Tuesday, May 5, 2026

निरभ्र

आज तसं काम खूप होतं. आटपून घरी जायलाच रात्रीचे दोन वाजणार याची स्पंदनला खात्री झाली. पण इलाज नव्हता. कॉफीचे घोट रिचवत तो काम करत राहिला. घरी परतण्यापूर्वी गेल्या तासाभरातली इ मेल त्याने डोळ्याखालून घातली आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला.

’आनंदी...’ इथे? आपल्याच गावात? कधीही भेटू शकतो तिला? स्पंदनचा विश्वास बसत नव्हता. मैत्रिणीने पाठवलेलं इ मेल त्याने पुन्हा पुन्हा वाचलं. आनंदी नोकरीच्या शोधात होती. झटकन निर्णय घेत स्पंदनने पटकन चार ओळी लिहिल्या. इ मेल पाठवून झालं आणि नंतर मात्र कितीतरी प्रश्न मनात सतावत राहिले. मैत्रिणीशी  बोलून त्याला वाटणारी तीच ही आनंदी आहे याची त्याने खात्री केली. आणि इ मेल पाठवणं ही चूक झालेली नाही याबद्दल खात्री पटल्यावर तो निश्चिंत झाला. दोन्ही हात मानेमागे गुंफवून खुर्चीच्या पाठीवर त्याने डोकं टेकलं. विचारात गढून गेला तो. जवळजवळ चार वर्षांनी आनंदी पुन्हा संपर्कात येण्याची चिन्ह दिसत होती. या चार वर्षात काय झालं असेल? आता भेटून खरंच काय साध्य होईल? स्पंदन हे नाव तरी तिला आठवत असेल? इ मेल मिळाल्यावर आनंदीची प्रतिक्रिया काय होईल?

रात्री उशीरापर्यंत नोकरीचे अर्ज इकडे - तिकडे पाठवून देत आनंदी कंटाळली होती. पण इलाज नव्हता. ओळखीच्या लोकांना तिने नोकरी बघत असल्याचं कळवलं होतं. घाई नव्हती पण नुसतं बसूनही चालणार नव्हतं. एक प्रोजेक्ट संपायच्या आधीच दुसरा मिळाला तर मधले दडपणाचे दिवस वाट्याला येणार नाहीत. तेच या क्षणी आनंदीच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. इतके दिवस दोन - दोन आघाड्यावर लढणं चालू होतं.  एकीकडे नवीन नोकरी शोधावी लागणार याची चिन्ह आणि एकीकडे विशाल. अखेर मनावरचं ओझं उतरलं.  फरफट थांबली. मनावरचे काळे ढग आता दूर व्हायला हवे होते, मनःशांती हवी होती.  स्वत:च्या कर्तृत्वावर ती मिळेल याची तिला खात्री होती.  विशालचं मात्र तिला राहून राहून आश्चर्य वाटतं होतं. ऐन उमेदीच्या काळात पंख गमावलेलं पाखरू झालं होतं त्याचं. त्याचं त्याला तरी हे कळेल? कळलं तर कधी? का खूप उशीर झालेला असेल तेव्हा? त्याचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि तिच्या चेहर्‍यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. नंतर तिला हसायलाच यायला लागलं. त्याच्या वेडेपणाचं की भोळसटपणाचं तेच तिला समजेना. पण तो प्रसंग मात्र लख्ख आठवायला लागला तिला. आणि तसेच कितीतरी.

त्या दिवशी विशाल कामावरून परतला तोच चेहरा पाडून.

"आई ओरडल्यावर होतो तसा झालाय चेहरा. काय झालं?" आनंदीने हसत विचारलं.

"आपले लोकच त्रास देतात गं.  सातासमुद्राकडे गेलं तरी आपली वृत्ती बदलत नाही.  पाय ओढणं, दुसर्‍याचा दुःस्वास अगदी रक्तात भिनलेल्या गोष्टी आहेत या आपल्या." 

"चालायचंच."

"हो. पण मी अडकतो ना. दरवेळेला होतं असं. वैताग आलाय मला."

"तू रोखठोक बोलायला लाग विशाल. दरवेळी पडतं घेतोस त्यामुळे होतं तसं. आपली बाजू चुकीची नसेल तर कधीकधी लढूनच ते सिद्ध करावं लागतं." तिच्या आवाजातल्या ठामपणाकडे विशाल पाहत राहिला.  तिच्यातल्या आत्मविश्वासानं दरवेळी तो चकित व्हायचा आणि  त्याचवेळेला मनावर प्रचंड दडपणही यायचं.  तिच्यासारखं वागणं का जमत नाही याचा विषादही वाटायचा. त्याने तिला तसं बोलूनही दाखवलं कित्येकदा. आजही पुन्हा तितक्याच कौतुकाने त्याने त्याला काय वाटतं ते सांगितलं. आनंदी हसली. कामावर काय झालं ते तिने नीट समजून घेतलं. विशालचं कुठे चुकतंय, तो कुठे कमी पडतोय ते समजावून सांगितलं आणि काय करता येईल याबद्दल वेगवेगळे मार्गही सुचवले. आनंदीच्या बळावर हे करणं सहज जमेल असं त्याचं त्यालाच वाटलं. आनंदीच्या आश्वासक मिठीत स्वत:ला गुरफटवून तो शांतपणे झोपला.

