माझ्या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या माझ्या गोष्टी - FB - Live
आजोबा
मी त्यांना काम सांगितलं की मात्र ओरडतात,
'हातपाय आहेत ना? स्वत:ची कामं स्वत: करायची' असं म्हणतात आणि आरामखुर्चीत
डुलत बसतात.
मी आज
खोलीत लपून बसलो. कामांची रेल्वेगाडी आजीने हाकली. आजोबा गेले. मी हळूच विचारलं.
"गेले का
जमदग्नी?"
"कोण जमदग्नी?
बाहेर ये." आजोबा खेकसले. मी घाबरलो. आजोबा होते की इथेच. मी पळणार होतो पण आजोबांनी
मला धरून आणायला आजीला पाठवलं असतं.
"बाहेर
ये." आजोबा परत जोरात ओरडले. मी बाहेर आलो.
"कोण
जमदग्नी?"
आजोबांनी डोळे वटारुन विचारलं.
"आजी तुम्हाला
जमदग्नी म्हणते. जमदग्नी म्हणजे काय?" आजोबानी मला उत्तर दिलं नाही. ते आजीवर
वसकन ओरडले. आजी आहे कुठे? आजी तिथे नव्हतीच. नेहमी मी पळतो.
आज आजी पळाली.
पण मला
कुणीतरी सांगा ना, जमदग्नी म्हणजे काय?
-----------------------------------------
"उठ गं" आईचा आवाज चढला.
"झोपले की उठवतेस. उठले की झोपवतेस."
मी कुरकुरले.
"लाडात येऊ नकोस." ती चिडली.
निघून गेली. मी उगाच भिंतीवर पाय मारला. इकडच्या
भिंती पोकळ. भगदाडच पडलं. मी घाबरले.
"काय झालं?" आईने खालून जोरात विचारलं
"पुस्तक पडलं." मी भगदाड झाकलं. त्यावर उशी ठेवली.
धावत खाली गेले.
"खरं सांगितलं की तू ओरडत नाहीस ना?"
"काय केलंस?" आई चिडली. मी गप्प.
"सांग. नाही ओरडणार." नाईलाजाने
आई म्हणाली.
तिला मी खोलीत नेलं. भगदाड दाखवलं.
"ऑ?" आईचं
तोंड उघडंच राहिलं. ती मटकन बसलीच. चिडली,
बडबडायला लागली.
"तू ओरडणार नव्हतीस."
मी रडायला लागले.
"मी ओरडत नाहीये." ती
ओरडत म्हणाली.
मोठी माणसं! बोलतात एक, वागतात वेगळं. मोठी माणसं!
-----------------------------------------
मजा
दादा म्हणाला,
"काहीतरी गडबड आहे."
तो गडबड शोधायला खोलीत गेला. माझ्या, त्याच्या. परत आला.
"काय रे? काय उद्योग केले आहेत कार्टीने?" आईने विचारलं.
"काही नाही." तो
पुटपुटला. मी दादाची फजिती झाली म्हणून टाळ्या वाजवल्या. तेवढ्यात बाबा दादाचं चित्र
घेऊन आला. मी घाबरले. आईच्या मागे लपले.
"पिकरुने काढलंय?"
आईने विचारलं.
"नाही. दादाचं नाव पुसलं..."
बाबा म्हणाले.
"म्हणजे?" आईला काही कळलं नाही.
"चित्र कुणी काढलं?" बाबानी विचारलं.
"मी काढलं."
दादा म्हणाला.
"नाव कुणाचं दिसतंय?" बाबानी विचारलं. दादाने
नीट पाहिलं.
"माझं नाव पुसून हिने
तिचं घातलं." दादा किंचाळला.
"म्हणून शहाण्यासारखी
वागत होती." आई पुटपुटली. दादाने मला ढकललं, केस ओढले. मी पुन्हा बेअक्कल झाले. भोकाड पसरलं.
-----------------------------------------
थोबाडीत
"एक
लगावणार आहे तिच्या." आई म्हणाली. दार वाजलं. मायाताई आली.
"आई, तुझ्या एक लगावणार
आहे." मी तिला सांगितलं. मायाताई थांबलीच नाही. पळाली.
आईने माझ्या
एक लगावली. मी कोपर्यात रडत बसलो.
"नको
तेव्हा नको ते बोलतेस. तुझ्या बाबांसारखं."
"मग
त्यांना लगाव." बाबा आला आणि कोपर्यात बसला.
"त्याला
लगाव ना." मी पुन्हा म्हटलं. आई हसली आणि तीही कोपर्यात येऊन बसली.
या मोठ्या
माणसांचं काही समजत नाही. आई - बाबांनी मला
जवळ घेतलं.
"मायाताईची
भांडी बाबा घासणार आहे." आई म्हणाली
"म्हणजे?" मला काहीच
कळत नव्हतं.
"अरे, तू बाबांना लगाव
म्हणालास ना?"
"हो."
"मग
बाबांनी भांडी घासली की झालं."
आई ना.
नेहमी कोड्यात बोलते.
तुम्हाला
कळलं का? कळवाल का याचा अर्थ?
मजा येते! धन्यवाद.
ReplyDeleteधन्यवाद मिलिंद.
ReplyDeleteछान आहेत गं. मुलांना मराठी काय वाचून दाखवायचं हा एक प्रश्न असतो तर हे बरं आहे. :)
ReplyDeleteअरे व्वा. खूप दिवसांनी!!! कशी आहेस? नक्की ऐकव या गोष्टी मुलांना.
Deletemajet aahe.aikwen aata shala officially band jhali na :)
Delete