Sunday, December 18, 2016

पो पो

चौकात गाडी उभी केली. लाल दिवा हिरवा व्हायची वाट पहात होते. गाडीत  पोरं, म्हणजे दोनच आणि नवरा कोंबलेला. हीऽऽऽ बडबड प्रत्येकाची. काय झालं कुणास ठाऊक पण डावीकडे वळण्याचा दिवा चमकत होता आणि मी गाडी नेली सरळ.
"आई.....लाल वरुन नेलीस गाडी."
"पकडलं तुला कॅमेर्‍यात."
"आता येईल पत्र, भरा पैसे." नवरा आणि मुलगा दोघांच्या आवाजात आनंद मावत नव्हता. एकाच्या मनात सुडाचा आनंद, तर एकाला फुकट करमणुक असा मामला.
"अरे गाढवानो, अपघात नाही झाला ते सुदैव समजा. मला तिकीट मिळणार याचाच आनंद तुम्हाला." हे माझं पहिलंच तिकीट असणार होतं त्यामुळे नव‍र्‍याला मिळालेल्या तिकीटाचा पाढा माझ्यावर गाडी घसरायच्या आधीच मी घडाघडा म्हणत दु:खद विधान टाकलं.
"तुझ्यामुळे इन्शुरन्स वाढला आहे."
"आता तू भर घालते आहेस.  सारखी माझ्या ड्रायव्हिंगच्या नावाने खडे फोडायचीस ना. बघू या तुमची मजा." त्याच्या हातात चांगलंच कोलीत मिळालं होतं.
दुसर्‍या दिवसापासून माझा बराचसा वेळ पोस्टमन कधी येतो त्याची वाट पहाण्यात जायला लागला. धावत पळत जावून पत्रपेटी उघडायची ही घाई उडे. महिना झाला तरी प्रेमपत्र आलं नाही. नवरा आणि मुलगा दोघांनाही फार दु:ख झालं. नवरा तर तिकीट देणार्‍या माणसांना शोधायलाही निघाला. कसंबसं थोपवलं त्याला तरी म्हणालाच,
"कासवाच्या गतीने चालवतेस म्हणून मिळत नाही कधी तुला तिकीट. च्यायला, एक संधी होती तीही घालवली या लोकांनी. कॅमेरे नीट तपासत नाहीत लेकाचे."
"माझी गती काढू नकोस. तू सशाच्या वेगाने जातोस आणि मग लागतात पोलिस मागे."
"मी बाकीच्या गाड्या जेवढ्या वेगात जात असतात त्यांच्यामागून जातो."
"पण पोलिस तुलाच का पकडतो? बाकिच्या गाड्यांना का नाही?"
"ते तू पोलिसांना विचार."
"तू सगळ्या गाड्यांच्या पुढे जात असशील. मागून वरात गाड्यांची. लिडींग द ट्रॅफिक म्हणतात त्याला." त्यावर जास्त वाद घालण्याच्या फंदात न पडता कधी ना कधी बायकोला तिकीट मिळेल या आशेवर त्याने तो विषय सोडून दिला. 

मध्ये बरेच दिवस गेले आणि एका सुप्रभाती आम्ही सफरीला निघालो.  वहातूक फार नव्हती.  रस्त्यावर वाहनच नाहीत म्हटल्यावर मला चेव चढला. नाही तरी कधीतरी सशाची गती मलाही दाखवून द्यायचीच होती. मी गाडीचा वेग एकदम वाढविला. नवरा अचंबित झाला, मुलगा ताठ होवून बसला. मुलीने देहाभोवती आवळलेला पट्टा हाताने घट्ट धरला.
"अगं, अगं सावकाश चालव. घाई नाही आपल्याला."