सकाळी दोघं दचकून जागे झाले ते फोनच्या आवाजाने. टेबलावरच्या फोनकडे दोघांनी पाहिलं आणि परत डोळे मिटले. फोन वाजतच राहिला.  आनंदीने विशालला हातानेच ढकललं.  कूस वळवत विशाल पुन्हा झोपला. नाईलाजाने डोळे चोळत आनंदीने फोन उचलला. कुणाचा फोन आहे हेही तिने पाहिलं नव्हतं. फोनवर विशालची आई होती. आनंदीशी थोडंफार बोलून विशालला उठवायला लावलं तिने.

"तो झोपलाय. काल खूप उशीरा आला. आज शनिवार आहे तर निवांत झोपायचा बेत आहे त्याचा." आनंदी झोपलेल्या विशालकडे पाहत उत्तरली. 

"आम्हाला नंतर बाहेर जायचं आहे म्हणावं." बाबांचा आवाज तिच्या कानावर पडला. आनंदीने मुकाट्याने विशालला उठवलं. विशाल कुरकूर करत उठला. पण एकदा आईशी गप्पा सुरू झाल्यावर खुलला. कालचं सारं प्रकरण त्याने पुन्हा एकदा त्याच क्रमात त्याच्या आई - बाबांना सांगितलं. त्याचं आनंदीला विशेष वाटलं नाही. पण विशालचे बाबा जेव्हा भारतातून अमेरिकेत त्याच्या साहेबांशी बोलायला यायचं म्हणायला लागले तेव्हा तिला नवल वाटलं आणि धक्का बसला तो विशालच्या मान डोलावण्याचा. त्यांचं बोलणं संपल्यावर विशालकडून तिने फोन घेतलाच.

"बाबा, तुम्ही विशालच्या साहेबांशी बोलायला यायचं म्हणताय?" कानावर विश्वास बसत नसल्यासारखा स्वर होता तिचा.

"हो. का ? त्याची आईसुद्धा यायचं म्हणतेय." आनंदीला हसावं की रडावं तेच कळेना.

"त्या पण साहेबांना भेटणार आहेत का?" तिच्या आवाजातला उपरोधिकपणा विशालच्या बाबांना जाणवला असावा.

"हे बघ आनंदी. विशाल काही तुझ्यासारखा स्वतंत्र वातावरणात वाढलेला नाही. तू शिक्षणासाठी बाहेर राहिलीस. विशाल लग्न होईपर्यंत आमच्याच बरोबर होता. आमचं कायम लक्ष असायचं त्याच्यावर. जर त्याला त्रास होत असेल तर धावणारच ना आम्ही मदतीला?"

"बाबा, कामातल्या बारीकसारीक कुरबुरी सोडवण्यासाठी तुम्ही भारतातून इथे येणार? विशाल काही लहान नाही. तुम्हाला त्याला भेटायला यायचं असेल तर जरूर या. पण त्याच्या साहेबांना भेटण्यासाठी नक्कीच नाही. त्याचं त्याला तोंड देऊ दे या प्रसंगाला." आनंदीच्या स्पष्टवक्तेपणाचा विशालच्या बाबांना राग आला. त्यांनी काही न बोलता फोन ठेवून दिला.

"कशाला दुखवलंस तू बाबांना?" विशालचे डोळे भरून आल्यासारखे वाटले आनंदीला.

"विशाल, तू कमालच करतोस. मान काय डोलवतोस ते दोघं तुझ्या बॉसशी बोलायला येणार म्हणाले तर? स्वत:चं स्वत:  बाहेर पडायचं असतं अशा अडचणींतून..." विशालला आनंदीच्या बोलण्याला खीळ कशी घालावी ते समजत नव्हतं. फोन वाजला तसा त्याने सुटकेचा श्वास टाकला. आईचा फोन पाहिल्यावर मात्र कुचंबणा झाल्यासारखं त्याने आनंदीकडे पाहिलं.  लहान मुलाची समजूत घालतात तशी समजूत त्याची आई फोनवर तिकडून घालते आहे हे आनंदीला विशालच्या स्वरावरून जाणवत होतं. विशालची कीव आली आनंदीला. ती तिथून निघून गेली. स्वत:च्या मनाचा उद्वेग शांत कसा करावा तेच तिला समजेनासं झालं होतं. कणा नसलेल्या पुरुषाबरोबर वैवाहिक जीवनाची सुरुवात तर झाली होती. पण हे असंच चालू राहिलं तर...?

आनंदीने टाकलेला रागीट कटाक्ष पाहून विशालला आईबरोबरचं बोलणं थांबवावं असं वाटत होतं. पण आईच्या मृदू स्वराने त्याला बरं वाटत होतं. आनंदी रागाने तिथून गेली तसं घाईघाईने त्याने बोलणं आटोपतं घेतलं. तिचा राग शांत करायचा एकच मार्ग त्याला ठाऊक होता. त्याने कडक कॉफीचा कप आनंदीसमोर धरला. पण आनंदीची कळी खुलली नाही.

"आई रागवेल बरं बाळाला बायकोसाठी कॉफी केली म्हणून." धुसफुसत तिने कॉफीचा कप तोंडाला लावला.

"मी नाही सांगणार तिला तुझ्यासाठी कॉफी केली ते." निरागस चेहर्‍याने विशाल उत्तरला आणि आनंदीला पुढे काय बोलावं तेच कळेना. ती निमूटपणे कॉफीचे घोट घेत राहिली. पण तिला राहवलं नाही.

