Thursday, December 24, 2020

३५०० मैल

 ९ दिवस आणि ३५०० मैल गाडी हाकायची ठरली तेव्हा मी माझं Big Bend नावाचं राष्ट्रीय उद्यान घरातल्या घरातच करायचं ठरवलं पण दरवर्षीच्या नेमामध्ये कोविड काळ येऊ न देता कमी गर्दीच्या ठिकाणी जायचं, विमानाने न जाता गाडीने प्रवास करायचा या विचारावर मुलं ठाम होती. शेवटी गाडी कशी चालवायची याबद्दल हजार सूचना तोंडी दिल्यावर माझं समाधान झालं पण सूचना लिखित पाहिजेत अशी सूचना आली. त्यात ६ क्रमांकावर ओरडत बसायचं नाही ही सूचना मुलांनी घुसडवली आणि हल्लीच गाडी शिकलेल्या मुलीने घरातली ती सर्वोत्कृष्ट वाहन चालक असल्याचा निर्वाळाही दिला. 

गाडी प्रकरण संपतय तेवढ्यात कोविड काळ अंगावर आला. बाहेरचं खायचं नाही म्हणून जिथे जाऊ तिथे स्वयंपाक आपला आपणच करायचं ठरलं! स्वयंपाक आपला आपणच म्हटल्यावर पुन्हा माझा उत्साह थंडावला. बाहेर खायचं नाही तर कशाला करायचा प्रवास? माझ्या कुरकुरीला थोपवण्यासाठी मुलांनी स्वयंपाकाची बाजू सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली आणि पुढचे ९ दिवस एकावेळच्या जेवणात आम्ही रोज  दोन पिनट बटर सॅडविचेस खाल्ली. आई उगाचच बाऊ करते हे वाक्य प्रत्येक सॅडविच खाताना ’डेझर्ट’ म्हणून मला ऐकायला लागलं. 

दिवस पहिला - देशाच्या आरोग्यखात्याच्या सूचना तंतोतत पाळल्या या एका वाक्यात आमची तयारी सर्वांच्या लक्षात यावी.  शार्लट ते बर्मिंगहॅम राज्यातील अलाबामा. हा ६:३० तासांचा प्रवास आहे. गर्दीमुळे ८ तास लागले. वाटेत देहधर्म उरकायला गवतात जायचं की विसाव्याच्या थांब्यांवरचा माणसांचा संपर्क खपवून घ्यायचा याबाबतीत निश्चित धोरण ठरत नव्हतं. गाडीत आवाजांचं प्रदुषण वाढल्यावर ज्याने त्याने मग स्वत:चं धोरण स्वीकारण्याबाबत एकमत झालं. ८ तासांनी आम्ही अंग टाकायला Airbnb मध्ये म्हणजे राहण्याच्या ठिकाणी पोचलो. Airbnb च्या घर मालकाने कोविडला अनुसरुन घर आधीच ’सॅनेटाइझ’ केलेलं होतं. तरीही घरात पाऊल टाकल्याटाकल्या बरोबर घेतलेले ढीगभर ओले कागद (wipes) वापरुन पुन्हा स्वच्छ केलं. धुतलेली भांडी पुन्हा धुतली. मुलाने स्वयंपाक करण्यासाठी बाह्या सरसावल्या आणि कसलेल्या आचार्‍यासारखा पास्ता केला. मुलीने दुसर्‍या दिवशीच्या जेवणाची व्यवस्था (पिनट बटर सॅडविच) करुन टाकली.  जे घडेल ते पाहायचं, मिळेल ते गोड मानायचं हा मंत्र मी पाठ करत राहिले. रात्री पलंगावर पाठ टेकली ती पहाटे उठायचं आहे हे मनाशी घोळवत.

दिवस दुसरा - बर्मिंगहॅम ते टेक्सास राज्यातील क्लेबर्न. हा प्रवास १० तासांचा आहे. विरंगुळ्याचे क्षण निर्माण करणं भागच होतं.  मराठी शब्दांची अंताक्षरी खेळायचं ठरलं. मुलांचं मराठीचं ज्ञान उघडं पडल्यामुळे इंग्रजी शब्दांची अंताक्षरी खेळू या असं त्यांनी आव्हानच केलं. तिथे आमचं ज्ञानप्रदर्शन झालं. मुलं आणि पालक दोघांनाही फिट्टमफाट झाल्याचं समाधान या खेळाने दिलं. मुलांना मग देशांच्या नावाची अंताक्षरी खेळायची हुक्की आली.  काहीकाही देश नविनच निर्माण झाले आहेत की काय असं मला वाटलं. असतील बापडे असं मनात म्हणत मीही एकदोनदा माणसांची नावं घेऊन अशा नावांचे देश आहेत असं ठोकून दिलं. मुलांनाही हे नविनच देश असावेत असं वाटलं.  अंताक्षरी संपल्यावर  कुणीतरी टुम काढली, घरातल्या प्रत्येकाचा एकेक चांगला गुण आणि सुखद प्रसंग सांगण्याची. गाडीत अचानक शांतता नांदायला लागली ती मुक्कामाला पोचेपर्यंत. १० तासांनी क्लेबर्नमध्ये पोचलो तेव्हा गाडीतून सामानही काढायच्या आधी मी पर्समधून कॅमेरा काढला. हे घरच इतकं सुंदर होतं की सगळं काही टिपावं असं वाटत होतं. फोटोच फोटो काढून झाले; म्हणजे मी एकटीने काढले. कुणालाही त्यात रस नव्हता. लेक निसर्गाचे फोटो काढतो. फोटोत माणसं असल्याशिवाय निसर्ग कोणत्या गावचा ते कळत नाही हे काही त्याला पटत नाही. माणसं असलेला निसर्ग टिपण्यासाठी नाकं मुरडत  माझं सामानही खोलीत नेणार्‍या लेकरांची आणि नवर्‍याची छायाचित्र मी टिपली आणि पुन्हा एकदा पास्ता खाऊन आम्ही निद्राधीन झालो.

तिसरा दिवस - क्लेबर्नमधून टेक्सास राज्यातील सॅन्डरसन गावाकडे गाडी पळवायला सुरुवात केली. ५:३० तासांचा प्रवास. सुरळीत! काहीच घडलं नाही. ती वादळापूर्वीची शांतता होती हे संध्याकाळीच लक्षात आलं. सॅन्डरसनपासून मेक्सिको अगदी शेजार्‍याचं घर बघावं इतकं जवळ आहे. थोडे ताजेतवाने झालो आणि शेजार्‍याचं घर बघण्यासाठी पुन्हा तासभर प्रवास केला.  सुकलेली नदी पार केली की तिच्यापलिकडे दिसणारी खिंड म्हणजे मेक्सिको. मेक्सिको तिथून सुरु होत असलं तरी त्या बाजूला मानवी वस्ती नाही. हाताच्या अंतरावर मेक्सिको आहे ही भावना निर्माण होते इतकंच आणि तसंही कुणी जायचा प्रयत्न केलाच तर ते बेकायदेशीर आहे. भणाणत्या वार्‍यात आमची चार डोकीच तिथे होती. बाकी सारा उजाड माळ. उगाचच गस्त घालणारे कुणीतरी येतील,  बेकायदेशीरपणे मेक्सिकोतून अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल आम्हाला पकडतील असं वाटण्याएवढं गुढ वातावरण होतं. पलिकडे दिसणार्‍या मेक्सिकोच्या कातळाला चौकटीत बंदीस्त करण्यासाठी कॅमेरा काढला. ’फोटो’असं म्हटल्याम्हटल्या मुलांनी डोळे वटारले. "फोटो, फोटो काय सारखं. त्या क्षणाचा आनंद घ्यायचा असतो." आठवणी अशाच फोटोतून जपायच्या असतात, आता एकही फोटो काढणार नाही तुमचा असं ठणकावून सांगत तिघं पाठमोरे असतील तेव्हा फोटो काढायचे असं मी ठरवून टाकलं. बघत बसा स्व:ताच्या पाठी असंही मनातल्या मनात खिजवलं. ती रात्र Big Bend आता हाताच्या अंतरावर आहे या जाणीवेने आणि तीन दिवसांचा प्रवास सुखरुप पार पडल्याच्या आनंदात गेली. 

चौथा, पाचवा आणि सहावा दिवस - Big Bend राष्ट्रीय उद्यान - कोविड विचारात घेऊन मुद्दाम आम्ही हे ठिकाण निवडलं होतं. बर्‍याचदा रस्त्यावरुन फक्त आमचीच गाडी धावत होती. मैलोनमैल वस्ती नाही त्यामुळे इतर सोयीसुविधाही नाहीत. (पेट्रोल पंपावरच्या बाथरुम मात्र  सगळीकडे अतिशय स्वच्छ होत्या) याच कारणामुळे देशातील इतर ठिकाणांपेक्षा इथे तुलनात्मक गर्दी कमी असते असं मुलांनी शोधून काढलं होतं. खरंच गर्दी कमी होती. काही जागा कोविडमुळे बंद होत्या. तीन दिवस आता बाहेरचं जग विसरायचं होतं. निसर्ग हात पसरुन आजूबाजूला उभा होता त्याच्या कुशीत शिरलो.  निसर्गमय झालो.  मैलोनमैल पायी तुडवले, डोंगरमाथ्यांवर चढलो, नदीच्या पात्रात उड्या मारल्या,  डोंगरांनी वेढलेल्या मैदानावर तंबू (Tent) ठोकून राहिलो. रात्री ३ वाजता उठून तारांगण पाहिलं.  वाळूत आडवं पडून नजर तार्‍यांवर ठेवली की हळूहळू आपणच तारा होऊन गेल्यासारखं वाटायला लागतं तो अनुभव अविस्मरणीय आहे.  या राष्ट्रीय उद्यानातून मेक्सिको अगदी हाताच्या अंतरावर आहे हे सतत जाणवत राहतं. राष्ट्रीय उद्यानात पलिकडून मेक्सिकन प्रवेशही करतात पण जरी प्रवेश केला तरी उद्यानातून अमेरिकेच्या दिशेने बाहेर पडणं अशक्य आहे. जागोजागी चौक्या आहेत, रस्त्यावरही गस्त घालणार्‍या गाड्या दिसतात. उद्यानात काही ठिकाणं अशी आहेत की रितसर नदी ओलांडून होडीतून पलिकडे जाताही येतं.  तिथे पोचल्यावर पासपोर्टची आवश्यकता असते. कोविडमुळे सध्या हा मार्ग बंद केलेला आहे. मात्र मेक्सिकोतले विक्रेते होडीतून येऊन वस्तू विकायला ठेवतात पण तिथे थांबत नाहीत. वस्तूंबरोबर तिथेच ठेवलेल्या पांढर्‍या बाटलीत आपण पैसे ठेवायचे आणि वस्तू घ्यायची. दरही त्यावरच लिहिलेले होते.  हा दोन्ही बाजूंचा प्रामाणिकपणा अचंबित करणारा आहे. यातल्याच एका मार्गावर  नदीच्या पलिकडून मेक्सिकन लोक खाद्यपदार्थ विकत होते. काठावरुन आपण आपल्याला काय हवं ते सांगायचं (बोंबलायचं). त्यानंतर ते होडीतून  पदार्थ आणून देतात. भारतातल्या अनेकांना प्रश्न पडतो की ट्रम्पनी जी भिंत बांधली ती कुठे? खरंतर कुठेच नाही. जी बांधली ती अतिशय कमी लांबीची आहे. आधीच्या भिंतीची डागडुजी केली आहे त्याचाही समावेश ते त्यांनी बांधलेल्या ’भिंती’ त करतात. दुसरं म्हणजे ते जी भिंत बांधणार होते ती कॅलिफोर्निया राज्यात. त्यातलं तथ्य, वस्तुस्थिती ’गुगल’ केल्यावर कळेलच. आम्ही गेलो होतो टेक्सास या राज्यात. गर्दी टाळून पहाडांचं दर्शन घ्यायचं,  वाळवंट तुडवायचं, खिंडी आणि घळी पाहायच्या, त्यातून भटकायचं याचा अनुभव घ्यायचा असेल तर पुन्हा पुन्हा जावं असं आहे हे Big Bend नावाचं राष्ट्रीय उद्यान. Big Bend  हे नाव आग्नेय दिशेकडून ईशान्य दिशेकडे वाहणार्‍या नदीच्या प्रवाहाने निर्माण झालेल्या खिंडी, घळी, पहाड तसंच अमेरिका आणि मेक्सिको या नदीमुळे दुभागला गेला आहे त्यामुळे पडलेलं आहे.

