Thursday, June 27, 2019

कथाकथन - अध्यक्षीय भाषण

कथाकथन या विषयावर माझे चार (?) शब्द.

माझ्या मराठी शाळेच्या संकेतस्थळावर भाषण आणि कथाकथन ’ऐकता’ येईल - https://bit.ly/2FBThrw

कथाकथन हा शब्द खर्‍याअर्थी आपल्या रोजच्या आयुष्यात सतत आपल्या आजूबाजूला घोटाळत असतो. एखादा प्रसंग, किस्सा बोलता बोलता आपण सांगतो ते खरंतर कथाकथनच आहे फक्त त्याचं स्वरुप छोटं - मोठं असू शकतं. तुम्ही ती गोष्ट, किस्सा किती रंगवून सांगता यावर त्या कथनाची रंगत अवलंबून असते. यामुळेच कथाकथन हा प्रकार अस्तित्वात आला असावा. जो मुळात आपल्या सर्वांच्याच अंगात भिनलेला आहे. विचार केलात तर लक्षात येईल की तसं म्हटलं तर आपण ही भूमिका रोजच निभावत असतो. कधी यशस्वीरित्या तर कधी धडपडत. त्याचंच विस्तारित स्वरुप कथाकथन.

कथाकथन म्हटलं की मला एक प्रसंग नेहमी आठवतो. साधारण १९९१ मधली ही गोष्ट आहे.  माझे वडील जिल्हापरिषदमध्ये कार्यकारी अभियंता  होते. गणपत्तीनिमित्त कार्यक्रम असावा बहुतेक. गिरीजा किर, वि. आ. बुबा या दोघांच्या कथाकथनाचा. ऑफिसच्या आवारातल्या गॅरेजमध्ये कार्यक्रम होता. आता नवल वाटतं, गॅरेजमध्ये कार्यक्रम होता त्याचं. हौसेपोटी गाड्या हलवून कर्मचार्‍यांनी छानसं व्यासपीठ उभारलं होतं. जिल्हापरिषदचे सारे कर्मचारी आणि जवळपासची लोकं कार्यक्रमाला हजर होती. गॅरेजच्या समोर गर्दी करुन रस्त्यावरच सगळे बसलेले. आमच्या क्वार्टर्स समोरच होत्या. घराच्या पायरीवर पथारी पसरुन कार्यक्रम पाहायला आम्ही बहिणी, आई बसलो. आपापल्यापरीने सगळे जय्यत तयारीत होते.  पण कार्यक्रम काही सुरु होईना. हळूहळू कुजबूज सुरु झाली. वि. आ. बुवा बसलेले दिसत होते. गिरीजा कीरांची वाट पाहत असणार. तेवढ्यात ऑफीसमधलं कुणीतरी आमच्या घराच्या दिशेने यायला लागलं. वडिलांकडे असणार म्हणून सरकून आम्ही त्यांना आत जायला जागा करुन दिली. पण ते म्हणाले.
"मोहना तुझ्याशी बोलायचंय." गोंधळून मी पाहतेय तेवढ्यात ते म्हणाले,
"गिरीजाताई काहीकारणास्तव येऊ शकत नाहीत. तू कर आज कथाकथन. वि. आ. बुवा आलेले आहेत. तुझं आणि त्यांचं कथाकथन करु." गिरीजा कीरांच्या जागी मी? त्यांचं आभाळमाया पुस्तक मी वाचलं होतं. भारावून गेले होते आणि प्रचंड उत्सुकतेने त्यांची वाट पाहात होते. त्याऐवजी मी करायचं कथाकथन? माझी पुंजी फार थोडी होती. स्पर्धांमधली बक्षिसं आणि गणपतीउत्सवात रत्नागिरीकरांसमोर केलेलं कथाकथन. त्यावेळेस महाविद्यालयातले आम्ही तिघं चौघं या स्पर्धांमध्ये आघाडीवर होतो त्यामुळे जिकडे तिकडे गोष्टी सांगायला असायचो.  पण आज मला एकट्याने कथाकथन करायचं होतं तेही गिरीजा किर यांच्या जागी. हातापायला कापरं सुटलं. पण जिल्हापरिषदेचा कर्मचारीवर्ग कुठूनकुठून आलेला. गर्दी झालेली. कार्यक्रम रद्द करता येणार नव्हता कारण वि. आ. बुवा आलेले होते. पण ते एकट्याने पूर्ण कार्यक्रम सादर करु शकत नव्हते.  वि. आ. बुवांची एक कथा झाली आणि मी उभी राहिले. गिरीजा कीरांच्या ’मित्रा’ कथेने मला अनेक बक्षिसं मिळवून दिली होती. त्याच कथेन सुरुवात केली.  माझ्या शब्दांची गाडी धाडधाड करत सुटली. कथा सुरु कधी झाली आणि कधी संपली तेच कळलं नाही इतका वेग होता त्या कथेला. त्यावेळेला मी नुकतीच आकाशवाणीत निवेदिका म्हणून काम करायला सुरुवात केली होती. दुसर्‍यादिवशी आकाशवाणीत कार्यक्रमाला आलेल्या कुणीतरी माझ्या कथाकथनाची नक्कल करुन दाखवली त्यावेळेस सुटलेल्या गाडीची कल्पना आली....पण प्रसिद्ध लेखिकेच्या जागी, प्रसिद्ध लेखकासमवेत आयत्यावेळी केलेलं हे कथाकथन होतं. तर बघा, नकळत तुमचेही कान टिपत होते ना माझं बोलणं? हेच तर असतं कथेचं कथन.

