Friday, February 24, 2012

क्षितीज - भाग 8

बसने जाणं जसं शुभमला आवडत होतं, तसचं कधी एकदा ड्रायव्हिंग शिकतो असंही झालं होतं. लवकरच दोन्ही गोष्टीतलं नावीन्य संपलं. सवय झाली. कधी गाडी, कधी ड्रायव्हिंग असं चालू झालं, त्यालाही आता वर्ष होवून गेलं. आज मात्र ड्रायव्हिंग शिकायलाच नको होतं असं वाटत होतं.

'कशाला शिकलो ड्रायव्हिंग असं झालय. हात मोडलेला, पाय मोडलेला अशा अवस्थेत किती दिवस घरी रहावं लागणार आहे  कुणास ठाऊक. मला एका हाताने टाईप करणंही कठीण जातय.' शुभमने नेहाला टेक्स्ट केलं. त्यानंतर मात्र त्याच्यात त्राणच राहिलं नाही. वीस वर्षापर्यंत मेंदू तातडीच्या प्रसंगात निर्णय घेण्याएवढा विकसित झालेला नसतो हे, आईने सांगितलेलं तज्ञाचं मत खरं असावं असं आज त्याला प्रथमच वाटत होतं. हायस्कुलमधलं हे शेवटचं वर्ष. दोन महिने उरलेले त्यानंतर कॉलेज. गॉश! परीक्षा, मार्कस्‌, कॉलेज प्रवेश.....  सगळं घरात बसून कसं पार पडणार? थकल्या मनाने त्याने खुर्चीवरच मान मागे  टेकवली पण दृष्टीसमोर चार दिवसापूर्वी घडलेला अपघातच येत राहिला.
अकरावीपर्यंत काही केल्या त्याला ड्रायव्हिंगची संधी घरातून मिळाली नव्हती. शाळेतच शिकून घेता येतं म्हणून तो गाडी दहावीतच शिकला. पण घरची गाडी मिनतवार्‍या करुनही मिळत नव्हती. अगदी क्वचित फार हट्ट केला की जवळच्या रस्त्यावर एक चक्कर टाकायला मिळे तेवढच. गाडी शिकल्यापासून इथे तिथे जायलाही त्याला गाडीशिवाय पर्याय नाही असच वाटायला लागलं  होतं. दरवेळेला कशाला आई-बाबाला आणणं पोचवणं याचा त्रास? दोघांना पटवायचा अयशस्वी प्रयत्नही केला शुभमने. शेजारचा सॅम काय टेचात स्पोर्ट कार चालवातो. त्याच्या नाकावर टिच्चून त्याला आपली गाडी भरधाव, खचकन ब्रेक दाबून, व्हि सिक्स इंजिनचा आवाज करत चालवायची होती. शेवटी बारावीत गेल्यावर आईच्या जुन्या गाडीवर समाधान मानावं लागलं.
वर्ष बरं गेलं, आणि चार दिवसापूर्वी, शनिवारी सकाळी तो मित्राकडे जायला म्हणून घराबाहेर पडला. फार लांबही नव्हतं घर. रोजचाच रस्ता. गाडीचा वेगही कमीच होता. शनिवारची सकाळ. त्यामुळे फारशा गाड्या नव्हत्याच रस्त्यावर. गाडीत लावलेल्या  रेडिओवरच्या गाण्यात शुभम रंगला होता. डावीकडे वळायचा सिग्नल अजून पिवळा होता. तो लाल व्हायच्या आधी आपण गाडी  वळवू असाच अंदाज बांधला शुभमने. थोडासा वेग वाढवत त्याने गाडी वळवली. आणि काय होतय ह्याची जाणीव होईपर्यंत  समोरुन आलेली गाडी त्याच्या गाडीच्या उजव्या बाजूवर आदळली. त्याचं अनुकरण करत मागून आलेली गाडीही धाडदिशी त्याच्या गाडीच्या मागच्या भागावर आदळली. सीटबेल्ट घातलेला असूनही शुभमच्या मानेला जोरदार हिसडा बसला. बाजूने आदळलेल्या गाडीमुळे खिडकीच्या फुटलेल्या काचाही उजव्या गालात रुतल्यासारख्या वाटल्या.  सगळ्या गाड्या कर्कश्य आवाज करत थांबल्या. त्याने हात हलवायचा प्रयत्न केला खरा. पण हात हलेना. पायातूनही प्रचंड कळा येत होत्या. मागून आपटलेल्या गाडीचा ड्रायव्हर तोपर्यंत मदतीसाठी धावला होताच. समोरुन आपटलेल्या गाडीतल्या माणसांनाही लागलं असावं. शुभमच्या डोक्यातलं विचारचक्रही  थांबलच. ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेडचे आवाज कानात घुमायला लागले तेव्हां कुणीतरी सेलफोनवरुन ९११ ला कॉल केल्याचं त्याला  जाणवलं.  शुभमला अतीव वेदनेने गुंगीच आली. जाग आली ती हॉस्पिटलमध्येच. हातापायाला प्लॅस्टर आणि समोर बसलेले आई-बाबा.
"कसं वाटतय?" आईच्या आवाजातला हळुवारपणा जाणवून त्याला एकदम रडायलाच यायला लागलं. 
"बाकीच्या गाडीतली माणसं कशी आहेत?" मनातल्या मनात प्रार्थना करत त्याने प्रश्न केला. तरुण मुलांच्या निष्काळजीपणाने  हकनाक बळी गेलेल्या माणसांच्या किती कथा त्याने ऐकल्या होत्या. आपल्यामुळे कुणावर तशी वेळ येवू नये याचं भान त्याला तशाही अवस्थेत होतं. 
"सगळी ठीक आहेत. मागच्या गाडीतल्या माणसाला फार लागलेलं नाही. समोरुन जी गाडी आदळली त्यातल्या बाईंनाही सुदैवाने फारसं लागलेलं नाही. एक हात थोडासा सुजलाय तेवढच. पोलिसांना तुझ्याशी बोलायचं आहे. विमा कंपनीच्या माणसांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत. या गोष्टी लगेचच कराव्या लागतात. तेव्हां जे आठवत असेल ते आणि काय असेल ते खरं सांगून टाक."  बाबा आणि आईच्या आश्वासक वागण्याने त्याला डोक्यावरचं प्रचंड ओझं क्षणभराकरता का होईना उतरल्यासारखं वाटलं. पुढच्या  दोन दिवसात बर्‍याच गोष्टी घडल्या. पोलिसांचे अगणित प्रश्न, विमाकंपनीने झटकन वाढविलेला विमा, त्या दोन गाड्यातली माणसं  कोर्टात तर खेचणार नाहीत ना, ही भिती तर होतीच. या चार दिवसात त्यापैकी कुणाचा फोन आला नव्हता. पण बर्‍याचदा नंतर मान दुखतेय, पाठीला मुका मार बसला या कारणांनी पैसे काढण्याचा प्रयत्न करतात असं कालच त्याची भेटायला आलेली  मित्रमंडळी सांगत होती. आई किंवा बाबा काहीच कसं बोलले नाहीत? त्याला आश्चर्य वाटलं.
 दोन दिवसांनी घरी आल्यावर त्याच्या खोलीत दोघं येवून बसले होते. तेव्हां त्यांनी विचारलेले प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर नाचले.
"तू सेलफोन वर नव्हतास ना बोलत?" आईने थेट मुद्यालाच हात घातला.
त्यालाही झाल्या प्रकारामुळे दोषी वाटत होतच. नेहमीचा आक्रमकपणा कुठेतरी लोपला होता. 
"नाही. मी गाडी चालवताना कधीच सेलफोन नाही गं वापरत. तुम्ही रोज बाहेर पडायच्या आधी आठवण करुन देताच की."
"तरी खात्री करुन घ्यायला हवीच. टेक्स्टिंग नव्हतं ना चाललेलं?" बाबाने पुढचा प्रश्न विचारला. त्याने नुसतीच नकारार्थी मान  हलवली.
"लाल सिग्नलवर डावीकडे वळवलीस गाडी?"
"नाही. पिवळ्यावर." हळुच तो उत्तरला.
"अरे पण किती वेळा सांगितलय की सिग्नल पिवळा होतय असं दिसलं की थांबायचं. भलतं धाडस करायचं नाही. अवघे काही  सेकंद नाहीतर मिनिटं वाचतात, पण ते वाचवायला जाताना काय घडू शकतं ते पाहतोयस ना?"
"आय ऍम रिअली सॉरी. चुकलं माझं" थोडावेळ तो गप्पच राहिला. विचारावं की नको या संभ्रमातच त्याने विचारलं.
"कुणी 'सू' (खटला) नाही ना करणार आपल्याला? माझे मित्र म्हणत होते की पैसे उकळायला पाहतात मानेचं, नाहीतर पाठीचं  दुखणं सुरु झालं म्हणून."
"अजूनतरी नाही. त्या समोरुन येणार्‍या गाडीतल्याच बाई सेलफोन वर बोलत होत्या बहुतेक. पण खटला होण्याची शक्यता नाकारता नाही येत.  ते बघू आपण नंतर. आत्तातरी तुझा अभ्यास, परीक्षा हे सगळं कसं पार पडणार हे पाहायला हवय." दोघांनीही त्याला धीर देत  म्हटलं. त्याला ड्रायव्हिंगबद्दल हजार सूचना करणारी, बडबडणारी आईही शांत होती. त्यामुळे तर शुभमला अधिकच दोषी वाटत होतं. चूक असून किंवा नसूनही वाढलेला विम्याचा हप्ता डोळ्यासमोर नाचत होता. त्याच्या लायसन्सवर आलेले पॉईंट्‌स्‌ अस्वस्थ  करत होते. त्यात आणखी हे कोर्ट प्रकरण नको उद्भवायला. या पेक्षा गाडी नसतोच शिकलो इतक्या लवकर तर? उगाचच त्याला  वाटत राहिलं. तो त्याच्या बाजूला निशब्द बसलेल्या आई बाबांकडे काही न बोलता पहात राहिला. हळूहळू औषधांचा प्रभाव शरिरावर जाणवायला लागला. डोळ्यावर झापडच आली त्याच्या. गाढ झोप लागली. कधीतरी आईने त्याच्या उशीच्या बाजूला चिठ्ठी ठेवली.