सातवा दिवस - तीन दिवस उंडारुन, उनाडून अगदी ताजंतवानं व्हायला झालं. कोविडच्या वातावरणामुळे आलेली मरगळ कुठल्याकुठे पळाली. परतीचा प्रवास आम्ही वेगळ्या मार्गाने करणार होतो.  राष्ट्रीय उद्यानातून निघालो ते टेक्सास राज्यातल्या टेरलिंग्वा गावात राहायला थांबलो. हा  ५:५० तासांचा प्रवास होता. एव्हाना गाडी चालवायला, गाडीत तासनतास बसायला आणि भूक लागली की पिनट बटर सॅडविच खायला आम्ही सगळे सरावलो होतो.

आठवा दिवस - लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्सला घालवणार होतो. पुन्हा एकदा एकदम १० तासांचा प्रवास होता. चौघं गाडी चालवत असल्यामुळे सुरुवातीला इतक्या प्रवासाचं आलेलं दडपणही एव्हाना नाहीसं होऊन गेलं. न्यू ऑर्लिन्स जवळ यायला लागलं आणि  रिकामे रस्ते पुन्हा गजबजायला लागले. निसर्गाचा वरदहस्त माणसांनी बाजूला ढकललेला क्षणोक्षणी जाणवायला लागलं. न्यू ऑर्लिन्सला पोचल्यावर आरोग्य खात्याचा, ’सुटी असली तरी एकत्र जमू नका’ हा इशारा फेटाळून लावलेला पदोपदी दिसत होता. इथे गाव फिरायचं, तिथले प्रसिद्ध पदार्थ खायचे एवढाच आमचा बेत होता. गर्दी पाहिल्यावर आम्ही सगळं लवकर आटोपतं घेतलं पण खाणं मात्र सोडलं नाही. विकत घेऊन गर्दी टाळून, लांब जाऊन यथेच्छ ताव मारला. इथून आम्ही आमचा प्रवास तसाच पुढे चालू ठेवला ते अलाबामा राज्यातील मॉन्टगोमेरी येईपर्यंत. रात्री इथे मुक्काम करुन मार्टीन ल्यूथर किंग जिथे राहायचे ते ठिकाण पाहायची इच्छा होती पण वेळेत बसत नव्हतं. 

नववा दिवस - अलाबामा राज्यातील मॉन्टगोमेरीहून आमचं गाव. नॉर्थ कॅरोलायनातील शार्लट. ६:३० तास प्रवास आणि मग संपली सुटी. अटलांटा सोडल्यावर रस्त्यावर दोन - तीन अपघात, वाहनांच्या वेगावर नियत्रंण ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी दबा धरुन बसलेले पोलिस असंच दृष्य या ६:३० तासात जागोजागी होतं. नागरी सोयी सुविधा नसलेलं Big Bend अधिक मोहक होतं, मन:शांती देणारं होतं ते मागे टाकून आम्ही कुठे धावतोय असं वाटायला लागलं. एकदा का टेक्सास राज्यातील क्लेबर्न सोडलं की राष्ट्रीय उद्यानापर्यंतचा रस्ता म्हणजे निसर्गाचं राज्य आहे. कुठल्याच गावात माणसांची चाहूल विशेष जाणवत नव्हती आणि रस्त्यावर गाड्यांची गर्दीही नव्हती. सॅन्डरसनमध्ये तर माणसांपेक्षा ओसाड पडलेल्या घरांची संख्याच जास्त आहे. तिथे जवळच भुतांचं गावही आहे. Ghost Town - ओस पडलेलं गाव! ही अशी गावं, घरं दिसत होती तेव्हा पडक्या भिंतीमध्ये काय कहाणी दडली असेल असा प्रश्न पडत राहिला.  परतीच्या प्रवासात मन मागे धावत होतं, वाटेतलं काही ना काही आठवत होतं. धावणं चालूच होतं. मनाचं आणि गाडीचं. मन आणि गाडी विरुद्ध दिशेने! 

९ दिवसातले पाच - सहा  दिवस आमचे एका वेगळ्या जगात गेले. वर्षातली ही सुटी आम्ही चौघं एकत्र असतो त्यामुळे अधूनमधून होणार्‍या प्रवासापेक्षा या सुटीची वाट आम्ही सगळेच बघत असतो. यावेळेसही तेच. घरी आल्याआल्या पुन्हा पुढच्यावर्षीचे वेध!

पैसे बाटलीत ठेवा.
बेकायदेशीर प्रामाणिकपणा
















माझ्याकडे पाठ फिरवून मेक्सिकोत प्रवेश करता येईल का या विचारात उभे राहिलेले घरातले तीन खंदे 🙂 


त्या तिथे पलिकडे मेक्सिको

त्या तिथे पलिकडे मेक्सिको



Monday, November 16, 2020

दिवाळीचा साहित्य फराळ



 नमस्कार मित्र मैत्रिणींनो ,

माझा दिवाळीचा फराळ हा असा आहे:
१ सामना दिवाळी अंकात ’चोरीचा मामला’ ही माझी हलकीफुलकी कथा आहे.
२ प्रसाद दिवाळी अंकात पाचशे मैल ही गोर्डन वेन (Gordon Wayne) या
युवकाच्या जीवनावर प्रेरणादायी कथा आहे.
३ अनुराधा दिवाळी अंकात काटशह ही कथा नावाप्रमाणेच एकमेकांवर कुरघोडी
करण्याच्या प्रयत्नात असणार्या काही प्राध्यापक आणि विद्यार्थीनीची आहे.
४ मेहता ग्रंथ जगतच्या दिवाळी अंकात मांजर, नवरा आणि मुलं हा ललित लेख
आहे. कोणाची, कुणाशी तुलना केलेली आहे हे लेख वाचलात तरच कळेल 🙂
५ माझा मराठीचा बोल (मामबो) या इ दिवाळी अंकात ती वही ही पती - पत्नी
आणि त्यांच्या मित्राच्या वहीची हलकीफुलकी कथा आहे.
६ बृहनमहाराष्ट्र वृत्तच्या दिवाळी अंकात दृष्टी ही कथा विद्यार्थी आणि शिक्षिकेच्या
नात्याचे पदर उलगडणारी कथा आहे.
७ अभिरुची दिवाळी अंकात त्सुनामी या आमच्या मांजराच्या आगमनाची,
तिच्यावर ओढवलेल्या संकटाची कथा म्हणजेच माझा ललित लेख आहे.
यातले मामबो आणि बृहनमहाराष्ट्र वृत्त आंतरजालावर वाचण्यासाठी हा दुवा -
मामबो - https://www.mazamarathichabol.org/
(इथे गेल्या चारवर्षांचे दिवाळी अंक वाचता येतील)
बृहनमहाराष्ट्र वृत्त - https://bit.ly/3kvwbEN
वाचा आणि अभिप्रायही कळवा ही विनंती.

Friday, October 30, 2020

मराठी अमेरिकन रेडिओ - ’मोर्चाला जायचं का?’

 मराठी अमेरिकन रेडिओसाठी ’मोर्चाला जायचं का?’ यामध्ये ऋत्विक, पर्णिका आणि माझ्या उदयनशी झालेल्या गप्पा. खरंतर गप्पा म्हणण्यापेक्षा आमच्यासारख्या भारताबाहेर राहणार्या पालकांच्या मुलांचे ऋत्विक आणि पर्णिका प्रतिनिधीच म्हणेन मी. इथल्या कितीतरी घरांमध्ये ऋत्विक, पर्णिकासारखी मतं असणारी, त्यांच्यासारखे अनुभव घेतलेली मुलं असतील आणि आमच्यासारखे, उदयनसारखे पालक.

उदयनने अचूक प्रश्न विचारले आहेत आणि कार्यक्रमाचं पार्श्वसंगीत श्रवणीय आणि समर्पक आहे. नक्की ऐका, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कळू दे.


यातच माझ्या लेखक मित्राने, गौतम पंगूने त्याच्या अप्रतिम लेखाचा काही अंश वाचलेला आहे. त्यांनी आमच्यासारख्या भारतीयांना दिलेली उपमा मुद्दाम ऐकण्यासारखी आहे 🙂
पुढच्या भागात अमेरिकेतील लेखिका शिल्पा केळकर आणि तिची मुलगी अनुका सहभागी होणार आहेत. कोणताच भाग चुकवू नका. नक्की ऐका.

_________________________________
मराठी अमेरिकन रेडिओ सादर करत आहे,

“मोर्चाचा जायचं का? भाग १”

एक ज्वलंत चर्चा, अमेरिकेतल्या वंशभेदाबद्दल, भारतातून येऊन अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी अमेरिकन समाजात या बाबत आणि एकंदरच अमेरिकेतल्या सामाजिक समस्यांबद्दल असलेल्या उदासिनता आणि अमेरिकेत जन्मलेल्या मराठी अमेरिकन मुलांमधे ह्या विषयाबद्दल असलेल्या आत्मियता आणि सक्रियते बद्दल....

दोन भागात मांडलेला एक वेगळा आणि महत्वाचा विषय. सादर करतो आहोत पहिला भाग. नक्की ऐका, इतरांनाही ऐकवा आणि प्रतिक्रिया कळवा.

Thursday, October 22, 2020

कालचक्र कथा अभिवाचन

या कथेचं अभिवाचन, कलाप्रेमी या रत्नागिरीच्या संस्थेसाठी मी केलं. नक्की पाहा.


Facebook Link - https://www.facebook.com/watch/?v=420637885587514

अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात सुधारणाचं वारंही जवळपास पोहोचू न देणारी जवळजवळ २,००,००० लाखांच्यावर लोकवस्ती आहे यावर विश्वास बसेल? पण हे खरं आहे. अमेरिकेतल्या पेनसेलव्हिनिया आणि ओहायो या भागात आमिश/ऑमिश नावाची ही जमात आहे.

