Thursday, March 21, 2019

दारू

मी दारू कधी प्यायला लागले? हा प्रश्न मी तुम्हाला का विचारतेय असा प्रश्न पडला ना? आणि उगाच प्रश्न विचारून प्यायची तर घरात पी आम्हाला कशाला सांगतेस असं म्हणत असाल तर म्हणा बापडे. दुसरं काय म्हणणार मी. पण झालं असं समाजमाध्यमातला एक मित्र याला जबाबदार आहे म्हणजे माझ्या दारू पिण्याला नव्हे त्या आठवणी जागवण्याला. त्याने खाल्ली मिसळच पण तो मिसळ खायला जिथे गेला ते निघालं आमच्या रत्नागिरीच्या दारू अड्ड्याचं वर्णन. त्या वर्णनामुळे मुळात मला तो अड्डा कसा ठाऊक असा प्रश्न खूपजणांना पडला. मग मलाही त्याचं उत्तर सार्वजनिक देण्याचा मोह पडला त्यामुळे इथे कुणी रत्नागिरीकर असतील वाचणारे  तर त्यांच्या नाहीतर तिथे जाऊ पाहणार्‍यांच्या ज्ञानात थोडी भर.  तिथेच बसून हे वाचत असाल तर मग प्रश्नच मिटला.

तर आमच्या पुण्याच्या काकांना कुणीतरी रोपं आणण्यासाठी ’हा’ पत्ता दिला होता. ’हा’ म्हणजे दारूच्या अड्ड्याचा. आम्ही बहिणी उत्साहात तो पत्ता दाखवायला निघालो.  गोखले नाक्यावरून डावीकडे वळलं की थोडं चालायचं मग उजवीकडे जे बोळकांडं लागेल तिथून रोपं दिसतीलच वगैरे वगैरे म्हणत काकांबरोबर निघालो.  एका बोळकांडीसमोरून जाताना रोपं दिसली. आम्ही तिकडे वळलो. तर ती शोभेकरता ठेवली होती.
"असंच जा पुढे" असं कुणीतरी सांगितलं.  आम्ही पुढे जात राहिलो. आत, आत. पुढे काही बाकडी दिसली. थोडीशी रोपंही दिसली. काका म्हणाले,
"तुम्ही बसा इथे." मी चौकशी करून येतो.

 मरायला टेकलेल्या ट्यूबलाईटच्या प्रकाशात आम्ही दोघी एका रिकाम्या बाकड्यावर जाऊन बसलो. आजूबाजूच्या बाकड्यांवर बसलेले आयुष्यात कधी मुली न पाहिल्यासारखे डोळे विस्फारून आमच्याकडे पाहायला लागले. ते पाहायला लागले म्हणून आम्हीही त्यांच्याकडे पाहायला लागलो.  ट्युबलाईट मरायला टेकली होती त्यामुळे  कुणी एकमेकाला नीट दिसत नव्हतंच.  बसलोय तर काहीतरी मागवणं भाग होतं.
"पाणी माग." मी बहिणीच्या कानात कुजबुजले. तेवढ्यात पोऱ्या आला. त्याने हातातल्या फडक्यानं बाकड्याची सफाई केली. ते फडकं खरं तर खूप कळकट होतं, पण त्यानं ते बाकड्यावरून अतिशय पटकन फिरवलं. त्यामुळं बाकडं खरंच स्वच्छ झालं की अजून घाण झालं हे कळू नये एवढी सफाई त्या सफाईत निश्चितच होती. एव्हाना बाकिचे लोक आमच्याकडे बघतायत हे आम्हाला कळू नये म्हणून आम्ही मान खालीच घालून ठेवली होती. मी त्या पोर्‍याने फडकं फिरवताच म्हटलं,
"दोन ग्लास."  त्याच्या हातातला फडका क्षणभर अंधातरीच राहिला. त्या फडक्याचं काय करावं हे त्याला कळेना तेवढ्यात काका आले ते अक्षरश: धावतच.
"उठा, उठा, चला पटकन." आम्ही गडबडीत उठलो. बहिणीला पाणी सोडवेना. ती म्हणाली.
"त्या पोर्‍याला पाणी आणायला सांगितलंय."
"राहू दे तुमचं पाणी. चला." काका धाप लागल्यासारखे धावत बाहेर गेले. त्यांच्यामागून आम्ही. मोकळ्या हवेत आल्यावर ते म्हणाले,
"तो दारूचा अड्डा होता." आम्ही दोघी काकांच्या घाबरलेल्या चेहर्‍याकडे पाहत होतो. काहीही न होता काका इतके घाबरले होते. त्या पोर्‍याने खरंच दोन ग्लास आणून दिले असते आणि आम्ही दोघी पाणी प्यायल्यासारखे ते प्यायलो असतो तर?

6 comments:

 1. ����������superb

  ReplyDelete
 2. मजा आली! इतरवेळी, रत्नांग्रीच्या आमच्या खूप सुंदर आठवणी आहेत. ते पतीतपावन कडून टिळकांकडे येताना आडव्या गल्लीत ते 'श्रीमंत बाजीराव पेशवे संकुल' असं मोठ्ठ्या ठळक अक्ष्ररात लिहिलेलं वाचलं. काय मस्त वाटलं!! बाकी मस्तच! -मिलींद

  ReplyDelete
  Replies
  1. मिलिंद धन्यवाद. तुम्ही रत्नांग्री लिहिलंयत ते वाचून; आम्ही आकाशवाणीच्या ’रत्न्गांग्री’ केद्रांवरुन बोलत आहोत’ अशी उगाचच आठवण झाली:-).

   Delete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.