* * * * * * * * * * * * * * * * * * * *
पिल्या,

असा झोपून राहिलेला, थकलेला, वाद न घालणारा शुभम पाहणं फारसं सोपं नाही. मला तुझ्या चेहर्‍यावरुनच कळतय की तुला  फार अपराधी वाटतय. झालं ते झालं. आता त्याची चर्चा करण्यात, उगाळण्यात काय अर्थ आहे. थोडक्यात निभावलं यात समाधान  मानायचं. नववीतच सगळी मुलं शिकतात म्हणून तुलाही शिकायचं होतं ड्रायव्हिंग तेव्हां आम्ही मना केलं होतं ते याच कारणासाठी. टेक्स्टिंग, सेलफोनचा वापर आणि मद्यपान करुन केलेल्या ड्रायव्हिंगमुळे किती अपघात झालेले ऐकले आहेत. आणि आपण कितीही व्यवस्थित चालवली गाडी तरी बाकीचे कशी चालवतायत ते आपल्या हातात कुठे असतं? ह्याच मुळे फार सावध  रहावं लागतं गाडी चालवताना. तुझ्या शाळेतल्याच पाच मुलांची ती शोकांतिका आठवतेय ना? झाडावर आदळून गाडी उलटी पालटी  झाली. गेलीच ना सगळी मुलं त्यात? आजही त्या रस्त्यावरुन जातो आपण तेव्हां गवतावर रस्त्याच्या बाजूला त्यांच्या स्मृतीसाठी  लावलेल्या काठीवरचा फलक, नाहीतर क्रॉस असलेले दांडे, अधूनमधून तिथे दिसणारी ताजी फुलं पाहिली की तुला ती  मुलं आठवतात. मला ताजी फुलं तिथे ठेवणार्‍या त्यांच्या जिवलगांचं दुःख व्याकुळ करतं. सेलफोनचा वापर, मद्यपान ह्या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येईल. पण तुम्हा मुलांचा मेंदू लहान वयामुळे तातडीच्या प्रसंगात निर्णय घेवून कृती करण्या एवढा विकसित झालेला  नसतो त्याचं काय करायचं रे? आणि हे अभ्यासाने सिद्ध झालेलं सत्य आहे. तुला घडलेला हा अपघात म्हणजे डोळे उघडणारा धडा असेल अशी अपेक्षा करु का? 

तुझी आई 

ता. क. : तु वाचतोस का रे माझी पत्रं? तुझ्या वागण्यातून वाचत असावास असं वाटतं तरी. म्हणजे बदलत चाललेला, समंजस असा काहीसा वाटतोस तू हल्ली. हे वाढत्या वयामुळे, माझ्या एकतर्फी पत्रलेखनांने की दोन्हीमुळे?
क्रमश:
पूर्वप्रसिद्धी ’व्हिवा’ लोकसत्ता: 

ओ ड्यूऽऽड लेखमालिका

Friday, February 17, 2012

क्षितीज - भाग 7

"उद्या आम्ही इथून परत निघणार. आय जस्ट कॅन्ट वेट टू टॉक टू यु.  ’सी यु', असं म्हणता येत नाही कारण तसं आपण फारसं  भेटतच नाही. पण आता मी आल्या आल्या कार्यानुभवाच्या निमित्ताने भेटता येईल." रात्री गच्चीत झोपल्या झोपल्या शुभमने साता समुद्रापलीकडे असलेल्या नेहाला टेक्स्टिंग केलं.  भारताबद्दल त्याला तिच्याशी खूप बोलायचं होतं. या खेपेला शुभमने सिंहगड पाहिला. अपेक्षाभंगच झाला.  पैसा आणि इच्छेचा अभाव हे एकच कारण?. सगळे नुसतं म्हणतात भारतात हे नाही, ते नाही पण प्रत्यक्षात बदलासाठी कुणी काही करत नाहीत. भारतातल्या अनेक गोष्टीबद्दल मनात विचारांचा घोळ सुरू होता. नेहाशी बोललं की दिशा मिळेल?
शुभम परत आल्यावर मूलभूत प्रश्नालाच नेहाने हात घातला.
"आवडतं तुला भारतात जायला?"
"ठाऊक नाही. कदाचित कॉलेज झाल्यावर नोकरीसाठी म्हणून आवडेलही काही दिवस तिथे जाऊन राहायला. पण आपण राहतो ते गाव म्हणजेच माझं जग वाटतं मला. इथून मी नाही जाणार कुठे. तुला आवडतं भारतात जायला?" शुभमने तिलाच उलट विचारलं.
"अं? नाही रे. वाट्टेल ते  प्रश्न विचारतात कुणीही. पहिला प्रश्न, बॉयफ्रेंड आहे का तुला? चौथी पाचवीत होते तेव्हाच हे विचारलेलं कुणीतरी. जसं काही जन्म झाल्या झाल्या अमेरिकेत प्रत्येकाला बॉयफ्रेड असतो, आणि गल्लो गल्ली लोकं चुंबनच घेत असतात असं वाटतं  त्यांना. सगळ्या नातेवाईकांना भेटायला जायचं प्रकरण असतच. मनासारखं कुठे वावरता येतं तिकडे?. अंग पूर्ण झाकलं जायला हवं, तोकडे कपडे नकोत, मेकअप नाही करायचा.....  काय तर म्हणे चांगल्या नजरेने पाहत नाहीत रस्त्यावर. आणि खरंच किती टक लावून बघतात. दे रिअली मेक मी नर्व्हस."
"याबद्दल खूप ऐकलंय आईकडून. मुलींना पाहून जीभ पण फिरवतात ओठावरून. आई म्हणते बाकी काही नाही तरी या गोष्टींपासून सुटका मिळवायची तर यावं अमेरिकेला. इकडे घालतात तसे कपडे, फॅशन भारतात करतात पण अमेरिकेत असे कपडे घातल्यावर कुणाच्या नजरा वारंवार वळत नाहीत, कुणी  जीभ  चाटत नाही हे विसरतात भारतातली लोकं. मी आता खरं सांगायचं तर आईच्या पत्राची वाट पाहतोय. तुला सांगितलं ते आईशी गप्पा मारताना तिलाही सांगितलंय. मला नक्की ठाऊक आहे की ती यासंदर्भात लिहेलच."
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
शुभंब्या,
तुझ्याकडून भारताबद्दल नकारार्थी ऐकलं की त्रास होतो. त्यातून तुझं राहतं गाव म्हणजेच तुला तुझा जग वाटतं हे ऐकलं की तर फारच अस्वस्थता येते. पण ते मान्यं करणं भाग आहेच. या देशातच तू वाढलेला, पालक भारतीय आणि दर दोन वर्षांनी महिनाभर भारतात घालवलेले दिवस एवढ्यावर आमचा देश तुला तुझाही वाटावा असं वाटण्याचा अट्टाहास आम्ही तरी का करावा? तरीही तुझी निरीक्षणशक्ती आणि बोलण्यातून सकारात्मक गोष्टी ऐकल्या की बरं वाटतं. तुला भारतातल्या मुलांसाठी काहीतरी करावंसं वाटतंय ही फारच चांगली गोष्ट आहे. खूप मुलांच्या बाबतीत असं झालं आहे. त्यांना कधी ना कधी तरी आपली मुळं शोधावीशी वाटतात. इथल्या मुलांप्रमाणे, जग फिरायचं या संकल्पनेतून आपल्या मायभूमीचं अंतरंग पाहायचं भान येतं. ही मुलं कोणत्या ना कोणत्या संस्थेतून भारतातल्या खेड्यापाड्यातलं जीवन पाहायला म्हणून जातात आणि मग जातच राहतात. तिथलं काम आवडतं  म्हणून, शांत, तणावविरहित जीवनाचा अनुभव घ्यावासा वाटतो म्हणून आणि शहरीजीवनापलीकडच्या आपुलकीचं, माणुसकीचं सहजदर्शन सुखावतं म्हणून. तुझ्या सुदैवाने कितीतरी गट, संस्था तुला मार्ग दाखवायला आहेत. आणि मुंबई, पुणं म्हणजे महाराष्ट्र नव्हे हे ही यातून तुझ्या लक्षात येईल, आणि माझ्या दृष्टीने एवढं जरी झालं तरी खूपच.  चला आता पुन्हा आपलं रहाटगाडगं सुरू. उद्या पहिल्यांदाच बसचा प्रवास करणार आहेस नं? कार्यानुभवाचा अनुभव हॉस्पिटलमध्ये येईल, तसाच बसच्या प्रवासाचाही अनुभव वेगळाच वाटेल. संध्याकाळी सांगशीलच कसं वाटलं बसने जाणं ते.
तुझी आई
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
बसचा प्रवास, एकट्याने. सकाळी सहा वाजता धडधडत्या मनाने शुभम थांब्यावर उभा होता. एकटाच. कुणीच नव्हतं तिथे. बापरे, बसने जातच नाही की काय कुणी. बाबाची परत फिरलेली गाडी थांबवावी असं त्याला वाटून गेलं. तेवढ्यात हिरव्या रंगाची बस फुसफुसा आवाज करत थांबली.
ड्रायव्हरने केलेल्या गुड मॉर्निंगला त्यानेही तोंडातल्या तोंडात पुटपुटत प्रतिसाद दिला आणि झुलपं उडवीत तो बसला. बसला म्हणजे काय चक्क उडालाच. इंटरनेट! बसमध्ये इंटरनेटची सोय. वॉव, आता अर्ध्यातासाचा प्रवास क्षणभरात संपेल. एकदा बस बदलून परत अर्धा तास. त्यातही असेलच म्हणा इंटरनेट. पण त्याची ही नशा फार वेळ टिकली नाही. बाजूच्या माणसाने त्याला काहीतरी विचारलं आणि मग गप्पाच सुरू झाल्या. गाडीत म्हटलं तर माणसं पाच सहाच होती. त्यात मध्ये एक 'देसी' मुलगाही चढला. सायकल घेऊन थांबला होता तो. सायकल लावली त्याने बसच्या मागे. नेहमी एकच बस पकडत असावेत सर्वजण. प्रत्येकजण एकमेकाला ओळखत होता. त्यात आज शुभमची भर. त्याच्याशी ओळख करून घ्यायला सर्वांनाच उत्सुकता होती. शुभमलाही प्रचंड कुतूहल होतं. इतकी वर्ष आई-बाबाच सोडायचे कुठेही. त्याचा असा हा पहिला प्रवास. काय करू आणि काय नको असं झालं होतं शुभमला.
हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मात्र त्याचा उत्साह निवळला.
"कुठून या फंदात पडलो असं झालंय. तुला आवडतंय हे व्हॉलेंटियरिंग?" नेहा त्याला कॅफेत भेटली तेव्हा तो चिडलेलाच होता.
"काय झालं?"
"शस्त्रक्रिया बघायला मिळेल असं वाटलं होतं. तेवढं सोडून बाकी सर्व करतोय. वैताग नुसता !"
"अरे पहिलाच आठवडा आहे आपला. मिळेल बघायला एखादीतरी शस्त्रक्रिया. आणि आपला रुबाब बघ ना. स्क्रब, हॉस्पिटलचा पोशाख, आयकार्ड... डॉक्टर झाल्यासारखंच वाटत नाही का तुला?"
"हं" त्याने नुसताच हुंकार दिला, तिचं म्हणणं पटल्यासारखा.   दोन महिन्याच्या सुट्टीतला हा कार्यानुभव. केवढी धडपड केली होती शुभमने त्यासाठी. पाचशे मुलांतून दोनशे मुलं निवडणार. त्यासाठी लिहिलेला निबंध, मुलाखत, हा अनुभव निश्चितच कॉलेज प्रवेशासाठी उपयोगी पडणार होता. आज तो वैतागला तरी सगळाच काही आनंद नव्हता. डॉक्टर्स थोडेसे फटकूनच वागतात असं वाटलं तरी टीनाने, तिथल्या रिसेप्शनिस्टने, त्याच्यासाठी मुद्दाम राखून ठेवलेला केक त्याला आठवला. तिने खाऊन टाकलेलं त्याचं चॉकलेट. त्याला आत्ताही हसायला आलं. टीना म्हणाली होती. तुझीच चूक ती, का ठेवलंस ते चॉकलेट उघड्यावर. मला खूप आवडतं, म्हणून मी खाऊन पण टाकलं. डॉक्टर मंडळीपेक्षा ही लोकं जवळची वाटली. तो थोडासा शांत झाला. नेहालाही इथेच काम करायला मिळालं होतं हे सुखदायक होतच. तिची भेट फक्त सगळे मित्र मैत्रिणी एकत्र जेवायला हॉस्पिटलच्या कॅफेत भेटत होते तेव्हाच. पण तेही त्याच्या दृष्टीने खूप होतं. तो परत खुलल्यासारखा झाला.
"ऑऽसम, बाय द वे मी बसने येतो इकडे."
"आवडतं?"
"मग? खूप स्वतंत्र झाल्यासारखं वाटलं. नाहीतर एवढे मोठे झालो तरी आई-बाबावर अवलंबून राहावं लागतं. बस मस्त आहे. एकदा बदलायला लागते. तिथे जरा भिती वाटते. फारशी वस्तीच नाही त्या भागात. पण बसमध्ये चक्क इंटरनेटची सोय आहे आणि सायकल लावायला पुढे स्टँडपण. रिअली कूल."
"माणसं होती का? आय मीन गर्दी." सर्वांनाच त्याच्या बस प्रवासाचं कुतूहल होतं.
"अर्धी बस भरलेली. त्यात माझा व्हॉलेंटियर चा शर्ट बघून ड्रायव्हर विचारत होता काय करावं लागतं तिथे काम करायचं तर? त्याला सोळा वर्षाची मुलगी आहे. मी माहिती तर सांगितलीच पण एक जास्त अर्जही होता माझ्याकडे तोही दिला.
"मग ड्रायव्हर खुष का एकदम?"
"यस्‌. आणि एक सीक्रेट." बाकीचे मित्र तिथे नाहीत असं बघून पटकन त्याने नेहाला सांगितलं.
"बोलू नकोस कुणाला. माझं आणि ड्रायव्हरचं संभाषण ऐकत होता एक माणूस. ते सिस्को कंपनीचे डायरेक्टर आहेत बहुधा. त्यांनी सांगितलं की त्यांच्या कंपनीत पण असं कार्यानुभवाचं काम करता येतं. मी त्याचं कार्ड घेतलंय. पुढच्या वर्षी करता येईल. बाकी कुणाला सांगणारच नाहीये मी. तू येऊ शकतेस अर्थात."
"नक्कीच, माझं तेच तर स्वप्न आहे. जितक्या ठिकाणी एकत्र राहता येईल त्या गोष्टी करायच्या. आपण एकाच कॉलेजात शिकत असू. संध्याकाळी तिथल्या हिरवळीवर गप्पा मारु, एकत्र अभ्यास करू. खरं तर माझ्या शाळेत मैत्रिणी चिडवतात मला की कसली स्वप्न पाहतेस. हायस्कूल संपलं की नवीन मित्र मिळेल तुला. पण मला तुझं आणि माझं नातं टिकवायचं आहे.
"मला पण. दोघांनीही यशस्वी व्हायचं. स्पर्धांमध्ये एकत्र भाग घ्यायचा." आजूबाजूचे कॅफेत बसलेले डॉक्टर्स, नर्स, इतर लोकं उठायला लागले तसे सगळेच जण भानावर आले. निघता निघता तो म्हणाला,
"मी ठरवलंय. झालोच डॉक्टर तर असं नाही वागायचं हाताखालच्या लोकांशी. मुख्य म्हणजे हसतमुख राहायचं, टिनासारखं. इतर लोकं कामं सांगतात तेही उपकार केल्यासारखं, त्यामुळे काम झाल्यावर कौतुक बाजूलाच राहिलं." सगळ्यांनी माना डोलवल्या. आता आपापल्या विभागात जाऊन काम करायला हवं होतं. या सुट्टीत कार्यानुभवाचे १०० तास तरी भरायलाच हवेत. चांगल्या कॉलेजासाठी ते तास फारच उपयुक्त आहेत याची प्रत्येकाला जाणीव होती.