आपल्याकडच्या ग्रामीण जीवनाशी थोडंफार साम्य असलेल्या या जमतीच्या चालीरीती फार वेगळ्या आहेत. यामुळेच सर्वसामान्य अमेरिकन आणि पर्यटकांनाही यांचं आकर्षण वाटतं. ’फॉर रिचर ऑर पुअरर’, ’विटनेस’ यासारखे चित्रपट आमिश समाजजीवनांवर बेतलेले आहेत.
साधारण १५१२ च्या दरम्यान युरोपमध्ये होऊ घातलेल्या सुधारणा धर्मांबद्दलही उलथापालथ करणार्या होत्या. शिशुबाप्तिसाविरोधी आणि धर्म व राज्यकर्त्यांचा संबंध नसावा या मतांचा आग्रह धरत १५२५ मध्ये उलरिच त्स्विलग्लीने वेगळा पंथच निर्माण केला. या पंथात सामील होणार्यांना हद्दपार किंवा मृत्यूदंड या मतप्रवाहाला विरोध असणार्या स्थापितांकडून सुनावला गेला. बायबलमध्ये शिशुबाप्तिसामाचा उल्लेख नसल्याने हा पंथ आपल्या विश्वासावर ठाम होता. कठोर परिश्रमावर विश्वास ठेवणारा हा पंथ म्हणजेच आमिश/ऑमिश जमात.
युरोपमधून धर्ममुक्त वातावरणाचा शोध घेत ही मंडळी अमेरिकेत पोचली.
दुसर्या महायुद्धानंर भोवताल बदलला. जनजीवन अत्याधुनिक बनलं पण आमिश तसेच राहिले. अधूनमधून बंडखोरीची उदाहरणं पुढे येत असतात तसंच या लोकांचा तिटकारा करणार्या गटांकडून मारहाण केल्याच्या घटनाही घडत असतात. युरोपमध्ये आता आमिश नाहीत. वाढती कुटुंबसंख्या आणि त्यामानाने कमी पडणारी शेतीची जमीन यामुळे इतर देशांमध्ये हे हळूहळू विखुरले जात आहेत. त्यांच्या विश्वासानुसार, नियमांनुसार त्यांना जगण्याची मुभा मिळावी इतकीच माफक अपेक्षा ते करतात.

Thursday, October 8, 2020

कथा अभिवाचन

 

दुवा - https://www.facebook.com/artistsharmony/

अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात सुधारणेचं वारंही
जवळपास पोहोचू न देणारी जवळजवळ २,००,००० लाखांच्यावर लोकवस्ती आहे यावर विश्वास बसेल? पण हे खरं आहे. अमेरिकेतल्या पेनसेलव्हिनिया आणि ओहायो या भागात  आमिश/ऑमिश नावाची ही जमात आहे.

आपल्याकडच्या ग्रामीण जीवनाशी थोडंफार साम्य असलेल्या या जमतीच्या चालीरीती फार वेगळ्या आहेत. यामुळेच सर्वसामान्य अमेरिकन आणि पर्यटकांनाही यांचं आकर्षण वाटतं. ’फॉर रिचर ऑर पुअरर’, ’विटनेस’ यासारखे चित्रपट आमिश समाजजीवनावर बेतलेले आहेत.

साधारण १५१२ च्या दरम्यान युरोपमध्ये होऊ घातलेल्या सुधारणा धर्मांबद्दलही उलथापालथ करणार्‍या होत्या. शिशुबाप्तिसाविरोधी आणि धर्म व राज्यकर्त्यांचा संबंध नसावा या मतांचा आग्रह धरत १५२५ मध्ये उलरिच त्स्विलग्लीने वेगळा पंथच निर्माण केला. या पंथात सामील होणार्‍यांना हद्दपार किंवा मृत्यूदंड या मतप्रवाहाला विरोध असणार्‍या स्थापितांकडून सुनावला गेला. बायबलमध्ये शिशुबाप्तिसामाचा उल्लेख नसल्याने हा पंथ आपल्या विश्वासावर ठाम होता. कठोर परिश्रमावर विश्वास ठेवणारा हा पंथ म्हणजेच आमिश/ऑमिश जमात.

युरोपमधून धर्ममुक्त वातावरणाचा शोध घेत ही मंडळी अमेरिकेत पोचली.‍ दुसऱ्या महायुद्धानंतर भोवताल बदलला.  जनजीवन अत्याधुनिक बनलं पण आमिश तसेच राहिले. अधूनमधून बंडखोरीची उदाहरणं पुढे येत असतात तसंच या लोकांचा तिटकारा करणार्‍या गटांकडून मारहाण केल्याच्या घटनाही घडत असतात. युरोपमध्ये आता आमिश नाहीत. वाढती कुटुंबसंख्या आणि त्यामानाने कमी पडणारी शेतीची जमीन यामुळे इतर देशांमध्ये हे हळूहळू विखुरले जात आहेत. त्यांच्या विश्वासानुसार, नियमांनुसार त्यांना जगण्याची मुभा मिळावी इतकीच माफक अपेक्षा ते करतात.

Thursday, October 1, 2020

रत्नागिरी आर्ट सर्कलच्या कार्यक्रमात माझी कथा आणि मुलाखत - FB Live/Youtube

 रत्नागिरी आर्ट सर्कलच्या कश्ती शेखने वाचक - वसा या कार्यक्रमात माझी ’संकोच’ कथा वाचली. गोष्टीतल्या नायिकेला साजेशीच कश्ती आहे त्यामुळे कथेतली षोडशा आपल्यासमोर उभी राहते. या कथेच्या अभिवाचनानंतर  माझी अर्धा तास - लेखकाचा खास यामध्ये माझी मुलाखत झाली.  ती एक तास चालली.  दिप्ती कानविंदे, नंदिनी आणि कश्ती शेख या तिघींबरोबर गप्पा चांगल्याच रंगल्या. अमेरिकेत येण्यापूर्वी मी रत्न्गागिरी, कणकवली, पालघर, देवरुख या ठिकाणी राहिलेली आहे त्यामुळे गप्पांमध्ये हे विषय होतेच. हा कार्यक्रम फेसबुक Live होता आणि या सर्व गावांतून माझ्या कौतुकासाठी सारी उपस्थित होती यासारखा आनंद नाही.

मी फेसबुक आणि युट्युब दोन्ही दुवे देते. नक्की पाहा. रत्नागिरी आर्ट सर्कल वाचन - वसा कार्यक्रमात अतिशय सुंदर कार्यक्रम महिनाभर सादर करणार आहे त्यांचे चाहते व्हा. मला फेसबुकवर मैत्रीसाठी साद घातलीत तर कृपया तसं कळवा कारण कोण, कुठून आलंय तेच हल्ली कळेना झालंय :-)

Facebook :

संकोच कथा अभिवाचन

https://www.facebook.com/watch/?v=1221566698205763


माझ्या नंदिनी, दिप्ती आणि कश्तीबरोबरच्या गप्पा

https://www.facebook.com/watch/?v=353724962634707


Youttube:

संकोच कथा अभिवाचन

https://youtu.be/XDxOTnoQ3ig


माझ्या नंदिनी, दिप्ती आणि कश्तीबरोबरच्या गप्पा

https://www.youtube.com/watch?v=zwffKXKRCqQ


Saturday, July 11, 2020

आत्मसन्मानाची लढाई - सकाळ - सप्तरंग पुरवणी

कृष्णवर्णीय फ्लॉईडच्या पोलिसांकडून झालेल्या निर्घृण हत्येनंतर वर्णद्वेषविरोधी  निदर्शनांनी अमेरिका पेटून उठली. विशेषत: इथे वाढलेल्या स्थलांतरितांच्या मुलांनी, दुसर्‍या पिढीने पालकांना त्यांच्या तटस्थ भूमिकेचा विचार करायला भाग पाडलं आहे. स्थलांतरितांची ही दुसरी पिढी (आमची मुलं) कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही त्यांच्या कृष्णवर्णीय मित्रमंडळीना पाठिंबा देण्यासाठी  निदर्शनात भाग घेत आहेत, कृष्णवर्णीय संस्थांना मदत करत आहेत आणि त्याचवेळी पालकांना जाहिर पत्र लिहून, त्यांच्या भूमिकेला विरोध करत  याविषयावर बोलायला, विचार करायला उद्युक्त करत आहेत. त्याच विषयावरचा  लेख आहे.
                                                        

’स्पिरिट रॉक’ या शब्दातच त्याचा अर्थही सामावला आहे. ’ब्लॅक लाइव्ज मॅटर’ चळवळीला पाठिंबा दर्शविण्यासाठी माझ्या मुलीच्या शाळेत काही मुलांनी शाळेतल्या या दगडावर सुंदर संदेश लिहिले. जितक्या तळमळीने मुलांनी हे संदेश लिहिले तितक्याच पटकन त्यावर फुल्या मारून त्या संदेशाला, चळवळीला विरोध दर्शविण्याचीही खुमखुमीही कुणीतरी दाखवली. ’ब्लॅक’ खोडून तिथे ’ब्लु’ लिहिलं गेलं. प्राचार्यांनी या घटनेवर कडक टीका केली. मुलांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला. यानंतर मात्र वेगळंच घडलं. ज्या प्राचार्यांनी तीव्र शब्दात मुलांना समज दिली त्यांनाच ’वर्णद्वेषी’ विधानं केल्याबद्दल निलंबित करण्यात आलं. पालक म्हणून आम्हाला अर्थातच धक्का बसला. मनात वादळ उठलं. आपल्या मुलांना ज्या शाळेत पाठवतो तिथले प्राचार्यच वर्णद्वेषी आहेत या वस्तुस्थितीने मन धास्तावलं. इतक्या वेळा कारणाकारणाने ऐकलेली प्राचार्यांची भाषणं आठवत राहिली, त्यांचे विचार आपल्याला परिचित आहेत हा भ्रमच होता की काय अशी शंका यायला लागली. त्यातही प्राचार्य निर्दोष आहेत असं सांगणारा एक गटही त्यांच्या बाजूने घोषणा देत उभा राहिला आणि त्याचवेळी निदर्शनं करणारा!

कृष्णवर्णीय फ्लॉईड पोलिसांच्या निघृणपणामुळे मृत्युमुखी पडला आणि अमेरिकेत वर्णद्वेषाविरोधी निदर्शनांचा उद्रेक उसळला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही संसर्गाचा विचारही न करता लोक रस्त्यावर उतरले यावरूनच त्याच्या तीव्रतेची जाणीव होत राहते. गावागावात या घटनेचे पडसाद उमटणं साहजिकच होतं. फक्त त्याच्या स्वरूपाची कल्पना कुणालाच नव्हती. भारतीय पालक नेहमीच अशाबाबतीत मुलांना सबुरीचा सल्ला देतात, स्वत: तटस्थ राहतात पण यावेळी स्थलांतरीतांच्या तरुण मुलांनी पालकांना नवी दृष्टी दिली. पालकांना त्यांच्या भूमिकेचा विचार करायला भाग पाडलं.

काही दिवसांपूर्वीच माझ्या मुलाने वर्णद्वेषाला बळी पडलेला कृष्णवर्णीय फ्लॉईड आणि सुरू झालेली चळवळ याबाबत त्याच्या ऑफिसच्या CEO शी थेट संपर्क साधला होता. कंपनीने काहीच भूमिका घेतली नाही, कर्मचार्‍यांना कंपनी वर्णद्वेषाला थारा देत नाही अशी खात्री देणारा संदेश पाठवला नाही याची नाराजी कंपनीतील कृष्णवर्णीयामध्ये तसंच इतरांमध्येही आहे हे नजरेला आणून दिलं. कंपनीने आपली चूक कबूल करत सर्वांशी बोलायची तयारी दाखवली. online meeting मध्ये सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या. CEO नी आधी याबाबत काही न केल्याबद्दल माफी मागितली आणि नंतर अतिशय भावुक ईमेल पाठवण्यात पुढाकार घेतला. तरुण मुलांना इथल्या प्रश्नांबद्दल किती आत्मीयता आहे याचं प्रत्यय देणारं हे उदाहरण.

फक्त भारतीयच नाही तर एकूणच स्थलांतरित पालकांची इथे जन्मलेली, वाढलेली मुलं त्यांच्या आई - वडिलांच्या भूमिकांची अक्षरश: चिरफाड करतायत. वॉशिंग्टन डी. सी. मधल्या निदर्शनात माझ्या मुलाने आणि त्याच्या मित्रमैत्रिणींनी भाग घ्यायचं ठरवलं तेव्हा आम्हाला पालक म्हणून चिंता होती कोरोना विषाणूच्या संसर्गाची पण फ्लॉईडच्या मृत्यूने तरुण पिढीच्या मनातलं वादळ, व्यवस्थेबद्दलचा प्रक्षोभ रस्त्यावर आला आहे. या देशाचे नागरिक असूनही तटस्थ भूमिका घेणारे स्थलांतरित, त्यामुळे मुलांशी होणारे वादविवाद यातून सर्वांनाच आपापल्या मानसिकतेचा सखोल विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. जे होतंय ते पाहताना, ऐकताना जितकी काळजी वाटते तितकाच तरुण पिढीच्या संवेदनशीलतेचा अभिमान!

