Monday, February 2, 2015

अळवावरचे थेंब

"नाही, नाही, त्याचं कारण आहे फार सोपं झालं आहे सगळं आता.... " प्रणिताने मान मागे करुन पाहिलं.
तावातावाने पारकर काका आपलं मत मांडत होते.
"काय सोपं झालं आहे काका? " तिने उत्सुकतेने विचारलं.
"अगं तुमची सर्वांचीच मुलं अस्खलित मराठीत बोलतात ना त्यावरुन म्हणत होतो. "
"सर्वांची? "
"अगदी सर्वांची नाही पण निदान काही जणांची. काय आहे, आता मराठी शाळा आहेत, चित्रपट पहाता येतात,  गुगल आहेच.  एकूणच साधनांची उपलब्धता हाताशी अगदी सहज आहे त्यामुळे मराठी टिकवणं सोपं आहे असं म्हणायचं होतं. "
"पण काका महत्वाचं आहे ते घरी मराठी बोलणं. त्याचा आणि या साधनांचा काहीच संबंध नाही. " काका हसले.
"तू खुर्ची सरसावून बसलीस ना तेव्हाच आता मी तोंडघशी पडणार हे कळलं होतं. " प्रणिताबरोबर बाकी सारेच हसण्यात सामील झाले.
"खरं आहे तुझं पोरी. तेच राहून गेलं आमचं त्यामुळे मुलांची नाळ जोडली गेलीच नाही भाषेशी. या देशात आलो त्याला ३० वर्षाहून अधिक काळ लोटला. आलो तेव्हा गावात मराठी फक्त आम्हीच.  वाटायचं, या भूमीत वाढायचं तर इथलंच होऊन गेलं पाहिजे. आपोआप मुलांना तसंच वाढवलं गेलं.   जुनी वस्त्र काढून नवी चढवल्यासारखं आम्हीही सगळं अडगळीत टाकलं. भाषा, चालीरीती सारंच. आमचं जे झालं तेच बहुतेक जणाचं. मग हळूहळू मराठी माणसं वाढली, सांस्कृतिक जाणिवांचं भान आलं. पण तरीही ते मर्यादित राहिलं ते स्थलांतरित झालेल्या आमच्यासारख्यांपर्यंतच. इथेच जन्मलेली आमची मुलं कोरडीच राहिली. ती कधी कधी म्हणतात, आम्हाला आवडलं असतं मराठी बोलता आलं असतं तर तेव्हा काय गमावलं ते लक्षात येतं. त्यामुळे तुमच्या पिढीचं  कौतुक वाटतं. सारं जपून ठेवता आहात. प्रणिता तुझ्यामुळे मनातलं बोललो आज. एरवी थोडासा बचावात्मक पवित्रा घेतला जातोच नाही म्हटलं तरी. त्याचाच भाग होता तो सारं सोपं झालं आहे म्हणण्याचा. "  पारकर काकांनी तोंड फोडलेल्या  विषयावरच मग गप्पा रंगत गेल्या.

प्रणिता स्वत:वरच खूश होती. पारकर काकांनी केलेल्या कौतुकाने घरातलं मराठीपण टिकवण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं.  मुलींभोवतीच तिचं विश्व होतं. तिला जे मिळालं होतं ते आणि नव्हतं तेही मुलींना मिळावं यासाठी  धडपड चालू होती तिची. दोन्ही मुली अष्टपैलू होत्या. नाच, गाणं, चित्रकला, बुद्धिबळ, खेळ... काही येत नाही असं नव्हतं. मुलींनी अष्टपैलू होणं हे तिचं ध्येयच होतं.  धावपळ व्हायची पण हे युगच असं आहे. स्पर्धेचं. त्यात टिकायचं तर अभ्यासाबरोबर सारं काही जमायला हवंच म्हणून तिचे अथक प्रयत्न चालू होते. पारकर काकासारखं व्हायला नको. आपल्याकडून काही राहिलं म्हणून मुलांचे बोल नकोत, आपल्या मनात खंत नको. तिने स्वत:च्या मनाची पुन्हा पुन्हा खात्री करुन घेतली.  कुठे काही चुकतंय असं वाटलं नाही तेव्हा  तिला मनापासून आनंद झाला. कधी एकदा पारकर काकांशी झालेलं बोलणं  मुलींना आणि त्यांच्या बाबाला सांगतोय हे असं होऊन गेलं.