"आता का? कासवाची गती ना माझी?" पुन्हा मी पाय जोरात दाबला. गाडी जीव घेवून पळायला लागली. पाचावर धारण बसल्यासारखी शांतता गाडीत पसरली.  आजूबाजूच्या थोड्याफार गाड्या किती सावकाश जातायत असा तुच्छ कटाक्ष प्रत्येक गाडीला देत मी मैलांचा हिशोब  करत होते. अजून दहा मैल. थोडा वेग वाढवला तर पाच मिनिटात मुक्कामाला. दोन तासाचं अंतर जेमतेम दिड तासात. गाडीच्या वेगामुळे की धास्तीने कुणास ठाऊक  सर्वाचाच डोळा लागला. माझा आत्मविश्वास दुणावला. सशाची गती माझ्यातही येवू पहातेय या कल्पनेनेच मी खुष झाले.

 त्या दिवशीची ती सफर माझ्यादॄष्टीने स्वर्गसुखाची झाली. कासवाने कवच टाकलं, आत्मविश्वसाने कळस गाठला. मला परवाना काही सरळ मिळाला नव्हता.  त्याचं असं झालं, मी खूप सराव केला,  परिक्षक कोणत्या मार्गावरुन नेतात तिथे तिथे जाऊन गाडी चालवली. पण दरवेळेस हात हलवत परत. तिसर्‍यावेळेला त्याच सदगृहस्थांना परत बघितल्यावर  आधी लाच द्यायचा प्रयत्न करायचा, ते नाही जमलं तर धमकी असा माझा बेत ठरला. पण  मला बघितल्यावर तेच घाबरले.
"ही आपली शेवटची भेट ठरो." मला कसंनुसं हसायचं होतं पण त्यांची उडालेली भंबेरी बघून खो खो हसायलाच यायला लागलं.
"मॅम, आर यू ओके?" माझा मानसिक तोल ढळला असावं असं वाटलं बहुधा त्यांना. तरी बसले बिचारे बाजूला. मान हलवत मी गाडी आवारातून बाहेर काढली.  जे काही करायला सांगितलं ते नीट केलं.
"लेफ्ट, लेफ्ट...." विचाराची साखळी त्यांच्या कर्कश्यं सूचनेने तुटली आणि मी गाडी धाडकन डावीकडे घातली.
"आय आस्कड यू टेक लेफ्ट टर्न."
"आय वॉज गोईंग टू"
"थॅक गॉड, अग महामाये (एका विशिष्ट पद्धतीने मॅम म्हटलं की ते ’महामाये’ असतं)  डावीकडे वळवताना गाडी डावीकडे वळण्याच्या लेनमध्ये न्यायची असते."
"ओऽऽऽ" एवढाच उद्गगार निघाला माझ्या तोंडून. अतिशय सुतकी चेहर्‍याने त्यांनी माझ्या हातात  परवाना सुपुर्त केला. माझं चालनकौशल्यच इतकं की धमकी, लाच असे आपली पातळी खाली आणणारे प्रकार करावेच लागले नाहीत. त्या परवान्याची कुणालाच खात्री नसल्यामुळे माझी गती इतके दिवस कासवाची होती पण आता मात्र उठलं की चालवायची गाडी आणि घुसवायची कुठेही हे सत्र मी चालू केलं.
 आजही तसचं झालं. बाहेर पडायचं म्हटल्यावर किल्ली घेण्यासाठी मी धावले. पण आज किल्ली नवर्‍याच्या हातात होती.
"फाटली वाटतं आता. स्वत: शर्यतीत भाग घेतल्यासारखा चालवतो तेव्हा?" मी पुटपुटले.
"पुटपुटू नकोस" त्याने गाडीचं दार जोरात आपटलं. मी खुषीत ड्रायव्हरच्या बाजूची जागा अडवली. मुलगा चरफडत मागे बसला. बाजूलाच बसायचं म्हटल्यावर गप्पा मारायचे विषय  सुचायला लागले. तितक्यात नवर्‍याने एम. एस.. सुब्बलक्ष्मी लावली.
"३० मिनिटं, १० सेंकद गेले आता." मुलाचा हिशोब.
"असा काय काढते ती आवाज?" मुलगी वैतागली.
"लोकांना गप्प करुन टाकायचा मार्ग." मी ही टोमणा मारला.