या चळवळीत इथली दुसरी पिढी सक्रिय झाल्यामुळे नकळत लक्षात येत राहतं की सर्वांच्याच मनात हा वर्णभेद नाही म्हटलं तरी आहेच. नेटफ्लिक्सने खास यूट्यूबवर प्रसिद्ध केलेल्या भागात हसन मिनाजचं प्रभावी भाषण नक्कीच विचार करायला लावणारं आहे. तो म्हणतो, ’फिरताना, धावताना, झोपलेले असताना, दार उघडताना सतत मृत्यूची भिती कृष्णवर्णीयांना भेडसावत असते. एशियन्सना प्रसिद्ध कृष्णवर्णीयांचा प्रचंड अभिमान आहे पण कृष्णवर्णीयांशी तुमची मैत्री नसते. घरात कुणी सावळ्या रंगाचं असेल तर तुम्ही त्यांना अगदी सहज कल्लू म्हणता, दाक्षिणात्य लोकांचा उल्लेख ’कल्लू’ करता.’ बहुतांशी घरात, प्रत्येक व्यक्तीला आहे तसं स्वीकारायला पाहिजे असे धडे देतानाच कधीतरी पालकांनी मुलांना कृष्णवर्णीयांपासून सावध राहण्याचाही इशारा दिलेला असतो. पालकांच्या दुहेरी भूमिकेला मुलं आव्हान द्यायला लागली आहेत. त्यांचा ढोंगीपणा त्यांच्या लक्षात आणून द्यायला लागली आहेत. फ्लॉईडच्या मृत्यूनंतर त्याचे तीव्र पडसाद अनेकांच्या घरातून उमटतायत, लेखणीतून व्यक्त होतायत.

फ्लॉईडच्या मृत्यूआधी, 2016 साली फॅलॉन्डो कॅस्टिओच्या बाबतीत घडलेल्या अशाच घटनेने ही युवा पिढी प्रचंड अस्वस्थ होती ती पालकांच्या वागण्यातून नकळत दिसणार्‍या वर्णद्वेषाने, त्यांच्या तटस्थ भूमिकेमुळे. मुलांना या विषयावर पालकांशी बोलणं अवघड जात होतं, वाद होत होते त्यामुळे पालकांशी संवाद कसा साधावा हे कळत नव्हतं त्यातूनच पत्रांची कल्पना जन्माला आली आणि Letters For Black Lives Project ही कल्पना रुजली. सुरुवातीला फक्त एशियन अमेरिकन्स मुलांचा समावेश असलेल्या या पत्रांमध्ये आता आफ्रिका, युरोप, कॅनडातील तरुणांचाही समावेश आहे. अनेक भाषांमध्ये या पत्रांचा अनुवाद झाला आहे. 2016 नंतर पुन्हा एकदा या पत्रांना उजाळा दिला जात आहे. त्यावेळच्याच कळकळीने मुलं पालकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या सार्‍या पत्रांचा सारांश असा आहे.

प्रिय, काका, काकू, मावशी, आत्या,
तुम्हाला कदाचित कृष्णवर्णीय मित्रमैत्रिणी नसतील, तुमचे सहकारी कृष्णवर्णीय नसतील पण आमचा जन्म इथेच झालेला आहे, आमचे अनेक मित्रमैत्रिणी, सहकारी कृष्णवर्णीय आहेत आणि या देशात त्यांना जी वागणूक मिळत आहे ते पाहून आम्हाला खूप भिती वाटते आणि त्यांची अतिशय काळजी वाटते. पोलिसांच्या हातून जेव्हा जेव्हा कृष्णवर्णीय व्यक्ती मारली जाते तेव्हा नकळत तुम्ही त्या व्यक्तीलाच दोषी ठरवता. यात तुमचा दोष नाही कारण माध्यमातून कृष्णवर्णीयांची हीच प्रतिमा आहे. चोर, गुन्हेगार! ’आम्ही या देशात आलो ते स्थलांतरित म्हणूनच आणि स्थिरावलोही; मग कृष्णवर्णीयांना हे का जमत नाही?’ हा प्रश्न कधी तुम्ही विचारला आहे तर कधी न बोलूनही तुमच्या कृतीतून हे व्यक्त होतं. म्हणूनच आज आम्हाला, इथे जन्मलेल्या, वाढलेल्या मुलांना काय वाटतं ते तुम्हाला सांगायचं आहे.
’आम्ही घरातून बाहेर पडतो तेव्हा निश्चिंत असतो, मनात फार धाकधूक नसते, पोलिस अडवतील, घरी परत येऊ की नाही अशी शंका नसते पण आमच्या कृष्णवर्णीय मित्रमैत्रिणींच्या बाबतीत तसं होत नाही. बहुतेकांचे पूर्वज गुलाम होते आणि अजूनही तशीच वागणूक त्यांना मिळते, बदल झाला आहे तो स्वरूपात. घर बांधण्यासाठी कर्ज मिळत नाही, मतदानाचा हक्क नाकारला जातो, शिक्षणापासून वंचित राखलं जातं. कृष्णवर्णीय या व्यवस्थेचे अद्यापही गुलामच आहेत. तुम्ही या देशात आलात, स्थिरावलात. कितीतरी वेळा या व्यवस्थेचा तुम्हालाही त्रास झालेला आहे. गरिबी, आतंकवाद, रोगराई, गुन्हेगारी अशा कितीतरी गोष्टींसाठी या ना त्या कारणाने तुम्हालाही दोषी ठरवलं गेलं. तुम्ही हे पचवलंत ते आमच्या उज्ज्वल भवितव्याच्या अपेक्षेने. आता आम्हाला तुमची साथ हवी आहे, तुमच्या हातात हात घालून आम्हाला कृष्णवर्णीयांचा लढा पुढे न्यायचा आहे. आपण सारेच या देशात सुखाने राहू. जसा तुमच्या मनात कृष्णवर्णीयांबद्दल ग्रह असतो तसाच इतरांच्या मनात तुमच्या - आमच्याबद्दल हे तुमच्या कसं लक्षात येत नाही? माध्यमं तुमच्या उच्चारांची नक्कल करतात, आम्हाला शाळेत चिडवलं जातं, विमानतळांवर अडवलं जातं. कृष्णवर्णीय समजून भारतीय लोकांना झालेला त्रास तुम्ही बघितला आहेच. सुरेशभाई पटेलांना कृष्णवर्णीय समजून पोलिसांनी केलेली मारहाण कोण विसरेल? झाली का कारवाई पोलिसांवर याबाबत? या अशा घटना कृष्णवर्णीयांना रोजच्याच झाल्या आहेत तरी तुम्ही तटस्थ का? कदाचित आपल्यावरही ही वेळ येईल हे का विसरता? याला खीळ घालायची असेल तर आता या अल्पसंख्याकांच्या लढ्यात तुम्हीही सहभागी व्हायला हवं.

कितीतरी घरांमधून या पत्रांनी, तरुण मुलांनी पालकांचे डोळे उघडले, दृष्टिकोन बदलला. क्विनटेरोने जेव्हा फेसबुकवरून आपल्या मित्रमंडळींना निदर्शनासाठी आवाहन केलं तेव्हा, ’All lives matter' असं सांगत तिच्या आई - वडिलांनी तिला मूर्खात काढलं. विरोध केला. वीस डॉलर्सच्या नोटेवरून एका माणसाच्या मानेवर 8 मिनिटं पोलिस गुडघा टेकून बसू शकतो यामागे असलेली पार्श्वभूमी तिच्या पालकांना समजून घ्यायची नव्हती, समजत नव्हती. मोर्च्यासाठी तिने घेतलेल्या पुढाकाराला पालकांनी विरोध केल्यावरही तिने मागे न हटण्याचा निर्धार केला. नाईलाजाने तिच्या संरक्षणासाठी म्हणून तिची आईही अखेर मोर्चात सामील झाली. कृष्णवर्णीयांची भाषणं ऐकताना त्यांची वेदना तिच्या काळजाला भिडली. तिसर्‍या दिवशी तर क्विनटेरोचे वडीलही त्या दोघींबरोबर गेले आणि शेवटच्या दिवशी तिच्या आईने कृषवर्णीयांसमोर स्वत:हून भाषण केलं. स्वत:मध्ये झालेला बदल, एक आई म्हणून आपले कसे डोळे उघडले गेले हे सांगताना ती गहिवरली, ऐकणार्‍यांनाही अश्रू आवरणं कठीण गेलं.

वॅग आणि झॅगने निदर्शनात सामील व्हायचं आहे असं सांगितलं तेव्हा चायनाहून स्थलांतरित झालेल्या बार्टेकने तीव्र शब्दांत मुलांची कानउघडणी केली. मुलांनी त्यांचा निर्धार स्पष्ट केल्यावर तर बार्टेकने घर सोडून जाण्याचीच धमकी दिली. मुलं तरीही गेलीच. बार्टेकच्या अंगाचा तिळपापड झाला पण तिथे पोलिसांनी सुरू केलेल्या अश्रूधुराच्या बातम्या यायला लागल्यावर बार्टेक मुलांना परत आणण्यासाठी धावला. इतकंच नाही तर बार्टेकने मुलांकडून कृष्णवर्णीयांचा लढा, त्यांची भूमिका समजून घेतली.

इथे जन्मलेल्या, वाढलेल्या मुलांनी इथल्या समस्यांबद्दल आपल्या पालकांनी पावलं उचलावी, ठाम भूमिका घ्यावी याचा आग्रह कृतीतून दाखवायला सुरुवात केली आहे. पालकांनी मुलांना समजून घेऊन त्यांना साथ द्यायला हवी नाहीतर मुलं एकट्याने लढा द्यायला तयार आहेतच पण मुलांना जसं आपल्या आई - वडिलांना आपला अभिमान वाटावा ही आस असते तसंच आपल्यालाही मुलांच्या नजरेतला आपल्याबद्दलचा आदर भावतोच हे विसरून चालणार नाही.

 



Wednesday, July 1, 2020

माझी कथा सुव्रत जोशीच्या आवाजात storytel app वर.

सुव्रत जोशी - माझ्या शटलकॉक कथेचं ध्वनिमुद्रण कसं केलं त्याबद्दल बोलताना. कथा पूर्ण ऐकायला सभासदत्व घ्यावं लागेल पण सुरुवातीचा एक महिना सभासद न होता वाचता येईल. अतिशय वाजवी दरात मराठी आणि इंग्रजी साहित्याचा खजिना storytel वर आहे. प्रसिद्ध लेखकांचं साहित्य प्रसिद्ध कलाकारांच्या आवाजात.

It's time to put your headphones on and listen to Shuttlecock! If you follow this link, you get the first 30 days for free:

https://www.storytel.com/signup…


This offer is only valid if you haven't tried Storytel before.


                                          ------------------------------

शटलकॉक! म्हटलं तर सत्य, म्हटलं तर काल्पनिक अशी ही कथा आहे. यातली पात्र मी पाहिलेली आहेत. कथेतलं सर्व जसच्यातसं घडलेलं आहे का? नक्कीच नाही. आपण जे ’जर - तर’ म्हणत असतो तो कथेचाही एक अपरिहार्य भाग असतो.

माझ्या कथेतल्या या व्यक्तिरेखा भारतातल्या मित्रमैत्रिणींना अमेरिकेतल्या एका वेगळ्या यंत्रणेची, जगाची ओळख करून देणार्‍या आहेत. नक्की ऐका आणि ऐकून अभिप्राय द्यायला विसरू नका.