"पारकर काका कौतुक करत होते तुमचं. " प्रणिताच्या बोलण्यावर तितिशा आणि दिशाने प्रश्नार्थक चेहर्‍याने एकमेकींकडे पाहिलं.
"मराठी बोलता, लिहिता, वाचता ना दोघी म्हणून. " प्रणिताच्या आवाजातल्या उत्साहावर दोघींच्या नुसत्या हुंकाराने  पाणी पडलं. तरीही चिकाटीने तिने घडलं ते सांगितलं.
"मग? तुम्हाला दोघींना काय वाटतं? "
"तुला आम्हाला काय वाटतं ते खरंच ऐकायचं आहे? "
"नक्की. पण  पोचलो आपण तुमच्या गाण्याच्या वर्गापाशी. उतरा पटकन. नंतर बोलू. " गाडी थांबवत प्रणिता म्हणाली. तितिशा आणि दिशा दोघी हातातलं सामान घेऊन उतरल्या. त्यांचा सराव होईपर्यंत कामं उरकून घ्यावीत या विचाराने तिने गाडी वळवली. तासाभरात पुन्हा इथे यायला हवं. इथूनच दोघींना बास्केट बॉल खेळायला नेऊन सोडायचं. पुन्हा काहीतरी काम आटपून न्यायला यायचं. घरी जायला नक्की आठ वाजून जाणार. जाता जाताच वाटेत थांबावं कुठेतरी खाऊन घ्यायला. बाबासाठी काहीतरी न्यावं लागेल फक्त. कामांची, वेळेची  गणितं तिचं मन सोडवत राहिलं.

घरी आल्याआल्या ठरवल्यासारखं मुलींनी विषय काढला.
"सांगू आम्हाला काय वाटतं? "
सोफ्यावर निवांत बसून टी. व्ही. चं बटण दाबणारी प्रणिता गोंधळली.
"कशाबद्दल? "
"मगाशी तू विचारत होतीस ना? बाबा तू पण ऐक रे. " दोघींनी आईने जे गाडीत सांगितलं होतं ते सांगून बाबाला पण चर्चेत सामील केलं.
"आता आमचं मत सांगतो. पारकर काकांसारखं तुमचं पण चुकतंय. "  एकदम तोंडघशी पडल्यासारखं झालं.  प्रणिताला राग आला दोघींचा.   पण कसोशीने शांत रहात ती मुली पुढे काय बोलतायत ते ऐकत राहिली.
"म्हणजे मराठीचं नाही म्हणत. मराठीसाठी मुद्दाम काही करावं लागलंच नाही. पहिली ओळख मराठीचीच तर झाली आणि घरात आपण मराठीत बोलतो याचा आम्हालाच अभिमान वाटतो, जवळीक वाटते तुमच्याबद्दल. सार्‍याच मराठी बोलणार्‍यांबद्दल. पण बाकीच्या गोष्टींबद्दल आमची मतं मांडायची आहेत आम्हाला दोघींना. "  आई, बाबा काहीच बोलत नाहीत ते पाहून दोघी पुढे बोलत राहिल्या.
"शाळेत जायला लागल्यापासून आम्ही कधी घरी नसतोच. हे शिका, ते शिका, इतर भारतीय मुलांशी तुलना हेच असतं कायम.  सहावीत गेल्यापासून तर श्वास घ्यायलाही वेळ नाही अशी अवस्था झाली आहे.  आता, कॉलेजच्या प्रवेशासाठी हे करायला हवं, ते करायला हवं, शाळेच्या, मंडळाच्या कार्यक्रमात भाग घे, हे जमायलाच हवं, ते न करुन कसं चालेल. तितिशा करते म्हणून मी आणि मी करते म्हणून ती. तुम्ही तर अष्टपैलू नव्हता पण तरी हुशार आहात. आम्हा दोघींनाही सारखं काहीतरी करायला भाग पाडत असतेस तू आई. आणि बाबा तू पण. "
"ए, मला नका बुवा मध्ये पाडू. " वातावरणातला ताण हलका करण्यासाठी बोलला खरा बाबा. पण दोघी चिडल्याच.
"नको तेव्हा मजा करु नकोस बाबा. आज आम्ही सांगणारच आहोत आम्हाला काय वाटतं ते. "
"आई तू जशी दमतेस ना आम्हाला सतत इकडे तिकडे घेऊन जायला. तितक्याच आम्ही दमतो.  तुमच्या दोघांच्या अपेक्षेप्रमाणे आम्हाला यश मिळालं नाही, गोष्टी जमल्या नाहीत तर या विचारानेच निराश व्हायला होतं. आम्ही दोघी आताशी फक्त आठवीत आहोत आणि आमच्या कॉलेजच्या प्रवेशासाठी तुम्ही दोघं इतकी चर्चा करता, लोकांकडून माहिती मिळवता की  वाटतं पुढे शिकायलाच नको म्हणजे सारं काही आपोआप टळेल. एकदा एखादी तरी उन्हाळ्याची सुट्टी, शनिवार, रविवार असे हवेत की आम्ही फक्त  झोपा काढू. तुम्ही तुमच्या लहानपणीच्या गोष्टी सांगता ना तेव्हा आम्हाला तुमचा हेवा वाटतो.  आम्हाला तुमचं लहानपण हवं आहे.  खेळायचं आहे घराबाहेर तास न तास, भटकायचं आहे निरर्थक, सायकल दामटवायची आहे.  तुमच्याबरोबर पत्ते खेळायचे आहेत, गोष्टी ऐकायच्या आहेत, दंगा मस्ती करायची आहे, पदार्थ करायला शिकायचे आहेत. " प्रणिता आणि बाबा दोघंही आपल्या लेकींकडे पहात राहिले. इतकं साचलं होतं यांच्या मनात? दोघंही मूक होऊन गेले.
"खूप बोललो ना आम्ही. रागावलात? " दोघींनी गळ्यात हात टाकले. प्रणिताने डोळ्यातून येणारं पाणी लपवलं. कसनुसं हसून ती नकारार्थी मान डोलवत राहिली.
"आम्हाला ठाऊक आहे हे सारं तुम्ही आमच्यासाठी, आम्ही आयुष्यात पुढे यावं, यशस्वी व्हावं म्हणून करताय. पण आम्हाला काय पाहिजे ते कुणी विचारलंच नाही कधी, सांगायला गेलं तरी दुर्लक्ष किंवा आमचं चुकीचं हे पटवून देणं, तुमच्या दृष्टीने चुकीचं असलं तरी कधीतरी आमच्या मनासारखंही करुया ना. आई, बाबा आम्हाला तुमचा वेळ पाहिजे. तुमच्याबरोबर वेळ घालवायचा आहे आम्हाला. आपल्या चौघांना एकत्र करता येईल अशा गोष्टी करायच्या आहेत. पारकर आजोबांच्या हातून मुलांना मराठी शिकवायचं राहून गेलं तसं तुमच्या हातून, आम्हाला तुमचा वेळ आणि निर्णय स्वातंत्र्यं द्यायचं राहून गेलं आहे आई, बाबा. " प्रणिता आपल्या मोठ्या झालेल्या लेकींकडे पहात राहिली. अळवावरच्या थेंबासारखे निसटून गेलेले क्षण  परत आणणं शक्य नव्हतं पण पारकरकाकांमुळे आज मुलींनी त्याचं मन मोकळं केलं होतं, आपल्याला काय पाहिजे ते सांगितलं होतं. आता कुणाची इच्छा पूर्ण करायची हे ठरवायचं होतं. जमेल त्यांना काय हवं ते द्यायला? नकळत तिने बाबाकडे पाहिलं. तेच प्रश्नचिन्ह घेऊन तोही तिच्याकडे पहात होता.

