Friday, February 3, 2012

क्षितीज - भाग 5

आजच्या पत्राबद्दल आईशी बोलावंसं वाटत होतं. भारताबद्दल विचारावंसं वाटत होतं. पण ते टाळायचंही होतं.  शुभमने पलंगाखालचा कागदी खोका काढला. वाचलेलं पत्र त्याने अलगद घडी करुन त्या खोक्यात ठेवलं आणि  गादीखाली लपवलेलं नेहाचं पत्र  हळूच काढलं. इन मिन चार पाच पत्र गेल्या वर्षभरात. कधी चुकून भेटायला मिळालं की एकमेकांना दिलेली. पत्रातलं अक्षर न अक्षर पाठ झालं होतं. पण पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटायचं. डोक्यावर पालथा हात ठेवून तो नेहाच्या पत्रांबद्दल विचार करत राहिला. ती लिहिते ते वाचून वाटतं की जगात माझ्या एवढं हुशार, देखणं कुणी नाहीच. मी बोलतो ते ऐकत राहावंसं वाटतं तिला. माझ्यासारखे गुण तिच्यात असावेत असं वाटतं  नेहाला. नाही तर घरी... किती बोलतोस, ... असं कसं बोलतोस... असं कसं वागतोस... माझं  चुकीचंच असतं सर्व. त्यामुळेच  नेहाच्या पत्राची पारायणं करणं किती छान वाटतं. डोक्यावरचा हात बाजूला करत नेहाने लिहिलेली ती पत्र तो परत वाचत राहिला.  आईच्या पत्रांचाही  विचार करत राहिला. आईच्या पत्रातल्या शब्दांनी आई-बाबा दोघंही त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करतायत  असं वाटायला लागलं होतं.