मुंबईच्या लोकलमध्ये चढल्यासारखी आवाजांची गर्दी उडाली गाडीत. नवरा  सुब्बलक्ष्मींबरोबर स्तोत्र म्हणायला लागला आणि  सगळं शांत झालं. मुलाच्या कानात यंत्राद्ववारे गाणी शिरली. मुलीने डोकं पुस्तकात खुपसलं. मी एकटीच निरुद्योगी.  कुणी गाडी चालवायला बसलं की माझा जीव धोक्यात आहे ह्या कल्पनेने छाती धडधडते, कापरं भरतं.  मी बसले होते तिथे नसलेला ब्रेक मी पायाने दाबायला लागले. तो दाबतानाच  उजव्या हाताने वरची कडी घट्ट धरली. डाव्या हाताने खाली बस, खाली बस अशी आपण खुण करतो ना तशी खुण करत राहिले, म्हणजे तुझा वेग कमी कर अशा अर्थाने. काही परिणाम दिसेना.
"यापेक्षा मी चालवते गाडी" म्हटल्या म्हटल्या नवरोजींचा हात स्टेअरिंग व्हिलवर घट्ट दाबला गेलेला दिसला मला. गाडीचा वेग अचानक नको तितका वाढला. माझ्या अंगविक्षेपानी तो हळूहळू भडकत चालला होताच. त्यात मी गाडी चालवते म्हणणं म्हणजे त्याच्या भिक्कार ड्रायव्हिंगला  आणखीनच भिक्कार म्हटल्यासारखं झालं ना?
" अरे, अरे, घासटणार ती गाडी आपल्याला. तू लेनच्या बाहेर गेला आहेस." मी दोन्ही कानावर हात घेऊन किंचाळले, त्यामुळे मला सोडून सर्वाना प्रचंड दचकायला झालं. 
"मॉम इज सच अ हॉरिबल पॅसेंजर" वर तोंड करुन मुलगा.
" शी ओनली नोज हाऊ टे येल अ‍ॅड स्क्रिम." कन्यारत्नाने तारे तोडले.
 आता नवर्‍याचं ड्रायव्हिंग सुधारु की मुलांना सरळ करु? 
एव्हांना नवरोजींनी पुन्हा आपला वेग वाढवला.
" अरे, इथे पोलिस लपलेला असतो." असं बिनदिक्कत विधान करुन मोकळं व्हायचं हे  अनुभवाने जमलेलं तंत्र वापरलं.  बायको खोटं सांगतेय हे ठाऊक असलं तरी प्रतिक्षिप्त क्रिया होवून आपोआप वेग कमी झाला. गाडीचा वेग कमी करता करता एकदम माझ्या नवर्‍याला पुढच्या कुठल्या तरी गाडीत त्याचा मित्र असल्याचा भास झाला. बिचार्‍याला माझ्यावरुन लक्ष उडवणं आवश्यक वाटत असावं. झालं, त्याची गाडी पुढे आमची गाडी त्याच्या मागावर. वेग वाढत गेला आणि एकदम आमच्या मागे दिवे फाकफुक करायला लागले. मुलाने यंत्र काढलं. मुलीने पुस्तक बाजूला ठेवलं. मी अंग आक्रसून घेतलं.
"बाबा, तुला पकडायला आला." मुलगा आनंदातिशयाने.
आरशातून मागे बघत  गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवत  नवरा म्हणाला,
"आता हा विषय पुरे. यावर चर्चा नको."
विषय सुरुच झाला नव्हता मग आधीच चर्चा कशी बंद करायची? पण आत्ता काही बोलले असते तर त्याने मलाच पोलिसाच्या ताब्यात देवून टाकलं असतं. नवर्‍याच्या मागे पहिल्यांदा पोलिस लागला तेव्हा त्याला समजेचना आपण काय करायचं  ते. तो आपला पोलिसाला पुढे जायला द्यावं म्हणून आणखी जोरात चालवायला लागला.  चकाकत्या दिव्यांबरोबर आवाजही सुरु केले  पोलिसाने. शेवटी दोघंही थांबले.
"थांबवायची असते गाडी दिवे चमकताना दिसले की." पोलिस चांगलाच गोंधळला होता. नवर्‍याच्या डोळ्यासमोर दिव्यांऐवजी काजवे चमकले असावेत.
