Thursday, January 22, 2015

स्वयंपाक

"आई, आज मी करते स्वयंपाक. " ऐकलं आणि पोटात गोळा आला.  लेकीला स्वयंपाकाची आवड लागल्यापासून इतक्या वर्षांच्या माझ्या मेहनतीवर पाणी पडणार याची लक्षणं नजरेसमोर यायला लागली होती.
परवाच तिने तारे तोडले होते. म्हणाली,
"किती सोप्पं असतं हे कुकिंग. " आधी आजूबाजूला पाहिलं. नवरा, मुलगा जवळपास नाहीत याची खात्री केली आणि म्हटलं,
"कुकिंग? मराठी शब्द शोध या शब्दासाठी. " हल्ली हे शस्त्र फार उपयोगी पडायला लागलंय.  तिचा मेंदू मराठी शब्दाच्या शोधाला निघाला आणि माझा काही काही गैरसमज तसेच रहाण्यासाठी काय करावं याच्या. नाहीतर काय,  कुकिंग सोप्पं आहे ही बातमी घरात प्रसारित झाली तर संपलं सगळं.  गेली कितीतरी वर्ष मी एकच पाढा म्हणतेय, माझं आयुष्य म्हणजे रांधा वाढा, उष्टी काढा... खरं तर प्रत्येकजण स्वत:चं ताट उचलून विसळून ठेवतो त्यामुळे उष्टी बादच आणि रांधणं किती होतं हा ही प्रश्नच. पण जे मिळतंय तेही बंद होईल या भितीने नवरा आणि रोजच्या रोज बाहेरचं खायला मिळतं या आनंदात मुलगा माझ्या ’रांधा वाढा... ’ चालीत सहानुभूतीचा सूर मिसळत आले आहेत. वर्षानुवर्ष. मुलगा तर जेव्हा जेव्हा एखादा पदार्थ करतो तेव्हा आज मी रांधा वाढा, उष्टी काढा करणार असंच म्हणतो. नवरा असलं काही करायच्या फंदात पडत नाही किंवा मीच त्याला त्यात उडी मारु  देत नाही कारण नवर्‍याने एखादा पदार्थ करायचा ठरवलं की  क्रम ठरलेला असतो. मी अत्यानंदाने सोफ्यावर फतकल मारते आणि त्याने काय आणि कसं करावं त्याचं मार्गदर्शन सुरु  करते. तो मी सांगेन त्यापेक्षा वेगळं काहीतरी कसं करायचं या विचारात पडतो. त्याच्या म्हणण्यानुसार त्यामुळे पदार्थाची चव नेहमीपेक्षा वेगळी लागते. म्हणजे बिघडते का असं विचारलं की दुर्लक्ष करुन अशा प्रयोगांनीच असंख्य शोध लागतात हे तो ठासून सांगतो. त्याला कसलातरी शोध लागून नोबेल प्राईज वगैरे मिळालं तर म्हणून मी माझी गाडी त्याच्या विचारशक्तीला खीळ घालत नेहमी पराठ्यावर आणून थांबवते.
"तू पराठे मस्त करतोस. तेच कर. "
"कसे करायचे? " आजतागायत तो हे चेष्टेने म्हणतो की त्याला हा प्रश्न खरंच पडतो ते समजलेलं नाही.  पण एका जागी बसून मी  घरात स्वयंपाकघर नावाचा एक भाग कुठे आहे,  बटाटे कुठे असतात, गॅसची शेगडी कुठे असते, झालंच तर लसणीचा कांदा वापर म्हणजे आपला तो नेहमीचा कांदा नव्हे रे, लसणीचा कांदा आणि नुसता कांदा या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत यावर बराच वेळ बोलते.  ते झालं की लसूण, मिरची सारं कुठे सापडेल त्याची दिशा बसल्या जागेवरून बोटाने दाखवते.  जिकडे बोट दाखवेन त्याच्या विरुद्ध बाजूला तोही ठरल्याप्रमाणे जातो. मग माझं कपाळावर हात मारणं, पुरुषांचा ’कॉमन सेन्स’ काढणं हे नेहमीचं काम मीही उरकते. एकेक करता करता  सारी सामुग्री एकत्रित झाली आहे असं वाटलं की पंजाबी मैत्रीणीने सांगितलं तसं कणकेत बेसन घालावं की घालू नये याचा खलही बराचवेळ चालतो. माझ्या आईचे पराठेच किती मस्त होतात आणि त्याची आई ते करते तरी की नाही यात अर्धा तास. शेवटी भूक लागली, भूक लागली असं मुलं कोकलत आली की तुझं ना हे असंच, चला आता बाहेरच उरकू  जेवण असं म्हणत कुठल्यातरी रेस्टॉरंटमध्ये जाणं. ह्या नेहमीच्या क्रमाला मुलंही सरावली आणि सोकावली आहेत. ती  रोजच बाबा करेल काहीतरी, बाबा करेल काहीतरी म्हणून मागे लागतात आणि त्यांचे बेत हाणून पाडायचेच, स्वयंपाकघरातलं वर्चस्व ढळू द्यायचं नाही अशी माझी प्रतिज्ञा असल्याने मी त्याला स्वयंपाकघरात शिरुच देत नाही. खरंच त्याला नोबेल प्राईज मिळालं तर?

