Friday, January 4, 2013

सीमारेषा

महाविद्यालयीन जीवनाबद्दल गोष्टी चालल्या होत्या लेकाशी. त्याचं हे पहिलं वर्ष आमच्यापासून दूर रहाण्याचं.
"मुलं दारु, सिगरेट पितात/ओढतात का तिकडे?" दोन तीन महिने मनात असलेला प्रश्न चाचपडल्यासारखा बाहेर आला. तो हसला अवघडल्यासारखा. पुढच्या प्रश्नाची कल्पना त्याला आधीच आली असावी.
"हो."
"सर्रास?"
"ते मला नाही माहित."
"हं"
" मी पण असतो का त्यात असं विचारायचं आहे ना तुला? मग विचार ना तेच."
मी हसून म्हटलं,
"एकदम तुझा पारा चढायला नको ना म्हणून साधारण चित्र काय आहे ते विचारावं असं वाटलं."
"क्वचित. म्हणजे एक दोनदा थोडीशी घेऊन बघितली आहे."
माझा चेहरा पाहण्यासारखा झाला.
"सिगरेट?" न रहावून विचारलंच
"अजिबात नाही."
माझी चुळबुळ, अस्वस्थपणा वाढला असावा.
"आई, मी प्रामाणिकपणे सांगतोय. सगळीच मुलं करतात हे पण आई वडिलांना खरं सांगत नाहीत."
"अच्छा" म्हणून मी ते संभाषण संपवलं.

एक दोन दिवस अस्वस्थतेत गेले. हे चांगलं नाही वगैरे उपदेश कसा करायचा किंवा करायचा की नाही या विचारात.
"मला एक समजत नाही की तुम्ही पालक दारु पिऊ नका, लग्नाशिवाय शारिरिक संबंध येता कामा नयेत असा धोशा लावता पण मुलांना मोह टाळता आलाच नाही तर त्यांनी काय करायचं ते सांगत नाही."
"म्हणजे?"
"पिण्याचे परिणाम काय काय होऊ शकतात, एकावेळी कमीत कमी म्हणजे नक्की किती घ्यावी, सवयीचं व्यसनात रुपांतर कसं होऊ शकतं, ते झालं तर त्याचे शरिरावर होणारे परिणाम. किंवा गाडी चालवू नका, जो गाडी चालवणार असेल तो दारु पिणार नाही याची दक्षता घ्या, शारिरिक संबंधाबद्दल काळजी घेतली नाही तर काय होऊ शकतं. त्यातून निर्माण होणारे रोग अशा कितीतरी गोष्टी तुम्ही सांगत नाही. आम्हाला महाविद्यालयात ही माहिती देण्यासाठी खास तास आणि परिक्षा असते."
मी फक्त ऐकत होते. महाविद्यालयांची जागरुकता आवडली याबाबतची.
"तू काळजी करु नकोस. मला हे असं करायला वेळच मिळत नाही."
"तू म्हणतोस ते खरं आहे. पण तू आत्ता सांगितलंस तसं करणं म्हणजे पालकांना, आपण अशी माहिती देऊन मुलांना उत्तेजन तर देत नाही ना असंही वाटतं."
"पण नुसतं दारु पिऊ नका, मादक पदार्थांच्या आहारी जाऊ नका असं सांगून तरी काय उपयोग? का ते माहित असलं की मुलं जास्त विचार करतील ना या गोष्टी करताना?"

मी काही बोलले नाही. मुलांशी बोलताना मित्रमैत्रीण व्हावं पण त्याचवेळी पालक म्हणून त्यांनी आपल्याला आदर दाखवावा ही जी आपली अपेक्षा असते त्यातली सीमारेषा इतकी धुसर आहे की ती केव्हाही भंग पावेल असं वाटतं खूपवेळा.

25 comments:

  1. I had a recent conversation (for the first time) with my daughter about a few things...after reading your post, I just realized it is not going to get easier ever

    ReplyDelete
    Replies
    1. मेघना, पालकत्व वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध होत जातं. कधी सरळ वाट तर कधी खाचखळगे. चालूच रहाणार गं ते.

      Delete
  2. छान !!...thanks for sharing..खरच तू आमच्या सारख्या मागून येणार्यांची Dr. Laura होणार आहेस लवकरच !

