Thursday, January 26, 2017

WhatsApp

काल अचानक आमच्या घरी गोंधळ उडाला. म्हणजे झालं काय की मी जाहिर करुन टाकलं. "आजपासून मी चांगलं वागणार आहे." युद्धभूमीवर क्षणभर शांतता पसरली. तिघांनी चमकून एकमेकांकडे पाहिलं. तू विचार, मी विचार करत; घरातला सर्वात छोटा सदस्य जो नेहमीच आगाऊ असतो तो रणांगणात उतरला. "पण तू चांगलं वागत नाहीस असं कुणी म्हटलं?" खरं तर जीव मुठीत धरुन शूर असल्याचा बहाणा होता तो कारण शत्रूबद्दल बद्दल एकमेकांकडे काय गरळ ओकलेलं आहे याची तिघांपैंकी कुणालाच खात्री नव्हती. आता तुम्हाला वाटेल, मला ३ मुलं आहेत. तर तसं नाही. या लढाई मध्ये नवराही आपण त्या गावचेच नाही असं भासवत फितूर झालेला असतो. म्हणून आमच्या घरात युद्ध, सामना, कुस्ती हे डाव नेहमी ३ विरुद्ध १ असेच रंगतात. त्याचा निकालही ठरलेला असतो. प्रत्येकाला सामना आपणच जिंकला असं वाटत असतं आणि त्या एका मुद्यावर लढाई चालूच रहाते. तर, लेकिने पुन्हा विचारलं. "आई, सांग ना कुणाला वाटतं तू चांगलं वागत नाहीस?" प्रेमाने टाकलेलं वाक्य असलं तरी समदु:खी आहे तरी कोण हे शोधण्याचा प्रयत्न नीट कळत होता. "whatsapp" ला. गंडातर आपल्यावर नसल्याची खात्री झाल्यावर सगळे माझ्या आजूबाजूला जमले. "काय मूर्खपणा सुचला त्या whatsapp ला? म्हणजे त्याने केलं तरी काय नक्की की तू अशा निर्णयाप्रत यावीस?" माझ्या दु:खावर फुंकर घातल्याचा आविर्भाव नवर्‍याच्या चेहर्‍यावर होता पण स्वर बायकोला सरळ करण्याचा मार्ग चाचपडत होता. "बरंच काही केलंय त्याने. एकच उदाहरण देते. भारतातले लोक आपल्याकडे रात्र झाली की सुप्रभात सुप्रभात करत इतके सुविचार पाठवतात की आपण किती वाईट आहोत या विचाराने झोप उडते. सुविचार आणि माझं वागणं याचा ताळमेळच बसत नाही." अच्छा, अच्छा असा चेहरा करत माना एकमेकांकडे वळल्या. मी माझं बोलणं चालूच ठेवलं. "रात्रभर जागी राहते मी याचाच विचार करत. आणि दिवस सुरु झाला की गुळरात्र, शुभरात्र असे संदेश यायला लागतात तिकडून मग मला झोप यायला लागते." "म्हणून तू आम्हाला दिवस रात्र झोपलेलीच दिसतेस." सुपुत्राला कोडं सुटल्याचा आनंद झाला. मग मी, whatsapp वर बायकांना कमी लेखून केलेले विनोद मला आवडत नाहीत, कुणाच्याही फोटोवर जाड- बारीक चर्चा म्हणजे माणुसकीचा खून वाटतो, एकमेकांना टोमणे मारणारे शेरे मारणं म्हणजे भारताने शेजार्‍याशी पुकारलेलं युद्ध वाटतं.... इत्यादी काळीज चिरुन टाकणार्‍या व्यथा बोलून दाखविल्या. एरवी सतत माझ्याशी लढाई लढणारी ही ३ माणसं आज चक्क माझं ऐकत होती. म्हटलं, हाताशी आलेल्या संधीचं करावं सोनं. होऊ दे त्या मनाला मोकळं. तिघांचेही चेहरे ट्रम्प महाशय गादीवर विराजमान होण्याच्या दु:खाने जितके उद्या व्याकुळ होणार आहेत तितके माझ्या व्यथेने झालेले पाहिले आणि मी थांबले. तिघं उठून उभे राहिले. आपापली आयुधं (फोन, लॅपटॉप, हेडफोन) घेऊन इकडे तिकडे विखुरायच्या आधी शेंडेफळाने खात्री केली. "तर आई, तुझं ते चांगलं वागणं आजपासून सुरु. जमेल ना नक्की तुला?" "आगाऊपणा बंद कर. मुर्ख, नालायक...." मी जोरात खेकसले आणि तिघांनी युद्धभूमीतून पळ काढला.

No comments:

Post a Comment

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.