"घाबरायला झालं, म्हटलं रस्त्यात थांबवली तर ओरडाल म्हणून थांबवायची जागा शोधत होतो."
 त्यानंतर बरीच तिकीटं जमा झाली होती. हे कितवं ते मोजून त्याला सांगणार तर त्याने चर्चा नको म्हणून आधीच विषय गाडून टाकला. मुकाट्याने डोळे मागून येणार्‍या पोलिसाकडे वळवले. तेवढ्यात मी नवर्‍याला म्हटलं.
"वेगात चालवतोय हे कळलंच नाही असं म्हटलं की पोलिसांना दया येते असं ऐकलंय. बघ सांगून."
तितक्यात पोलिसमहाशय आले.
"काय कसं काय? कुठे जाऊन आलात? बरे आहात ना?" ततपप करत नवर्‍याने उत्तरं दिली. गाडीतले आम्ही सगळे फार सज्जन असल्यासारखे मुग गिळून बसलो होतो. कशाला उगाच मधे पडा, नाही का? नवर्‍याने  विचारलं नसतानाही वेगात चालवतोय हे कळलंच नाही असं आधी सांगून टाकलं आणि लगेच आरशातून एक काम उरकल्यासारखं त्याने मागे नजर टाकली. माझ्याही डोळयात  शाबासकी मावत नव्हती.
पोलिसाने ड्रायव्हिंग लायसन्स मागितलं, काहीतरी वाचलं आणि एकदम म्हणाला,
"वॉव, वुई आर मिटींग अगेन."
मला  ओशाळल्यासारखं झालं. पुन्हा पुन्हा त्याच पोलिसाकडून तिकीट की काय? एकाच माणसांकडून घ्यायची तरी कितीवेळा. संकोच वाटतो ना.
तेवढ्यात तो म्हणाला.
"मी आलो होतो तुमच्या घरी."
आता मात्र माझ्या अंगात उत्साह संचारला.
’अगबाई? हो का? केव्हा? आठवत नाही.’ वगैरे म्हणावसं वाटत होतं पण हे सगळं मनात भाषांतरीत करुन इंग्लिशमध्ये तोडांवर येण्याआधी तोच म्हणाला
"तुमच्याकडे चोरी झाली तेव्हा."
जळल्लं मेलं ते लक्षण. तेव्हा आला होता होय. चोरी म्हणजे काय तर आमचा जुना पुराणा फ्रीज आम्ही गराजमध्ये ठेवला आहे. गराजचं दार सतत उघडं. फ्रिजमधले मसाले सोडून सगळं गेलं. म्हणजे चोर अमेरिकनच. समोरचे, मागचे, येणारे जाणारे असे तर्क वितर्क करुन झाले. शेजारी पाजारी कोण कोण आपल्या डोळ्याला डोळा देत नाहीत याची यादी काढली.  पण चोरी कधी झाली होती याचाच अंदाज नव्हता त्यामुळे पाच पंचवीस डॉलर्स साठी कुठे पोलिस तक्रार. चोराच्या मागे लागायचं नाही असं ठरवलं.  पण आमच्या अमेरिकन शेजारीणीने भरीला घातलं आणि आम्ही तक्रार नोंदवली. पोलिस घरी आल्याचा काय तो आनंद. त्यांनाही अशी गिर्‍हाइकं क्वचितच मिळत असावीत. मुलीने आपल्या बोटाचे ठसे त्यांना घ्यायला लावले. मी आभार म्हणून आपला भारतीय चहा पाजला. प्यायले बिचारे. पण तो अन्याय विसरता आला नसावा बहुधा त्या पोलिसाला. म्हटलं हा दंड दुप्पट करतोय की काय वचपा म्हणून?
"मी तिकीट देत नाही. इशारा देवून सोडून देतो. पण सावकाश चालवा. चहा प्यायला येवू कधीतरी. " त्याने मागे बघून म्हटलं
’माझ्यासारखा चहा होतच नाही बाई कुणाचा’ मी आनंदाने चित्कारले. नवर्‍याला वाटलं, तिकीट टळल्याचा आनंद.