"किती बारीकसारीक चौकशा करत असते रे तुझी आई. जेवायला काय केलं. नीट जेवलास ना, पुरेसं होतं ना आणि तू पण श्रावणबाळासारखा उत्तरं देत असतोस." 

"आनंदी जाऊ दे ना." तो काकुळतीने म्हणाला. ती गप्प बसून राहिली. 

"आनंदी, मी एकुलता एक आहे त्यामुळे काळजी वाटते त्यांना आणि मलाही काही चुकीचं वाटत नाही." आनंदीचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. कसल्या विचारात गुंतली होती कुणास ठाऊक. विशालही कॉफीचा कप हातात धरून तसाच बसून राहिला. आनंदी समोर बसलेली असूनही त्याला खूप एकटं वाटत होतं. आनंदीचा आग्रह म्हणूनच तो नागपूर सोडून पार या देशात आला होता. आतापर्यंत नागपूर सोडून कुठे बाहेर स्थिर व्हायचा विचारही त्याच्या मनात डोकावलेला नव्हता. एकुलता एक. आई - बाबा दोघं वकील. बाबांनी मुद्दाम घराचा वरचा भाग त्याच्यासाठी ठेवला होता. सारं कसं छान सुरळीत चालू होतं. आनंदी आयुष्यात येईपर्यंत. आनंदीचं स्थळ सांगून आलं तेव्हा आई - बाबांचंच नक्की ठरत नव्हतं. मुंबईची मुलगी. नागपूरला कशी राहील हाच प्रश्न दोघांना छळत होता. आणि झालंही तसंच.

"मला संधी मिळाली तर परदेशात जायचं आहे."

"अमेरिका?" त्याच्या बाबांनी विचारलं होतं.

"असंच काही नाही. कोणताही देश. तिथे काम करण्याचा अनुभव घ्यायचा आहे. फार वेगळं वातावरण असतं बाहेरच्या देशात कामाबाबतीत असं ऐकलंय. मला त्याचा अनुभव घ्यायचा आहे ."

"पण आम्हाला नागपूरमध्येच राहणारी मुलगी पाहिजे." विशालच्या आईच्या ठाम स्वराला उत्तर म्हणून आनंदीने फक्त विशालकडे पाहिलं. विशाल तिच्याकडे टक लावून पाहत होता. तिला त्याचा निरागस चेहरा विलक्षण आवडला.  सार्‍या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून नागपूर तर नागपूर असंही तिच्या मनात येऊन गेलं. पण क्षणभरच. कुणालाच काही बोलण्याची संधी न देता ती म्हणाली.

"जिथे माझं काम असेल तिथे राहायला आवडेल मला. काम न करता राहणं ही कल्पनाच करू शकत नाही मी." नंतरचं बोलणं, उपचाराचं, वरवरचंच होतं. दोन्ही बाजूंनी मनातल्या मनात नकार पक्के केले होते. 

आणि तरीही विशालचं लग्न आनंदीशीच झालं. विशालने कितीतरी मुली पाहिल्या पण आनंदी काही त्याच्या मनातून जाईना. आनंदीही मुलं पाहत होतीच. विशाल जसा तिच्यात अडकला होता तेवढं स्वत:ला गुंतवून घेण्याचा आनंदीचा स्वभाव नव्हताच. विशालकडून काही कळलं नव्हतं त्यामुळे तिने नकार गृहीत धरला आणि ती मुलांना भेटत राहिली. होकार, नकार चालू होते. तेवढ्यात त्याच्या घरुन होकार आला. नकार देण्यासारखं, मुद्दाम बोट ठेवण्यासारखं काही नव्हतंच. विशालने परदेशात जायची तयारी दर्शविली होती. त्याची शैक्षणिक कारकीर्द पाहता त्याला ते सहज शक्यही होतं. आनंदीला परदेशात काम करण्याच्या अनुभवाचं महत्त्व जास्त वाटत होतं. काही वर्षांनी ते परत गेलेच असते नागपूरला. 

"चूक झाली?" विशालला कॅनडात आल्यावर काही महिन्यातच हा प्रश्न पडायला लागला होता. सतत आई - वडिलांच्या छायेत वाढलेल्या विशालला स्वतंत्रपणे निर्णय घेणं म्हणजे दडपणच वाटायचं. नागपूरचे दिवस आठवायचे. कामावरून परत आलं की तिघं प्रत्येक गोष्टीची चर्चा करायचे. मतं मांडायचे. दोघांच्या मतानुसार वागणं विशालच्या अंगवळणी पडलं होतं. आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्याने कधी नुकसान झालं नव्हतं. आतापर्यंत सुरळीत पार पडलं होतं. घरी - दारी दोन्ही ठिकाणी. आनंदी घरात आल्यावर तिच्याशीही तो सहज जमवून घ्यायला शिकला. आनंदी मधला आग्रही ठामपणाही त्याला आवडायचा. तिच्या म्हणण्यानुसार आपसूकच तो वागायचा. मुळात त्याच्या स्वभावात आक्रमपणा नव्हता, निर्णयक्षमता होती की नाही हे त्याने कधी अजमावून पाहिलंच नव्हतं. कुणाचं मन मोडणं त्याच्या फार जीवावर येई आणि त्यासाठी स्वत:च्या मनाला थोडी मुरड घालण्यात त्याला कमीपणा वाटत नसे. पण आनंदी आल्यावर या त्याच्या भूमिकेमुळे येणार्‍या अडचणी त्याला जाणवायला लागल्या होत्या.  ना तो आई - बाबांना खूश ठेवू शकत होता, ना आनंदीला. त्याला त्याचा त्रास होत होता पण पर्याय सापडत नव्हता. आनंदीचे स्वाभिमान, कणा, आत्मविश्वास हे शब्द त्याच्या कानात घुमत राहायचे त्याचवेळेस त्याला त्याच्या आईचं म्हणणंही पूर्णपणे पटायचं. दरवेळी ती म्हणायची,

