आई-बाबांचा कुजबुजल्यासारखा आवाज वाटला तसे त्याने कान टवकारले. जॉनीचं नाव ऐकल्यावर मात्र त्याचं डोकंच उठलं. तो एकदम समोर येऊन उभा राहिला. शुभमने बाबाच्या हातातला कागद हिसकावला. जॉनीने आजूबाजूच्या घरांच्या पत्रपेटीवर अडकवलेल्या जाहिरातीचा तो कागद होता. घाईघाईने त्याने ती जाहिरात वाचली.
"अरे पण तुम्ही मला कामं करूच देत नाही आणि सारखं सांगता, जॉनी शू पॉलिश करतो, जॉनी लॉन मोविंग करतो (ग्रास कटिंग), जॉनी ग्रोसरी स्टोअरमध्ये काम करतो, जॉनी हे करतो आणि जॉनी ते करतो...."
"पण तुला काय झालं एवढं चिडायला?" शुभमने त्या दोघांचं बोलणं ऐकलं असेल अशी त्यांना शंकाही आली नव्हती. बाबाला मुळी त्याचा राग कळेचना.
"काय झालं म्हणजे? सारखं तुमचं चालू असतं जॉनी पुराण. जॉनीला शेजारी पाजारी लॉन मोव्ह करताना पाहिलं की लगेच त्याचे वडील किती मोठ्या कंपनीत मॅनेजर आहेत तरी इथल्या मुलांना कमीपणा वाटत नाही पॉकेटमनीसाठी अशी कामं करताना, यावरच चर्चा."
"त्यात काय चुकीचं आहे पण? चांगली गोष्ट आहे ती."
"मग मला पण करू देत की. तुम्ही म्हणता ना अमेरिकेत आल्यावरच कोणत्याही गोष्टींची लाज वाटू न देता काम करायचं हे शिकायला मिळालं. मग मला का नाही करू देत? अं? का? का नाही करू देत? तिथे लगेच 'देसी' होता तुम्ही." शुभमचा फुटाणा ताडताड फुटत होता.
"देणार आहोत ना. एखादा महिना तरी ग्रोसरी स्टोअरमध्ये काम करायचा अनुभव हवाच. थोड्याशा पैशांसाठी किती श्रम करावे लागतात, हे कळायलाच हवं तुला." शुभमच्या रागाचा फुगा एकदम फुटलाच. त्याला बाबाकडून अशा शरणागतीची अपेक्षाच नव्हती. तितक्यात आईने सूत्रं ताब्यात घेतली.
"त्याचा अर्थ असा नाही की लगेच या सुट्टीत तू काम करशील. पण तसं करू शकतोस एवढंच म्हणायचंय आम्हाला."
"म्हणजे नाहीच ! मला वाटलंच, एवढ्या पटकन कसं काय मान्य केलंत. मी निदान घरचं लॉन मोविंग करतो या सुट्टीत. त्याच्या मोबदल्यात तुम्ही पैसे मलाच द्या."
"पण घरचंच काम करायला तुला पैसे कशाला हवेत?"
"बरं नको देऊस पैसे. खूष?" कुठून पैसे मागितलं असं त्याला झालं.
ती पुढे काही बोलायच्या आत थांब, थांब करत त्याने स्पष्ट केलं.
"पण प्लीज तुझं सुरू करू नकोस. तोंडपाठ आहे ते मला. मी स्वयंपाक करते, भांडी घासते, कपडे घड्या करते, तुमच्या वेळा सांभाळते, त्याचे कोण देतंय पैसे.... सांग म्हणणार होतीस ना? होतीस ना?"
"शुभम पुरे आता, नाहीतर आपल्याला आजचं जेवण पैसे दिले तरी मिळणार नाही." बाबाने वातावरण हलकं करायचा प्रयत्न केला.
"मी जातोच आता इथून."