आमची पिढी मोठी झाली ती व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांच्या कथाकथनाच्या कॅसेट ऐकत. ही नावं मी सांगतेय तेव्हा लक्षात येतं की यामध्ये स्त्री कथाकथनकार नाहीत. का? खरं सांगायचं तर फार विचारच केला नव्हता कधी. पण आज कथाकथन या विषयावर बोलायचं आहे म्हटल्यावर हे प्रकर्षाने जाणवतंय. स्त्री कथाकथनकार होत्या, त्यांचे कार्यक्रम होत होते पण कॅसेट रुपात आलेले पुरुष कथाकथनकार जास्त होते. मला आठवतंय, व. पु. काळेंची शिष्या मुग्धा चिटणीसचं कथाकथन त्यावेळेस आमच्यासारख्या महाविद्यलयीन विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होतं. निलम प्रभु यांच्या ’पप्पा’ कथेच्या सादरीकरणाला कोण विसरेल? पण त्यांचं हे कथाकथन व. पु. काळेंबरोबर होतं. स्वतंत्रपणे केलेलं नव्हतं. तरीही आज इतक्या वर्षांनीही पप्पा कथेमधील ती आणि नानासाहेब देशमुख यांचा विसर पडत नाही. दत्तक मुलगी आणि नानासाहेब यांच्या आयुष्यातील गुंतागुंत निलम प्रभु इतक्या प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोचवतात की ही कथा काळजात घर करुन बसते. कथा सांगणं हे कौशल्य आहे यात कथा निवड आणि श्रोता महत्वाचा. आपल्यासमोरचा वयोगट, त्यांची आवड - निवड हा मोठा भाग त्यात आलाच पण कोणत्याही कथेत ’कथा’ असायला हवी. रंजकता हवी. थोडक्यात ज्या कथेला उत्तम सुरुवात, मध्य आणि शेवट असेल अशा कथेत श्रोता रंगतो. कथाकथन करताना प्रेक्षकांचा अंदाज घेत आयत्यावेळी बदल करता आले पाहिजेत. हे सोपं नाही पण कठीणही नाही. अनुभवाने जमणार्‍या या गोष्टी आहेत.  कथाकथन सादर करताना खूपजणांचा गोंधळ उडतो. कथेतील पात्रांचे आवाज बदलायचे असतात असा समज असतो. पण प्रत्यक्षात तुम्ही स्त्री, पुरुष असा आवाजात बदल न करता, आवाजात चढ - उतार करुन ते पात्र डोळ्यासमोर उभं करायचं असतं. ते केलं नाही, तर त्याचं स्वरुप एकपात्री प्रयोग असं होतं.

अजूनही स्त्री कथाकथनकार म्हटलं की मुग्धा चिटणीस, निलम प्रभु, गिरीजा कीर  ही काही नावं ठळकपणे आठवतात. २० वर्षाहून अधिक काळ भारताबाहेर असल्याने नविन नावं मला ठाऊक नाहीत किंवा कानावर पडलेली नाहीत. हा विचार मनात आला की वाटतं, जर खरंच एकूणच कथाकथन हा प्रकार कमी झाला असेल तर तो माध्यमांच्या बदलामुळे झाला असावा. गोष्टी सांगणार्‍यामधे मुळात गोष्टी वाचण्याची आवड बहुतेकवेळा असतेच. पण इतर माध्यमांच्या प्रभावामुळे वाचन कमी झाल्यामुळे कथाकथन कमी झालं असावं.  वाचनाची आवड हा मुद्दा बाजूला ठेवला तर आपलं किंवा इतरांचं लेखन आपण कथाकथनाने दुसर्‍यांपर्यंत पोचवू शकतो. न वाचणारी मंडळीही गोष्टी उत्साहाने ऐकतात.  हाच विचार घेऊन मी माझ्या मेल्टिंग पॉट आणि नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ’रिक्त’ कथासंग्रहाबाबत केला. कथाकथनाचे कार्यक्रम केले. त्यामुळे माझ्या कथा मी श्रोत्यांपर्यंत पोचवली आणि त्यामुळे पुस्तकाबद्दलही उत्सुकता निर्माण झाली. लेखक म्हणून हेच तर हवं असतं ना आपल्याला? लेखकाला आपलं किंवा आपल्याला आवडलेलं इतरांचं लेखन इतरांपर्यंत पोचावं असं वाटत असतं. त्यासाठी कथाकथन हा उत्तम मार्ग आहे असं मला वाटतं.