"कधी नजरे आड केलं नाही तुला आणि आता एकदम कुठच्या कुठे गेलास. त्यामुळे..." काय खाल्लं, कुणी केलं  पासून कंपनीत काय घडलं आणि तो नागपूरलाच असल्यासारखं चर्चासत्र. रोजची तीच प्रश्नोत्तरं. त्याला त्यात काही वावगं वाटायचं नाही. पण आनंदी काय म्हणेल हा विचार मनामध्ये असायचाच.  आनंदीचं म्हणणंही चुकीचं नव्हतंच.

"प्रत्येकवेळी तेच तेच विचारतात. आता लहान आहेस का तू? मी करून नाही घातले तुझा आवडीचे पदार्थ तर तू घे ना करून. बाहेर जाऊन खा. नाहीतर जरा तोंड उघडून सांग आईला इथे कसं असतं ते. स्वत: वकील आहेत. दिवसभर बाहेर असतात. कळत कसं नाही एकट्याने शक्य नसतं सर्व. दोघांनाही करावी लागतात कामं इकडे. नाहीतर हे पाहिजे, ते पाहिजेचा आग्रह तरी सोडायला हवा."  

"अगं, तिला नाही गं सांगून पटत. नागपूरला मी कधी इकडची काडी तिकडे केली नाही. आणि सगळी ऐकीव माहिती आहे तिच्याकडे बाहेरच्या देशाची. स्वत:ला करावं लागतं इतकंच माहीत आहे तिला. "

"पण म्हणजे तुला करावं लागत असेल तर ते आनंदीने करावं? मला पण तेच विचारतात. तू स्वयंपाक करून कामावर जातेस का? रात्रीचा स्वयंपाक कोण करतं, दिवसा कोण करतं. ऐकेन, ऐकेन आणि तुम्ही येऊन राहा म्हणून सांगेन." आनंदीचं असं बोलणं ऐकलं की विशाल धास्तावून जायला लागला. घरी बोलायचं तर शक्यतो आनंदी नसताना, नाहीतर ती आसपास नाही याची खात्री करायला लागला.

दोन वर्षांनी दोघं भारतात आले. मुंबईच्या विमानतळावर आनंदी आणि विशाल, दोघांचेही आई - बाबा आले होते. चौघांकडे पाहतानाच  प्रत्येकाच्या चेहर्‍यावरचा तणाव आनंदीला जाणवला.  खारला घरी पोचल्यावर दुसर्‍याच दिवशी सकाळी नागपूरला जायला निघायचं आहे असं विशालच्या बाबांनी म्हटल्यावर तिला धक्काच बसला.

"बाबा, आम्ही चार दिवस मुंबईत राहू आणि नागपूरला येऊ असं ठरवलं होतं ना आपण सर्वांनी? थोडे दिवस नागपूरला राहून मी परत मुंबईला येईन. विशाल राहील दोन आठवडे तिकडे. तुम्ही अशी घाई का करताय?"

"आम्हाला सुट्ट्या नाहीत. दोघांच्याही कोर्टाच्या तारखा आहेत लागलेल्या."

"पण तुम्ही आलातच का मुंबईला?" आनंदीच्या रोखठोक प्रश्नाने विशालची आई गडबडली. पण लगेच सावरून म्हणाली.

"मुलाला भेटावंसं वाटलं म्हणून आलो."

"अहो, पण त्यांनी बेत कळवला होता ना. तुम्हाला विचारूनच सगळं ठरवलं होतं." आनंदीचे बाबा मध्ये पडले आणि वादाला वेगळंच वळण लागलं. विशाल अस्वस्थ होऊन नुसताच बसून होता. विशालच्या बाबांनी सामान उचललं तशी त्याची आईही त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहिली.

"विशाल, तुला जायचं तर जा तू त्यांच्याबरोबर." आनंदीने विलक्षण शांत स्वरात म्हटलं आणि आता काय वादळ उठणार या शंकेने आनंदीच्या आईचा जीव भांबावला. ती न सुचून विशालकडे पाहत राहिली. विशाल दारात येऊन उभा राहिलेला पाहून आनंदीचा अगदी संताप संताप झाला. "विशाल, तू खरंच निघतोयस?"

"हो. तू पण चल." चाचरत तो म्हणाला. आईने तिलाही निघायची खूण केली. बाबांनीही तिला बाजूला घेऊन समजूत घातली. आनंदीने झाला तितका तमाशा पुरे म्हणत निघायची तयारी दर्शविली.

"मी पण निघते तुमच्याबरोबरच. पण सलग इतका प्रवास त्रासाचा होईल. आज इथे राहू. सकाळी निघू." ती स्वत:चं सामान आणायला वळली आणि विशालच्या आईच्या शब्दांनी थबकली. 

"विशालच येईल फक्त आमच्याबरोबर." 