घरी आल्यावर अपेक्षाभंगाची नाराजी शुभमच्या चेहर्‍यावर पसरलेली होतीच. कटकट, चिडचिड चालू होती. त्याच्या चिडण्याची, कुरकुरीची सवय असल्यासारखं कुणी फारसं लक्ष दिलं नव्हतं. रात्री झोपायच्या आधी वाचायला पुस्तक उघडताच आईचं नवीन पत्र हातात आलं. चिडचिड कुठल्या कुठे पळाली.
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
चि. शुभम,

 संध्याकाळी वैतागलास आल्याआल्या. तुला मी म्हटलं बसच्या प्रवासाची कटकट होत असेल तर सोडू आम्ही तुला. पण तुझा राग होता तो हॉस्पिटलमधल्या लोकांवर. त्यात मी तुला म्हटलेलं, 'वेलकम टू रिअल लाईफ' ते रुचलं नाही कदाचित.
तुम्ही मुलं हॉस्पिटलमध्ये इतकी मदत करता त्याचं कौतुक तिथल्या कर्मचार्‍यांना वाटत नाही याचं फार दुःख वाटतंय तुला. पण तिथेच टीनासारखीही माणसं असतात हे विसरू नकोस. यातून एक चांगला निर्णय घेतलास आणि तो कायमचा लक्षात  ठेव. तू म्हणालास ना की जर तू डॉक्टर किंवा एखादा मोठा माणूस झालास, तर हाताखालच्या लोकांशी असं वागणार नाहीस, तेच  म्हणतेय मी. या कार्यानुभावाच्या निमित्ताने घडलेली आणखी एक चांगली गोष्ट. तू बसने जायला लागलास.
भारतात आम्ही सहज चालत, नाहीतर सायकलीने, बसने कुठेही फिरायचो तुमच्या वयाचे असताना. या देशात ते शक्य नाही. रस्ता माणसांसाठी नसतोच इथे. पुन्हा मोठी शहरं सोडली तर बसची सोय तरी कुठे आहे? त्यातूनही असली तरी किती पालक मुलांना बसने जायला देतात? तू  बसने जायचं ठरवलंस तेव्हा थोडीशी धाकधूक होतीच. पण मला माहीत आहे तू खूष होतास, उपदेशाचा एक डोस कमी झाला. नाहीतर आम्ही तुला सोडतो-आणतो सगळीकडे याची तुला किंमत नाही हे कधी ना कधीतरी ऐकावं लागलेलं आहेच. तो भाग सोडला तरी कुठेतरी स्वतंत्र झाल्याची जाणीव पण सुखदायक वाटते. खरं ना? मला तू बसमधले अनुभव सांगतोस ना ते आवडतात ऐकायला.
तुझं निरीक्षण बरोबर आहे. बसमधली, हॉस्पिटलमधली सर्वसामान्य परिस्थितीतली माणसंही समाधानी वाटली ना तुला, त्या डॉक्टर लोकांपेक्षा? फार ताण तणाव नसले की माणसं खुष असतात, हे तुला बघायला मिळतंय हे चांगलंच झालं. तू म्हणालास तसं कधीतरी खरंच आपण सगळे एक चक्कर टाकू बसने. पंधरा वर्षापूर्वी इथे आलो तेव्हा घरात गाडी यायच्या आधी बसने फिरायचो आम्ही. कितीवेळ उभं राहायला लागायचं थांब्यावर. तेव्हा भारतात सहजासहजी मिळणार्‍या वाहनांचं मोल समजलं. नंतर गाडी आल्यावर बसने जायचा कधी प्रसंगच आला नाही इतक्या वर्षात. पण तुझ्या नजरेतून ऐकायला मिळणारा बस प्रवास आणि बसमधले प्रवासी फारच रंगतदार वाटतायत. तुझ्या वयाच्या मुलांनाही त्यांच्या आई-वडिलांनी हा अनुभव द्यायला हवा असं नाही वाटत तुला? त्यांची शोफरगिरी वाचेल आणि मुलांसाठी एक नवीन अनुभवविश्व. तू सांगायला हवस तुझ्या मैत्रमित्रणींना. कदाचित त्यांनाही वाटेल बसच्या प्रवासाचं आकर्षण आणि मग त्यांच्यामुळे त्यांच्या पालकांना. आता तू खर्‍या अर्थी स्वतंत्र व्हायला लागला आहेस. गाडी चालवायला शिकणं हे त्यातलं मोठं पाऊल

                                                                                                                                     तुझी
                                                                                                                                                  सौ. आई
                             
ता. क. : आज मुद्दाम चि. आणि सौ. शब्द वापरले आहेत. काळाच्या ओघात हे शब्द नष्टच होतील, पत्रलेखनातून. बघ तुला उत्सुकता  वाटली तर सांगेन त्याचा अर्थ.
                                                                                               

क्रमश:

पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता-व्हिवा- "ओऽऽऽड्यूड" लेखमालिका