"पैसे तर नाही मिळणार, पण एक मार्ग आहे तुला माझ्याकडून तुझ्या आवडत्या गोष्टी मिळवायचा."
"कुठला?" शुभमने उत्सुकतेने विचारलं.
"सांगितलेलं काम लगेच करायचं. पाच मिनिटांनी, नाहीतर दिवसभरात कधीतरी करेन. झोपायला जायच्या आधी झाल्याशी कारण अशी आश्वासनं नकोत."
"करतो की मी कामं घरातली."
"हो करतोस ना पण ती वेळेवर करण्याबद्दल म्हणतेय मी."
"काय मिळेल पण आवडीचं?"
"ज्या ज्या दिवशी कामं वेळेत पूर्ण होतील त्या दिवशी तुझ्या आवडीचा पदार्थ जेवणात मिळेल."
"वे कूल ! डील?"
"हो."
"बघ हं तिरामिसू, बाकलावा, गुलाबजाम, काजुकतली .... मी यादीच करतो. चालेल?"
शुभम आणि बाबा दोघांनीही एकमेकाला टाळी दिली. गोडखाऊ बापलेकांना आत्ताच मिष्टान्न समोर दिसायला लागली होती. तावातावाने सुरू झालेल्या संभाषणाचा सुखद शेवट, त्याचा विश्वास बसेना.
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
शुभम्या,
आज भांडणाचाच मूड होता तुझा. आम्ही म्हणजे तमाम 'देसी', मुलांना पॉकेटमनीसाठी नोकर्या करायला देत नाही त्याचं एकच कारण रे, तुमचा अभ्यास. असं वाटतं की करू शकतो आम्ही तुमचं शिक्षण तर कशाला अशी कामं करायला लावायची. इथली जीवनशैली वेगळी आहे, उपभोगतेला जास्त महत्त्वं आहे, त्यामुळे अमेरिकन पालकांचं बचतखातं तसं रिकामंच असतं. मुलांना पुढच्या शिक्षणासाठी नोकरीशिवाय पर्यायच नसतो. कितीतरी लोकं बरीच वर्ष नोकर्या करतात, कॉलेजसाठी पैसा जमवतात आणि तिशीनंतर कॉलेज करून पस्तिशीच्या दरम्यान स्थिरावतात. दहावी बारावीपर्यंत शिक्षण मोफत होतं पण त्यानंतर इथल्या मुलांचं शाळा सोडण्याचं, महागडं कॉलेज शिक्षण, हेच तर मुख्य कारण असतं ना? पण पुढे शिकण्याची जिद्द ज्यांच्याकडे आहे ते त्यासाठी किती प्रयत्न करतात ते आपण पाहतोच. मला मान्यं आहे की जॉनीचे बाबा त्याचं शिक्षण करणार आहेत आणि तरी तो लहान सहान कामं करून पैसे मिळवायची धडपड करतो. तुला तसं करावंसं वाटतं याचं कौतुकही वाटतं. फक्त घरातली कामं ही वाटूनच घ्यायला हवीत, त्यासाठी पैसे द्या, हे म्हणणं चुकीचं नाही का वाटलं तुला? पण ठीक आहे. सौदा गोड पदार्थावरच मिटला. या निमित्ताने माझं पाककौशल्य क्वचित दिसण्याऐवजी रोज रोज दिसेल म्हणा. त्यासाठी अर्थात तुलापण कामं वेळेवर करायला शिकावं लागेल हे विसरू नकोस. मी नाही करू शकले सगळे पदार्थ तरी आता आपण जाणार आहोतच भारतात तेव्हा आजी कौतुकाने करून घालेल तुला. थोडेच दिवस राहिले आहेत सुटी सुरू व्हायला. मला तरी कधी एकदा भारतात जातोय असं झालंय. तुलाही माझ्यासारखं वाटावं अशी इच्छा असली तरी अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे हे समजतंय मला.

तुझी आई
No comments:
Post a Comment
तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणार्याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.