"आपण अगत्याने केलं ना त्यांचं आपल्या घरी आले तेव्हा, म्हणून सुटलो." मी अभिमानाने म्हटलं,
"कदाचित मी म्हटलं वेगात जातोय ते कळलच नाही तेही कारण असेल." नवरा म्हणाला. त्यातलं कुठलं खरं यावरुन घर येईपर्यत आमचं वाजलं. 

त्या दिवशी तिकीट पदरात न पडल्याच्या समाधानात घरी आलो. थोडे दिवस गाड्या सरळ धावल्या, म्हणजे चाकाच्या आणि आमच्या वागण्याच्याही.  पण आता माझे माझ्या आयुष्यातले तिकीट मिळण्याचे दिवस पापाचे घडे भरत आल्यासारखे जवळ येत चालले होते. अखेर तो दिवस आलाच.

नेहमीप्रमाणे सावळ्या गोंधळात चौकडी गाडीत स्थिरावली. माझ्या हातात सारथ्य होतं. मी ते कुशलतेने पार पाडत होते. जवळजवळ दिड तास सुखरुप पार पडला आणि शत्रुपक्षाने मात केली. अचानक माझ्या मागे लांबवर दिवे चमकायला लागले.
"कोण चालवतंय इतक्या वेगात? तू तर बाजूला बसला आहेस. कोण सापडला बकरा सकाळी सकाळी." मी उत्साहाने म्हटलं. वर्षानुवर्ष मी हे दृश्य पहातेय. पोलिस माझ्या गाडीच्या बाजूने दिवे चमकवत जातात. पुढे जावून कुणाला तरी पकडतात. मग मुलगा किंवा नवरा म्हणतो,
"परत येताना तो तुला थांबवणार आहे."
"का?" मनात नसतानाही पटकन प्रश्न तोडांतून बाहेर पडतोच. मग नवरा आणि मुलामध्ये नेत्रपल्लवी. तू सांग, तू सांग  असा एकमेकांना दिलेला धीर.
"सावकाश चालवतेस ना म्हणून तिकीट द्यायला. एका दगडात दोन पक्षी पोलिसाला."  मुलगा पटकन सांगून टाकतो. प्रत्युत्तर ऐकायचं नसतंच, त्यामुळे आपण त्या गावचे नसल्यासारखं करत बाहेर बघायला लागतो. आत्ताही तसंच काहीतरी असणार. पोलिस दुसर्‍या कुणाला तरी पकडणार याची मला शंभर टक्के खात्री. मी आजूबाजूला कोण गाडीला ब्रेक नसल्यासारखं चालवतंय ते बघण्यासाठी नजर टाकली.
"यावेळेस बकरा नाही बकरी."  नवर्‍याच्या आवाजातल्या गर्भित अर्थाने माझी पाचावर धारण बसली. उजवा हात स्टिअरिंगवर घट्ट दाबत, डाव्या हाताने मी त्याला ओढायला सुरुवात केली.
"अग ओढतेस काय मला?"
"तू बस ना माझ्या जागेवर. तुझा अनुभव दांडगा आहे पोलिसांच्या बाबतीतला." त्याच्या अनुभवाला इतकी किंमत दिलेली पाहून नवरा एकदम हळवा हळवा झाला.
"चालत्या गाडीत कसा येऊ मी तिकडे. घाबरु नकोस. मी आहे ना."
माझ्या गुन्ह्याचं पातक नवरा अंगावर घेत नाही म्हटल्यावर हात, गाडी, पाय सगळं गार गार पडलं.