Friday, February 10, 2012

क्षितीज - भाग 6

आई-बाबांचा कुजबुजल्यासारखा आवाज वाटला तसे त्याने कान टवकारले. जॉनीचं नाव ऐकल्यावर मात्र त्याचं डोकंच उठलं. तो एकदम समोर येऊन उभा राहिला. शुभमने बाबाच्या हातातला कागद हिसकावला. जॉनीने आजूबाजूच्या घरांच्या पत्रपेटीवर अडकवलेल्या जाहिरातीचा तो कागद होता. घाईघाईने त्याने ती जाहिरात वाचली.
"अरे पण तुम्ही मला कामं करूच देत नाही आणि सारखं सांगता, जॉनी शू पॉलिश करतो, जॉनी लॉन मोविंग करतो (ग्रास  कटिंग), जॉनी ग्रोसरी स्टोअरमध्ये काम करतो, जॉनी हे करतो आणि जॉनी ते करतो...."
"पण तुला काय झालं एवढं चिडायला?" शुभमने त्या दोघांचं बोलणं ऐकलं असेल अशी त्यांना शंकाही आली नव्हती. बाबाला मुळी  त्याचा राग कळेचना.
"काय झालं म्हणजे? सारखं तुमचं चालू असतं जॉनी पुराण. जॉनीला शेजारी पाजारी लॉन मोव्ह करताना पाहिलं की लगेच त्याचे  वडील किती मोठ्या कंपनीत मॅनेजर आहेत तरी इथल्या मुलांना कमीपणा वाटत नाही पॉकेटमनीसाठी अशी कामं करताना, यावरच चर्चा."
"त्यात काय चुकीचं आहे पण? चांगली गोष्ट आहे ती."
"मग मला पण करू देत की. तुम्ही म्हणता ना अमेरिकेत आल्यावरच कोणत्याही गोष्टींची लाज वाटू न देता काम करायचं हे शिकायला मिळालं. मग मला का नाही करू देत? अं? का? का नाही करू देत? तिथे लगेच 'देसी' होता तुम्ही." शुभमचा फुटाणा  ताडताड फुटत होता.
"देणार आहोत ना. एखादा महिना तरी ग्रोसरी स्टोअरमध्ये काम करायचा अनुभव हवाच. थोड्याशा पैशांसाठी किती श्रम करावे  लागतात, हे कळायलाच हवं तुला." शुभमच्या रागाचा फुगा एकदम फुटलाच. त्याला बाबाकडून अशा शरणागतीची अपेक्षाच  नव्हती. तितक्यात आईने सूत्रं ताब्यात घेतली.
"त्याचा अर्थ असा नाही की लगेच या सुट्टीत तू काम करशील. पण तसं करू शकतोस एवढंच म्हणायचंय आम्हाला."
"म्हणजे नाहीच ! मला वाटलंच, एवढ्या पटकन कसं काय मान्य केलंत. मी निदान घरचं लॉन मोविंग करतो या सुट्टीत. त्याच्या मोबदल्यात तुम्ही पैसे मलाच द्या."
"पण घरचंच काम करायला तुला पैसे कशाला हवेत?"
"बरं नको देऊस पैसे. खूष?" कुठून पैसे मागितलं असं त्याला झालं.
ती पुढे काही बोलायच्या आत थांब, थांब करत त्याने स्पष्ट  केलं.
"पण प्लीज तुझं सुरू करू नकोस. तोंडपाठ आहे ते मला. मी स्वयंपाक करते, भांडी घासते, कपडे घड्या करते, तुमच्या वेळा  सांभाळते,  त्याचे कोण देतंय पैसे....  सांग म्हणणार होतीस ना? होतीस ना?"
"शुभम पुरे आता, नाहीतर  आपल्याला आजचं जेवण पैसे दिले तरी मिळणार नाही." बाबाने वातावरण हलकं करायचा प्रयत्न  केला.
"मी जातोच आता इथून."
"पैसे तर नाही मिळणार, पण एक मार्ग आहे तुला माझ्याकडून तुझ्या आवडत्या गोष्टी मिळवायचा."
"कुठला?" शुभमने उत्सुकतेने विचारलं.
"सांगितलेलं काम लगेच करायचं. पाच मिनिटांनी, नाहीतर दिवसभरात कधीतरी करेन. झोपायला जायच्या आधी झाल्याशी कारण  अशी आश्वासनं नकोत."
"करतो की मी कामं घरातली."
"हो करतोस ना पण ती वेळेवर करण्याबद्दल म्हणतेय मी."
"काय मिळेल पण आवडीचं?"
"ज्या ज्या दिवशी कामं वेळेत पूर्ण होतील त्या दिवशी तुझ्या आवडीचा पदार्थ जेवणात मिळेल."
"वे कूल ! डील?"
"हो."
"बघ हं तिरामिसू, बाकलावा, गुलाबजाम, काजुकतली .... मी यादीच करतो. चालेल?"
शुभम आणि बाबा दोघांनीही एकमेकाला टाळी दिली. गोडखाऊ बापलेकांना आत्ताच मिष्टान्न समोर दिसायला लागली होती.  तावातावाने सुरू झालेल्या संभाषणाचा सुखद शेवट, त्याचा विश्वास बसेना.
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
शुभम्या,
 आज भांडणाचाच मूड होता तुझा. आम्ही म्हणजे तमाम 'देसी', मुलांना पॉकेटमनीसाठी नोकर्‍या करायला देत नाही त्याचं एकच कारण रे, तुमचा अभ्यास. असं वाटतं की करू शकतो आम्ही तुमचं शिक्षण तर कशाला अशी कामं करायला लावायची. इथली जीवनशैली वेगळी आहे, उपभोगतेला जास्त महत्त्वं आहे, त्यामुळे अमेरिकन पालकांचं बचतखातं तसं रिकामंच असतं. मुलांना पुढच्या शिक्षणासाठी  नोकरीशिवाय पर्यायच नसतो. कितीतरी लोकं बरीच वर्ष नोकर्‍या करतात, कॉलेजसाठी पैसा जमवतात आणि तिशीनंतर कॉलेज  करून पस्तिशीच्या दरम्यान स्थिरावतात. दहावी बारावीपर्यंत शिक्षण मोफत होतं पण त्यानंतर इथल्या मुलांचं शाळा सोडण्याचं,  महागडं कॉलेज शिक्षण, हेच तर मुख्य कारण असतं ना? पण पुढे शिकण्याची जिद्द ज्यांच्याकडे आहे ते त्यासाठी किती प्रयत्न  करतात ते आपण पाहतोच. मला मान्यं आहे की जॉनीचे बाबा त्याचं शिक्षण करणार आहेत आणि तरी तो लहान सहान कामं  करून पैसे मिळवायची धडपड करतो.  तुला तसं करावंसं वाटतं याचं कौतुकही वाटतं. फक्त घरातली कामं ही वाटूनच घ्यायला  हवीत, त्यासाठी पैसे द्या, हे म्हणणं चुकीचं नाही का वाटलं तुला? पण ठीक आहे. सौदा गोड पदार्थावरच मिटला. या निमित्ताने माझं पाककौशल्य क्वचित दिसण्याऐवजी रोज रोज दिसेल म्हणा. त्यासाठी अर्थात तुलापण कामं वेळेवर करायला शिकावं लागेल हे विसरू नकोस. मी  नाही करू शकले सगळे पदार्थ तरी आता आपण जाणार आहोतच भारतात तेव्हा आजी कौतुकाने करून घालेल तुला.  थोडेच दिवस राहिले आहेत सुटी सुरू व्हायला. मला तरी  कधी एकदा भारतात जातोय असं झालंय. तुलाही माझ्यासारखं वाटावं अशी इच्छा असली तरी अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे हे समजतंय मला.
                                                                                                                                           तुझी आई
                                                                                                                                       
क्रमश:

पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता-व्हिवा- "ओऽऽऽड्यूड" लेखमालिका

Friday, February 3, 2012

क्षितीज - भाग 5

आजच्या पत्राबद्दल आईशी बोलावंसं वाटत होतं. भारताबद्दल विचारावंसं वाटत होतं. पण ते टाळायचंही होतं.  शुभमने पलंगाखालचा कागदी खोका काढला. वाचलेलं पत्र त्याने अलगद घडी करुन त्या खोक्यात ठेवलं आणि  गादीखाली लपवलेलं नेहाचं पत्र  हळूच काढलं. इन मिन चार पाच पत्र गेल्या वर्षभरात. कधी चुकून भेटायला मिळालं की एकमेकांना दिलेली. पत्रातलं अक्षर न अक्षर पाठ झालं होतं. पण पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटायचं. डोक्यावर पालथा हात ठेवून तो नेहाच्या पत्रांबद्दल विचार करत राहिला. ती लिहिते ते वाचून वाटतं की जगात माझ्या एवढं हुशार, देखणं कुणी नाहीच. मी बोलतो ते ऐकत राहावंसं वाटतं तिला. माझ्यासारखे गुण तिच्यात असावेत असं वाटतं  नेहाला. नाही तर घरी... किती बोलतोस, ... असं कसं बोलतोस... असं कसं वागतोस... माझं  चुकीचंच असतं सर्व. त्यामुळेच  नेहाच्या पत्राची पारायणं करणं किती छान वाटतं. डोक्यावरचा हात बाजूला करत नेहाने लिहिलेली ती पत्र तो परत वाचत राहिला.  आईच्या पत्रांचाही  विचार करत राहिला. आईच्या पत्रातल्या शब्दांनी आई-बाबा दोघंही त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करतायत  असं वाटायला लागलं होतं.