Monday, May 4, 2020

शरद पोंक्षेंशी गप्पा

शरद पोंक्षेंशी गप्पा मारणं हा एक 'अनुभव' होता.
हल्ली कोणताही कार्यक्रम जास्तवेळ ऐकत/पाहत नाहीत म्हणून आम्ही ४५ मिनिटं ठरवली होती पण नंतर कितीतरीजणांनी कळवलं की फार पटकन संपली मुलाखत, यातच सारं आलं. नाही का?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वाना सकारात्मकतेची कास धरायला हवी हे ठाऊक आहे आणि त्याची जाणीव होते जेव्हा शरदनी सकारत्मकतेने कर्करोगांशी लढा दिला ते ऐकताना, मालिकांचं बदललेलं रूप, भाषा याबद्दल काय वाटतं, चुकीचं मराठी वापरलं गेलं की त्यांच्यासारख्या सुजाण कलाकारांना काय वाटतं, त्याबाबत ते काय करतात, नथुराम आणि सावरकर यावरून त्यांना तीव्र विरोध सहन करावा लागलेला आहे अशावेळेस त्यांच्या घरच्यांची काय भूमिका असते अशा माझ्या आणि मृदुलाच्या अनेक प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरं, मारलेल्या गप्पा खरंच ऐकण्यासारख्या आहेत. सुरूवात आणि शेवट त्यांनी म्हणून दाखविलेल्या संवादानी आहे. पाहायला आणि ऐकायला हवं असं आहे सारं. नक्की पाहा, आपल्या मित्रमैत्रीणींना कळवा (Like and Share).


Tuesday, March 31, 2020

इटुकल्या पिटुकल्या गोष्टी

माझ्या मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी  सांगितलेल्या माझ्या गोष्टी -  FB - Live




आजोबा
 'चष्मा आण, पाणी दे. चहा कर.आजोबा दिसेल त्याला पकडतात. कामांची रेल्वेगाडी सोडतात. आई म्हणते, नाचवतात सगळ्यांना.
मी त्यांना  काम सांगितलं की मात्र ओरडतात,
 'हातपाय आहेत ना? स्वत:ची कामं स्वत: करायची' असं म्हणतात आणि आरामखुर्चीत डुलत बसतात.
मी आज खोलीत लपून बसलो. कामांची रेल्वेगाडी आजीने हाकली.  आजोबा गेले. मी हळूच विचारलं.
"गेले का जमदग्नी?"
"कोण जमदग्नी? बाहेर ये." आजोबा खेकसले. मी घाबरलो.  आजोबा होते की इथेच. मी पळणार होतो पण आजोबांनी मला धरून आणायला आजीला पाठवलं असतं.
"बाहेर ये." आजोबा परत जोरात ओरडले. मी बाहेर आलो.
"कोण जमदग्नी?" आजोबांनी डोळे वटारुन विचारलं.
"आजी तुम्हाला जमदग्नी  म्हणते.  जमदग्नी म्हणजे काय?" आजोबानी मला उत्तर दिलं नाही. ते  आजीवर वसकन ओरडले.  आजी आहे कुठे? आजी तिथे नव्हतीच.  नेहमी मी पळतो. आज आजी पळाली.
पण मला कुणीतरी सांगा ना,  जमदग्नी म्हणजे काय?
                                      -----------------------------------------
 भगदाड

"उठ गं" आईचा आवाज चढला.
"झोपले की उठवतेस. उठले की झोपवतेस." मी कुरकुरले.
"लाडात येऊ नकोस." ती चिडली. निघून गेली.  मी उगाच भिंतीवर पाय मारला. इकडच्या भिंती पोकळ. भगदाडच पडलं. मी घाबरले.
"काय झालं?" आईने खालून जोरात विचारलं
"पुस्तक पडलं."  मी भगदाड झाकलं. त्यावर उशी ठेवली. धावत खाली गेले.
"खरं सांगितलं की तू ओरडत नाहीस ना?"
"काय केलंस?" आई चिडली. मी गप्प.
"सांग. नाही ओरडणार." नाईलाजाने आई म्हणाली.
तिला मी खोलीत नेलं. भगदाड दाखवलं.
"?" आईचं तोंड उघडंच राहिलं. ती मटकन बसलीच.  चिडली, बडबडायला लागली.
"तू ओरडणार नव्हतीस." मी रडायला लागले.
"मी ओरडत नाहीये." ती ओरडत म्हणाली.
मोठी माणसं! बोलतात एक, वागतात वेगळं. मोठी माणसं! 
-----------------------------------------
मजा
 एकदा मजा झाली. आईने न सांगता मी सगळं केलं. दात घासले, आंघोळ केली. नाश्ता कटकट न करता खाल्ला, गृहपाठ केला. एकदम शहाण्यासारखी वागले. आईला धक्काच बसला. बाबाला वाटलं मला अक्कल आली.
दादा म्हणाला,
"काहीतरी गडबड आहे." तो  गडबड शोधायला खोलीत गेला.  माझ्या, त्याच्या. परत आला.
"काय रे? काय उद्योग केले आहेत कार्टीने?" आईने विचारलं.
"काही नाही." तो पुटपुटला. मी दादाची फजिती झाली म्हणून टाळ्या वाजवल्या. तेवढ्यात बाबा दादाचं चित्र घेऊन आला. मी घाबरले. आईच्या मागे लपले.
"पिकरुने काढलंय?" आईने विचारलं.
"नाही. दादाचं नाव पुसलं..." बाबा म्हणाले.
"म्हणजे?" आईला काही कळलं नाही.
"चित्र कुणी काढलं?" बाबानी विचारलं.
"मी काढलं." दादा म्हणाला.
"नाव कुणाचं दिसतंय?" बाबानी विचारलं. दादाने नीट पाहिलं.
"माझं नाव पुसून हिने तिचं घातलं."  दादा किंचाळला.
"म्हणून शहाण्यासारखी वागत होती." आई पुटपुटली. दादाने मला ढकललं,  केस ओढले.  मी पुन्हा बेअक्कल झाले.  भोकाड पसरलं.

-----------------------------------------
थोबाडीत
 आमच्याकडे मायाताई काम करते. उशीरा येते. कधीकधी येतच नाही. आजही तिचा पत्ता नव्हता.
"एक लगावणार आहे तिच्या." आई म्हणाली. दार वाजलं.  मायाताई आली.
"आई, तुझ्या एक लगावणार आहे." मी तिला सांगितलं. मायाताई थांबलीच नाही. पळाली.
आईने माझ्या एक लगावली. मी कोपर्‍यात रडत बसलो.
"नको तेव्हा नको ते बोलतेस. तुझ्या बाबांसारखं."
"मग त्यांना लगाव." बाबा आला आणि कोपर्‍यात बसला.
"त्याला लगाव ना." मी पुन्हा म्हटलं. आई हसली आणि तीही कोपर्‍यात येऊन बसली.
या मोठ्या माणसांचं काही समजत नाही. आई - बाबांनी  मला जवळ घेतलं.
"मायाताईची भांडी बाबा घासणार आहे." आई म्हणाली
"म्हणजे?" मला काहीच कळत नव्हतं.
"अरे, तू बाबांना लगाव म्हणालास ना?"
"हो."
"मग बाबांनी भांडी घासली की झालं."
आई ना. नेहमी कोड्यात बोलते.
तुम्हाला कळलं का? कळवाल का याचा अर्थ?







Monday, March 23, 2020

पोस्ट

"बॅग भर." बहिणीने हुकूम सोडला.
"पोस्टात जायचं आहे ना? मग बॅग कशाला?" माझ्याकडे सहानुभूतिपूर्वक नजर टाकून दोघी बहिणी हसल्या,
"पोस्टाचा कारभार विसरलेली दिसतेयस. भर बॅग तू. कळेलच तुला"
"३ दिवसांचे कपडे भर. बाकीचं मी बघते." बहिणाबाईंचा झपाटा पाहून मी बॅग भरली.
"चलाऽऽऽऽ" तिने आरोळी ठोकली. चाकाची बॅग, पत्र्याची बॅग आणि एकावर एक भलेमोठे डबे रचलेला, जेवणाचा डबा घेऊन बाहेर पडलो.

घराच्या बाहेर पाऊल टाकलं. बाहेर पडल्या पडल्या चार - दोन रिक्षा सामानाकडे वळून बघत बघत रिकाम्याच नाहीशा झाल्या. अखेर एक थांबला.
"ताई, येवढालं सामान आणि तुम्ही तिघी, कोनी बी थांबनार नाय."
"तुम्ही थांबलात ना." रिक्षा भुर्रकन निघायच्या आधी आम्ही सामानाला आत कोंबलं. एका बहिणीला सामानावर बसवलं आणि आम्ही दोघी मांड्या घालून स्थानापन्न झालो. रिक्षावाला खदखदा हसला.
"दात काढायला काय झालं?" बहीण करवादली.
"सेल्फी काढा आनि टाका फेसबुकवर. लई भारी पिक्चर येईल."
ट्रंकेवर बसलेल्या बहिणीला सेल्फीची कल्पना एकदम आवडलीच. पण चालत्या देहाचा कोणताही भाग हलवता येणार नाही इतके घट्ट आम्ही बॅगांच्या आसपास अडकलो होतो.
"द्या मी काढतो."
"तुम्ही रिक्षा चालवा हो." तिघींमधली कुणीतरी एवढ्या जोरात खेकसली की त्याची रिक्षा, शिक्षा झाल्यासारखी हवेत उडाली आणि एकदम पोस्टासमोरच थांबली.
आखडलेले हातपाय आधी रिक्षातून बाहेर टाकत, आमची अंगंही बॅगांसकट बाहेर पडली.