चॅरिटी बॉल डान्स ! वर्गातली बरीच मुलं जाणार होती. शुभम खुष होता ते नेहा भेटणार म्हणून. पोस्टरसाठी ते दोघं भेटले त्यालाही तीन चार महिने होवून गेले होते. आई बाबांना सांगायचं म्हणजे प्रश्नच प्रश्न. तसंच झालं. किती प्रश्न विचारले आईने. त्याला एकदम  तो सातवीत असताना शाळेतच डान्स होता तेव्हाचा प्रसंग आठवला. आई-बाबा दोघांनाही या डान्स प्रकाराची काही कल्पना  नव्हती.
"नाचायचं म्हणजे मुलीबरोबरच की मित्र चालतो?"
त्याचं गोंधळलेपण पाहून शुभमला भारतात असं काही नव्हतच की काय ते  शाळेत असताना असच वाटलं होतं.
"मित्राबरोबर जाणार आहे. नाचायचं की नाही ते नाही ठरवलेलं."
"पण मग तिथे जाऊन काय करणार?"
"गप्पा मारत बसू. आणि शाळेच्याच तर हॉलमध्ये आहे. पोलिस असतात. बहुतेक मुलांचे आई-वडीलही येतात."
"खरंच? पण तू तर पहिल्यांदा जाणार आहेस. एवढं सगळं कसं काय माहीत तुला?"
"मित्रांकडून. आणि तुम्ही आलात तरी चालेल."
त्या वेळेस दोघांनी जायचं टाळलं. बाबांनी त्याला नेवून सोडलं होतं. त्याला कंटाळाच आला तिकडे. नाचणं तर जमलं नाहीच, गप्पा  पण कुणाशी फार रंगल्या नाहीत. त्यानंतर दोन वर्षं तो गेलाच नव्हता नाचाबिचायला.
पण नेहाशी मैत्री झाल्यावर पहिल्यांदाच त्यांच्या शाळेने आजूबाजूच्या शाळांना आमंत्रित केलं होतं. अंदाज घेत त्याने आई-बाबांसमोर विषय काढला. दोघांनी परवानगी दिली.
शुभमला कधी एकदा नेहाशी बोलतोय असं झालं.
"आय कँट वेट टू सी यू."
"मला पण खूप गप्पा मारायच्या आहेत." दोघांनाही कधी एकदा भेटू असं झालं होतं.
"नवीन पत्र लिहिलं आहेस नं? बर्‍याच दिवसांनी तुझं पत्र वाचायला मिळेल. मला आवडतात तुझी पत्र वाचायला. "
"का? तुझ्याबद्दल लिहिते म्हणून?"
"ते तर आहेच गं, पण तू तुझ्या शिक्षकांबद्दल, मैत्रिणींबद्दल लिहितेस ना, ते देखील. तुझा अभ्यास, विषयातले गुण, तुझे पुढचे बेत  वाचताना मला ते चित्र समोर दिसायला लागतं."
"ए, पत्रावरुन आठवलं. बर्‍याच दिवसात तुझ्या आईच्या पत्राबद्दल नाही सांगितलंस."
"लिहिलंच नाही काही तिने. तुझी आणि तिची आधीचीच पत्र वाचतोय मी परत परत."
"विचारलं नाहीस तिला?"
"मी तिची पत्र वाचतो हेही सांगितलेलं नाही तिला. मग एकदम पत्र का नाही लिहिलंस असं कसं विचारायचं?"
"त्यात काय? आईला सांग की तिची पत्र आवडतात आणि तू वाट पाहत असतोस."
"हं ! बघू " त्याने  विषय बदलला.
फोन ठेवला आणि त्याला शिक्षक दिन आठवला.  घाईघाईने तो आईच्या खोलीत शिरला. ती वाचनात मग्न होती.  त्याने अलगद तिच्या हातातलं पुस्तक बाजूला केलं. कपाळावर आठ्या पडल्याच तिच्या. पण काहीतरी नवीन कल्पना सुचवायची आहे म्हटल्यावर ती एकदम खुलली. त्याच्या बोलण्याचा विचार करत राहिली. शिक्षक दिनाबद्दल लगेच काही सुचणं शक्य नव्हतं. पण तिने कागद पेन पुढे ओढलं. नाहीतरी कितीतरी दिवसात शुभमला पत्र  नव्हतं लिहिलं. ते लिहिता लिहिता सुचेलही काही तरी शिक्षक दिनासाठी. काय करतो देव जाणे पत्राचं. वाचतो तरी का? दरवेळी पत्र लिहिताना सतावणारा प्रश्न होता तो. पण त्याच्या वागण्या  बोलण्यातून तो वाचतोय हे जाणवायचं, कुठेतरी पुसटसे उल्लेख, थोडासा समंजसपणा.... तिला उगाचच वाटत होतं की खरंच तसं आहे हे तिला ठरवता येईना. पण ती त्याला विचारणार नव्हती. 'बोअरिंग...' असं एका शब्दात त्याने पत्रांबद्दल म्हटलं असतं तर  तिला ते सहन नसतं झालं. आणि खूप बोलला असता, आवडतायत असं म्हणाला तर? पण ते तर तो कधीही सांगू शकत होता. तो जोपर्यंत तू लिहू नकोस असं सांगत नाही तोपर्यंत ती लिहिणार होती.
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
शुभम,
 तुला डान्सला हो म्हटलंय खरं पण थोडीशी भिती वाटतेय. आपण घरात  मोकळेपणाने बोलतो, जे काही तुझ्या आयुष्यात चालू आहे ते आमच्या पर्यंतही पोचतंय (असं आम्हाला उगाचच तर नाही ना वाटत?), पण केव्हातरी वाटतं हे थोडं जास्तच होतंय. नसावं पण. आमच्यावेळेस स्नेहसंमेलनं असायचीच की शाळेची. आणि ते फिशपॉन्ड ! इथे नसावं बहुधा असलं काही. पण मुद्दा काय सर्वांनी एकत्र जमायचं, मजा करायची. आणि आम्हाला जे वाटायचं की अमेरिकन मुलं म्हणजे स्वैराचारच. तसं नाही हे केव्हाच समजलंय. आठवतं तुला? तू पहिल्यांदा शाळेत डान्ससाठी गेलास तेव्हा काय झालं होतं ते? हजारो प्रश्न विचारले होते आम्ही तुला. शेवटी तू सांगितलं होतंस की तुम्ही येऊ शकता. आम्ही फक्त शाळेत सोडायचं काम केलं. तुला परत आणायला आलो तेव्हा मी अवाकच झाले. हॉलच्या बाहेर बहुतेक सर्व अमेरिकन पालक होते.  मुलांवर लक्ष असायला हवं म्हणून केव्हाचे आले होते. किती भ्रामक समजुती आहेत आमच्या इथल्या पालकांविषयी. मला  खात्री आहे की आतमध्ये वावरणार्‍या मुलांच्या मनात आपले पालक बाहेर उभे आहेत ही जाणीव सतत असणार, मनात असलं तरी  उथळ वागणं शक्यच नाही अश्या वेळेस. आम्ही 'खरे' पालक असं मानणारे भारतीय तिथे दिसले नाहीत. आमच्यासारखे परत  न्यायला आलेलेच होते सगळे.