चॅरिटी बॉल डान्स ! वर्गातली बरीच मुलं जाणार होती. शुभम खुष होता ते नेहा भेटणार म्हणून. पोस्टरसाठी ते दोघं भेटले त्यालाही तीन चार महिने होवून गेले होते. आई बाबांना सांगायचं म्हणजे प्रश्नच प्रश्न. तसंच झालं. किती प्रश्न विचारले आईने. त्याला एकदम  तो सातवीत असताना शाळेतच डान्स होता तेव्हाचा प्रसंग आठवला. आई-बाबा दोघांनाही या डान्स प्रकाराची काही कल्पना  नव्हती.
"नाचायचं म्हणजे मुलीबरोबरच की मित्र चालतो?"
त्याचं गोंधळलेपण पाहून शुभमला भारतात असं काही नव्हतच की काय ते  शाळेत असताना असच वाटलं होतं.
"मित्राबरोबर जाणार आहे. नाचायचं की नाही ते नाही ठरवलेलं."
"पण मग तिथे जाऊन काय करणार?"
"गप्पा मारत बसू. आणि शाळेच्याच तर हॉलमध्ये आहे. पोलिस असतात. बहुतेक मुलांचे आई-वडीलही येतात."
"खरंच? पण तू तर पहिल्यांदा जाणार आहेस. एवढं सगळं कसं काय माहीत तुला?"
"मित्रांकडून. आणि तुम्ही आलात तरी चालेल."
त्या वेळेस दोघांनी जायचं टाळलं. बाबांनी त्याला नेवून सोडलं होतं. त्याला कंटाळाच आला तिकडे. नाचणं तर जमलं नाहीच, गप्पा  पण कुणाशी फार रंगल्या नाहीत. त्यानंतर दोन वर्षं तो गेलाच नव्हता नाचाबिचायला.
पण नेहाशी मैत्री झाल्यावर पहिल्यांदाच त्यांच्या शाळेने आजूबाजूच्या शाळांना आमंत्रित केलं होतं. अंदाज घेत त्याने आई-बाबांसमोर विषय काढला. दोघांनी परवानगी दिली.
शुभमला कधी एकदा नेहाशी बोलतोय असं झालं.
"आय कँट वेट टू सी यू."
"मला पण खूप गप्पा मारायच्या आहेत." दोघांनाही कधी एकदा भेटू असं झालं होतं.
"नवीन पत्र लिहिलं आहेस नं? बर्‍याच दिवसांनी तुझं पत्र वाचायला मिळेल. मला आवडतात तुझी पत्र वाचायला. "
"का? तुझ्याबद्दल लिहिते म्हणून?"
"ते तर आहेच गं, पण तू तुझ्या शिक्षकांबद्दल, मैत्रिणींबद्दल लिहितेस ना, ते देखील. तुझा अभ्यास, विषयातले गुण, तुझे पुढचे बेत  वाचताना मला ते चित्र समोर दिसायला लागतं."
"ए, पत्रावरुन आठवलं. बर्‍याच दिवसात तुझ्या आईच्या पत्राबद्दल नाही सांगितलंस."
"लिहिलंच नाही काही तिने. तुझी आणि तिची आधीचीच पत्र वाचतोय मी परत परत."
"विचारलं नाहीस तिला?"
"मी तिची पत्र वाचतो हेही सांगितलेलं नाही तिला. मग एकदम पत्र का नाही लिहिलंस असं कसं विचारायचं?"
"त्यात काय? आईला सांग की तिची पत्र आवडतात आणि तू वाट पाहत असतोस."
"हं ! बघू " त्याने  विषय बदलला.
फोन ठेवला आणि त्याला शिक्षक दिन आठवला.  घाईघाईने तो आईच्या खोलीत शिरला. ती वाचनात मग्न होती.  त्याने अलगद तिच्या हातातलं पुस्तक बाजूला केलं. कपाळावर आठ्या पडल्याच तिच्या. पण काहीतरी नवीन कल्पना सुचवायची आहे म्हटल्यावर ती एकदम खुलली. त्याच्या बोलण्याचा विचार करत राहिली. शिक्षक दिनाबद्दल लगेच काही सुचणं शक्य नव्हतं. पण तिने कागद पेन पुढे ओढलं. नाहीतरी कितीतरी दिवसात शुभमला पत्र  नव्हतं लिहिलं. ते लिहिता लिहिता सुचेलही काही तरी शिक्षक दिनासाठी. काय करतो देव जाणे पत्राचं. वाचतो तरी का? दरवेळी पत्र लिहिताना सतावणारा प्रश्न होता तो. पण त्याच्या वागण्या  बोलण्यातून तो वाचतोय हे जाणवायचं, कुठेतरी पुसटसे उल्लेख, थोडासा समंजसपणा.... तिला उगाचच वाटत होतं की खरंच तसं आहे हे तिला ठरवता येईना. पण ती त्याला विचारणार नव्हती. 'बोअरिंग...' असं एका शब्दात त्याने पत्रांबद्दल म्हटलं असतं तर  तिला ते सहन नसतं झालं. आणि खूप बोलला असता, आवडतायत असं म्हणाला तर? पण ते तर तो कधीही सांगू शकत होता. तो जोपर्यंत तू लिहू नकोस असं सांगत नाही तोपर्यंत ती लिहिणार होती.
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
शुभम,
 तुला डान्सला हो म्हटलंय खरं पण थोडीशी भिती वाटतेय. आपण घरात  मोकळेपणाने बोलतो, जे काही तुझ्या आयुष्यात चालू आहे ते आमच्या पर्यंतही पोचतंय (असं आम्हाला उगाचच तर नाही ना वाटत?), पण केव्हातरी वाटतं हे थोडं जास्तच होतंय. नसावं पण. आमच्यावेळेस स्नेहसंमेलनं असायचीच की शाळेची. आणि ते फिशपॉन्ड ! इथे नसावं बहुधा असलं काही. पण मुद्दा काय सर्वांनी एकत्र जमायचं, मजा करायची. आणि आम्हाला जे वाटायचं की अमेरिकन मुलं म्हणजे स्वैराचारच. तसं नाही हे केव्हाच समजलंय. आठवतं तुला? तू पहिल्यांदा शाळेत डान्ससाठी गेलास तेव्हा काय झालं होतं ते? हजारो प्रश्न विचारले होते आम्ही तुला. शेवटी तू सांगितलं होतंस की तुम्ही येऊ शकता. आम्ही फक्त शाळेत सोडायचं काम केलं. तुला परत आणायला आलो तेव्हा मी अवाकच झाले. हॉलच्या बाहेर बहुतेक सर्व अमेरिकन पालक होते.  मुलांवर लक्ष असायला हवं म्हणून केव्हाचे आले होते. किती भ्रामक समजुती आहेत आमच्या इथल्या पालकांविषयी. मला  खात्री आहे की आतमध्ये वावरणार्‍या मुलांच्या मनात आपले पालक बाहेर उभे आहेत ही जाणीव सतत असणार, मनात असलं तरी  उथळ वागणं शक्यच नाही अश्या वेळेस. आम्ही 'खरे' पालक असं मानणारे भारतीय तिथे दिसले नाहीत. आमच्यासारखे परत  न्यायला आलेलेच होते सगळे.
बरं आता मुद्द्याचं. तुला पुढच्या आठवड्यात शिक्षकांसाठी काय करायचं असा प्रश्न पडलाय. आमच्या शाळांमध्ये मुलांनी ठरवून खास शिक्षकांसाठी काही कधी केलं नाही. (खरं तर किती छान कल्पना आहे ही).  मला वाटतं, वर्गातल्या प्रत्येक मुलाने एखादी आठवण त्या त्या शिक्षकाबद्दल लिहावी आणि त्या सगळ्या आठवणी छोट्याशा वहीत प्रत्येक पानावर चिकटवून ती वही शिक्षकांना द्यावी. कितीतरी प्रसंग त्यात असतील की तुमचे शिक्षक विसरुनही गेले असतील, कधी ना कधी तुम्हाला त्यांच्याकडून उत्तेजन मिळालेलं असतं, कौतुक झालेलं असतं. वाचताना पुन्हा  एकदा कदाचित ते प्रसंग त्यांच्यासमोर उभे राहतील.
एका शिक्षिकेने तिच्या आयुष्यातील लिहिलेला प्रसंग आत्ताच मी वाचला, ऑन लाइन. पाणावले डोळे. कदाचित तुला माहीतही असेल. पण लिहावासा वाटतोय तुझ्यासाठी. काहीवेळेस शिक्षक तुमचं आयुष्यच बदलून टाकतात. बघ आवडतेय का ही कल्पना.
 वर्गातल्या मुलांना त्या शिक्षिकेने भाषा विषयाचा प्रकल्प म्हणून एकेक कोरा कागद दिला. प्रत्येक मुलाचं नाव लिहून त्या खाली रिकामी जागा ठेवायला सांगितली. त्या रिकाम्या जागेत इतर मुलांनी त्या त्या विद्यार्थ्याबद्दल त्यांना वाटणारी सर्वात चांगली गोष्ट लिहायची होती.  ते कागद तिने मुलांना दिले. मुलांचे खुललेले चेहरेच सारं सांगत होते. कुणी म्हणत होतं.
"खरंच मला माहीतच नव्हतं मी बाकीच्या मुलांना आवडतो." तर कुणी म्हणालं
"मी इतक्या जणांना माहीत आहे याची कल्पनाही नव्हती."
कितीतरी वर्षांनी त्या वर्गातल्या एका मुलाला व्हिएतनाम युद्धात वीरमरण आलं.  शिक्षिका त्याच्या अंत्यदर्शनाला गेली. वर्गातली  बरीच मुलं जमली होती. एकेक करुन सर्वजण त्याच्या शवपेटीशी जाऊन त्याचा अंतिम निरोप घेत होते. त्या शिक्षिकेला पाहिल्यावर मार्कच्या सैन्यातील मित्राने तिला विचारलं.
"तुम्ही मार्कच्या शिक्षिका?"
तिने नुसतीच मान डोलवली.
"खूप ऐकलं आहे आम्ही तुमच्याबद्दल."
तिने स्मितहास्य केलं. मुलं आपल्याला विसरली नाहीत ही जाणीव सुखदायक होती.
मार्कच्या वर्गातली मुलं आणि त्यांचे आई-वडील एकत्र जेवायला थांबले.
"आम्हाला काहीतरी दाखवायचं आहे." भरलेल्या डोळ्यांनी मार्कच्या वडिलांनी पाकिटातून एक चुरगळलेला कागद बाहेर काढला.
"मार्कच्या खिशात सापडला हा कागद. तुम्ही कदाचित ओळखाल असं वाटलं."  जीर्ण झालेला, कितीतरी ठिकाणी चिकटवलेला तो  कागद पाहताक्षणी तिने ओळखला. तो कागद तोच होता ज्याच्यावर मार्कबद्दल इतर मुलांनी लिहिलं होतं. चांगलं, त्याचे गुण दर्शविणारं.
मार्कची आई म्हणाली.
"तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाहीत. इतकी वर्ष जपून ठेवला त्याने जीवापार आवडणारा तो कागद."
"तो कागद माझ्याकडे अजून आहे. दागिन्यांच्या पेटीत जपून ठेवलाय मी."
"लग्नाच्या अल्बममध्ये आहे माझा कागद ."
"मी तर कायमचा पर्समध्येच ठेवला आहे. मला वाटतं त्या वर्गातल्या प्रत्येकाकडे हा कागद आहे, असावा." एकेकजण बोलत होता आणि ऐकता ऐकता अश्रु लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी त्या मुलांची ती शिक्षिका शेवटी हमसाहमशी रडली. तिने केलेली एक छोटीशी गोष्ट,  कृती. किती महत्त्वाची ठरली मुलांसाठी. असे क्षण दुर्मिळच नाहीत का? नाहीतर शाळा म्हणजे स्पर्धा, एकमेकांना चिडवणं, द्वेष असच समीकरण होत चाललं आहे. बघ कदाचित ही गोष्टही तू वर्गात सर्वच शिक्षकांसाठी पोस्टरबोर्डवर लावू शकतोस. असे शिक्षक तुम्हा मुलांनाही मिळोत असं मनापासून वाटतं.     - तुझी आई                                                                                                                                                                                    
                                                                                                                         


क्रमश:

पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता-व्हिवा- "ओऽऽऽड्यूड" लेखमालिका

Friday, January 27, 2012

क्षितीज - भाग ४

शुक्रवारची संध्याकाळ. येणारा प्रत्येक दिवस नवीन काहीतरी घेऊन येत होता. शुभमच्या बरोबरीने कधी ती उत्साहाने सळसळत होती, तर कधी त्याच्या इतकीच निराश होत होती, चिडचिड करत होती. आज  मात्र भराभर कामं आटपून एखादा चित्रपट बघायचा मनात होतं. त्याच्याआधी जेवणाचा घोळ आटपला  की मग निवांतपणा मिळाला असता. जेवताजेवता शुभमचं काहीतरी निघालंच.
"तुम्ही विसरलात का?"
दोघांनी प्रश्नार्थक नजरेने  पाहिलं.
"पुढच्या आठवड्यात नेहाच्या घरी जायचं आहे. दोघं मिळून एका स्पर्धेसाठी पोस्टर करणार आहोत." आई, बाबांनी एकमेकांकडे पाहिलं तेव्हाच त्याच्या लक्षात आलं की नेहाला भेटायला मिळेलच असं नाही.
"हे बघ ! फोन, ऑन लाइन चॅट इथपर्यंत ठीक. प्रत्यक्षात भेटणं म्हणजे जरा अतीच होतंय." बाबाचं होतंय तोच आईने विचारलं.
"नेहाच्या आईची संमती आहे?"
शुभमने नुसतीच मान हलवली.
"अडनिडं वय आहे तुमचं. असे भेटायला लागलात आणि काही विपरीत घडलं तर सगळं महागात पडेल."
"थांब मी सांगतो स्पष्ट."  बाबाने एकदम मुद्द्यालाच हात घातला.
" नो टचिंग, नो सेक्स. ते इंग्रजी चित्रपटात दाखवतात तसे बेसबॉल सारखे फर्स्ट-सेकंड-थर्ड बेस असलं काही व्हायला नको."
"गॉट इट डॅड!" शुभम चांगलाच संकोचला.
"नाही ऐक. तुझ्यामुळे ती मुलगी प्रेग्नंट राहिली तर...  एवढाच विचार कर. दोघांच्या आयुष्याचा खेळखंडोबा होईल. शिक्षण, करिअर यावर लक्ष केंद्रित करायचं वय आहे हे. तुम्हाला दोघांनाही पुढे काय करणार आहात ते माहीत नाही."
"मी आर्किटेक्चर साठी प्रयत्न करणार आहे. तिलाही तेच करायचं आहे."
"तसं नाही रे. हे सगळं होईलच की नाही हे कुठे ठाऊक आहे तुम्हाला? तुमची मैत्री किती दिवस टिकणार हे ही माहीत नाही. कॉलेजसाठी कदाचित दोघं वेगवेगळ्या गावात असाल. भविष्यात एकमेकांबद्दल आकर्षण राहीलच असंही नाही. मैत्रीपर्यंतच संबंध राहू दे, हे सांगायचं आहे आम्हाला."
"ठाऊक आहे हे सगळं. पोस्टर करायचं म्हणून भेटणार आहोत आम्ही." शुभमला दोघांचाही राग यायला लागला.
"ते ठीक आहे. पण कधी ना कधी हे बोलायचंच होतं ते या निमित्ताने सांगतोय."  जास्त न ताणता दोघांनी आटोपतं घेतलं. खोलीत येऊन तो तसाच बसून राहिला. किती स्पष्टपणे बोलले ते त्याच्या आणि नेहाच्या मैत्रीबद्दल. संभाषण आठवूनही त्याचे कान लाल  झाले. अवघडच जातं आई वडिलांकडून हे  असलं  ऐकायला. त्यापेक्षा आईला सांगायला हवं, पत्रच लिहीत जा. त्यातून तिच्या  लहानपणीच्या गमतीजमती समजतात, भारत कसा आहे, होता तेही समजतं. आईच्या पत्रातलं जग अद्भुत असतं हे त्याने स्वत:शीच कबूल केलं.