माझं वर्चस्व मी इतकी वर्ष स्वयंपाकघरात अबाधित राखलं पण त्या कार्यक्षेत्रात अचानक मुलीची ढवळाढवळ सुरु झाली.  कार्टीने चांगलाच घोळ घालायला सुरुवात केली आणि आता इतक्या वर्षांनी माझं व्यवस्थापन कौशल्य सुधारावं लागणार अशी चिन्ह दिसायला लागली. सरकारी नोकर कसे वरिष्ठ आल्यावर जागे होतात त्याप्रमाणे लेक स्वयंपाकघरात शिरल्यावर मी खडबडून जागी झाले.
"हे बघ, तू कधीतरी करतेस आणि एखादाच पदार्थ करतेस ना म्हणून तुला सोप्पं वाटतं. रोज करायला लागलीस की काही सोपंबिपं वाटत नाही. "
"असं कसं? कोणत्याही गोष्टीची सवय झाली की सगळं सोपं वाटतं असं तूच तर सांगतेस. मग स्वयंपाक पण आणखी सोपा वाटायला पाहिजे. अय्याऽऽ म्हणजे तुला सवय झालीच नाही स्वयंपाकाची? " मोठा शोध लागल्यासारखा आविर्भाव करत ती म्हणाली. लावा शोध नी मिळवा नोबेल प्राईज घरातल्या सगळ्यांनीच.  ही मुलं तरी ना, नको तेव्हा अक्कल कशी पाजळायला शिकतात  देवजाणे. त्यातून मुली अधिक. घरातल्या दोन पुरुषांनी माझं डोकं खरंच इतकं कधी खाल्लं नव्हतं. काय म्हणेन त्याला मान डोलवून मोकळे होतात.  बर्‍यांचदा ती मान होकारार्थी आहे की नकारार्थी आहे तेही कळत नाही. पण ते कसं न ऐकता मान डोलवतात तसं मीही न विचार करता माझं पटलं म्हणून त्यांनी मान डोलवली आहे असंच गृहीत धरते. तर ते जाऊ दे, वेगळा, स्वतंत्र आणि मोठा विषय... मी पुन्हा लेकीकडे वळले,
"अगं मला म्हणायचं आहे की तू एखादाच पदार्थ करतेस ना म्हणून तुला सोप्पं वाटतं. मी बघ, रोज भात, भाजी, आमटी, पोळी, चटणी, कोशिंबीर, झालंच तर ताजं ताजं लोणचं, काहीतरी गोड... " ती नुसतीच बघत राहिली.
"काय झालं? "
"तू किती पदार्थांची नावं घेतलीस. "
"हो, मग? "
"पण एक दिवस आम्ही फक्त पोळी भाजी खातो आणि एक दिवस फक्त आमटी, भात. तू म्हणतेस साग्रसंगीत फक्त सणासुदीला. " एव्हाना नवरोजी प्रवेश करते झालेले असतातच.
"सणासुदीला पुरणपोळी, गुळपोळी, बासुंदी, श्रीखंड असं करतात पिल्ल्या. "
"हे काय असतं? " लेकीच्या चेहर्‍यावर मोठ्ठं प्रश्नचिन्ह, नवर्‍याला खावं की गिळावं या पेचात मी. तितक्यात बच्चमजींचा प्रवेश.
"भारतात गेलो की नाही का आपण खात आजीकडे... " युद्ध हरणार असं दिसताच मी व्यवस्थापन कौशल्य पणाला लावलंच.
"हे बघा, आपण मूळ मुद्द्याकडे वळू या. तुला स्वयंपाक करायचा आहे आज असं म्हणत होतीस ना? " लांबलचक वाक्य टाकलं की आधी काय चालू होतं ते सगळी विसरतात.  मी थोडं थांबून तो परिणाम साधल्याची खात्री केली आणि म्हटलं,
"मला काय वाटतं आज तुमच्या बाबालाच काहीतरी करु दे. " आता त्याची माझ्याकडे पहाण्याची नजर  खाऊ का गिळू अशी. मुलं एकदम खूश.
"चालेल, चालेल, बाबा तूच कर. "
मी एका दगडात दोन तीन पक्षी मारल्याच्या  आनंदात  नेहमीप्रमाणे त्याला मार्गदर्शन करायला सोफ्यावर विराजमान होते...