"अरे, आता करु काय? थांबवू कुठे? कुठे थांबवू गाडी...?" ओरडता ओरडताच मी भररस्त्यात करकचून ब्रेक दाबून गाडी थांबवलीही. मागे लागलेला पोलिस हाताने खुणा करायला लागला. कसं मॅनेज करतात कोण जाणे हे पोलिस. एकाचवेळी कुणाच्या तरी मागे लागायचं, दिवे लावायचे, आवाज सुरु करायचे, खाणाखुणा... पोलिसांचं एकदम कौतुकच वाटायला लागलं मला. गाडीचे चकाकते दिवे, कर्कश्य आवाज, इतक्या लांबून तावातावाने  चाललेले  हातवारे आणि विचारलेल्या प्रश्नाला कधीही वेळेवर उत्तर न देणारा नवरा... फार काही एकाचवेळी घडत होतं.  शेवटी माझ्या लक्षात आलं की गाडी रस्त्याच्या कडेला उभी करण्याच्या त्या खाणाखुणा आहेत. खड्ड्यात जाणार नाही अशा बेताने गाडी थांबवली.
हाय, हाऊ आर यू त्याने मला विचारलं, मग मीही त्याला तेच विचारलं. पकडायला येतात आणि ख्यालीखुशाली का विचारतात कोण जाणे.
"इज देअर एनी रिझन यु वर स्पिडींग?"
मी रडायलाच लागले.
"मॅम, मॅम..." त्याच्या आवाजातल्या मृदुपणाला दाद म्हणून मी धाय मोकलून रडायला सुरुवात केली. क्षणभर शांतता पसरली. मला वाटलं माझं रडणं चांगलं परिणामकारक आहे. तितक्यात त्याने एकदम आवाज चढवला.
"व्हाय आर यु क्राईंग?"
"अं?" हा तर माझ्या नवर्‍याच्या वरताण निघाला. रडणार्‍या बाईला असं दरडावतात का?
"यु डिडंट रिअलाईज यु वर स्पीडींग?"
मला पुन्हा एक उमाळा आला. किती बाई मनातलं ओळखलं. तोंड उघडून सांगायचीही आवश्यकता भासली नाही. मी डोळे पुसत हसर्‍या चेहर्‍याने पाहिलं.
"ओल्ड ट्रिक्स मॅम. यु वर १० माईल्स ओव्हर.  लायसन्स, रजिस्ट्रेशन प्लीज." कुसकटपणाची हद्दच झाली की. नवर्‍याने पुढे होवून सगळी कागदपत्र त्याच्यापुढे केली.
तो परत आपल्या गाडीत जाऊन बसला. आम्ही न बोलता एकमेकांकडे पहात, ताटकळत. जे काही होणार होतं ते ’तो’ गेल्यावर.  बराचवेळ आकडेमोड झाली. एक कागद माझ्या हातात आला.
"हॅव अ नाईस डे" जखमेवर मीठ चोळत महाशय निघून गेले.
कागद उघडून बघितला.
दोनशे सत्तावीस डॉलर्स दंड. कागदाचा बोळा करुन बाहेर भिरकवावा असं  वाटलं. पण बोळे फेकून देऊन दंड भरणं कसं वाचणार?
"कोर्टात जावून विनंती करता येते. पहिलंच तिकीट असेल तर फक्त कोर्टाची फी घेवून बाकी माफ करतात." माझं रडणं, उतरलेला चेहरा पाहून नवरोजीनी सल्ला दिला.
"तू बाबाला घेवून जा बरोबर. तो सांगेल तुला नीट." मुलगाही एकदम सुतासारखा सरळ आला आणि अखेर मी कोर्टाची पायरी चढले. आयुष्यात प्रथमच.

कोर्टाची पायरी:
चढण्याची दोन आठवडे जोरदार तयारी केली. नवरा जज्ज, मुलगा वकिल आणि मुलगी माझ्या सोबतीला असा सराव रोज चालायचा घरात.  करायचं काय?  दोषी म्हणून मान्य करुन दंड कमी करा, इन्शुरन्स कंपनीला कळवू नका अशी विनंती करायची. सराव पूर्ण झाला आता नाटकाचा दिवस. कोर्टात पोचलो तर ही गर्दी. काही माझ्यासारखे बावचळलेले, काही सराईत, काही हातापायावर ट्यॅट्यु  असलेले तर काही घसरणारी पॅट सावरणारे. बरेच होते. एकूण सतराशे पन्नास! खरचं, वकिलच म्हणाले आज जरा जास्त गर्दी आहे, सांभाळून घ्या. सर्व तयार ठेवलंत तर काम पटापट होईल.