"ठीक आहे. मी येईन ठरल्याप्रमाणे चार दिवसांनी." राग आवरत आनंदीने उत्तर दिलं.

"तू आली नाहीस तरी चालेल." विशालच्या आईच्या शब्दांचा अर्थ कुणाच्याच पटकन लक्षात आला नाही. पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला तसं आनंदीची आई पुढे झाली.

"जे झालं त्याबद्दल माफ करा. आता आणखी ताणू नका. चूक झाली असेल तर आपली सर्वांचीच. आनंदीला का शिक्षा करताय तुम्ही?"

"आणि विशाल, आनंदी बायको ना तुझी. मग तू का नाही काही बोलत? जो बेत ठरला आहे तसा पार पाडू इतकं साधं तू तुझ्या आई - बाबांना सांगू शकत नाहीस?" आनंदीच्या बाबांनी विषादाने विचारलं.

"तुम्ही आमच्याबद्दल त्याच्या मनात अढी निर्माण करताय." विशालचे बाबा ताठर स्वरात म्हणाले.

"का? त्याला स्वत:चं मत नाही? प्रत्येकाने त्याच्या मनात भरवायचं आणि त्याप्रमाणे तो भरून घेणार." आनंदी विशालसमोर जाऊन उभी राहिली. "असा उठसूठ प्रत्येकाला खूश ठेवायला लागलास ना विशाल तर कुणीच सुखी होणार नाही. ना तू, ना मी आणि ना तुझे आई बाबा. विचार कर विशाल. खरं सांगतेय मी." आनंदी ताडताड बोलली आणि आतल्या खोलीत जाऊन बसून राहिली. विशाल त्याच्या आई - बाबांबरोबर निघून गेला. ते त्याचं शेवटचं दर्शन. नंतर सगळे धागे उसवतच गेले. विशालला त्याच्या आई - बाबांच्या शब्दाबाहेर जायचं नव्हतं. आनंदीच्या ठाम मतांपासून तिचे आई - बाबा तिला परावृत्त करू शकत नव्हते. आनंदीला होईल तेवढी तडजोड तिने हे लग्न टिकवण्याकरता केली होती. विशालने संसार कुणाशी करायचा हे ठरवावं या मतावर ती ठाम होती. कॅनडाहून भारतात येताना एकत्र झाल्या आहेत असं वाटणार्‍या दोघांच्या वाटा वेगळ्या कधी झाल्या तेच कळलं नव्हतं दोघांनाही. सुट्टी संपल्यावर कॅनडात परत जायचा आनंदीचा निर्णय बदलला नाही. त्याचवेळी विशालच्या आई - बाबांनी विशाल नागपूरलाच राहील हे पक्कं केलं. 

कॅनडाला आल्यावर विशालचं सामान दोन खोक्यात भरून तिने एका खोलीत ठेवून दिलं. सहा महिने वाट बघायची, नाही आला तर कुठल्या तरी संस्थेला सामान दान करायचं तिने ठरवून टाकलं. रिकाम्या खोलीत मोकळा श्वास घेतला आणि एकदाच फक्त एकदाच ती हमसून हमसून रडली. आयुष्यभरासाठी घेतलेला हात निसटून जाण्याच्या मार्गावर कधी पोचला? चूक कुणाची? परिस्थिती बदलेल? बदलावी अशी इच्छा तरी राहिली आहे का? विचार करून करून तिचं मन थकून जात होतं. दोन टोकाच्या स्वभावाची माणसं एकत्र आल्याचा हा परिणाम? आई - वडिलांचा पदर न सुटलेल्या विशालला दोष द्यायचा, त्याच्या आई - बाबांना की स्वत:लाच आणि तडजोडीचं बाळकडू पाजायला विसरलेल्या स्वत:च्या आई - वडिलांना? उत्तर सापडत नव्हतं. बरेच दिवस विचार करत पर्याय शोघत राहिली आनंदी. अखेर कंटाळून तिने  तो नाद सोडून दिला. एका वळणावर येऊन ती स्थिर झाली. अलिप्ततेने मनाला वेढून टाकलं. तरी कितीतरी दिवस तिला वाटत राहिलं. एकदा तरी विशाल आणि ती दोघं, दोघांनी बोलायला पाहिजे  सारं संपवण्यापूर्वी. कदाचित विशाल इथे असता तर ते शक्य होतं. भारतात गेलं की अस्तित्व हरवून जातं. दुसर्‍यांच्या मताचं ओझं बाळगून वावरायला लागतो आपण हे तिचं तिलाच जाणवत होतं. मग आज्ञाधारक विशालचं दुसरं काय होणार. संबंध कायमचे संपवण्याआधी तिला काय वाटतंय ते मनापासून तिने लिहून काढलं. विशालला पाठवूनही दिलं. त्याचे आई - बाबा प्रत्येक शब्द  वाचतील ही कल्पना असूनही तिला स्वत:च्या मनाचं समाधान करून घ्यायचं होतं. 