चाकवाली बॅग विमानतळावर चालवल्यासारखी मी खडे असलेल्या रस्त्यावर चालवली. त्यामुळे निर्माण झालेल्या सुमधुर पार्श्वसंगीताच्या साथीने पत्र्याची बॅग सावरत आम्ही पोस्टात झोकदार ’’एंट्री’ घेतली. आणि रामा रामा.... पोस्टातली तोबा गर्दी पाहून एकदम विमानतळावर आल्यासारखं वाटलं.
"इथेही इतकी गर्दी?" माझ्या प्रश्नाला उत्तर न देता बहीण तरातरा पत्र्यांची बॅग घेऊन आत जायला निघाली.
"अगं, अगं..." करत आम्ही दोघी तिच्या मागे. गिर्‍हाईक आणि कर्मचार्‍यांच्या मधला अभेद्य दरवाजा तिने मोडला आणि पोस्टाच्या कर्मचार्‍यासमोर बॅग आपटली. त्या आवाजाचा शून्य परिणाम म्हणून कर्मचार्‍याची नजर संगणकावर खिळलेलीच राहिली. त्यामुळे संगणकात आहे तरी काय ही माझी उत्सुकता चाळवली. मी घाईघाईत चष्मा शोधून, डोळ्यावर चढवून त्याला काय दिसतंय ते मलाही दिसेल का म्हणून पाहायला लागले. एवढ्यात लक्षात आलं, काचेच्या पलीकडे उभी असलेली माणसं आमच्याकडे पाहत होती, आम्ही कर्मचार्‍याकडे आणि कर्मचारी संगणकाकडे. म्हणजे थेट कुणीच कुणाकडे पाहायचं नाही असा नियम आहे की काय पोस्टात?
"बॅग उघड." बहीण म्हणाली. नक्की कुणी बॅग उघडायची हे न कळल्याने मी म्हटलं,
"बॅग उघड." तेवढ्यात दुसरी बहीण पण तेच म्हणाली. कुणीच बॅग उघडेना तसा तो कर्मचारी ओरडला,
"बॅग उघडा." बहीण एकदम घाबरून खाली बसली. तिने बॅग उघडली.
"विजेचं बील, पत्ता, पासपोर्ट, आधारकार्ड, पॅन कार्ड....." मोठी यादी सांगत होती, छोटी एकेक कागद पुढे करत होती. आता त्या बॅगेचं रहस्य उलगडलं. अर्ध्या तासाने संगणकातून डोकं बाजूला काढून आम्ही पत्र्याच्या ट्रंकेतून काढलेल्या कागदपत्रावर त्याने नजर टाकायला सुरुवात केली.
"साक्षीदार आणा."
"ही आहे ना." माझ्याकडे दोघींनी सराईतासारखं बोट दाखवलं.
"या नाही चालणार."
"का नाही चालणार?" मी बुचकळ्यात. तेवढ्यात बहीण म्हणाली,
"अहो, मागच्यावेळी नात्यातला साक्षीदार चालला की."
"आता नाही चालणार. तुम्ही बाहेर इतके उभे आहेत त्यातल्या आणा कुणाला तरी."
"आमच्या कुणी ओळखीचं नाही त्यात."
"चालतंय."
"चालतंय काय? आम्हाला नाही चालणार." तिघींपैकी कुणाचा तरी आवाज चढला.
"हे बघा, हे पण चालणार नाही." सप्पाट स्वर.
"काय चालणार नाही?" हळूहळू आमचे आवाज वेगवेगळ्या टिपेला पोचले.
"हेऽऽऽ" कागदाच्या चळतीतला कुठलातरी कागद फलकावत कर्मचारी उत्तरला. दोन्ही बाजूने वणवा पेटल्यासारखंच झालं. पोस्ट कर्मचारी आणि ३ गिर्‍हाइकं यांची तिथे जी काय तोंडातोंडी सुरू झाली ती झाली. मला धड काहीच माहीत नाही त्यामुळे आपण फक्त २ बहिणींची बाजू घ्यायची या निकराने मीही पोस्ट लढवायला घेतलं.
"ओ, मी लिहिते हा प्येपरात. थांबा आता तुमच्याबद्दल लिहितेच." कर्मचार्‍याच्या चेहर्‍यावरची माशीही हलली नाही.
"पुरे तुझ्या त्या लिखाणाचं कौतुक. काहीतरी लिहिशील आणि आपलं काम होणार असेल तर तेही व्हायचं नाही." बहिणीने हाताला धरून मला मागे ओढत म्हटलं. पण कर्मचार्‍याच्या हातात कोलीत मिळालं होतं. त्याने असहकार पुकारायचं नेहमीचं धोरण तेवढ्याच उत्साहाने पुन्हा राबवलं.
"मी काही करू शकत नाही. तुम्ही पोस्टमास्तर कापश्यांना भेटा. ते म्हणतील तसं करू."
"भेटतोच. २ महिन्यापूर्वी हेच काम होतं तेव्हा ही कागदपत्र चालली. साक्षीदार म्हणून बहीणही चालली. तुम्ही ना गिर्‍हाईकाला अडवायचं कसं हेच बघता. हे आणा, ते आणा, ते नाही, हे चालायचं नाही. आधीच नीट सांगा ना सगळं. आणि दर २ दिवसांनी नियम बदलतात कसे? अं, कसे हो बदलतात तुमचे नियम? सांगा कशाला गुंतवायचे आम्ही पैसे तुमच्या पोस्टात? सरकारला मदत करायला जावी तर नखरेच हजार सरकारी कर्मचार्‍यांचे ..." निर्विकार कर्मचार्‍याने त्याची निर्विकार नजर पुन्हा संगणकावर खिळवली त्यामुळे पुढची वाक्य फेकायला आम्ही कापश्यांकडे पोचलो.

तीन बायका एकदम आत आल्याने हल्ला झाल्यासारखे आधी कापशे बावचळले. पण पटकन चेहर्‍यावरचे सारे भाव पुसत त्यांनी आमच्याकडे पाहिलं. तो निर्विकारपणा शेवटपर्यंत तसाच राखलाही. एव्हाना बाहेरची हजारो गिर्‍हाईकं आणि पोस्टातले कधीही न हसणारे कर्मचारी कामं टाकून ’शिणेमा’ बघायला मिळाल्याचा आनंद लुटायला लागले. आम्ही हातातले अनेक कागदपत्र नाचवीत, हवेत उडवल्यासारखं करत तर कधीकधी त्यांच्यासमोरच्या टेबलावर ठेवत, आपटत आम्हाला विकासपत्राचे पैसे मिळायलाच हवेत हा आमचा हक्क तावातावाने पटवून दिला. कापश्यांनी तोडीसतोड विरुद्ध भूमिकेत शिरत, शांतपणे ’त्या’ कर्मचार्‍याला बोलावलं,
"साहेब, मागच्यावेळेला आपण ॲडजेस्ट केलं ते करायलाच नको होतं..." ॲडजेस्ट हा शब्द ऐकला आणि आम्ही तिघी वेगवेगळ्या तर्‍हेने उखडलो. मला नक्की काय चालू आहे ते कळत नसलं तरी आम्ही भारत देशाचे प्रामाणिक सक्षम नागरिक (बहिणी) असल्याने कुणालाही काही ’ॲडजेस्ट’ करायला लावत नाही हे पक्कं ठाऊक होतं. मी बिनदिक्कत प्रामाणिक सक्षम नागरिकाची बाजू मांडली.
"आम्ही नव्हतं तुम्हाला ॲडजेस्ट करायला सांगितलं. हेच कागद आहेत असं तुम्हीच म्हणाला होतात." याच अर्थी उरलेल्या दोघींनी तोंडसुख घेतलं तसं कर्मचारी त्याच्या साहेबांकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत राहिला. कापशेंना एकदम पोस्टाचं कामकाज आमच्यामुळे कमीतकमी २ तास थांबल्याचं जाणवलं असावं. ते म्हणाले.
"लगेच करतो तुमचं काम" क्षणभर सन्नाटाच. भांडायचे बरेच मुद्दे तसेच राहिले होते आमचे. आणि मुख्य म्हणजे आम्हाला तिघींना एकमेकींशी न भांडता तिसर्‍याशी एकत्रित भांडता येतं याचाही साक्षात्कार झाला होता त्यामुळे इतक्यात भांडण संपून कसं चालेल?
"अहो असं काय? एकदम असं कसं काम होईल? थोडं लांबवा ना." आम्ही तिघी काकुळतीलाच आलो.
"छे, छे झालंच बघा. लगेच देतो तुमचा चेक. बाहेरुन घ्या." त्यांनी प्रकरण संपवलंच. चाकातली हवा गेल्यासारख्या आम्ही बाहेर आलो. भानावर आल्यावर, बघे आपापल्या कामाला लागण्याआधी आतल्या आणि बाहेरच्या बघ्यांकडून ५-५ रुपये करमणूक आकार देता का असा खडा सवला टाकला. ज्यांना आम्ही खरोखरीच त्यांची करमणूक केली असं वाटलं त्यांनी त्याचं मोल जाणलंही. बहिणीकडे पैसे दिले,
"हे काय?"
"जाताना रिक्षाच्या भाड्याला होतील. कसली करमणूक झाली आज लोकांची. त्यांनी पण हसत हसत दिले पैसे." रिक्षाचे पैसे वाचल्याच्या आनंदात बहीण म्हणाली,
"तू राहा रांगेत उभी."
"बरं. पण तुम्ही दोघी काय करणार?" असं विचारेपर्यंत चाकाची बॅग उघडून त्यातली सतरंजी तिने अंथरलीही एका कोपर्‍यात. दुसर्‍या बहिणीने डब्याची झाकणं उघडली. माझ्याकडे बघून दोघी म्हणाल्या.
"गेल्या दोन्ही वेळेला तू नव्हतीस. चार चार दिवस यावं लागत होतं. दिवसभर इथेच. त्यामुळे अशी व्यवस्था करावी लागते." हे त्या दोघी सांगतायत तेवढ्यात एका माणसाने घाईघाईने त्यांच्यासमोर थर्मास उघडला,
"घ्या आमचंही आत्ताच झालंय. ताक आहे." पोस्टातल्या सुखदु:खाच्या गोष्टी करत मग तो तिथेच बसला. आपापला नंबर ठेवून त्या दोघींभोवतीचं पोस्टातल्या गिर्‍हाइकांचं कोंडाळं बदलत होतं.

पुढच्याला लागणारा किमान अर्धा तास पाहिल्यावर माझा नंबर ठेवून मध्येच मीही जेवून आले. शेवटी अखेर पोस्ट ’सर’ झालं. काम झालंच च्या समाधानात मी विजेत्यासारखी काचेच्या अलीकडे. पलीकडे कर्मचारी कसलेतरी आकडे लिहिण्यात मग्न. त्यात उजवीकडची विकास पत्र आणि डावीकडची ज्येष्ठ नागरिक पाटी सतत डोळ्यासमोर.
"किती वेळ लागेल हो अजून?" कर्मचार्‍याने आठ्या घालून का होईना चक्क माझ्याकडे पाहिलं.
"हे बघा. इथे लिहिलं आहे विकास पत्र आणि इथे ज्येष्ठ नागरिक. विकास पत्राची वाट पाहत पाहत ज्येष्ठ नागरिक व्हायची वेळ होईल. इतके तास उभी आहे मी इथे." हा असा विनोद पहिल्यांदाच ऐकल्यासारखा तो कर्मचारी जोरात हसला आणि धनादेश हातात येण्याआधीच मी पोस्टातला कर्मचारी हसला या धक्क्याने खाली कोसळले.

Friday, January 31, 2020

संकोच

"तोच तोच विनोद तू मला का सांगतेस?" आईवर मी चिडले आणि दाणदाण पाय आपटीत
माझ्या खोलीत आले. खोलीचं दार धाडकन बंद केलं.
"दार मोडेल. हळू आपट." घ्या, माझ्या रागापेक्षा आईला दाराची काळजी. पुन्हा एकदा दार उघडून जोरात आपटावं असं वाटलं मला; पण तसं केलं तर संपलंच. आईची बडबड जी चालू होईल ना ती थांबणं कठिण. मी पलंगावर अंग टाकलं आणि माझा राग हळूहळू शांत होत गेला. हो, आता मी चौदा वर्षांची आहे तर आई गेल्यावर्षीपासून तिच्या कामाच्या ठिकाणी पोनीटेलने केलेला विनोद सांगते दरवेळेस. कधी मला, कधी सर्वांना. इतकी लाज आणते ना. सगळे हसतातही तिच्या या विनोदावर. मूर्ख नुसते. आजही तेच म्हणाली,
"पोनीटेल म्हणतो तसं तुला एका पिंपात घालायला पाहिजे आणि १९ वर्षांची झालीस की बाहेर काढू." हेच, दरवेळेस हेच. मग मी वर लिहिलंय ते म्हटलं आणि पुढे पुस्ती जोडली.
"त्यापेक्षा तुला पिंपात ठेवते आणि मी १९ वर्षांची झाले की बाहेर काढते." संपलं. खरं तर मी हे मनातच म्हणते नेहमी पण वर्षभर ऐकून एकदम आलंच तोंडून बाहेर. खरं सांगू? मला खो, खो हसायला येतंय आता म्हणजे मी कल्पना करतेय की आईला खरंच पिंपात टाकलं तर? एकवेळ मी राहीन पडून कितीही वर्ष पिंपात पण आई? छे, आतून पिंपाच्या झाकणावर बडवत बसेल, ’मला बाहेर काढा, काढा’ म्हणत. पिंपाला भोकं मात्र ठेवायला हवीत. श्वास घेता यायला हवा नं आणि भोकातून ठेव म्हणावं पूर्ण घरावर लक्ष. पण ते जाऊ दे. आमची खरी समस्या ही नाहीच. ही होती त्यावरची प्रतिक्रिया. मी हे असंच बोलते याला कारण आहे माझी आई. या पोनीटेलच्या सहवासाचा तिच्यावर परिणाम झालाय आणि तिच्यामुळे माझ्यावर.  आई पोनीटेलकडे काम करते.  तिथेच तिचा हा पोनीटेल काहीतरी पाचकळ विनोद करतो आणि आईला ते आवडतात. पोनीटेल हे त्याचं नाव नाही. तो पोनीटेल बांधतो म्हणून आई त्याला पोनीटेल म्हणते. माझ्या प्रत्येक प्रश्नावर, अडचणीवर आईकडे एकच उपाय, पिंपात टाकणे. जाऊ दे. पिंपाबद्दल खूप झालं.