    ReplyDelete
  3. सीमारेषेच्या कल्पना बदलायला हव्यात आता पालकांनी - कारण मुला-मुलींचे जग आता खूप वेगळे आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सविता, मुलामुलींचं जग बदललं आहे पण दुर्देवाने पालकांचे आपली मुलं असं काही करणार नाहीत हे समज तसेच आहेत.

      Delete
    2. परीणाम काय होतील हे सांगायची खरंच गरज आहे का? मला वाटत नाही- काही गोष्टी आपोआप कळतात.

      Delete
    3. माझी मोठी मुलगी आता या वर्षी नोकरी साठी घराबाहेर पडेल, बिई झालंय पूर्ण, कॅंपस सिलेक्शन पण झालंय, तेंव्हा लहानपणापासून केलेले संस्कार हे आपोआपच सगळी काळजी घेतील याची खात्री आहे.

      Delete
    4. हो ना, कधी तुम्ही म्हणता तसं वाटतं, आम्हाला कुठे कुणी सांगितलं होतं असं मनात येतं पण काळ खरंच बदलला आहे. अशावेळेस वाटतं, गोष्टी घडून गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा मोकळेपणाने काही बाबी मुलांशी बोललेल्या बर्‍या पण मी म्हटलं आहे तसं, ही सीमारेषा धुसर आहे.

      Delete
  4. He shared exactly what these young generation thinks. Forcing them not to do this & not to do that is not going to resolve the issue. They should know what can result & what they should do to avoid the future results.

    ReplyDelete
  5. good! !will tell my son to read it

    ReplyDelete
  6. मुलांवरचे संस्कार अशाचवेळी त्यांच्याही नकळत त्यांना व आपल्यालाही अतिशय मदत करतात. मुलांच्या मनात आपण आईबाबाला सगळे काही सांगू शकतो हा भाव निर्माण करण्याचे काम पालकांचे आहे. मग पुढे खूपश्या गोष्टी आपोआपच टळतात.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरं भानस, पण तरीही आपला गोंधळ उडतोच किती माहिती द्यावी, किती नाही याबाबत. पण या मोकळेपणाबाबत एक किस्सा आठवतो आहे. आमच्या इथली साधारण २ री ते ५ वी तली मुलं कलडेसॅक मध्ये खेळायची. शेजार्‍यांच्या मागच्या अंगणातून रेल्वे रुळ ओलांडले की मैदान होतं.लेकाला रेल्वे रुळ ओलांडून खेळायला जायचं नाही असं बजावलं होतं आणि काळोख पडला की घरी. एकदा त्याला यायला उशीर झाला. मी शेजारणीला फोन केला घरी पाठवून दे त्याला सांगायला तर ती म्हणाली की सगळी मुलं मैदानावर आहेत.
      त्यावेळेस लक्षात आलं की अशी बंधन घातली तर मुलं हे न सांगता करणारच, खोटं बोलणार. न चिडता त्याला विचारलं, खरं सांगितलंस तर ओरडणार नाही याची हमी दिली. तो आता म्हणतो की तुम्ही तेव्हा म्हटलंत तसं केलंत त्यामुळे मोकळेपणाने काहीही बोलू, विचारु शकतो किंवा हा जो अनुभव लिहिला त्यातला आम्हाला केलेला उपदेशाचा डोसही पाजू शकतो :-).

      Delete
  7. >>>मुलांच्या मनात आपण आईबाबाला सगळे काही सांगू शकतो हा भाव निर्माण करण्याचे काम पालकांचे आहे. मग पुढे खूपश्या गोष्टी आपोआपच टळतात. ++
    हे सोप्प वाटणारं कामं दरवेळेस नवी परिक्षा घेत असते !!

    पोस्ट आवडलं ... आणि विचारांना वावही मिळालाय.....

    ReplyDelete
    Replies
    1. धनव्याद सहजच! <<<<<<< हे सोप्पं वाटणारं कामं दरवेळेस नवी परिक्षा घेत असते !!>>>>>>>>>> अगदी खरं.