आनंदीचं पत्र वाचल्यानंतर अगदी लगेच तिला भेटावं, तो तिच्या प्रेमात कसा आकंठ बुडालेला आहे हे सांगावं असं वाटत राहिलं विशालला. लग्नानंतरची दोन वर्ष आठवत राहिली. आनंदीचा उत्साही स्वभाव, तडफदार वागणं याचंच तर त्याला आकर्षण होतं. किती पटकन ठरवायची ती कोणतीही गोष्ट. अगदी लांब पल्ल्याचा प्रवास असला तरी दोन मिनिटात ठरवून निघायचं. सुरुवाती सुरुवातीला राहायचं कुठे, जायचं कसं असे प्रश्न विचारून तो तिला हैराण करे. अनुभवाने, तिला सगळं जमतं असंच त्याला वाटायला लागलं होतं. साध्यासाध्या बाबतीत तिच्यावर अवलंबून राहायला लागला तो. तेच चुकलं? तो विचार करत राहिला. तसंही ठाम निर्णय त्याने कधी कुठे घेतले होते? आत्ताही त्याला आपलं चुकलं की नाही ते ठरवता येईना. सवयीने त्याने ते पत्र आईला दिलं. आनंदीच्या वागण्याची पुन्हा चिरफाड झाली. तिला उत्तर पाठवायचीही तसदी घेऊ नकोस असं त्याच्या आईने त्याला बजावलं आणि त्याने ते मानलं. आनंदी उत्तराची वाट पाहत असेल या विचाराने अधूनमधून तो अस्वस्थ होई.

महिना दोन महिने खरंच त्याच्या उत्तराची वाट पाहिली आनंदीने. पण हळूहळू ती स्वत:च्या व्यापात गर्क झाली. एकटी राहत होती. कामाचा ताण वाढत होता. संध्याकाळी परत आलं की जेमतेम पोटात काहीतरी ढकलून ती दिवस संपवे. विचार करायला वेळ नव्हता, इच्छाही नव्हती. शनिवार - रविवार मात्र एकटेपणाची भावना वेढून टाके. भूतकाळ अस्वस्थ करत राही. अशावेळी ती भटकंतीत मन रमवायला शिकली. धावणं, फिरणं झालं की मन प्रसन्न होऊन जाई. मरगळ झटकून ती पुन्हा आपल्या कामात व्यग्र होऊन जाई. निराशावादी ती नव्हतीच त्यामुळे लवकरच एकटेपणातला आनंदही  लुटायला शिकली. चालू असलेला प्रोजेक्ट संपण्याची चिन्ह दिसायला लागल्यावर  पुन्हा  नोकरी शोधण्याच्या वणवणीला तयार झाली. ओळखीपाळखीच्या लोकांना लगेचच तिने कळवलं. हे काम संपायच्या आधीच दुसरं काम मिळेल तर किती बरं असं वाटत असतानाच आलेल्या इ मेलने क्षणभर तिच्या छातीत धडधडलं. स्पंदन? हा तोच स्पंदन असेल? चार वर्ष तरी झाली असतील भेटून. त्याच्या इ मेल मध्ये काही उल्लेख नाही पण हा तोच आहे.... भेटायचं की टाळायचं? 

अस्वस्थपणे ती ’स्टार बक्स’ च्या बाहेर येरझारा घालत होती. जरा लवकरच पोचली होती. लांबून स्पंदन येताना दिसला आणि तिच्या हृदयाचे ठोके चुकले.

"ओळखलंस?" त्याने हसत हात पुढे केला. त्याच्याशी हस्तांदोलन करून तिने फक्त मान डोलवली.

"चल. आत बसू." तिला काय बोलायचं तेच सुचत नव्हतं. मनातले प्रश्न ओठावर येऊ द्यायचे नाही असं ठरवूनही ती बोलून गेली.

"नोकरीसाठी खरंच मदत करणार आहेस की मला ओळखत होतास म्हणून..." तो हसला.

"दोन्ही."

"दोन्ही? म्हणजे?" त्याला काय म्हणायचं आहे ते तिच्या लक्षात येत नव्हतं.

"तुझ्याशी बोलायचं होतं. पुन्हा भेटशील असं कधी वाटलंच नव्हतं. आणि माझ्याच कंपनीत नोकरी मिळू शकते. म्हणून दोन्ही म्हटलं."

"चार वर्ष झाली स्पंदन आपण भेटून. एकदाच तर भेटलो होतो आणि एक दोन वेळा फोनवर बोललो होतो. म्हणजे तुला काय बोलायचं असेल तेच समजत..."

"मी अजून लग्न केलेलं नाही आनंदी." तिला तोडून टाकत त्याने म्हटलं आणि ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली.

"आणि त्याचं कारण तू आहेस." तो घाईघाईने बोलला.

"मी?" आता तर ती अगदीच गोंधळली.

"हो."

"अरे, पण मी होकार कळवला होता. नकार तुझ्याकडूनच होता स्पंदन."

"खरं आहे तुझं. तुला भेटलो तेव्हा असं एखाद्या मुलीला ठरवून भेटणं वगैरेचा पहिलाच प्रसंग होता. माझ्या अपेक्षा काय आहेत हे माझं मलाच कळलेलं नव्हतं. मग सर्वांचं म्हणणं पडलं की घाई करू नये. पटलं मला ते. पण नंतर प्रत्येक मुलीची मनातल्या मनात तुझ्याशी तुलना करायला लागलो. शेवटी तुला फोन केला."

"फोन केलास?"

"हो. विसरलीस?" आनंदी विचार करत राहिली.

