Tuesday, May 14, 2019

होरपळ बालमनांची


"तू बातमी ऐकली असशील म्हणून फोन केला." मैत्रिणीचा फोन आला तेव्हा मी गाडी चालवत होते.  रेडिओवरआमच्या गावातल्या, शार्लटमधील विद्यापीठातल्या गोळीबाराबद्दलची बातमी सुरु झाली आणि पोटात गोळाच आला.  तेवढ्यात मैत्रिणीचा फोन आला. तिची मुलगी तिथेच शिकायला आहे. ती सुखरुप असल्याचं कळलं आणि जीव भांड्यात पडला. आजूबाजूची, ओळखीच्यांची  मुलं तिथे शिकायला त्यामुळे नक्की काय झालं ते कळेपर्यंत, सर्वांची खुशाली कळेपर्यंत चैन पडणार नव्हतं. विद्यापीठाच्या आवारात जायला - यायला ताबडतोब बंदी घातली होती. बंदी उठेपर्यंत विद्यार्थीवर्ग आपापल्या वर्गात होता. घरी मुलांनी खुशालीचे  टेक्स्ट केल्यानंतर फोन बंद होते. एका धाडसी मुलाच्या कृतीमुळे या हल्ल्यात कमी जिवितहानी झाली. दोन जण जिवाला मुकले तर चारजण जखमी झाले. या दोनजणापैंकी एक होता रायली होवेल. रायली जिवाची पर्वा न करता मारेकर्‍यावर चालून गेला. स्वत:च्या जिवाचं मोल देत रायलीने मारेकर्‍याला जमिनीवर लोळवलं, तिथे असलेली इतर मुलं रायलीच्या मदतीला धावली. पडलेल्या मारेकर्‍याला त्यांनी धरुन ठेवलं. पण पडता पडता मारेकर्‍याने झाडलेल्या गोळीत रायली मृत्यूमुखी पडला. २१ वर्षाच्या रायली होवेलच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल बोलताना प्रत्येकाचेच डोळे भरुन येतात, शब्द अपुरे पडतात. पळा, लपा किंवा धैर्याने मारेकर्‍याचा सामना करा ही तीन सूत्र हिंसेला तोंड देण्याच्या प्रशिक्षणात मनावर बिंबवली जातात. यातील रायलीने निवडलेल्या पर्यायाचं त्याच्या आई - वडिलांना आश्चर्य वाटत नाही तसंच त्याला ओळखणार्‍या सर्वांनाच.  त्याच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी सरकारनेही उचित पाऊल उचललं. सरकारी इतमामात गावी परतलेल्या रायलीच्या पार्थिवाची वाट पाहत नागरिक दोन तास  साश्रू नयनांनी उभे होते. 