शुभम तिथून गेला तरी तिच्या मनात काही ना काही घोटाळत होतच. आधीच्या पत्राबद्दल शुभमच्या प्रतिक्रिया तिला कळल्या  नव्हत्या. पण कुठे नाराजीचा सूरही दिसला नव्हता वागण्याबोलण्यातून, हेच खूप होतं. किती लेखातून, टी.व्ही. वरच्या कार्यक्रमातून वाढत्या वयातल्या मुलांशी कसं वागावं हे ती ऐकत होती, वाचत होती. पालकांनी पालकच राहावं, उगाचच मित्र होण्याचा प्रयत्न करु नये, हे कुठेतरी वाचलेलं तिला फार आवडलं होतं. ती ते अमलात आणायचा प्रयत्नही करीत होती. तो  स्पष्ट काही सांगत नाही तोपर्यंत ती लिहीत राहणार होती. आणि काही नाही तर बालपणातल्या, शाळा, महाविद्यालयातल्या आठवणी लिहिताना पुन्हा एकदा तिला तरुण झाल्यासारखं नव्हतं का वाटत? शुभमला मराठी वाचण्याचा सराव होईल. पत्रलेखनातून खूप काही साध्य होईल याचा भरवसा वाटत होतं तिला. हात धुऊन ती उठलीच. ऑफिसरुममध्ये जाऊन तिने कागद पुढे ओढला.

* * * * * * * * * * * * * * * * * * * *
शुभ्या,
 कशी वाटतात माझी पत्रं तुला? आलं का नीट मराठी वाचता? तसं आज सेक्सबद्दल स्पष्ट  बोललोच आम्ही तुझ्याशी. तरी मुद्दाम लिहितेय. आम्ही वयात येताना असं काही कुणी सांगणारं नव्हतं. आईने थोडंफार सांगितलं होतं पण पुढच्या स्वाभाविक येणार्‍या गोष्टी मनमोकळेपणे नव्हतो बोललो. प्रश्न होते ते मनातच राहिले. आता खूप माहिती वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना समजते. आम्ही तुझ्याएवढे असताना नुकतंच दूरदर्शन सुरु झालं होतं. पण त्या वेळेस टी.व्ही. वर नसती प्रलोभनं नव्हती. चित्रपटांमध्येही उत्तान, सवंग दृश्यं नसायची. त्यातून आम्ही अमेरिकेत  कुठे वाढत होतो? अरे, पण आजकाल सगळी म्हणतात की मुलं भारतात वाढवण्यापेक्षा इथेच नीट वाढतात. खरं असेल का हे?  मी हे तुला लिहितेय कारण तुम्हा मुलांना हे धडे देताना कुठेतरी सारखं मनात असतं की त्यापेक्षा भारतात असतो तर बरं झालं असतं की काय? भारतात सुट्टीत गेलं की आपल्याला बदलत चाललेल्या त्या त्या भागाचं तसं वरवरचंच चित्र दिसतं. आम्ही सोडून आलो तेव्हाचा भारत आम्ही तुमच्या डोळ्यासमोर उभा करतो. प्रत्यक्षात  बदललेला भारत आम्हाला तरी कुठे कळतो? तुम्ही देखील आमच्याकडून ऐकलेला भारत शोधत राहता. असे बदल  होतच राहणार. जगात कुठेही गेलं तरी प्रलोभनांपासून दूर राहणं सोपं नाही. ते तुला जमावं एवढीच इच्छा -   तुझी आई .                                                                                                                                                                  


                                                                                              तुझी आई
* * * * * * * * * * * * * * * * * * * *



क्रमश:

पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता-व्हिवा- "ओऽऽऽड्यूड" लेखमालिका

Thursday, January 19, 2012

क्षितीज - भाग 3

सकाळी जाग आली तेव्हा खिडकीतून ऊन आत डोकावत होतं. आज शुभमला आवडत्या गोष्टी करायला खूप वेळ होता. लॅपटॉप चालू करुन त्याने शेअरचे भाव बघितले. गेल्या महिन्यात शेअरची घसरण झाल्यावर शुभमच्या मनात पैसे गुंतवायचं आलं होतं. आईकडून फक्त दोनशे डॉलर्स मिळाले होते मुश्किलीने. पण  बाबांच्या मध्यस्थीने अखेर पाचशे डॉलर्स गुंतवायला मिळाले. त्याला एकदा ते तंत्र जमलं की बाबा आणखी पैसे द्यायलाही तयार होते. शाळेत शिकलेला इ-ट्रेडिंगचा धडा प्रत्यक्षात अनुभवता येणार म्हणून शुभम खुष होता. बाबांच्या मदतीने खातं उघडलं आणि त्याला शेअरच्या वर खाली होणार्‍या भावांनी वेडच लावलं. आत्ताही त्याने  शेअरचे भाव चढलेले बघितले तसा उत्साहाने तो खाली धावला.
"मी कंपनी उघडतोय."
आईने लक्ष दिलं नाही, तसं पुन्हा त्याने तेच म्हटलं. प्रश्नार्थक चेहर्‍याने तिने नुसतंच त्याच्याकडे पाहिलं.
"बघ आत्ता शेअर विकायचे असतील तर प्रत्येक व्यवहाराला पंधरा डॉलर्स देतो आपण. मी आणि माझे दोन मित्र सल्लागार म्हणून  काम सुरु करु. प्रत्येक व्यवहारासाठी सात डॉलर्स. म्हणजे निम्म्या पैशात."
"अरे आत्ता कुठे शेअर्सची खरेदी, विक्री शिकतो आहेस. आणि एकदम कंपनी? अभ्यासाचं काय मग?"
"ते करुनच. आणि कंपनी सुरु करणं एकदम सोपं असतं. दोनशे डॉलर्स लागतात. जाहिरातदारांकडून पैसे मिळवायचे. शाळेतल्या डेका क्लबमध्ये आम्हाला बिझनेस प्लॅन शिकवतात. तो काल्पनिक असतो  आणि हा  प्रत्यक्ष असेल एवढंच."
"पण जाहिराती मिळवणं इतकं सोपं नसतं राजा!"
"आम्ही सगळा आराखडा दाखवू ना त्यांना. आणि नाहीच तर मग आत्ता स्वतःचेच थोडे थोडे पैसे घालावे लागतील."
"पण पैसे गुंतवायला तुमचा सल्ला कोण घेईल? किती लहान आहात तुम्ही वयाने."
"वय कशाला सांगावं लागेल. आमची वेबसाईट असेल."
सोळा वर्षाच्या मुलाकडे ती मती गुंग झाल्यासारखी बघत राहिली.
"हे बघ आई, आमचा ह्या बाबतीत खूप विचार झालाय. सुरुवातीला दोन सल्ले फुकट द्यायचे. आमच्या सल्ल्याप्रमाणे पैसे गुंतवले आणि एका वर्षात त्यांना फायदा झाला नाही तर पैसे परत द्यायचे. आणि करारामध्ये तळटीप असेलच की, तुमच्या फायद्या तोट्याला आम्ही जबाबदार नाही म्हणून."
"तू बाबांशी बोल बाबा."
"नाही. मी सगळा बिझनेस प्लॅन बनवणार आहे आणि मगच बाबांना दाखवीन. तू सुद्धा काही सांगू नकोस."
तिने नुसतीच मान हलवली.
"टि. व्ही. वर दाखवतात ना टीनएजर मिल्यिनेयर. तसं व्हायचं आहे मला."
आईच्या आ वासलेल्या चेहर्‍याकडे दुर्लक्ष करत  तो तिथून पसारही झाला. काही सुचेनासं झालं तशी ती उगाचच त्याच्या खोलीत डोकावली. लॅपटॉप चालूच होता. त्याची ई मेल वाचावीत? आलेली, त्याने पाठवलेली.... फेसबुक मध्ये कुणी काय त्याच्याबद्दल लिहिलंय तेही कळेल. तिला नक्की ठरवता येईना. विचारलं कधी की तो स्वतःच दाखवतो मग असं वाचलेलं कळलं तर चिडून बसेल. मनात उलटसुलट विचारांचं आवर्तन चालू होतं. बराचवेळ ती तशीच बसून राहिली. तितक्यात शुभम आलाच.
"तू माझी पत्र वाचतेयस?"
आपण काहीच न केल्याबद्दल मनातल्या मनात तिने स्वतःचीच पाठ थोपटली.
"मी कशाला वाचू?"
"मग माझ्या खोलीत का आलीस?"
तिला एकदम त्याचा राग आला. 'माझी खोली', 'माझी पत्रं'... ही आजकालची मुलं मी, माझं हेच करत राहतात. आवंढा गिळत तिने वादाला तोंड फुटणारे शब्द गिळून टाकले.
"तुला तुझ्या कंपनीबद्दल विचारायचं होतं. पण तू पळच काढलास. सुचेनासं झालं काही म्हणून बसले इथे येऊन. खास कारण काहीच नाही."
"मी धावायला जातोय आता. आल्यावर विचार मला तू काय विचारायचं आहे ते." तिने नुसतीच मान हलवली.
"तुला बघायचं आहे माझं फेसबुक?"
"काय?" आज धक्क्यावर धक्के द्यायचं ठरवलं असावं शुभमने असंच तिला वाटायला लागलं.
"बघ ना. आणि ई मेल वाचलीस तरी चालतील. दाखवू तुला कसं बघायचं ते?"
"मला माहीत आहे. माझं ट्‌वीट्‌रचं अकाउंट आहे."
"का‍ऽ‍य?" शुभम अवाकच झाला.
"बरोबर ऐकलंयस तू. फेसबुक आता जुनं झालं. लोकं हे नवीन वापरायला लागले आहेत. दाखवू का तुलाच?"
"ग्रेटच आहेस. पण नको. मला फेसबुकच आवडतं." तो धावायला निघून गेला. तिने मग त्याने परवानगी दिलीच आहे म्हणून  थोडीशी पत्र वरवर चाळली. विशेष काही नव्हतं. बाजूच्याच ड्रॉवरमधला कागद तिने ओढला आणि भरभर विचार कागदावर उमटायला लागले.

