Saturday, March 26, 2016

जग

मुलाने कागद पुढे केला. चित्र विचित्र नावं पाहून मी बुचकळ्यात पडले.
"ही तुझ्या मित्रमैत्रींणीची नावं आहेत का?" कुठली अज्ञानी आई आपल्या पदरात पडली अशा नजरेने त्याने माझ्याकडे पाहिलं आणि काय नावं ही हल्लीच्या मुलांची अशा नजरेने मी त्याच्याकडे.
"जिबुटी, पापुआ न्यू गुनिआ,  नाउरु... अरे हे सगळे मित्र मैत्रीणी येणार आहेत का तुझ्याबरोबर जग प्रवासाला?" त्याचे गरागरा फिरणारे डोळे तो थांबवेना. त्यामुळे मी विषय विसरुन म्हटलं,
"थोबाडीत देईन आता असे डोळे फिरवलेस तर." त्याने डोळे फिरवणं थांबवलं आणि गुरगुरत विचारलं.
"तुम्ही तुमच्या आई - वडिलांवर भडकलात की डोळे फिरवत नव्हता?"
"पुटपुटायचो." लगेच नवर्‍याने  तोंड खुपसलं. ह्याला बाई एक वेळेवर खोटं म्हणून बोलता येत नाही. पटकन बाजू लढवत मी म्हटलं.
"आमची नव्हती हिंमत. आणि आम्ही फिरवले असते तर त्यांनी कायमचे ते फिरवूनच ठेवले असते." त्याला फार काही कळलं नसावं.
"मग काय करायचात?"
"आम्ही तुमच्यासारखे चक्रम नव्हतो. त्यामुळे तशी वेळच आली नाही कधी."
"आम्ही म्हणजे कोण?" तो गोंधळला.
"मी."
"मग तू तुला ’आम्ही’ का म्हणतेस?" तू तर सांगितलं होतंस राजे- महाराजे, पेशवे असं करायचे.
"माझ्या अख्ख्या पिढीची बाजू मांडताना मी स्वत:ला आदरार्थी संबोधते." पुन्हा एकदा त्याच्या सगळं डोक्यावरुन गेलं असावं. पण हल्ली तो फार वेळ जातो म्हणून प्रत्येक शब्दाचा अर्थ विचारत नाही. सारांश शोधून काढतो.
"हो का?" त्याच्या त्या हो का तून तो काहीही ऐकत नव्हता हे मला कळलं. पण आता मलाही त्या विचित्र नावांच्या मुलामुलींमध्ये रस जास्त होता. पोरगा नक्की कुणाबरोबर उंडारतो हे तर कळायला हवं ना."
"ते जाऊ दे. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस." मी विषय पुन्हा योग्यं ठीकाणी वळवला. काहीतरी गौप्यस्फोट करणार असल्यासारखं त्याने घरातल्या इन मिन तीन माणसांकडे पाहिलं आणि दवंडी पिटवल्यागत ओरडला,
"ती देशांऽऽऽऽची नावं आहेत." माझा चेहरा इमोजी मधल्यासारखा भयानक, आश्चर्यचकित वगैरे  झाला.  तेवढ्यात त्याने विचारलं.
"तुला जिओग्राफी विषय नव्हता का शाळेत?" मुलगी ओरडली.
"अरे, भूगोल म्हण. नाहीतर आईचं पुन्हा सुरु होईल." नुकतीच होळी झाली होती पण दोघांच्या मानगुटीला धरुन त्यांना रंगीत पाण्यात बुचकळून काढावसं वाटलं.
"भूगोल विषय नव्हता तुला?" त्याने बहिणीचं मुकाट ऐकलं.
"शिक्षक चांगले नव्हते आमचे."
"तू पुन्हा तुझ्या अख्ख्या पिढीबद्दल बोलतेयस का? " ऐकत होता म्हणजे कार्टा आधी.
"हो. हे बघ आम्हाला त्यांनी सांगितलेले देश आम्ही पाठ केले होते. भूगोलात पहिली येत होते मी शाळेत." दोन्ही मुलं पोट धरुन हसायला लागली. त्यात इतका वेळ बर्‍यापैंकी तटस्थाची भूमिका घेतलेला नवराही शिरला.
"आईचं ना नाचता येईना अंगण वाकडं झालंय." खाऊ का गिळू नजरेने मी मुलीकडे पाहिलं. ही एक  मराठीच्या वर्गात बसते आणि मी शिकवलेल्या म्हणी माझ्यावरच वापरते.
"आणि तरी ती तू केलेल्या पोळ्यांना भूगोल झालाय असं म्हणते." तिघांनी एकमेकांना उत्स्फुर्तपणे जोरदार टाळ्या  दिल्या.  मी मात्र तिघांकडे बघून डोळे गरागरा फिरवले.

4 comments:

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.