Thursday, November 8, 2018
Monday, November 5, 2018
दिवाळी आणि दिवाळी अंक
गेली काही वर्ष याचा अनुभव घेतेय. आणि यावर्षी तब्बल १२ दिवाळी अंकात माझ्या कथा आहेत. असं लिहिताना मनात येऊन गेलं, ’म्हणजे महिन्यात फक्त एकच कथा लिहून झाली?’ पण शब्दांचं, विषयांचं असंच आहे. एकदा आजूबाजूला घोटाळायला लागले की कागदावर स्थिरावेपर्यंत त्यांना धीर नसतो पण जवळपास यायचं नाही ठरवलं की फटकूनच वागतात, अस्वस्थ करत राहतात. चालायचंच. तर त्यापैकी काही छायाचित्र. आणि सर्व गोष्टींची अगदी थोडक्यात कल्पना. अंक मिळवून नक्की वाचा आणि अभिप्राय कळवा.
यावर्षी इतक्या अंकासाठी प्रथमच लिहून झालं आणि मेहता प्रकाशनाने माझा ’रिक्त’ कथासंग्रह प्रसिद्ध केला. त्यामुळे माझ्यासाठी हे वर्ष खूपच आनंदाचं ठरलं. तसंच तुमच्यासाठी उर्वरित हे आणि पुढील वर्ष आनंदाचं, इच्छापूर्तीचं जावो.
माझ्या कथा/लेख असलेले दिवाळी अंक
१. आवाज
२. श्री. व सौ.
३. सामना
४. प्रसाद
५. मेहता ग्रंथ जगत
६. कथाश्री
७. अनुराधा
८. कुबेर
९. अभिरुची
१०.माझा मराठीचा बोल
११. फ्रान्स महाराष्ट्र मंडळ
१२. बिगुल (लेख)
आवाज: आर्थर पार्क हा आमच्या गावातील भारतीय लोकांनी भरलेला भाग. तिथे काही वर्ष चोरांचा सुळसुळाट वाढलाय. अशीच एक नुकतीच झालेली चोरी आणि तिचा शोध घेणारा तरुण देखणा अमेरिकन पोलिस. तो पोलिस आणि भारतीय नागरिकांमुळे त्याच्या तपासकामात वाढलेला गोंधळ याची कथा - आर्थर पार्क
प्रसाद : न्यूयॉर्कमधील धडाडीचा तरुण वकील. वडिलांच्या पेशामुळे त्याच्याच वयाच्या मुलांकडून होणारी हेटाळणी आणि त्यामुळे वडिलांचीच आयुष्यभर लाज बाळगत आलेल्या आणि अचानक एका प्रसंगाने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेल्या परमजितची कथा - धुकं.
मेहता ग्रंथ जगत: दत्ता आणि मुक्ताच्या आयुष्यात सावत्र आई येते. मुक्ताच्या हृदयात ती सहज स्थान पटकावते. पण ’सावत्र’ या शब्दाच्या विळख्यात अडकलेला दत्ता तिला नाकारत राहतो. आणि अचानक कितीतरी वर्षांनी दत्ताच्या कृतीने तिघांचं अवकाश बदलतं. त्या घराची कथा - झाकोळ.
कथाश्री: सुलभा आणि अविनाशची एकुलतीएक मुलगी कांचन. एकेकाळी ज्या संकटातून अविनाशला जावं लागलं त्याच समस्येला कांचनलाही तोंड द्यावं लागतं. तोच प्रसंग तिच्यावर ओढवतो. हा प्रसंग तिला वडिलांबद्दल असलेल्या शंका, राग याबद्दल नकळत वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला भाग पडतो. कोणता हा प्रसंग आणि काय होतं पुढे? कथा - सुरुवात.
अनुराधा: दुकान, गिरण असं एक स्वप्न मनात बाळगत शिपायाचं काम करणारा त्रिंबककर, राजेश आणि धर्मेंद्र ही दोन टोकाचे स्वभाव असलेली त्याची मुलं. अचानक त्रिंबककरचं स्वप्न खरं होण्याची शक्यता निर्माण होते. पण... तो जो ’पण’ असतो त्यामुळे मुलगा, बायको एका बाजूला तर त्रिंबककर आणि त्याचा एक मुलगा दुसर्या बाजूला असं चित्र निर्माण होतं. होतं त्रिंबककरचं स्वप्न पुरं? की तो ’पण’ सर्वांनाच वेगळ्या दिशेला नेऊन सोडतो? कथा - दुकान, गिरण आणि...
बिगुल: कायद्याने अमेरिकेत समलिंगी विवाहाला मान्यता मिळालेली असली तरी यौवनावस्थेतील मुलांचं समलिंगत्व पालक स्वीकारत नाहीत. काय करतात ते यावर? त्यावर प्रकाश टाकणारा लेख. दुसरी बाजू.
श्री. व सौ. : वय नावाचं गौडबंगाल या अंकाच्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित कथा. वय वाढणं कुणाला चुकलंय? पण या वाढत्या वयाबरोबर होणारी मानसिक, शारीरिक स्थित्यंतरही कधीकधी ढवळून काढणारी ठरतात. कुणी यातून मार्ग काढतं, कुणी नकारात्मकताच घट्ट धरून राहतात. त्यावर आधारित कथा - पर्याय.
कुबेर: वरुण आणि त्याच्या मैत्रिणीच्या एका कृत्यामुळे आत्मघाती कृत्याकडे वळलेला त्याचा मित्र. वरूणला त्याच्या वागणुकीबद्दल न मिळालेली शिक्षा यामुळे उसळलेला जनप्रक्षोभ. या सार्या घडामोडींचा, तरुणांच्या मानसिकतेचा अभ्यास करणारे आलोक रॉय. असं काय केलं वरुणने आणि त्याच्या मैत्रिणीने? कथा - प्रारंभ.
सामना: एकमेकांपासून दूर गेलेल्या, कधीही भेट न झालेल्या बहिणी. अचानक एकीला दुसरीची भेट घ्यायची इच्छा होते. पण बहीण कुठे असते हे देखील ठाऊक नाही. होते दोघींची भेट? दुसरीला असते बहिणीला भेटायची इच्छा? त्या दोघींची आणि त्या दोघींच्या कुटुंबाची ही कथा - प्रवेश
| |
---|---|
|
|
|
|
|
Subscribe to:
Posts (Atom)