12 comments:

 1. Mast mala tuz likhan khup aawadat.dolyasamor chitra ubh rahat.lihat raha...

  ReplyDelete
 2. छान ...सुरेख

  ReplyDelete
 3. Replies
  1. इंद्रधनू - धन्यवाद. खूप दिवसांनी उगवलीस :-)

   Delete
 4. Too good..khupch chan.. Mi tumchya. Blogchi fan Zale ahe

  ReplyDelete
  Replies
  1. Aditivb - Thank you very much. I am glad you read my blog posts.

   Delete
 5. khupach chhan lekh ga Mohana :) tuze sagle vinodi lekh mala khupach aavadtat. dolyasamor chitra ubhe rahate ! mazyakade vi kadhich kahihi karat nahi, kahi vela mala bare nhavte tevha kele hote arthat mazya margdarshana khali, asach ek lekh aamchya gharatla lihava ki kaay ase manat yet aahe :) hahaha,

  ReplyDelete
  Replies
  1. तुला लेख आवडला हे वाचून आनंद झाला. आता तूही लिहून टाक तुमच्या घरातल्यावर एखादा लेख :-). विनोद म्हणून आमच्या नवरोजीना मी बदनाम करते पण तो अतिशय उत्तम स्वयंपाक करतो आणि मी पण (?) असं मला वाटतं. हा हा :-)

   Delete
 6. मोहना, एकदम जहबहरदस्त झालयं. :) :) :)
  माझ्या मुलाला आजकाल किचनमध्ये हेल्प करायची असते आणि त्याने मला प्लानिंगमध्ये नसलेलं बेकिंग करावं लागेल या विचाराने काटा येतो. jeव्हा-केव्हा तो "स्वयंपाक" या शब्दापर्यंत पोचेल तेव्हा काय होईल माझं याची चुणूक मिळतेय तुमच्यासारख्या अनुभवी आई मंडळीकडून आणि अवांतर आता मला कळतय माझ्या आईने कधीच मला स्वयंपाक का नाही शिकवला ते ;)

  ReplyDelete
  Replies
  1. अपर्णा,
   :-). माझ्या लेकीलाही सारखं काहीतरी ’बेक’ करायचं असतं. इथे आमची ’वजनं’ कमी करायची धडपड आणि हिचे सारखे ’बेक’ बेत. १० वर्षांची आहे फक्त आणि इतकी ढवळाढवळ चालू असते ना. पण अगदी खरं सांगू का विनोद सुचतो म्हणून लिहिलं ते सारं. नाहीतर तिला असं मन लावून पदार्थ करताना पाहायला मजा येते. तिला सुरुवातीपासूनच पाककृती वाचून साहित्य एकत्र करणं, कचर्‍यासाठी भांडं तिथेच बाजूला ठेवणं अशा गोष्टी शिकवून टाकल्या आहेत मी त्यामुळे चिडचिड होत नाही आणि तिने केलेल्या कुकीज, ब्राऊनीजवर ताव मारता येतो. मुलगाही प्रयोग करत असतो. त्यामुळे मुलाला मदत करु दे . हळूहळू पद्धतशीर मदत करायला शिकव (थोडी मानसिक तयारी करावी लागते मात्र). पुढे तुलाच उपयोग होईल, जसा मला होतोय:-)

   Delete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.