सरळच सांगायचं तर माझा बाबा ही आमची समस्या. नाही, नाही माझा बाबा मला छळत नाही, त्रास देत नाही. उगाच कान टवकारू नका. मला ठाऊक आहे तुम्ही वाचताय पण मला वाटतंय की मी तुम्हाला सांगतेय, तुमच्याशी बोलतेय म्हणून म्हटलं, कान टवकारू नका. हे असं होत चाललंय माझं. आईसारखं. आई मला म्हणते मी विषय भलतीकडे नेते पण मी तिच्याकडूनच हे शिकले आहे पटतच नाही तिला.  तर मुद्दा असा आहे की मला असं वाटतं, माझ्या बाबाचं माझ्यावर प्रेम नाही. कदाचित तुम्हालाही पुढे मी जे सांगणार आहे त्यावरून ते लगेच पटेल, खात्री होईल.

माझ्या आईने बाबाशी लग्न केलं त्याला १० वर्ष झाली. चार वर्षांची होते मी. बाबाला त्याची आधीची दोन मुलं आहेत. मुलगे. आई त्यांना टोणगे म्हणते म्हणून मीही इथे आता त्यांना टोणगेच म्हणेन. माझ्या आईचं आणि बाबाचं, दोघांचीही ही दुसरी लग्न आहेत. पहिल्या जोडीदाराशी पटलं नाही म्हणून घटस्फोट घेऊन केलेली. माझे आई - बाबा का वेगळे झाले हे लहान असताना मला माहीत नव्हतं. दोन - दोन बाबा माझे लाड करतात याचा आनंद जास्त होता. तेच टोणग्यांचं. त्यांना दोन आया लाड करायला. एका गावात नसल्यामुळे दुसर्‍या बाबाशी कधीतरीच भेट व्हायची त्यामुळेही सर्व सुरळीत चाललं असावं किंवा आम्ही सर्वच लहान होतो त्यामुळे जाणही तितकीच. काय कारणं असतील ती असतील पण  मी मोठी होत असताना सगळं व्यवस्थित चालू होतं. कधीतरी वाढत्या वयाबरोबर वास्तव कळलं असेल. नातेवाईक आणि आजूबाजूची माणसं असतातच तुमच्या मनाचा तळ ढवळून काढायला असं आई म्हणते. काय असेल ते असेल पण गेल्या वर्षापासून मला जाणवायला लागलं की बाबा पूर्वीसारखा नाही वागत माझ्याशी. फक्त माझ्याशीच.  टोणग्यांशी त्याचं वागणं मला जास्त प्रेमाचं, जवळीक साधणारं वाटतं. आईला सांगावंसं वाटत होतं पण मी ते टोणग्यांनाच ऐकवलं. दोन्ही टोणगे माझ्यापेक्षा मोठे आहेत. दोन आणि तीन वर्षांनी. त्यांनी शांतपणे ऐकलं. एक टोणगा म्हणाला,
"तुझ्या मनाचे खेळ आहेत. उगाच काहीतरी डोक्यात भरवून घेतेस स्वत:च्या आणि आमच्या डोक्याला त्रास देतेस." दुसरा टोणगा म्हणाला,
"असेल. तसंही ते तुझे बाबा नाहीतच ना?" मला एकदम रडायलाच यायला लागलं. हेच असेल का खरं कारण? आतून कळलेलं का मला म्हणून इतक्या पटकन रडायला आलं? मला आता माझ्या स्वत:च्या बाबाकडे जावं असं वाटायला लागलं. आतापर्यंत खरंच असं कधी वाटलं नव्हतं पण जर माझ्या  बाबाला मी त्याची रक्ताची मुलगी  नाही म्हणून प्रेम वाटत नसेल तर कशाला राहायचं मी इथे? फक्त आई हवी म्हणून? तो विचार तिने करावा. हा तिढा ती सोडवू शकत नसेल तर तिच्यासाठी माझी किंमत तितकीच असा अर्थ मी काढलाय. मी रडता रडता विचार करत होते त्या वेळात टोणगे एकमेकांशी भांडायला लागले. ते तुझे बाबा नाहीतच असं एका टोणग्याने म्हणणं हे दुसर्‍या टोणग्याला क्रूरतेची परिसीमा असं काहीतरी असतं ना तसं वाटलं त्यामुळे त्यांची चांगलीच जुंपली. मी रडायचं विसरून त्यांच्या भांडणात सामील होणार तितक्यात आई डोकावलीच.
"काय चाललंय?" तिला आम्ही तिघं एकत्र असलो की भांडतो असंच वाटतं. भांडण सोडवताना ती आमच्या अंगावर  खेकसून सुरुवात करते,
"काय चाललंय?" तिने पुन्हा खेकसून विचारलं.
"ती रडतेय." दोघांमधलं कुणीतरी पुटपुटलं.
"ते दिसतंय मला. कुणामुळे रडतेय असं विचारतेय मी." कुणीच काही बोललं नाही. मला मजा बघायची होती पण माझ्या रडण्यामुळे टोणग्यांना बोलणी खावी लागणार असतील तर जाणं भाग होतं. मी रडत-रडत माझ्या खोलीत जाऊन बसले. मग वाटायला लागलं, माझी आई वागते का टोणग्यांशी चांगलं? त्यांना काय वाटत असेल? त्यांना जावंसं वाटत असेल का त्यांच्या आईकडे कायमचं? डोकं भणभणायला लागलं. या घरातून पळून जावं असंही मनात यायला लागलं. पण कुठे जाऊ? कसं जायचं? नुसतंच पळायचं की गरजेपुरतं सामान घ्यायचं बरोबर? रस्त्यावर राहिले तर सुरुवातीला लागेल इतकं? कोण देईल अधिक माहिती? एकही पळून गेलेली मैत्रीण किंवा मित्र आठवेना. काय करू खरंच? शेवटी एका मैत्रिणीलाच सांगितलं. तिला सांगायला थोडीशी भिती वाटत होती. तिने तिच्या आईला सांगितलं तर माझ्या आईला सांगणारच ना ती. पितळ उघडं पडेल लगेच. मैत्रीण म्हणाली,
"तू तुझ्या बाबांशीच बोल ना नाहीतर आधी आईशी बोल."
"नाही बोलायचं मला त्या दोघांशी या विषयावर." मैत्रीण माझ्यासारखीच आहे ती तटकन म्हणाली,
"मग जा पळून."
"कुठे जाऊ त्याचं उत्तर दे. तू येतेस माझ्याबरोबर? मजा येईल. नाहीतर पळायला मदत तरी कर."
"मूर्ख आहेस. तुझ्या भावाचं बरोबर आहे. काहीतरी डोक्यात भरवून घेतेस. ते काढ. वेगळा चष्मा घाल डोळ्यावर."
"आणि काय करू?"
"अगं जसा आपला दृष्टिकोन तसं समोरचं दिसतं असं तुझ्याच आईकडून ऐकलंय मी खूपदा."
"ते काय लक्षात ठेवतेस तू? पोनीटेलकडे काम करता करता ती पोनीटेलचे सल्ले आणि विचार स्वत:च्या नावावर खपवते." तिला उडवून लावलं मी पण नंतर खरंच मी बदलायला हवं का असं वाटायला लागलं. पण म्हणजे मी नक्की करायचं काय? बदल मला झेपेल? मुळात बाबा सांगतो ते मी करते, त्याच्याशी उगाच वाद घालत नाही; हे मी का सांगतेय कारण आईला वाटतं मी वाद घालण्यात फार पटाईत आहे. सत्य असं आहे की मी वाद घालायला सुरुवात करते ते त्यांच्यामुळेच. कोणत्याही विषयावरची या दोघांची मतं ऐकली की धक्काच बसतो मला. या मोठ्या लोकांची विचित्र मतं फारच विचित्र आहेत. मागासलेले नुसते. असा कसा विचार करतात? अविश्वसनीय. त्यांची मतं, म्हणणं सगळंच चुकीचं असल्यामुळे खोडून काढणं भाग असतं.  मी मतं खोडून काढायला सुरुवात केली की आई थांबवते. तेवढं सोडलं तर मी नीट वागते, शाळेत काय झालं ते सांगते, त्याच्या कामातही मदत करते लहर आली की. तोही ऐकतो सगळं, करतोही सारं माझ्यासाठी पण ’आय लव्ह यू’ म्हटलं की जबरदस्ती ’आय लव्ह यू टू’ म्हणतो. कधीकधी तर उत्तर न देताच निघून जातो. हे फक्त माझ्याशी. आईशी आणि टोणग्यांशी त्याचं वागणं नेहमीसारखंच आहे. एकदा न राहवून मी विचारलंच त्याला,
"बाबा, मी आवडत नाही का तुला?"
"आवडतेस." फोनमधली मान वरदेखील काढली नाही त्याने. ’आम्ही हेच केलेलं चालत नाही तुम्हाला’ असं पुटपुटत मी टक लावून त्याच्याकडे बघत राहिले. त्याची मान वर झाली नाही.
"आम्हाला व्याख्यान ऐकवता फोनमध्ये डोकं खुपसलं की." मी जोरात म्हटलं. तो वैतागला.
"बोल." कपाळावर आठ्या घालत त्याने माझ्याकडे पाहिलं.
’स्वत:च्या टोणग्यांकडे बघतोस का असा कधी? सारखं ’आय लव्ह यू चालू असतं.’ मी मनातल्या मनात धुमसत होते. प्रत्यक्षात गप्प राहिले. निघूनच गेले तिथून. जाताना तो किती वाईट आहे याची उजळणी केली मनात. मला माझा बाबा माझ्यावर प्रेम करत नाही हे लक्षात आल्यापासून त्याच्या सगळ्या वाईट सवयी अगदी प्रकर्षाने जाणवायला लागल्यात. उठसूठ ढेकर देत असतो, एकदा शिंकायला लागला की झालं; थांबतच नाही. लहान असताना आम्ही सगळे मोजायचो शिंका. आता दिलं सोडून. कळकट बनियन आणि चिटुकली चड्डी आणि पादणं...शी, शी, शी काय सांगतेय मी हे. माझ्या वयाला शोभत नाही पण इतकी चिडलेय मी की हे सगळं जगाला ओरडून सांगायची माझी तयारी आहे. मला माझा बाबा ’कूल’ पाहिजे पण त्याला काय फरक पडतोय. मुळात तो मला त्याची मुलगी समजतच नाही त्यामुळे कशाला माझ्यासाठी तो त्याच्या सवयी बदलेल? आता काहीतरी करायला हवं. आहे हे स्वीकायरायचं इतकंच उरलंय की काय माझ्या हातात? का सापडेल मला मार्ग?