"फोन केला पण माझ्या मनातलं बोलायची संधी दिलीच नाहीस तू." तो काय म्हणतो आहे ते हळूहळू तिच्या लक्षात आलं. विशाल बरोबर लग्न पक्कं झालं आणि स्पंदनचा फोन आला होता. त्या वेळेस क्षणभर प्रश्न पडला होता स्पंदनने फोन का केला असेल म्हणून. पण विशालमय झाली होती ती. स्पंदनने भेटायची इच्छा व्यक्त केल्यावर लग्न ठरल्याचं तिने आनंदाने सांगितलं होतं. त्यामुळे पुढे काहीच बोलला नसेल का स्पंदन? तिच्या मनातले विचार वाचल्यासारखं स्पंदन उत्तरला.

"तू इतक्या पटकन तोडून टाकलंस की पुढे काही बोलताच आलं नाही." आनंदी हसली.

"तुझा नकार पचवला होता त्यामुळे झालं असेल तसं.  माझं लग्न ठरलं होतं आणि तू पुन्हा भेटू या का असं विचारत होतास. मी स्पष्ट विचारलं नाही तरी तेव्हा अंतर्मनाला तुला का भेटायचं आहे ते जाणवलं असणारच. पण तुझ्यासारखंच जाणवून घ्यायचं नसेल."

"हं. तुझं लग्न ठरलं म्हटल्यावर पुढचे मार्ग खुंटलेच. मी मुलींना भेटत राहिलो. नकार देत राहिलो. प्रत्येकवेळेला मुलींना असं नकार देणंही रुचत नव्हतं आणि कुठलीच मुलगी मनापासून पसंतीला का उतरत नाही तेही कळत नव्हतं.  आनंदी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. पण हे माझं मलाच जाणवायला खूप दिवस लागले. कुणालाही भेटून आलो की  तुझा सावळा, तरतरीत चेहरा आठवायचा. त्यापेक्षाही तुझं बोलणं, वागणं..." स्पंदनचं बोलणं मनापासून ऐकत होती आनंदी.  नकळत आनंदीच्या तोंडून निघून गेलं.

"बोलणं, वागणं?" स्पंदनला आपल्या वागण्या बोलण्यात असं काय आढळलं की तो विसरू शकला नसेल? तिचा स्वर उत्सुक होता.

"आपण भेटलो त्या वेळेस उगाच आमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नाही केलास. बाबांची मतं तर एक दोन वेळा तिथल्यातिथे खोडून काढलीस. आणि त्यात कुठेही उर्मटपणाची झाक दिसली नाही. उलट त्या विषयावरचा अभ्यास जाणवला."

"अरे वा. पण हेच तुझ्या बाबांचं पण मत होतं का?" आनंदीने साशंक स्वरात विचारलं. घाईघाईत तिने ती तसं का विचारते आहे ह्याचाही खुलासा केला. " मला आठवतंय,  माझी आई म्हणाली होती नंतर की मी फार अटीतटीवर येते. पण एखाद्या विषयाचा अभ्यास असेल तर कुणी चुकीचा मुद्दा मांडला की राहवतच नाही."

"बाबांना जाणवला तुझा अभ्यास.  पण महत्त्वाचं ते नाही. मत मांडण्यातला तुझ्यातला आत्मविश्वास, ठामपणा आणि तरीही वागण्यातलं सहजपण. ते वेगळं होतं आणि जसजसं मी मुलींना भेटत गेलो तसतसं ते प्रकर्षाने जाणवायला लागलं. प्रत्येक मुलीशी माझं मन तुझ्याबरोबर तुलना करत राहिलं तेव्हा लक्षात आलं मी तुझ्या प्रेमात आकंठ बुडालो आहे.  शेवटी कंटाळून घरी लग्न न करण्याचा निर्णय सांगितला. काही पर्यायच नव्हता. आनंदी..." त्याला काहीतरी बोलायचं आहे हे आनंदीच्या लक्षात आलं  पण अंदाज येत नव्हता. आणि नोकरी शोधण्यासाठी मदत करणार आहे म्हणून इथे भेटायला बोलावलं स्पंदनने की त्याला विशालबद्दल...?  स्वभावाप्रमाणे ती स्पष्ट विचारणार तेवढ्यात स्पंदनच म्हणाला,

"आनंदी, तुझा घटस्फोट झालेला मला ठाऊक आहे." आता मात्र तिला काय बोलावं ते सुचेना. दोघंही अस्वस्थपणे कॉफीचे घुटके घेत नजर टाळत राहिले. कसंनुसं हसून आनंदी म्हणाली.

"हे सांगायला बोलावलंस की काय?" अवघडल्यासारखा स्पंदन हसला.

"छे. तुला वेगळंच विचारायचं होतं." आनंदीच्या काळ्याभोर डोळ्यात डोकावत तो म्हणाला.