* * * * * * * * * * * * * * * * * * * *
शुभु,
कमालच केलीस तू. एकदम खुले आम खजिना उघडून ठेवलास माझ्यासमोर. मित्र मैत्रिणींना लिहिलेली पत्र आई-वडिलांनी वाचलेली कुणालाच आवडत नाहीत आणि तू एकदम मेहरबानच झालास. माझं पत्र वाचून हा फरक का?  ए, हे पत्राचं तुझ्या-माझ्यातलं गुपित आहे बरं का. बाबांनाही मी अजून बोललेले नाही. तू  कंपनी सुरु करायची म्हणतोयस. बाबाला सांगायचं नाही असंही म्हणतोस. पण तुझा तो बिझनेस प्लॅन तयार झाला की तो दाखवून नीट सांगायला हवं  बाबाला. अरे, आम्ही घरातलीच माणसं तुला मागे कशाला खेचू? प्रत्येक गोष्टीतले खाचखळगे पालक म्हणून सांगायला हवेत ना? हे असं लिहायला लागलं की धडधडतं उगाचच. वाटतं सुरु केला की काय उपदेश. पण खूप प्रश्न आहेत तरीही मला तर मीच कंपनी चालू करतेय असं वाटतंय. काय भन्नाट कल्पना सुचतात तुम्हा मुलांना.
आमचं आयुष्य किती वेगळं होतं तुझ्या वयाचे होतो तेव्हा. हायस्कुलला गेल्यावर अभ्यास आणि घोकंपट्टी यातच वेळ जायचा की काय असं वाटायला लागलं आहे. आमचीही डोकी चालायची म्हणा तुमच्यासारखी, नाही असं नाही. पण आमच्या उड्या अर्थात मिल्यिनेयर, बिल्यिनेयर होण्याच्या नव्हत्या. पण तरीही धम्माल असायची. आमचा आनंदही निखळ होता. पण, तुझ्या मनात  नुसता पैसा तर नाही ना? तसं नसावं अशी मनापासून इच्छा आहे.  कारण त्यात यश नाही आलं, तर खचून जायला होईल. त्यासाठी प्रयत्न करताना आलेली मजा विसरुन जाशील. आमचं तसं झालं  नाही कारण इतक्या लहान वयात इतके पैसे मिळवायचे असं ध्येय नव्हतं. आजूबाजूचं वातावरणही तसं  नव्हतं. पण 'आगे बढो' असंच म्हणेन मी. या तरी पत्राला उत्तर पाठव. निदान वाचलंस की नाही हे सांगितलंस तरी पुर. -  तुझी आई                                                                                                                                                                      

ता.क.  मी काही तुझी पत्र वाचली नाहीत. फेसबुकही चाळलं नाही. ट्विटरसाठी मदत हवी आहे का? मी दाखवेन तुला. तूच  तेवढा 'कॉम्प्युटर सॅवी' आहेस असं नाही. तुझी आई पण तुझ्या सवाई आहे. मजा करतेय रे. तुझ्या भाषेत सांगायचं तर ’जस्ट  किडींग’.


क्रमश:

पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता-व्हिवा- "ओऽऽऽड्यूड" लेखमालिका

Monday, January 16, 2012

क्षितीज - भाग २

पत्र पलंगावर टाकून तो उठला. थोडावेळ ते त्याच्या मनात घोळत राहिलं पण संध्याकाळपर्यंत पत्राची पुसटशी आठवणही त्याच्या मनात राहिली नाही. नंतर सुट्टीचे दोन दिवस कसे गेले तेही समजलं नाही. सोमवारी शाळा सुटल्यावर घामाघूम होवून शुभम उभा होता बाबाची वाट पहात. चार मैल धावून  अंगातलं त्राण नाहीसं झालेलं. भरीला अचानक पडलेल्या थंडीमुळे डोकं दुखायला लागलं होतं.  इतक्यात रांगेत उभी असलेली टोयोटा त्याला दिसली. त्याने हात हलवला तसं बाबाने रांगेतून थोडीशी बाहेर काढत गाडी पुढे  आणली. गाडीत बसल्यावर एकदम त्याला  आईने लिहिलेलं पत्र आठवलं. पुन्हा वाचायचं ठरवलं होतं पण जमलंच नव्हतं. पाण्याची बाटली तोंडाला लावत शुभमने सकाळी बसमध्ये घाईघाईत खिशात ठेवलेला तो चुरगळलेला कागद काढला.
"आई किती छान लिहिते."
"काय लिहिलंय एवढं?" बाबाची उत्सुकता  चाळवली.
"पत्र!".
"कुणाला?"
 "मला."
"तुला आणि पत्र?" बाबाला आश्चर्यच वाटलं. त्याला वाटलं होतं काहीतरी छानसा सुविचार वगैरे असेल लिहिलेला. एकदम पत्र म्हणजे जरा नवलच.
"हो का, त्यात काय?"
"अरे घरातल्या घरात कशाला लिहायचं ते पत्र? बोलू शकते की ती."
"हो. पण आपण तिला बोलू देत नाही असं वाटतं तिला."
बाबा  हसायला लागला.  शुभम शांतच होता.
"मला दे ना वाचायला. कळू दे तरी काय लिहिलंय तिने लाडक्या लेकाला."
"गाडी चालवताना कसं वाचशील. आणि ते मला लिहिलंय."
"तर काय झालं? दे की. नाहीतर तू वाचून दाखव."
"देतो आणि मला नीट समजावून सांग तिला काय म्हणायचं आहे ते. एकदा वाचलंय मी पण कळलं नाही नीट."
त्याने नाईलाजानेच ते पत्र बाबाच्या हातात दिलं. आईला हे कळलं तर पुढचं पत्र तो बाबाला वाचायला देणार नव्हता.

घरी पोचल्या पोचल्या बॅकपॅक भिरकावत शुभम त्याच्या खोलीत धावला. हायस्कुलमध्ये आल्यापासून त्याचं क्षितिज विस्तारलं होतं.  आत्तापर्यंत  छोट्या मोठ्या स्पर्धांमध्ये तो भाग घेत होता. पण आता जे काही करायचं  ते महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने. नववी ते बारावी सगळ्या विषयात चांगले गुण तर पाहिजेतच पण वाचनालय, वृद्धाश्रम, अपंग मुलांना मदत अशा ठिकाणी कामं  केली की त्याचे गुण, स्पर्धांमधून मिळवलेली बक्षिसं, आणि पुढच्या वर्गातले विषय आधीच करण्याची धडपड. महाविद्यालयं प्रवेश  देताना या गोष्टी बघतात. अभ्यास एके अभ्यास करुन नाही चालत चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवायचा तर.  विचार मनात थैमान घालत होते. अंगावरचे कपडे पलंगावर भिरकावत त्याने लॅपटॉपचं बटन दाबलं. जी. मेल, फेस बुक, आय-एम, सुरु  केलं. शाळेच्या संकेतस्थळावर चाचणी परीक्षेचे गुण पहायचे होते, ट्रॅकमध्ये (धावण्याचा सराव) कुठल्या नंबरवर आहोत ते बघायचं होतं. तितक्यात आय-एम वर नेहाचे शब्द यायला लागले.
"हाय"
"हॅलोऽऽऽ, ब्रेकींग न्यूज.... माझ्या आईने पत्र लिहिलंय मला."
"अं...? का पण. एकाच घरात तर राहता ना? बोलत नाही का तुम्ही एकमेकांशी?"
"मी वाद घालतो, ऐकत नाही म्हणून लिहायचा मार्ग शोधलाय तिने"
" कशाबद्दल लिहिलंय?."
"तेच गं ते. तू सांगितलेलं, परागच्या ड्रग डीलींग बद्दल. आता मलाही वाटायला लागलंय सांगावं की काय त्याच्या घरी जाऊन."
"ओ. एम. जी. (ओ माय गॉड) आर यु गोईंग मॅड? तो आणि त्याचे ते ड्रग डीलर्स मारुन टाकतील तुला."
"हो, पण त्यांना कळायला तर हवं  आणि माझं नाव नको त्यात गुंतलं जायला."
" पण आपण हे कशाला बोलत बसलोय आय-एम वर. तू म्हणतोस माझ्याशी बोललं की डायरी लिहिल्यासारखं वाटतं. मग  सांग ना दिवसभरातल्या गोष्टी."
शुभम मग बराचवेळ त्या पत्राबद्दलच बोलत राहिला. आईने तिचं चुकलं हे कबूल केलं होतं त्या पत्रात, त्यातच तो खूष होता. नेहाही कुतूहलाने ऐकत होती.
"बरं आपल्याला पोस्टर करायचं आहे एकत्र. लक्षात आहे ना." आईच्या पत्रातून तो बाहेर आलाय असं वाटल्यावर तिने विचारलं.
"भिती वाटतेय घरात सांगायला. तू विचारलं आहेस आईला?"
"हो."
"मी विचारुन सांगतो."
"बरं, बाय."
"बाय."
शुभमला बरेच मित्र ऑनलाईन दिसत होते. पण अभ्यासाकडे वळायला  हवं  होतं.


क्रमश:
पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता-व्हिवा लेखमालिका: ओ ड्युऽऽड 