"मला माझ्या बाबाकडे जायचं आहे कायमचं राहायला." मी आईसमोर जाऊन उभीच राहिले. मला वाटलं आता स्फोट होईल. तसं झालं नाही. चला, म्हणजे आईसुद्धा बाबाला सामील. ही ब्याद कधी टळते असं हिलाही वाटतंय की काय? माझे डोळे भरून आले. आई शांतपणे म्हणाली,
"तू तुझ्या बाबाकडेच आहेस. खूळ काढून टाक हे डोक्यातून."
"खूळ? मला हे सांगतेस तसं बाबाशी बोललीस का?"
"बोलले."
"मग?"
"मग काय? त्याला नाही वाटत तसं."
"त्याने ते मला सांगायचं ना? दुसरं म्हणजे तोंडाने बोलून काय उपयोग, वागण्यात दिसायला हवं."
"तू विचार हे त्याला. नाहीतर असं करू आपण सगळे बसू आणि बोलू. हल्लीच घेतलं आहेस तू हे काहीतरी तुझ्या मनात."
"आधी कळलं नव्हतं. उशिरा आलं लक्षात."
"असं कसं अचानक बदलेल? तुझा दृष्टीकोन बदललाय. बाबाच्या प्रत्येक कृतीत तू अर्थ शोधायला सुरुवात केली आहेस हल्ली."
"टोणग्यांवर तू तरी करतेस का प्रेम? ती तुझी थोडीच आहेत." मी अगदी तिच्या मर्मावर बोट ठेवलं. माझंच चुकलं म्हणत राहते. आता कर विचार माझ्या प्रश्नावर.
"बास हं. अती झालं हे." त्या दोघांना टोणगे म्हणण्याचा अधिकार तिचाच असल्यासारखं आई चिडली आणि नेहमी बोलते तसं तेच तेच परत बोलत राहिली. आईला उसकवलं म्हणून मला बरंच वाटलं. घरातल्या सर्वांना असाच त्रास द्यायचं मी ठरवलंय. तिची ’टेप’ थांबल्यावर मी म्हटलं,
"टोणग्यांवर तू प्रेम करतेस का हा प्रश्न चिडण्यासारखा नाही तर स्वत:च्या मनात डोकावून पाहायला हवं असं वाटण्यासारखा आहे. माझ्या मनात हे खूळ आलंय तसं त्यांच्या मनातही येऊ शकतं ना?"
"येऊ शकतं पण मला नाही वाटत ती दोघं तुझ्याइतकी चक्रम आहेत." आईने संभाषण थांबवलंच.
आमच्या घरातलं वातावरण माझ्या या खुळामुळे बदललं असं प्रत्येकालाच वाटतंय. आई तर हवालदिल झाली. इतकी वर्ष त्या दोघांनी एकमेकांची मुलं आपली मानली, भेदभाव केला नाही आणि आता हे काय भलतंच? असं तिला वाटत होतं. बाबा तर घरातच टिकेनासा झाला. माझ्याशी बोलायचीही त्याची तयारी नव्हती. मी प्रयत्न केला तेव्हादेखील तेच उत्तर.
"तुझ्या मनातल्या खेळांना मी काही करू शकत नाही. चार वर्षांची होतीस तू या घरात आलीस तेव्हा. त्या क्षणापासून मी तुला माझीच मुलगी समजतो. आता ते सारखं कसं दाखवून द्यायचं मला ठाऊक नाही आणि इच्छाही नाही." तो हुप्प होऊन माझ्याकडे बघत राहिला. मला वाटलं त्याचे गाल ओढावे आणि कुशीत शिरावं पण माझ्या भावनांना खूळ म्हणणार्‍या लोकांचा मला आता प्रचंड राग यायला लागलाय. बाबाच काय, कुणीच माझ्यावर प्रेम करत नाही असं  वाटतंय. मला आता या विषयावर कुणाशीही बोलायचंच नाही. तशी आता किती वर्ष राहिली आहेत या घरातून बाहेर पडायची. शिक्षण संपलं की यांचा संबंध संपला. माझी मी कमावेन आणि खाईन पण या माणसांचं तोंड पुन्हा बघायचं नाही. मनातल्या मनात मी दृढनिश्चय केला तेवढ्यात आई आली. नको तेव्हा ती टपकतेच नेहमी.
"चल. लगेच निघायचं आहे."
"कुठे?"
"तू चल तर खरी." आईने जवळजवळ मला फरफटतच घराबाहेर काढलं. काय करणार आहे ही माझं? एकदा एखाद्याचं प्रेम उडालं की माणूस कुठल्याही थराला जातो...!


"तुझी आई मला तुझ्याबद्दल रोज सांगते." आईने मला पोनीटेलसमोर आदळलं. मी रागाचा कटाक्ष आईकडे टाकून निर्विकारपणे पोनीटेलकडे पाहत राहिले.
"ऐकलंस का?" त्याने मृदू स्वरात विचारलं.
"ऐकलं. तुमच्याबद्दलपण ती आम्हाला रोज सांगते." कुसकटपणे मी म्हटलं.
"अरे वा. चांगलंच बोलते ना?" मी उगाचच द्विअर्थी मान हलवली, त्याला त्याचा काहीच फरक पडला नाही.
"पिंपाचा विनोद सांगते. पाठ झालाय आमचा." मी तसं रागानेच म्हटलं हे पण ते दोघं आयुष्यात पिंपाचा विनोद पहिल्यांदा ऐकल्यासारखे हसले. मी ढिम्म. अखेर पोनीटेल म्हणाला,
"हे बघ. मला सगळं ठाऊक आहे त्यामुळे आधी उपाय काय ते सांगतो मग तू तुझं म्हणणं सांग. उलट्या पायर्‍या चढू." मी काहीच बोलले नाही तसं त्याने उलट्या पायर्‍या चढायला सुरुवात केली.
"तू आता किती वर्षांची झालीस?"
"चौदा." गुरकावल्यासारखं मी उत्तर दिलं.
"तुझी पाळी कधी सुरू झाली?" मी आईकडे डोळे मोठे करून पाहिलं. माझ्या पाळीशी माझ्या समस्येचा काय संबंध? आई शांत होती म्हणून नाईलाजाने उत्तर दिलं.
"गेल्यावर्षीपासून."
"म्हणजेच तुझ्या शरीरात बदल होत चालले आहेत. यौवनावस्था म्हणतात याला."
"शिकलेय शाळेत." हेच ऐकायला आले की काय इथे? म्हणजे माझ्या वागण्याला मीच जबाबदार. चिडणं, आक्रस्ताळेपणा, निराशा असं काय काय होतं म्हणे या वयात त्यामुळे या बदलाशी जुळवून घेताना काही प्रश्न निर्माण होऊ शकतात असं शाळेत शिकलेलं भलंथोरलं वाक्य पाठ झालंय. हे इतकं सगळं सांगण्याऐवजी दोन शब्दांत मी उत्तर दिलं.
"तू शिकली आहेस पण तुझा बाबा नाही. त्यामुळे तुला जे वाटतंय त्याला तू जबाबदार नाहीस. तुझ्या आईला वाटतंय तसं हे खूळ नाही." पोनीटेल काय म्हणतोय ते कळलंच नाही मला क्षणभर. प्रकाश पडला तसं मला खुर्चीतल्या खुर्चीत टुणकन उडी मारावीशी वाटली. उडी मारली नाही पण माझा चेहरा खुलला.
"बाबाचं प्रेम नाही हे बरोबर आहे ना?"
"नाही. ते साफ चुकीचं आहे पण तुझे बाबा तुझ्याशी जे वागतायत ना त्याचं कारण तुझं वय आहे."
"अं?" पोनीटेल सल्लागार आहे हे ठीक पण इतकं गहन कशाला बोलायचं? माझ्या चेहर्‍यावरचे भाव वाचत तो म्हणाला,
"तुझ्या बाबाला तुझ्या शरीरातल्या होणार्‍या बदलामुळे थोडंसं अवघडलेपण आलंय. त्याचं तुझं रक्ताचं नातं नाही हेही कारण असेल पण तेच एक कारण असेल असं म्हणता येणार नाही. सख्ख्या नात्यातही हे होतं. नकळत होतं. मला खात्री आहे तुझ्या बाबाला स्वत:लाही हे कळलेलं नसेल."
"खरंच? म्हणून तो चार हात दूर राहत असेल माझ्यापासून? तुम्ही त्याला सांगाल समजावून?" मला आत्ता याक्षणी बाबाला इथे आणावं असं वाटत होतं.
"ते येणार नाहीत कारण ते तुझ्यावर प्रेम करतात यावर ते ठाम आहेत. ही समस्या नसून हे तुझ्या डोक्याने घेतलेलं खूळ आहेत हेच त्यांच्या मनाने घेतलंय."
"मी जाते लगेच घरी. तुम्ही जे सांगितलंत ते सांगेत." मी उतावीळ झाले.
"नको. लगेच नको. आधी मी सांगतो ते अमलात आणू. नंतर हा बदल तुझे बाबा कसा स्वीकारतात ते पाहा. एकदा का तुझं मन शांत झालं की जे आपण बोललो ते सांग तुझ्या बाबांना. चालेल?" पहिल्यांदाच मला पोनीटेलने स्वत:च्या तोंडून पिंपाचा विनोद पुन्हा सांगितला तरी चालेल असं वाटलं. मी आनंदाने पोनीटेल सांगेल ते करायचं ठरवलं. येताजाता बाबाला, ’आय लव्ह यू’ स्वत:हून पुढाकार घेऊन  म्हणायचं अगदी लगेच ठरवलं. माझी तक्रार तीच होती ना की तो कधीही स्वत:हून हे म्हणत नाही. यापुढे मी ’आय लव्ह यू’ म्हणून थांबणार नाही, त्यालाही उलट म्हणायला लावेन. पोनीटेल म्हणाला, ’पुरुषांना भावना  व्यक्त करणं जमत नाही. ते तुमच्यासाठी सतत काही ना काही करत राहतात. तेच त्याचं प्रेम असतं. ते एकदा ओळखता आलं की झालं.’  मला ते पटलं. आतापर्यंत त्याने माझे सगळे लाड पुरवले. मला शाळेत तोच सोडतो, अभ्यास घेतो, माझं जगाबद्दलचं ज्ञान वाढावं म्हणून माहिती देतो, पुस्तकं भेट देतो...अशा अनेक गोष्टी करतो. आता फक्त त्याला प्रेम बोलून दाखवायला शिकवायचं होतं. आता तुम्ही म्हणाल, तुझ्या बाबांचं प्रेम आहे हे कळलं हे खूप नाही का? खरं आहे पण मला आवडतं प्रेम व्यक्त केलेलं, शब्दांनी व्यक्त केलेलं प्रेम! मुलीचा इतका हट्ट बाबाने पुरवला तर बिघडतं कुठे? मी मोठी होतेय, माझ्या शरीरात बदल होतायत यामुळे त्याच्या नकळत तो माझ्यापासून दूर जात असेल तर पोनीटेलने सांगितलेलं काम अगदी सोपं होतं.  माझ्या मनावरचा ताण एकदम नाहीसा झाला. कधी नव्हे ती आई मला आवडली आणि पोनीटेलही. पोनीटेलचा निरोप घेऊन मी आईसह घरी निघाले. घरी गेले की मी बाबाला घट्ट मिठी मारणार आहे. हो, हो. पोनीटेलने हळूहळू पावलं टाकायला सांगितली आहेत ते आहे लक्षात. बाबा नक्कीच अवघडून जाईल माझ्या मिठीमुळे पण मला आता कारण कळलंय ना त्यामुळे मला राग न येता हसायलाच येईल. तो चिडेल पण होईल सवय  आणि जाईल त्याचं अवघडलेपण.  माझ्या नजरेसमोर दिसतंय मला  दृष्य. आता मी अगदी उतावीळ आहे झाले आहे. एका नविन बदलासाठी माझ्या बाबाला तयार करायला. नव्याने आमचं नातं रुजवायला!

माझा मराठीचा बोल (मामबो) दिवाळी अंक २०१९ मध्ये प्रसिद्ध.