"विचार ना. नोकरीचं म्हणशील तर हा प्रोजेक्ट संपला की लगेच दुसरा शोधणं भाग आहे मला.  तुझ्याच कंपनीत आहे का जागा?" स्पंदनला काय विचारायचं असावं याचा अंदाज आला तरी ती मुद्द्यावर आली. तिला तो विषय नकोच होता. पुन्हा त्या वाटेकडे वळायचा विचार तिच्या मनात आतापर्यंत क्षणभरही डोकावला नव्हता. बेसावध क्षणात तिला स्वत:ला गुंतवू द्यायचं नव्हतं. पण आनंदीच्या प्रश्नाकडे कानाडोळा करत स्पंदनने विचारलं,

"माझ्याशी लग्न करशील?" आनंदीच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे पाहून तो हसला. मोकळेपणाने हसला. मनावरचा ताण निघून गेला होता. आनंदीच्या उत्तराचीही आता त्याला काळजी नव्हती. मनावरचा दडपण उतरल्याचा आनंद त्याला जास्त वाटत होता.  आनंदी आपल्याच गावात आहे आणि  नोकरी शोधते आहे या योगायोगाचं त्याला आधी आश्चर्य वाटलं होतं.  साशंक मनाने त्याने चौकशी केली होती. तिच्या घटस्फोटाचं कळल्यावर किंचित हळहळ वाटली होती. पण लगेच मनाने उचल खाल्ली. सुखाचा शोध संपल्यासारखं वाटायला लागलं. पण विषय कसा काढायचा? ती ’हो’ म्हणेल? आधी आपल्याकडून मिळालेला नकार तिच्या लक्षात असेल? एका अनुभवाने पोळल्यावर पुन्हा त्या फंदात पडेल? मनात प्रश्न असंख्य होते पण उत्तरं ठाऊक नव्हती. आनंदीशी बोलल्याशिवाय तिच्या मनाचा थांग लागलाही नसता. पण त्या क्षणापासून जी अस्वस्थता आली होती ती एकदाचा तो प्रश्न विचारल्यावर एकदम नाहीशी झाली. जास्तीत जास्त काय ’नाही’ म्हणेल. त्याने प्रसन्न चेहर्‍याने तिच्याकडे पाहिलं. आनंदी त्याच्याकडेच टक लावून पाहत होती.

"बोल ना." तो काकुळतीने म्हणाला.

"मला नाही काही सुचत."

"ठीक आहे. विचार कर."

"पण माझ्या नोकरीचं?" त्याला हसायला आलं.

"तुझ्या निर्णयामुळे त्यात काही बदल होणार नाही." दोघंही मनापासून हसले. आनंदीने अचानक विचारलं.

"तू घरी सांगितलं आहेस तुझ्या?" त्याने मान डोलवली.

"परवानगी दिली?"

"सहज. लग्न करायचंच नाही या बद्दल ठाम होतो. लग्नाला तयार झालो यातच खूष आहेत. त्यात जिच्या प्रेमात पडलोय तिच्याशीच लग्न करतोय याचं समाधान असेलच ना."

"पण घटस्फोटित बाईशी लग्न. आधीची परिस्थिती वेगळी होती."

"माझ्या दृष्टीने प्रेमात पडलेल्या मुलीशी लग्न आनंदी!" आनंदीकडे एकटक पाहत स्पंदन म्हणाला. त्याची नजर टाळत ती म्हणाली,

"मी उत्तर दिलेलं नाही स्पंदन."

"मग दे ना. म्हण ना हो. आधी होकार होताच की तुझा."

"स्पंदन, तुझं हे पहिलं लग्न असणार आहे. मी नुकतीच वेगळी झाले आहे. आणि कितीही म्हटलं तरी अजून त्यातून सावरलेले नाही."

"लगेच नाही गं लग्न करायचं. थांबू आपण काही दिवस. इतकी वर्ष थांबलो मी तसं अजून थांबेन. पण तुझा होकार ऐकायचा आहे मला आनंदी." 

"माझ्या विस्कटलेल्या संसाराचे व्रण तुला दुखावतील वेळोवेळी. माझं विटलेलं मन पाहून तू वैतागशील. माझं तोलूनमापून वागणं तुला निरुत्साही करेल. झेपेल?" स्पंदन हसला.

"इतकी बदलली आहेस?"

"हो. माझं मलाच जाणवतं ते. आणि माझा घटस्फोट का झाला याबाबत तू काहीच विचारलेलं नाहीस अजून."

"त्या आठवणींनी तुला त्रास व्हायला नको म्हणून विचारलं नाही."

"मी जे सांगेन ती अर्थात माझी बाजू असेल स्पंदन. विशालचीही बाजू असेलच."

"खरं आहे. पण त्याची बाजू काय होती हे तुला ठाऊक असणारच ना? तूच सांग दोन्ही बाजू." स्पंदनकडे  आनंदी मूकपणे पाहत राहिली. 

"हो म्हण आनंदी. उभं आयुष्य आहे आपल्यासमोर. होशील पुन्हा तू हसतीखेळती. मी करेन तुला तुझ्या नावाप्रमाणे आनंदी." स्पंदनने आनंदीचा हात हात धरला आणि तो तिच्या डोळ्यात खोल डोकावला. आनंदीच्या सार्‍या शरीरावर रोमांच उभे राहिले. मनावर रेंगाळत राहिलेले काळे ढग विरून निरभ्र आकाश दृष्टिक्षेपात आल्यासारखं वाटत होतं. इतक्या पटकन कोणत्याच निर्णयाप्रत पोचायला नको हे कळत असलं, व्यावहारिक मन मागे ओढत असलं तरी आनंदीचे  बोलके डोळे भावुक झाले, भविष्याची स्वप्न अलगद त्या डोळ्यांमध्ये उतरली.  स्पंदनच्या चेहर्‍यावर समाधानाचं हसू उमटलं.  एकमेकांच्या डोळ्यातील भविष्याची रांगोळी अधीर मनं  निरखीत राहिली. मधली चार वर्ष पुसून नव्याने आयुष्याच्या रांगोळीचे ठिपके जोडण्यासाठी आतूर झाली.



No comments:

Post a Comment

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.