Monday, January 14, 2013

फेसबुक हे असं...

फॅमिली डॉक्टरकडे गेले होते,  सगळ्या फॅमिलीला घेऊन. निघताना, गाव सोडतोय म्हटल्यावर डॉक्टर म्हणाल्या,
"कीप इन टच"
"तुम्ही फेसबुकवर आहात का?" संपर्कात रहायचं तर तेच प्रभावी साधन आहे  हा त्यामागे माझा विचार.
डाव्या, उजव्या हाताला असलेल्या दोन्ही मुलांच्या रागीट्ट नजरा टाळण्यासाठी डॉक्टरांवर दृष्टी केंद्रीत केली. नाही म्हणजे मुलीने  एकदा विचारलं होतं,
"आई, तू ऑफिसचं काम फेसबुकवर करतेस का?" आणि नवरा, मुलाचं  ठाम मत आहे की फेसबुकचं व्यसन आहे मला.
तर डॉक्टरांनी फेसबुक म्हणजे निव्वळ वेळखाऊ, रिकामटेकड्यासाठी कसं आहे ते सांगायला सुरुवात केली. मी आपलं,
या, या...राईट....यस, यस....पण आम्ही पण कामधंदे करुनच फेसबुक वापरतो, किंवा ते करता करता वापरतो....असे अस्फुट उदगार काढत किल्ला लढवायचा प्रयत्न केला. तो त्यांच्या आवाजापुढे, ठाम मतांपुढे पडला.

पण खरंच फेसबुक हे आयुर्विम्याला जसा पूर्वी पर्याय नव्हता तसंच आहे की नाही? जगातल्या सगळ्या बातम्या फेसबुकवर वाचता येतात. वर्तमानपत्रं त्यापुढे किस झाड की पत्ती. बातम्या वाचून कोपरखळ्याही मारता येतात. आवडलं आवडलं करत शेजार्‍या पाजार्‍यांच्या घरात घुसता येतं, त्यांच्या जगात, त्यांना आवडलेल्या कुणाच्याही घरात डोकावता येतं, म्हणजे परदेशात रहाताना भारतातला जो ’जिवंतपणा’ आपण ’मिस’ करत असतो तो बसल्या जागी एका उंदराच्या साथीने अनुभवता येतो. लोक एखादंच असं वाक्य टाकतात ’पोस्ट’ म्हणून की लहानपणी कोडं सोडवायला सरसावयचो तसं काय म्हणायचं असेल बरं या पोस्टमधून असं म्हणत कोडं सोडवण्याची मज्जा अनुभवता येते. राजकिय मतभेद वाचून  इतकी करमणूक होते की आपलं मत काय होतं तेच विसरायला होतं. आजारी पडलेल्याला हमखास उपाय सुचवता येतात, पाककृत्या कळतात.  कोण कुणाकडे कुणाबरोबर कधी गेलं होतं त्याचा सुगावा लागतो. एक ना अनेक किती गुण गावेत या फेसबुकचे?

थोडक्यात डोक्याला खूप खुराक देतं हे फेसबुक. आपलं व्यक्तिमत्वं अगदी चतुरस्त्र होऊन जातं...
फेसबुक हे असं, पूर्वी आयुर्विम्याला पर्याय नव्हता तसं...

22 comments:

  1. मोहना खूपच छान आणि नेमके लिहितेस .

    ReplyDelete
    Replies
    1. गीताताई धन्यवाद मनापासून.

      Delete
  2. फेसबुक म्हणजे रेफ्रिजरेट सारखे आहे. तुम्हाला माहित आहे की त्यात नवीन काहीच पदार्थ नाहीयेत. पण तुम्ही दिवसातून १० वेळा उघडून बघतच ना !?

    ReplyDelete
    Replies
    1. आवडली रेफ्रिटजरची उपमा अनिल!

      Delete
  3. आयुर्विमा काढलेला नाही - पण फेसबुक आहे. अर्थात फार वापरत नाही मी ते .
    पण कदाचित परदेशात राहून जितकी आपल्या देशाची, आपल्या मातीची, आपल्या माणसांची आठवण येते - तितकं इथंच असल्याने त्याच अप्रूप नाही.
    फोनवर बोलणं (कारण भेटायला जमतंच असं नाही) सगळ्यात सोयीचं!

    ReplyDelete
    Replies
    1. फेसबुकचा माझ्या दुष्टीने झालेला फायदा भारतातल्या नातेवाईकांचे फोटो बघता येतात हा कारण इमेल करा म्हणून सांगितलं तरी कुणी करत नाही, राहून जातं ते त्याच्यांकडून. बाकी खरं तर ते सारं उपहासात्मक लिहायचा प्रयत्न होता. फसला बहुधा :-).