अमेरिकेन जनतेपुढील ही समस्या गावागावात प्रत्येक घराच्या दारासमोर उभी आहे. आपल्या गावात, शाळेत असा प्रकार होणार नाही हा निव्वळ भ्रम राहिलेला आहे. UNCC मधील घडलेल्या घटनेआधी काही महिने आधी माझ्या मुलीच्या शाळेतला हा प्रसंग. ७ वीत शिकणार्‍या एका भारतीय विद्यार्थ्याने वर्गातल्या बाकावर लिहिलं. "I’ll get the guns by Thursday. Pitch in $200 for 5 Swisses." मुलांनी खोटं बोलणं, मारामारी करणं, इतरांना चिडवणं, वर्गातल्या बाकांवर, भिंतींवर मुलामुलींची नावं लिहिणं एवढीच मजल या वयात मुलं गाठतात असं गृहीत धरणं कालबाह्य झाल्यासारखं ही वाक्य वाचताना वाटलं होतं. या भारतीय विद्यार्थ्याने लिहिलेल्या या संदेशाचं  कुणीतरी छायाचित्र घेतलं आणि बातमी सर्वत्र पसरली. मुलाची चौकशी सुरू झाली. गंभीर स्वरूपाची हरकत असेल तर मुलांना तीन दिवस शाळेत यायला मनाई केली जाते पण त्याच दरम्यान  फ्लोरिडा राज्यातील  शाळेत घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे या प्रसंगाचे पडसाद तीव्र होते त्यामुळेच परिणामही. मुख्याध्यापकांनी झालेल्या घटनेची पोलिसांकडून चौकशी होऊन जास्तीत जास्त शिक्षा सुनावली जाईल याची ग्वाही दिली. त्याचाच परिणाम म्हणून ३ दिवस शाळेत न येण्याच्या शिक्षेवर न थांबता या मुलाला सुधारणागृहात दाखल केलं गेलं. या मुलाची पुढची शैक्षणिक प्रगती गोठल्यासारखीच आहे.  सुधारगृहाचा ठप्पा लागल्यावर त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली जाणार, त्याला मिळणारी वागणूक बदलणार, महाविद्यालयीन प्रवेश ही तर पार पुढची गोष्ट झाली. ही आम्ही जवळून पाहिलेली घटना. अशावेळेस  पालकांना मन घट्ट करुन अशी परिस्थिती उद्भवली  तर काय करायचं यावर मुलांशी बोलावं लागतं. मुलांच्या डोळ्यातले, मनातले प्रश्न वाचताना आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना नको वाटतं, जीव तुटतो.   कुणी कुणाचा जीव कसं घेऊ शकतं या निरागस प्रश्नाला उत्तर देताना या  कोवळ्या मनांना, अजाण मुलांना आपण अकाली  प्रौढत्वाकडे वळवतोय ही जाणिव वेदनादायी असते. पण या काळाचं हे वास्तव आहे. अशा घटना आणि मुलांवर होणारी कारवाई याचं प्रमाण शाळांतून खूप मोठं आहे. दुर्देवी घटनांची नक्कल मुलांना का करावीशी वाटत असेल? मुलं माध्यमातून या गोष्टी पाहत असतात, ऐकत असतात त्याचा नकळत मनावर परिणाम होत असावा का? असंच आपणही करावं असं वाटत असेल का?  शाळांना सातत्याने घडणार्‍या अशा घटनांमुळे यावर कडक कारवाई करणं भागच आहे . पण विद्यार्थ्यांना गंमत म्हणून केलेल्या उद्योगाच्या परिणामाची कल्पना तरी असेल का?  अशा घटना घडल्या की मन विषण्ण होतं. नानाविध उपायांची चर्चा होते. शिक्षकांच्या हातात बंदूका सोपवायला हव्यात या अंतिम निष्कर्षालाही बर्‍यांचदा खूपजणं  येतात.  पण शिक्षकांनी शिकवायचं की बंदूक चालवायला शिकून मुलांच्या सुरक्षिततेचीही काळजी करायची हा प्रश्नही त्याबरोबर येतोच.

मुळात मुलांच्या हातात बंदुका येतातच कशा हा सर्वसामान्य लोकांना पडणारा प्रश्न. कायद्याने वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत बंदूक विकत घेता येत नाही. आता तर काही राज्यात २१ ही वयोमर्यादा झाली  आहे पण यातून पळवाटा आहेतच. सर्वेक्षणातून जवळजवळ ६०% विद्यार्थ्यांनी बंदूक पाहिजे असेल तर सहज मिळू शकते अशी कबुली दिली आहे. बर्‍यांचदा घरातील मोठ्या माणसाची बंदूक मुलांच्या हातात पडते.  कधी हातात आलेल्या बंदुकीचा सहज वापर केला जातो. कधी मानसिक विकृतीमुळे बंदूक वापरली जाते तर काही वेळेला केवळ बढाई मारण्यासाठी शाळेत मुलं बंदूक आणतात. बर्‍याचदा आधीच कुणाच्यातरी लक्षात येतं आणि त्यांच्या हातातील बंदूक काढून घेतली जाते. कारवाई होते. पण जेव्हा असं होत नाही तेव्हा कितीतरी निष्पाप कळ्या उमलण्याआधीच संपतात. अंदाधुंद गोळीबार करुन ही मुलं काय साध्य करतात हा जसा प्रश्न आहे तसंच पूर्वी झालेल्या गोळीबारांचा पद्धतशीर अभ्यास करुन हिंसेची तीव्रता कशी वाढेल याचं व्यवस्थित नियोजन करण्याची  मुलांची मानसिकता चिंताजनक आहे. २००७ साली व्हर्जिनिया पॉलीटेक्निक मध्ये झालेल्या गोळीबारात ३२ मुलं आणि त्यांचे काही शिक्षक मारले गेले. या मुलाने आधीच्या गोळीबाराचा सखोल अभ्यास केला होता आणि अधिक मुलांचे बळी जाण्यात ती मुलं कुठे कमी पडली हे पाहून त्याप्रमाणे नियोजन करण्याची काळजी घेतली होती.