Tuesday, January 10, 2012

क्षितीज - भाग १

अमेरिकेतील  शालेय जीवनावर आधारित लेखमालिका मी लोकसत्ता - व्हिवासाठी लिहिली होती.  इथल्या शाळकरी मुलांचं जीवन वास्तवात बहुतांशी  कसं आहे हे मांडण्याचा प्रयत्न म्हणजे ही लेखमालिका. माझ्या नवीन मित्रमैत्रिणींसाठी.
                       *************************
परागला विचारु का नको अशा संभ्रमातच शुभम गाडीत बसला. इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि एकदम शुभमने विचारलं.
"तू ड्रग डिलिंग करतोस?" त्याच्या दृष्टीने ही आजची ताजी खबर होती. परागचा चेहरा कावरा बावरा झाला. घाबरुन त्याने समोर  बघितलं. रेडिओच्या आवाजात बाबांनी काही ऐकलं असेल असं वाटत नव्हतं.
"स्टुपिड! तुला कुणी सांगितलं?" रुक्ष स्वरात त्याने विचारलं.
"नेवर माइंड" शुभमला त्याला कुणाकडून हे समजलं ते सांगायचं नव्हतं.
"मग मलाही तू उगाच काहीतरी विचारु नकोस." परागच्या घोगर्‍या पण ठाम आवाजाने शुभमच्या अंगावर काटा आला. तो गप्प  झाला. रेडिओचा आवाज गाडीत घुमत राहिला. दोघांच्या घरातलं कुणी ना कुणी, आळीपाळीने त्यांना एकत्र शाळेत आणायचं, सोडायचं. कधी खूप गप्पा नाही तर मग काहीच नाही. त्यामुळे त्या शांततेतही थोडं अवघडलेपण सोडलं तर फार वेगळं काही नव्हतं. परागच्या बाबांनी गाडी दारासमोर उभी केली. त्यांचे आभार मानून शुभम घरात शिरला. समजलेली बातमी घरात सांगायची की नाही हे त्याला ठरवता येईना. तरीही आत आल्या आल्या त्याच्या मनातला अस्वस्थपणा बाहेर पडलाच. आई लगेच म्हणाली,
 "आपण परागच्या घरी सांगितलेलं बरं."
"काय?"शुभमला कुठून या फंदात पडलो असं झालं.  बाबांनी समजल्यासारखं म्हटलं.
"केवढी घाई करतेस प्रतिक्रिया व्यक्त करायला? असं सांगून कसं चालेल लगेच. काही ठोस पुरावा आहे का आपल्याकडे, आणि  त्याचे आई वडील त्याला विचारणार, तो शुभमला जाब विचारेल, त्यातून नेहाही मधल्यामधे अडकेल, परागवर राग काढेल ती."
आई एकदम गप्प झाली.  शुभमच्या लगेचच  लक्षात आलं. बाबा तिला कधीही म्हणतो ना, फार घाई करतेस प्रतिक्रिया व्यक्त  करायला ते अजिबात आवडत नाही तिला. थोडावेळ तसाच गेला.
 "मी काय लगेच धावलेले नाही सांगायला. नुसतं माझं मत व्यक्त करतेय. आपल्याला माहीत असून त्याच्या पालकांना अंधारात  ठेवलं, तर त्या मुलाचं आयुष्य नाही का फुकट जाणार? पुन्हा तसं काही झालं तर आपण आधीच सांगायला पाहिजे होतं असं  वाटत राहणार."
त्या दोघांचं चांगलंच वाजणार हे लक्षात आलं शुभमच्या. ही घरातली खासियतच. एक सांगायला जायचं, तर दुसरंच सुरु होतं  आणि शेवट काहीतरी तिसराच.
कसं वागायचं घरात तेच त्याला कळेनासं झालं होतं. वाद रंगण्याची चिन्ह दिसतायत म्हटल्यावर शुभम सटकलाच तिथून.
सहावीत गेल्या गेल्याच त्याने ऐकलं होतं की माध्यमिक शाळांमध्ये बरीच मुलं ड्रग्ज घेतात, विकतात. घरात सतत तीच काळजी.  तशी शाळा चांगल्या वस्तीतली. पण बंदुका, शारीरिक संबंध आणि ड्रग्ज या तीन प्रश्नांनी सगळ्यावर मात केली होती. या गोष्टींशी  कुठली वस्ती, शाळा याचा काही संबंध नाही हे कुणाच्या का लक्षात येत नाही हेच त्याला समजत नव्हतं. एकदा याच  नावाजलेल्या शाळेतल्या बाथरुममध्ये दोन मुलांनी हात बॉम्ब फोडलाच की. थोडं घाबरायला झालं, पण तसं चित्तथरारकच होतं.  असलं धाडस काही सोपं नाही. पुन्हा पुढचे तास झालेच नाहीत.  पोलिसांनी ताबडतोब त्या दोन मुलांना ताब्यातही घेतलं. शाळेतून  प्रत्येक मुलाच्या घरी काय झालं ते सांगणारा फोनही गेला. तेवढी एकच घटना त्या तीन वर्षात. नेमकी ती मुलं वर्गातलीच  निघाली. मग काय, आईला  भारतीयांच्या पाटर्यांमध्ये, त्या 'डॅम बोअरिंग' लोकांना सांगायला एक किस्साच मिळाला होता वर्षभर.  कधी कधी तर तेच तेच विचारायची, तेव्हा वाटायचं माझी काळजी म्हणून विचारते की मैत्रिणींना सांगायला? पण अशा गोष्टी जे  करतात ते लपून छपूनच. सहजासहजी नाही कळत काही. ड्रग डिलिंगबद्दल गप्पा होतात पण कुणालाच ते कोण आणि कसं करतं  ते नव्हतं कळलं. आता हायस्कुलमध्ये आल्यावर खूप मुलांची नावं माहीत झाली आहेत. त्यात आईच्या मते चांगल्या वर्तणुकीची  असणारी 'देसी' नावंही काही कमी नाहीत. पण ते घरात सांगितलं की पहिला प्रश्न -
"तू नाही ना घेत?"
"बघ हं. आमचं असतं लक्ष. नाहीतर कानावर येतं इथून तिथून."
"अरे, तुम्ही मी स्वतःहून सांगायला पाहिजे अशी अपेक्षा करता आणि त्याचवेळी कानावर येईलच कुठूनतरी अशी का धमकी देता? मला असं काही व्यसन असेल तर मी कशाला नावं सांगितली असती?"
"आवाज नको वाढवू. समजलं आम्हाला"
संपला संवाद. कधी चुकूनसुद्धा आमचं चुकलं, यु आर राईट. असं  म्हणणार नाहीत.
लॅपटॉपवर शुभमची बोटं धडाधड पडत होती.  त्या तिघांचे संवाद आत्ताच समोर घडल्यासारखे त्याने शब्दांतून उभे केले. नेहाला एकदा दिवसभरात काय घडलं ते सांगितलं की त्याला वेगळी डायरी लिहायची गरजच उरत नव्हती. लॅपटॉपच्या पडद्यावर तो  नजर खिळवून होता. कधी एकदा नेहाची प्रतिक्रिया त्या छोट्याशा चौकोनी पडद्यावर वाचू असं झालं होतं.
"ओ माय गॉड! ड्यूड!.... दीज ग्रोन अप्स्‌ ! .... तू तरी कशाला सांगितलंस पण?"
"ए, तुला माहीत आहे ना मी सगळं सांगतो घरात. बाहेरुन गोष्टी कळल्या की वैतागतात दोघं. माझ्याकडूनच समजलं की रागवत नाहीत, समजून घेतात. तू मला आवडतेस ते स्पष्ट सांगितलं म्हणूनच बोलायला मिळतं आपल्याला हे विसरु नकोस."
"हो माझी आई सारखी सांगते. आम्ही विरोध करत नाही याचा अर्थ तुम्हाला उत्तेजन देतोय असाही नाही."
"किती वेळा तेच तेच सांगतात. डोकं उठवतात अगदी."
"जी २ जी (गॉट टू गो). उद्या बोलू आपण. काळजी करु नकोस. लव्ह यू."
शुभमला डोकं एकदम शांत झाल्यासारखं वाटलं नेहाच्या शब्दांनी. हवेत तरंगल्यासारखंही. 'लव्ह यू'  गुदगुल्या झाल्या सारखं  गालात हसत, पुटपुटतच त्याने पलंगावर अंग टाकलं. नेहाशी ऑनलाईन गप्पा हीच त्याची डायरी. मनातलं तिला कळलं की डायरी  लिहून झाल्यासारखा तो शांत व्हायचा.
शुभमला जाग आली ती एकदम दहा वाजता. घरात शांतताच होती. शनिवार. यापेक्षा जास्त वेळ लोळत काढला तर खालून आई  ओरडणार याची त्याला खात्री होती. आळसावत त्याने पांघरुण झटकलं. घडी करता करता झटकलेल्या पांघरुणातून पडलेल्या पाकिटाने तो आश्चर्यचकित झाला. इथे कुणी आणून ठेवलं आणि कुणासाठी?
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
प्रिय शुभम,
    आश्चर्य वाटलं ना पत्र पाहून? काल एकदम ताडकन तोडूनच टाकलंस तू. बाबाची आणि माझी वादावादी सुरु होणार हे लक्षात आलं  आणि वैतागलास ना? ठरवलं होतं तू शांत झाल्यावर तुझ्याशी बोलायचं. पण पुन्हा आपलेच वाद सुरु होतात. म्हटलं घरातल्या घरात अगदी छोटीशी चिठ्ठी लिहावी. काल खरंच भिती वाटली मला. ड्रग्ज, बंदुकांचा सर्रास वापर, टीन एज प्रेग्नंसी या इकडच्या शाळांमधल्या समस्या ठाऊक आहेत रे, पण पक्की खात्री असते ना की आपली 'देसी' मुलं यात अडकणारच नाहीत. शाळांमध्ये  तरुण मुलं बेछूट गोळीबार करतात, निष्पाप मुलं प्राणाला मुकतात, मुलांचा सुरक्षिततेवरचा विश्वास नष्ट होतो, आयुष्यभर अशा घटनेचे व्रण मनावर कोरलेले राहतात. आपल्या मुलांच्या शाळेत हे असलं काही होणार नाही यावर ठाम विश्वास असतो प्रत्येकाला.  पण तरीही असं कुठेही घडलेलं ऐकलं की पोटातला गोळा कितीतरी दिवस जात नाही. आपण इतक्या चांगल्या वस्तीत राहतो तरी  तुझ्याच वर्गातल्या त्या दोन मुलांनी शाळेतल्या संडासात प्रयोग म्हणून हातबॉम्ब फोडण्याचा प्रकार केला होता ना? त्यातच अचानक अगदी शेजारचाच मुलगा आणि तोही भारतीय; ड्रग डिलिंग करायला लागलाय हे समजतं तेव्हा नको का त्याच्या पालकांना जागृत करायला? परागची आई तर मला सारखी भेटते. मुलाबद्दल कौतुकाने काही सांगायला लागली की वाटतं सांगावं तिला, निदान काही  सूचित तरी करावं की आपण फार भ्रमात असतो आपल्याच मुलांबद्दल. पण नुसतं सांगायला हवं म्हटल्यावर आपल्या घरात  झालेला गोंधळ आठवतो. काय करायला हवं तेच कळेनासं झालंय. माझं चुकलंच. आधी तू काय बोलतोस ते पूर्ण ऐकायला पाहिजे  होतं. बघ मला एवढंच सागांयचं होतं. तुझ्याशी बोलल्यासारखंच वाटतंय. माझ्या मनातलं पूर्णपणे तुला समजलं त्याचं समाधानही. नाहीतर मध्ये मध्ये तू इतका बोलतोस ना. मी लिहिलंय ते पटतंय का ते नक्की सांग. --- तुझी आई
ता.क. एवढं सगळं असलं तरी हेवा वाटतो मला, तुला इथल्या शाळेत शिकायला मिळतं त्याचा. किती साधनं उपलब्ध आहेत  रे तुम्हाला शाळेतून. आणि भविष्यात काय करायचं त्याच्या मार्गदर्शनासाठी शाळाही किती तत्पर असतात. नकळत भारतात आम्ही शिकत होतो तेव्हाचं शिक्षण आणि इथल्या शिक्षण पद्धतीची तुलना सुरु होते, गळेकापू स्पर्धा, सतत बाकीच्या मुलांचे दिले जाणारे दाखले, हुशार, ढ, बर्‍यापैकी असं नावासमोर झालेलं शिक्कामोर्तब इत्यादी इत्यादी. तो एक वेगळाच विषय आहे. ए, पण आमच्याच एका शिक्षकांमुळे मी लागले लिहायला. ते नंतर सांगेन कधीतरी, एकदा तू पत्र वाचतो आहेस ही कल्पना आली की. नीट वाच हं मी काय लिहिलं आहे ते.
                                                                                                                               क्रमश:
पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता व्हिवा - 'ओ ड्युऽऽड’ ही लेखमालिका