      Delete
  8. Shivkumar PathsarthyJanuary 6, 2013 at 8:47 AM

    Nice... This is wat our film Balak Palak is all about... I understand ur worries as a mothr...but kids are too smart ...we jus hav to talk to them make them undersnd the situation...i share a v v cool relatn wit my son.. He is growin.. We discuss almost eveythn under the son,., all we hav to do is make r kids realize we are thr frnds... N then see d change in them... BP is doing exteremly well... Packed houses at many places....

    ReplyDelete
    Replies
    1. Congrats! Let's see when I get chance to watch Balak Palak.

      Delete
  9. khup chaan ......... mazi mulagi ata pudachya varshi mahavidylayat jail teva hya tuzya anubhavacha mala fayda hoil dhanywad.................

    ReplyDelete
  10. My parents never had this conversation with me as I was growing up and I am great full for that cause I would have been so embarrassed to talk about it.

    ReplyDelete
    Replies
    1. काळाची पाऊलं ओळखूनच पालकांना वागावं लागतं. बदललेला समाज, रहाणीमान याचा विचार करता मुलांशी मोकळेपणे बोलणं योग्यं असं हल्ली पालकांना वाटतं, त्याचवेळेस त्याचा अतिरेक तर होत नाही ना, मुलांनाच ते अवघड वाटत नाही ना या गोष्टी आल्याच त्यात. पण शेवटी आपल्या अपत्याबद्दल वाटणारी काळजी हे तेव्हा काय किंवा आता काय, तीच आणि तेवढीच. मार्ग वेगळे पण फलित एकच असं काहीसं.

      Delete
  11. पालक-पाल्य संवाद आवश्यक आहेच पण बऱ्याच वेळा हा संवाद त्याचा अपेक्षीत निष्कर्ष (जो पालकांना बरोबर वाटतो) ठरवून मग सुरु केला जतो. आणि मग तो संवाद न राहता उपदेश वाटतो. मुलांचे विचार संयमाने समजून घेऊन, आपले विचार त्यांच्यापुढे मांडून त्या संवादाच्या निष्कर्षापर्यंत एकत्र पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न घडायला हवा. मगच आपली मते मुलांवर लादणे, त्यांना समजून न घेणे, generation gap असे problems टाळता येतील.

    ह्या विचार करायला लावणाऱ्या लेखाबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरं आहे तुम्ही म्हणता ते. पालकांना जे हवं असतं ते मुलांना पटवण्यासाठी आणि त्यांना वाटतं आहे तेच होत असेल हे ऐकायला मिळेल या हेतूनेच संवाद होतो बर्‍यांचजणांचा. आमच्या घरात आम्ही प्रयत्नपूर्वक हे टाळायचा प्रयत्न करतो आहोत. मुलांनी ’कळलं’ म्हटलं की लक्षात येतं संवाद बाजूला राहून आपला उपदेश सुरु झाला आहे :-)

      Delete
  12. अटकमहाराज हे माझे आध्यात्मिक गुरू. आपल्या शिष्यांना ते गीतेची प्रत देत. देताना सांगत, 'रात्री झोपताना उशाखाली.वाचली नाही तरी चालेल!'
    थोडी घसट वाढल्यानंतर मी त्ायंना विचारलं, 'तुम्ही असं का सांगता?'
    'असं मी मुद्दाम सांगतो! वाचा सांगितलं तर किंवा रोज एक अध्याय वाचा असं काही सांगितलं तर कोणीच वाचणार नाही...
    एकदा 'क्वचित थोडी घेणारे' एक जण त्यांच्याकडे आले. अटकमहाराज त्यांच्याशी काहीच बोलले नाही. रस्त्याने चालता चालता त्यांना एक बार दिसला. ते गृहस्थ त्यांच्याबरोबर होते. अटकमहाराजांनी त्यांच्या बरोबरच्या सर्व शिष्यांसमवेत बारमध्ये प्रवेश केला. कॅप्टन आला तेव्हा त्यांनी बेस्ट ड्रिंकची ऑर्डर दिली. स्वतःसाठी मात्र लिमका मागवलं.
    ह्या प्रसंगानंतर क्वचित कधीतरी घेणा-या त्या गृहस्थांनी ड्रिंक कायमचे सोडले.

    ReplyDelete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.