२०१२ साली सॅंडीहूक  प्राथमिक शाळेतली २० चिमुरडी मुलं आणि ६ शिक्षक अशाच गोळीबाराला हकनाक बळी पडले. पण यावेळेस जे झालं ते केवळ पुरेशी काळजी घेऊनही नविन आणि त्यादिवशी वर्गावर असलेल्या बदली शिक्षिकेला याबद्दल माहिती नसल्याने कारण जशी गोळीबाराची संख्या वाढली आहे त्याप्रमाणेच अशा परिस्थितीत काय पावलं उचलायला हवीत त्यासाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नांचीही. याही शाळेत प्रशिक्षण दिलं होतंच. पण ज्या वर्गातील मुलं बळी पडली त्यातील एका वर्गात  शिक्षिका नविन होती. काहीतरी विपरीत घडतंय ही सूचना मिळताच तिने वर्गाचं दार  लावण्याऐवजी प्रथम  मुलांना बाकड्याखाली लपवलं. त्यानंतर दार बंद करायला ती गेली तोपर्यंत बंदूकधारी मुलाने दार उघडलं. मुलं कुठे आहेत या त्याच्या प्रश्नावर तिने वर्गात कुणी नाही हे उत्तर दिलं. त्या मुलाने तिच्यावर  गोळी झाडली आणि लपलेल्या चिमुरड्यांचा भयाने थरकाप उडाला.  मुलं सैरभैर झाल्यासारखी धावली. आणि बंदूकधारी मुलाने अंदाधुंद गोळीबार केला. काही मुलांचा जीव वाचला काहींनी जीव गमावला.  दुसर्‍या वर्गात फक्त त्यादिवशी शिकवण्यासाठी आलेली शिक्षिका होती. दुर्देवाने तिच्याकडे दाराला कुलूप लावण्यासाठी किल्ली नव्हती. प्रशिक्षणातील सर्व बाबी योग्यं तर्‍हेने अमलात आणल्यामुळे इतर वर्गातील मुलं सुरक्षित राहिली आणि या दोन वर्गातील बहुतेक मुलांचा अंत झाला.