पूर्वी कथाकथनाचे कार्यक्रम होत असत. कॅसेटस निघत असत. आता समाजमाध्यमं  बदलली आहेत. काळानुसार बदलत  लोकापर्यंत पोचण्याचे मार्ग आपण शोधले पाहिजेत. किंबहुना कथा लोकांपर्यंत पोचवण्याचे मार्ग आता अधिक सुलभ झाले आहेत. ते वापरणं आपल्याच हातात आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे storytel. भारतात storytel app ला छान प्रतिसाद मिळतोय. त्याद्ववारे अनेक पुस्तकं आपण आता ऐकू शकतो. podcast हा दुसरा मार्ग. यासाठी आपण पट्टीचे कथाकथनकार नसलो तरी ऑडॅसिटीसारखी अॲप्स वापरुन आपल्या आवाजाला चढ उतार देता येतात.  youtube आहेच. ही सारी माध्यमं अशी आहेत की बसल्या जागी मराठी भाषिकांपर्यंत तुम्ही जगाच्या कानाकोपर्‍यात पोचू शकता. लेखक एकत्र येऊन असे कार्यक्रम  प्रत्यक्ष किंवा यामार्गे सादर करु शकतात. अगदी घरगुती स्वरुपात कथाकथनाचे कार्यक्रम करता येतील. वाचनालयात कथाकथन करता येईल. कथा ऐकायला कुणालाही आवडतं. सादरकर्त्याला आपली कथा उत्तम प्रकारे लोकांसमोर पोचवण्यासाठी कथाकथन करणं शिकलं पाहिजे. यासाठी सध्याच्या माध्यमांचाच उपयोग कसा करायचा हे आव्हान लेखकांनी झेललं पाहिजे. व्यक्तीगतपातळीवर किंवा एकत्रितपणे!

मार्ग बदलले तर लेखकांना आणि कथाकथनाला दिवस चांगले येतील अशी आशा, अपेक्षा करुन मी थांबते. पुन्हा एकदा यानिमित्ताने कथाकथनाबद्दल विचार करायला आणि तुमच्यासमोर माझे विचार मांडायला संधी दिल्याबद्दल मोहन कुलकर्णी यांची मी आभारी आहे. धन्यवाद.

2 comments:

 1. मजा आली वाचतांना. सुरुवातिलाच storytel मनात वाजू लागलं, आणि पुढे अपेक्षा पूर्ण झाली!
  'राजहंस' प्रकाशनाने कथा संग्रह छापणे बंद केले असले तरी,
  आंतरजालावर कथा बहरते आहे.
  'प्रतिलिपी' सारखे उपक्रम, 'टेलिग्राम'वरचा बोलती पुस्तके उपक्रम, आणि वपुंच्या चाहत्यांचे अनेक फेबुग्रुप कथा आजही पुढे नेत आहेत.
  चित्रात दिसते ते online संमेलन सापडलं नाही! लिंक द्याल, प्लीज :-)
  धन्यवाद.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद मिलिंद,
   हो. कथा बहरते आहे पण ’कथाकथन’ मागे पडत चाललं आहे. त्याची जागा standup comedy ने घेतली आहे असं म्हणतात पण मला ते पटत नाही कारण कथाकथनात आपण फक्त विनोदी विषय सादर करत नाही.
   संमेलन फक्त स्त्री लेखिकांपुरतं होतं त्यामुळे दुवा देऊ शकत नाही :-).सुरुवातीला दिलेल्या दुव्यावर माझं विनोदी कथाकथन आणि भाषण ’ऐकता’ येईल.

   आयोजक पुढच्यावेळेला ते सर्वांसाठी ठेवतील अशी आशा करु या.

   Delete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.