मुलींच्या पाठीवर थोपटून तिने टी. व्ही. चालू केला आणि मेंदूचा ताबा विचारांनी घ्यायच्या आधीच त्या कार्यक्रमात डोकं खुपसलं.


मोहना जोगळेकर
बृहनमहाराष्ट्र वृत्तसाठी लिहित असलेल्या लेखमालिकेतील लेख.

 वृत्ताचा दुवा:
http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/BMM_Newsletter_Feb2015.pdf

6 comments:

  1. छान आहे कथा. मुलांशी कसंही वागलं तरी त्यांच्या मनात पालकांबद्दल एखादी अपेक्षा तरी राहूनच जाते...

    ReplyDelete
  2. खुप मोठया प्रश्णाला वाचा फोडलीस मोहना. या लहानग्यांचे बालपणच हरवून गेलय की काय असं आजुबाजुला पाहिले की वाटते. आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे ही भावना निश्चितच चांगली आहे , आजच्या काळात मुलांना सर्व गोष्टींसाठी तयार करणे ही काळाची गरज आहे यात शंकाच नाही तरी पण आपण च सुवर्ण मध्य गाठायला हवा. जगु दया त्याना कधी कधी त्याच्या मनाप्रमाणे..

    ReplyDelete
    Replies
    1. सुवर्ण मध्य गाठायला हवा. जगु दया त्याना कधी कधी त्याच्या मनाप्रमाणे.... Agadi Khare Anju!

      Delete
  3. अंजली यांच्या मताशी सहमत.
    गोष्टीरूपाने अंजन घालायची पद्धत पण आवडली मोहना :)

    ReplyDelete
    Replies
    1. अपर्णा धन्यवाद. बर्‍याच दिवसांनी!
      गोष्टीरूपाने अंजन... कुणा एकाच्यातरी ते गेलं आणि परिस्थिती सुधारली म्हणजे झालं :-).

      Delete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.