बरं आता मुद्द्याचं. तुला पुढच्या आठवड्यात शिक्षकांसाठी काय करायचं असा प्रश्न पडलाय. आमच्या शाळांमध्ये मुलांनी ठरवून खास शिक्षकांसाठी काही कधी केलं नाही. (खरं तर किती छान कल्पना आहे ही).  मला वाटतं, वर्गातल्या प्रत्येक मुलाने एखादी आठवण त्या त्या शिक्षकाबद्दल लिहावी आणि त्या सगळ्या आठवणी छोट्याशा वहीत प्रत्येक पानावर चिकटवून ती वही शिक्षकांना द्यावी. कितीतरी प्रसंग त्यात असतील की तुमचे शिक्षक विसरुनही गेले असतील, कधी ना कधी तुम्हाला त्यांच्याकडून उत्तेजन मिळालेलं असतं, कौतुक झालेलं असतं. वाचताना पुन्हा  एकदा कदाचित ते प्रसंग त्यांच्यासमोर उभे राहतील.
एका शिक्षिकेने तिच्या आयुष्यातील लिहिलेला प्रसंग आत्ताच मी वाचला, ऑन लाइन. पाणावले डोळे. कदाचित तुला माहीतही असेल. पण लिहावासा वाटतोय तुझ्यासाठी. काहीवेळेस शिक्षक तुमचं आयुष्यच बदलून टाकतात. बघ आवडतेय का ही कल्पना.
 वर्गातल्या मुलांना त्या शिक्षिकेने भाषा विषयाचा प्रकल्प म्हणून एकेक कोरा कागद दिला. प्रत्येक मुलाचं नाव लिहून त्या खाली रिकामी जागा ठेवायला सांगितली. त्या रिकाम्या जागेत इतर मुलांनी त्या त्या विद्यार्थ्याबद्दल त्यांना वाटणारी सर्वात चांगली गोष्ट लिहायची होती.  ते कागद तिने मुलांना दिले. मुलांचे खुललेले चेहरेच सारं सांगत होते. कुणी म्हणत होतं.
"खरंच मला माहीतच नव्हतं मी बाकीच्या मुलांना आवडतो." तर कुणी म्हणालं
"मी इतक्या जणांना माहीत आहे याची कल्पनाही नव्हती."
कितीतरी वर्षांनी त्या वर्गातल्या एका मुलाला व्हिएतनाम युद्धात वीरमरण आलं.  शिक्षिका त्याच्या अंत्यदर्शनाला गेली. वर्गातली  बरीच मुलं जमली होती. एकेक करुन सर्वजण त्याच्या शवपेटीशी जाऊन त्याचा अंतिम निरोप घेत होते. त्या शिक्षिकेला पाहिल्यावर मार्कच्या सैन्यातील मित्राने तिला विचारलं.
"तुम्ही मार्कच्या शिक्षिका?"
तिने नुसतीच मान डोलवली.
"खूप ऐकलं आहे आम्ही तुमच्याबद्दल."
तिने स्मितहास्य केलं. मुलं आपल्याला विसरली नाहीत ही जाणीव सुखदायक होती.
मार्कच्या वर्गातली मुलं आणि त्यांचे आई-वडील एकत्र जेवायला थांबले.
"आम्हाला काहीतरी दाखवायचं आहे." भरलेल्या डोळ्यांनी मार्कच्या वडिलांनी पाकिटातून एक चुरगळलेला कागद बाहेर काढला.
"मार्कच्या खिशात सापडला हा कागद. तुम्ही कदाचित ओळखाल असं वाटलं."  जीर्ण झालेला, कितीतरी ठिकाणी चिकटवलेला तो  कागद पाहताक्षणी तिने ओळखला. तो कागद तोच होता ज्याच्यावर मार्कबद्दल इतर मुलांनी लिहिलं होतं. चांगलं, त्याचे गुण दर्शविणारं.
मार्कची आई म्हणाली.
"तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाहीत. इतकी वर्ष जपून ठेवला त्याने जीवापार आवडणारा तो कागद."
"तो कागद माझ्याकडे अजून आहे. दागिन्यांच्या पेटीत जपून ठेवलाय मी."
"लग्नाच्या अल्बममध्ये आहे माझा कागद ."
"मी तर कायमचा पर्समध्येच ठेवला आहे. मला वाटतं त्या वर्गातल्या प्रत्येकाकडे हा कागद आहे, असावा." एकेकजण बोलत होता आणि ऐकता ऐकता अश्रु लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी त्या मुलांची ती शिक्षिका शेवटी हमसाहमशी रडली. तिने केलेली एक छोटीशी गोष्ट,  कृती. किती महत्त्वाची ठरली मुलांसाठी. असे क्षण दुर्मिळच नाहीत का? नाहीतर शाळा म्हणजे स्पर्धा, एकमेकांना चिडवणं, द्वेष असच समीकरण होत चाललं आहे. बघ कदाचित ही गोष्टही तू वर्गात सर्वच शिक्षकांसाठी पोस्टरबोर्डवर लावू शकतोस. असे शिक्षक तुम्हा मुलांनाही मिळोत असं मनापासून वाटतं.     - तुझी आई                                                                                                                                                                                    
                                                                                                                         


क्रमश:

पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता-व्हिवा- "ओऽऽऽड्यूड" लेखमालिका

No comments:

Post a Comment

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.