      Delete
  4. Enjoyed reading it, very nicely written.

    ReplyDelete
  5. So true Mohana .... nicely written...

    ReplyDelete
  6. मस्त लिहिलंय....
    जगातल्या बातम्यांबरोबरच मित्र मैत्रिणी, नातेवाईक यांच्याही बातम्या समजतात फेसबुकवर....
    मी शक्यतो विनोदी पोस्ट पाहण्यासाठी जाते फेसबुकवर, आणि तिथे राजकारण, खेळ सद्य घटना यांवर काही ना काही विनोद केलेले मिळतातच....
    पण कितीही केलं तरी आभासी जग आहे ते....

    ReplyDelete
    Replies
    1. इंद्रधनु,
      खरं आहे, आभासी जग आहे ते. मला आणखी गंमंत वाटते की फ्रेंड रिक्वेस्ट पाठवताना आपण कोण आहोत आणि का रिक्वेस्ट पाठवली आहे ते सुद्धा कळवत नाहीत. आणि खूप लोकं अनोळखींना मित्र म्हणून सामील करुन घेतात त्याचं.

      Delete
  7. हम्म.. मी बंद केलंय अकाउंट. फार वेळ वाया जायचा.व्हर्च्युअल जगाची जास्त काळजी करत बसायचो आणि सभोवतालच्या लोकांकडे दुर्लक्ष !:) आता बंद केल्यापासून जरा वाचन पुन्हा वाढलंय, चांगलं चुंगलं वाचायला पुन्हा सुरुवात केली आहे, फेस बुक नसल्याने ( चार महिने झाले आता ) वेळ कसा घालवायचा या साठी नवनवीन आयडीयाज सुचताहेत. एकंदरीत काही फरक पडला नाही , काही सो कॉल्ड लिस्ट मधले नेहेमी कॉमेंट देणारे लोक, लाइक करणारे हल्ली कधी चुकुनही फोन करत नाहीत. ह्यांना खरंच मित्र म्हणायचं का? हा प्रश्न आहेच. पण काही लोकं मात्र फेसबुक शिवाय पण संबंध टिकवून आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. महेंद्र - तुमचं विधान एकदम मान्य. खरं तर मी लिहलं आहे ते तिरकसपणे, पण माझा हेतू साध्य झालेला दिसत नाही :-).

      Delete
    2. ्माझा सेन्स ऑफ ह्युमर कमी झालेला दिसतोय.. :) काही तरी करायला हवं.. :) सध्या कदाचित तुकाराम महाराजाचे अभंग वाचतोय म्हणून असेल .

      Delete
    3. महेंन्द्र - होतं असं कधीकधी, नाही हो. चेष्टा करतेय :-)

      Delete
  8. very nice...enojyed reading it..!!

    ReplyDelete
  9. फेसबुक काय किंवा व्हर्च्यअल जगातले काहीच... आपल्याला व्हर्च्यअल करुन टाकतात. जिवंतपणाची लक्षणच हरवून चाललीत कि काय. फ्रेंडलिस्ट मधले वर्षभरात चुकूनही दोन शब्दही लिहीत नाहीत आणि अचानक वादिला शुभेच्छा देतात. कदाचित ती व्यक्ती जगात नसेलही... पण शुभेच्छा असतील. गंमतच आहे. पण कधी कधी जुन्या हरवलेल्या माणसांचा शोध लागतो आणि धागा जिथे सोडला होता तिथूनच सहज उचलला जातो नं तेव्हा मात्र आनंद होतो.

    पोस्ट छान ! :)

    ReplyDelete
    Replies
    1. भानस धन्यवाद, वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या की समजतं आहेत बुवा ही सगळी माणसं इथेच :-). किती ’लाईक्स’ चा जमाना आहे.जुन्या मैत्रीला परत उजाळा मिळतो पण तोही कधी कधी एकतर्फीच होतो असं वाटतं. म्हणजे आपण आवर्जून फोन वगैरे करतो भारतात पण भारतातले मित्र मैत्रीणी दराचा विचार करुन विचारही करत नाहीत कधीतरी फोन करावा म्हणून. अपवाद असतो एखाद दुसरा त्यातच समाधान मानायचं.

      Delete
  10. तू तिरकसपणे लिहीलं असशील तर ते अजिबातच जाणवत नाहीये. :D

    ReplyDelete
    Replies
    1. ha ha,
      झालंय खरं तसं म्हणजे माझी फेसबुकशी ’हेट अँड लव्ह’ रिलेशनशिप असल्याने असेल बहुधा:-).

      Delete

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.