अशा घटना आता दैनदिन जीवनाच्या घटक होऊ लागल्या आहेत पण याची सुरुवात झाली ती २० एप्रिल  १९९९ साली  कोलोरॅडो राज्यातील लिटीलटन कोलंबाईन हायस्कूल मध्ये दोन तरुणांनी अंदाधुंद केलेल्या गोळीबारात १३ मुलं मारली गेली तर ३० हून अधिक जखमी झाली तिथून. या नंतर अनेक राज्यात शाळांना अशा प्रसंगांना सामोरं जायला लागलं आहे, लागत आहे. जिथे जिथे जिवितहानीचं प्रमाण जास्त आहे त्या घटनांची माहिती माध्यमातून लोकांपर्यंत पोचली, त्याची चर्चा होत राहिली. आत्तापर्यंत ७००० हून अधिक मुलं यात बळी पडली आहेत. यावर उपाय शोधण्याचे अथक प्रयत्न चालूच आहेत. बंदुकांवर नियंत्रण आणणं हा महत्वाचा उपाय NRA नॅशनल रायफल असोसिएशनच्या  वर्चस्वामुळे आणि त्यात गुंतलेल्या सर्वांच्या हितसंबंधामुळे  दरवेळी मोडीत निघतो. पोटचे जीव गमावल्यावर पालक पेटून उठतात, कायद्यात बदल करण्यासाठी धडपडतात. त्यांना सर्वसामान्य साथ द्यायचा प्रयत्न करतात. यात भर पडली आहे विद्यार्थ्यांची.  मुलंही आता जाब विचारायला लागली आहेत, विरोधाची पावलं उचलत आपला आवाज मोठ्यापर्यंत पोचवण्याचा  प्रयत्न करत आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे, March of Our Lives. गेल्यावर्षी विद्यार्थ्यांनीच सुरु केलेली ही संघटना त्यांच्या पिढीला ज्या असुरक्षिततेला तोंड द्यावं लागतंय ते बदलण्याचा निश्चय करुन प्रयत्न करत आहे. मागच्यावर्षी फ्लोरिडा राज्यातील डग्लस शाळेत घडलेल्या दुर्देवी घटनेतून या लढ्याची सुरुवात झाली आहे.   सरकारने या समस्येवर पावलं उचलावीत यासाठी विद्यार्थी जिवाचं रान करत आहेत.  शस्त्र नियंत्रण कायद्यात बदल आणि शस्त्र विक्री अगोदर त्या व्यक्तीची पूर्ण चौकशी. या दोन मुख्य मागण्या पुर्‍या होत नाहीत तोपर्यंत ही चळवळ चालूच ठेवण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार आहे March of Our Lives ची अलिकडची  चित्रफित हृदयद्रावक  आहे. या चित्रफितीत एका कार्यालयात गोळीबाराला तोंड कसं द्यायचं त्याचं प्रशिक्षण सुरु होताना दाखवलं आहे.  प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ म्हणून निमंत्रित केलेली व्यक्ती पाहून कर्मचार्‍यांना जसा धक्का बसतो तसाच चित्रफित पाहणार्‍यालाही. ती तज्ज्ञ व्यक्ती आहे, शाळकरी मुलगी!   ही छोटी मुलगी प्रौढांना गोळीबाराला तोंड द्यायला काय करायचं ते  सांगताना दाखविली आहे.  शेवट होतो त्या मुलीच्या शिक्षिकेने सांगितलेल्या खालील ओळींनी.

"Lockdown, lockdown let's all hide,

Lock the doors and stay inside,

Crouch on down, don't make a sound,

And don't cry or you'll be found."

जनरेशन लॉकडाऊन असं या चित्रफितीचं नाव आहे.


अमेरिकन शालेय जीवनात, अभ्यास आणि विविध विषयांचं ज्ञानार्जन  हा जसा अविभाज्य भाग आहे तसं हिंसेला तोंड देण्याचं प्रशिक्षण हा विषयही आता अनिवार्य झाला आहे. चुकीच्या हातांमध्ये बंदूक पडू नये याबाबात कायदा करण्याऐवजी राजकारणी मुलांना प्रशिक्षण मिळत आहे यातच समाधान मानत आहेत. बाह्य घटकांकडे बोट दाखवताना जी मुलं या मार्गावर पाऊल टाकतात त्यांचे पालक मुलांची मनं ओळखायला कमी पडत आहेत ते का,  त्या मुलांचे शिक्षक, मित्रमैत्रिणी यांनाही अशा मुलांच्या मनांचा थांगपत्ता लागत नाही तो का याकडेही लक्ष देणं भाग आहे. या समस्येवर  नक्की उपाय काय हे काळच ठरवेल पण तोपर्यंत किती बालमनं यात होरपळून निघणार, किती आपल्या जीवाला मुकणार हाही प्रश्न अनुत्तरीतच राहणार!

No comments:

Post a Comment

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.