Tuesday, July 7, 2026

स्नेहवन

आळंदीजवळचं (कोयाळी फाटा) स्नेहवन. आम्ही उन्हाळ्याच्या सुटीत गेल्यामुळे बरीचशी मुलं घरी गेली होती. तिथे असलेल्या पवन आणि ओम ह्या दोन छोट्या मुलांनी आम्हाला संस्थेच्या आवारात फिरवलं, संस्थेबद्दल माहिती दिली. दोघांमधला एक; खूप बोललं की तोंड दुखतं म्हणून जरा कमी बोलत होता :-). दोन्ही मुलांचं ऐकण्यात आम्ही सगळ्या (जाऊ, नणंद, मुलगी) इतक्या रमलो की चित्रीत करायला विसरलो. थोडीफार प्रकाशचित्र मात्र काढली.  

अशोक देशमानेंनी चांगली नोकरी सोडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील, अनाथ आणि गरजू मुलांसाठी "स्नेहवन" संस्थेची स्थापना केली. संस्थेत अनेक गरजू मुलं आहेत. मात्र खर्‍याअर्थी गरजू असणार्‍यांनाच इथे प्रवेश मिळतो हे देशमाने अर्जातल्या बाबींबद्दल सांगत होते तेव्हाच लक्षात येतं. फक्त अर्ज केला की इथे प्रवेश मिळत नाही. मुलांशी बोलणं होतं, त्यानंतर त्यांच्या घरी देशमाने प्रत्यक्ष जातात आणि मगच ते मूल संस्थेत दाखल होतं. 

येथे मुलांच्या केवळ शालेय शिक्षणावर भर दिला जात नाही, तर संस्कार, स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वासही विकसित केला जातो. स्नेहवनमध्ये ग्रंथालय, संगणक प्रशिक्षण, विज्ञान प्रयोगशाळा, योग, मल्लखांब, संगीत, शेती आणि विविध कौशल्य प्रशिक्षणाच्या सुविधा आहेत. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करत सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण आणि सेंद्रिय शेती यांनाही येथे महत्त्व दिले जाते. देशमानेंनी बोलता बोलता सांगितलं की एकदा गाडीसाठी चालक मिळत नव्हता तेव्हा त्यांनी ठरवलं की ज्यासाठी अडतं ते सारं मुलांना शिकवायचं. ह्या भावनेतूनच तिथले अनेक अभ्यासक्रम सुरु झालेले आहेत.

मुलांसह शिक्षकांनाही पुस्तकं वाचणं बंधनकारक आहे. वाचलेल्या पुस्तकांबद्दल बोलणं हेही. बक्षिस म्हणून पुस्तक वाचलं, त्याबद्दल बोललं की मुलांना चित्रपट पाहायला मिळतो असं देशमांनेंच्या बोलण्यात आलं. पुस्तक वाचून त्यावर मुलं, शिक्षक बोलतात हे अतिशय भावलं आणि मुलंच संस्थेंबद्दल माहिती देतात हेही. ओम आणि पवनने जवजवळ तासभर फिरुन संस्था दाखवली, माहिती दिली आणि लेकीकडून अमेरिकेबद्दलची घेतली. 

अशोक देशमाने हे मूळचे शेतकरी कुटुंबातील आणि वारकरी परंपरेचे संस्कार लाभलेले कवी आणि लेखक आहेत. पुण्यात IT क्षेत्रात नोकरी करत असताना, दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील आणि गावाकडच्या शेतकर्‍यांच्या व्यथा, कर्जबाजारीपणा, आत्महत्या ह्यातून आलेल्या अस्वस्थतेतून आणि वेदनेतूनच त्यांच्या अनेक कविता कागदावर उतरल्या, स्नेहवनची स्थापना झाली. त्यांची पत्नी, आई - वडीलही त्यांच्याबरोबरीने काम करतात.

स्नेहवनला जरुर भेट द्या आणि स्नेहवनबद्दलची माहितीही जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवा. 

स्नेहवन संकेतस्थळ - https://www.snehwan.in/home




Monday, July 6, 2026

ज्योतिष आणि कौन्सेलिंग आणि नमुना नमुना माणसं

 बरीच वर्ष मी माझी रास मेष आहे म्हणून लोकसत्तामधलं भविष्य वाचायचे. दर आठवड्याला त्यातलं सगळं जुळतं असंही वाटायचं. मुळात माझा भविष्यावर विश्वास आहे की नाही हे माझं मलाच अजूनही कळलेलं नाही; पण झालं काय खूप वर्षांनी कळलं की माझी रास मेष नाहीच ती वृषभ आहे. मग ह्याला काही अर्थ नाही म्हणत मी दोन्ही राशींचं भविष्य वाचून एकत्र करायला सुरुवात केली. हळूहळू तेही खरं आहे असं वाटायला लागलं. आता हे मी का लिहिते आहे? चपराक अंकासाठी मंजिरी तिक्का अमेरिकेतल्या ’नाटक’ वाल्यांवर लिहित होती, उदयन आपटेने माझं नाव सुचवलं आणि तिच्याशी ओळख झाली. पुण्यात आले की भेटायचं असंही आम्ही ठरवलं. पुण्याला गेल्यावर, ह्यावेळी भेट होणं कठीण आहे असं मी तिला कळवलं आणि तिने; ठरवलं तर सगळं जमतं असं :-). निघायच्या एक दिवस आधी अखेर तिची निगडीच्या घरी भेट झाली. तिने तिची २ पुस्तकं मला भेट म्हणून दिली. ज्योतिष आणि कौन्सेलिंग आणि नमुना नमुना माणसं.

संजय मनोहर ह्यांना पत्रिकेच्या आधारे असंख्य लोकांना मार्गदर्शन करताना आलेल्या अनुभवांना मंजिरीने कथारुपात सादर केलं आहे. अगदी खरं सांगायचं तर हातच लावू नये असं वाटत असताना इतक्या प्रेमाने दिलेलं पुस्तक वाचलं पाहिजे म्हणून मी हातात घेतलं आणि नकळत त्यात गुंतले. कधी प्रश्न पडले खरंच असं होत असेल का तर कधी वाटलं ज्योतिष हे शास्त्र म्हणतात तसं असलं पाहिजे. काही असो, पुस्तकातले अनुभव, घटना विविधांगी आहेत आणि सुरुवातीलाच संजय मनोहरांनी लिहिलेलं मला अगदी मनापासून पटलं, ते म्हणतात, ’ज्योतिषविषयक मार्गदर्शन करताना येणार्‍यांना देवाधर्माचं करायला न सांगता माझं त्याच्यांशी काळाशी आणि त्यांच्या प्रश्नांशी सुसंगत अशा गप्पा मारत समुपदेशन करणं त्यांना भावतंय, त्याचा त्यांना फायदा होतोय हे लक्षात आलं होतं.’

नमुना नमुना माणसं हे नावच ’सार’ सांगून जातं. पुस्तकातीला किस्से हलकेफुलके, कधी आपण स्वत:बद्दलच वाचतोय असं वाटायला लावणारे, माणसाच्या स्वभाव, वागण्यावर रंजक पद्धतीने भाष्य करणारे आहेत. अति बोलणारी, अबोल, स्वच्छतेचा अतिरेक करणारी माणसं, भिडेपोटी उद्बभवणारे प्रसंग अशा विविध विषयांवरचं हे हलकंफुलकं पुस्तक वाचण्यासारखं आहे.