"काय आज काय करुन आलात?"  कुणाला तरी तिथल्या पोलिसांनी विचारलं.
बापरे, म्हणजे इथे वारंवार हजेरी लावणारीही माणसं आहेत की काय? तेवढ्यात मलाच कुणीतरी काहीतरी प्रश्न विचारला.
"माझी पहिलीच वेळ आहे हो."  मी अनुभवी असल्यासारखं तिला का वाटलं  या शंकेने माझा चेहरा नेहमी असतो त्यापेक्षा चिंताक्रांत झाला. ’नो प्रॉब्लेम’ म्हणत तिने दुसरीकडे मोहरा वळवला.  पोलिसांनी सतराशे पन्नास लोकांच्या तैनातीला चार वकिल असतील, ते नावाप्रमाणे बोलावतील असं सांगितलं. नंतर वकिलांनीही बाहेर येवून नावाप्रमाणे आम्ही बोलावू, कागदपत्र, तुमचं म्हणणं तयार ठेवा म्हणून दहावेळा सांगितलं. मी ही जे काही माझ्याकडे होतं ते खरच दहा दहा वेळा तपासून पाहिलं. आता सर्वांची रवानगी एका मोठ्या खोलीत झाली. नावाप्रमाणे बोलवत होते वकिल. दहा एक लोकांची नावं घेत, मग तेवढ्या लोकांनी उठून जायचं. गर्दी खूप. ऐकू येणं कठीणच होतं. जो वकिल जरा थांबेल, अडखळेल तो माझं नाव घेत असणार याची खात्री होती मला. तसंच झालं. कुणीतरी खूप वेळ थांबलं तसं मी कान दिले तिकडे. माझंच नाव घ्यायचा प्रयत्न चालू होता. मी उठणार तेवढ्यात अचानक लोकं रांगेत उभे रहायला लागले. मी आपली त्या रांगेच्या मागे मुखदुर्बळासारखी सर्वात शेवटी जावून उभी राहिले. बर्‍याचवेळाने सगळ्यांना आपण उगाचच उभे आहोत हे समजलं. बसा, बसून घ्या. नाव घेतलं तरच उठा अशी खड्या आवाजातली विनंती झाली तेव्हा. माझा तर नंबरच गेला. तासाभराने परत नावाचा पुकार झाला.
वकिलमहाशयांनी मला काय काय पर्याय आहेत ते सांगितलं. काय विचारतील, काय उत्तर द्यायचं याचा अंदाज दिला.  आता रवानगी दुसर्‍या कोर्टात.  तिथे सारं काही शांत शांत. न बोलता मुकाट्याने प्रत्येक जण आत जात होता. बाकड्यावर आता उठवतील की मग अशा अवस्थेत अवघडल्यासारखा बसत होता. सगळीच मंडळी भितीने थंडगार पडल्यासारखी.
मी ही त्यातलीच एक. माझं नाव आलं. गुन्हा वाचला गेला,
"दोषी?" प्रश्न आला.  एकाच शब्दात उत्तर द्यायचं होतं. म्हटलं.
"दोषी."
तिथल्या कारकुन महाशयांनी  हिरवा कागद हातात दिला. एक भला मोठा उसासा टाकत मी बाहेर आले. बघू बघू करत मुलाने कागद ओढला.
२२७ डॉलर्सचा दंड १६६  झाला होता. किती वाचले याचा हिशोब करत गाडीत बसलो. गाडी चालू केली, मुलाने खांद्यावरुन हात टाकला आणि कानात कुजबूजला.
"आई, अगं पोलिस येतोय बघ तुझ्यामागे."
"काय?" मी घाबरुन मागे पाहिलं.
"एप्रिल फूल." लेक जोरात हसला. त्याच्या टपलीत मारलं आणि मी पुन्हा एकदा कासवाच्या गतीने गाडी चालवायला सुरुवात केली. कितीतरी दिवसांनी. 

No comments:

Post a Comment

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.