Thursday, October 29, 2026

हॅलोविन डे

साधारण सप्टेंबर महिना सुरु झाला की अमेरिकेतली दुकानं कोरलेले भोपळे, भुताखेतांचे मुखवटे यांनीच आपलं स्वागत करत असतात अगदी एकतीस ऑक्टोबरच्या सरत्या संध्याकाळपर्यंत. ही सरती संध्यावगळ म्हजेच हॅलोविन डे. पानगळ झालेली, काळ्‌याभोर रस्त्याच्या आजूबाजूला पदपथावर सुकलेल्या पानांची कुज‌बुज, कोरलेले भोपळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जागोजागी दिसणारी भूतं. अंधार्‍या रात्री राक्षस आणि पिशाच्च प्रकाशमान घरांचा दरवाजा ठोठावायला याचवेळी निघतात असा समज अदयापही आहे.

वास्तव आणि मायावी दुनिया याने सारं वातावरण यावेळी भारावून गेलेलं असतं. या दिवशी वेगवेगळे मुखवटे लावून मुलं या दुनियेत प्रवेश करतात. "ट्रिक ऑर ट्रिट" असं म्हणत चॉकलेट, गोळ्या वसूल करतात. दारासमोर भोपळा आणि सजावट नसेल तर मात्र कोणी आपल्या घरी फिरकत नाहीत आणि "ट्रिक ऑर ट्रिट" करायला बाहेर पडताना लोक आपल्या दारासमोर येणार्‍या भुताखेतांसाठी चॉकलेटस, गोळ्या ठेवायला विसरत नाहीत.
'हॅलो विन डे' ची पाळमुळं प्राचीन रोममध्ये पोचवतात. या दिवशी रोमन जनता 'पोम्पोना' या त्यांच्या अन्नपूर्णेचा सण साजरा करत, फळं आणि सुकामेवा भेट म्हणून देत. रोमन लोकांचा असाही विश्वास होता की कारली कोरुन जळती मेणबत्ती किंवा तेलाने थबथबलेली वात भूताखेतांपासून आपलं रक्षण करते.
प्राचीन ग्रीक समाजात वर्षांतून एकदा आत्मे पृथ्वीवर येतात असा समज होता. त्यांना प्रतिकार करण्याऐवजी 'अँजेथे- स्टेरिया’ नामक उत्सव आठवडाभर करून या आत्म्यांना भोजनासाठी निमंत्रित केले जाई. अंतिमतः ग्रीक पुजारी मंत्रविधीने त्यांची पाठवणी करत.
याचवेळी पश्चिम व मध्य युरोपातील सेल्टिक जमातही आत्म्यांना शांत करत. एक नोव्हेंबरला सेल्टिक जमातीचं नववर्ष सुरु होतं. या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला समहराएन या मृत्यु - देवतेला प्रसन्न करण्यासाठी होळी पेटवून प्राणी आणि क्वचित नरबळी देत. त्यावेळेस घराघरांतून अग्नीशमन करुन पुन्हा होळीद्ववारे प्रज्वलित करत यामुळे येणारं वर्ष सुख-समाधान घेवून येईल असा समज होता.
रोमन लोकांनी सेल्टिक साम्राज्य ताब्यात घेतले त्यामुळे समहाएन आणि रोमनांची पोम्पेन देवता यांचा एकत्रित उत्सव साजरा होवू लागला. फळांची देवाण-घेवाण याचबरोबर होळी आणि नरबळी महत्वाचे मानले जावून चालूच राहिले. दुष्ट आत्मे प्राण्यांच्या विशेषतः बगळ्या, माजरांच्या रुपाने येतात असाही समज सार्वत्रिक होता.
याचवेळेस ख्रिश्चन धर्माचा प्रचार सेल्टिकपर्यंतही पोचला. ख्रिश्चन धर्मप्रसारकांवर ३१ ऑक्टोबरच्या या प्रथेची दहशत बसली होती पण त्यांना ही पद्धत नष्ट करणं शक्यं नव्हतं कारण सेल्टिकनी धर्मप्रसारकांचीच होळी केली असती एवढं महत्त्वं या दिवसाला होतं. अखेर समहाएन भोजन ख्रिश्चन सुटीत बदलण्यात ते यशस्वी झाले. सर्व संताच्या स्मृतीप्रित्यर्थ एक नोव्हेंबर हा दिवस 'ऑल हॅलो डे' म्हणून निश्चित केला. याचीच आदली रात्र म्हणजे 'ऑल हॅलो इव्हिनिंग'. त्याचंच नंतर हॅलोविन हे नाव झालं. परंतु सेल्टिक ख्रिश्चन होऊनही पेगेनच्या विधीतून ते बाहेर पडू शकले नाहीत. उत्सवाचा आदला दिवस ते त्यांच्या पद्धतीने साजरा करतच राहिले. नंतर हॅलोविनची तीच पद्धत रुढ झाली.
मध्ययुगीन काळात असाही समज होता की हॅलोविनच्या रात्री सैतान व बदनाम लोकांना नरकातून बळी शोधण्यासाठी मुक्त केलं जाते. अशी कथा सांगतात की यांनी जर एखाद्याला अगदी छोटसंही दुष्कृत्य करताना पाहिलं आणि ती व्यक्ती लसणीच्या माळेने संरक्षित नसेल, कोरलेल्या भोपळ्यात जळती मेणबत्ती नसेल तर त्या व्यक्तीच्या शरिरात हे पिशाच्च प्रवेश करतं. सहाजिकच त्या दिवशी घराभोवती अग्नी पेटवून लोक सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत.
देशादेशात याबद्दल वेगवेगळे समज आणि श्रद्धा आहेत. वेल्समध्ये या दिवशी 'शिंकणं' म्हणजे क्षणभरासाठी आत्म्याला शरिरापासून मोकळे सोडणं म्हणतात. जर पिशाच्चाने चपळपणा दाखवला तर तो आत्म्यावर झडप घालून त्याला फरफटत नेतो असे म्हणत. शिंकल्यावर 'गाँड ब्लेस यू' म्हणण्याची पद्‌धत यामुळेच सुरु झाली.
स्कॉटिश समजुतीनूसार 'हॅलोविन डे' ला हायलंडर लोकांच्या घागर्‍यात भूत प्रवेश करतं. स्कॉटिशांचा असाही विश्वात होता की रोॲन लाकूड या शक्तीपासून संरक्षण देतं त्यामुळे प्रत्येकजण त्यादिवशी हातात काठी बाळगत.
इंग्लडमध्ये हॅलोविनला नटक्रॅक किंवा स्नॅप अँपल नाईट म्हणत. शेकोटी पेटवून सफरचंद, सुकामेवा खात कुटुंबिय यावेळेस भूताखेतांच्या गोष्टीत रंगून जात.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हॅलोविन अमेरिकेत मोठ्या प्रमाणात साजरा होत नसे. आयरिश आणि स्कॉटिश लोक इथे हजारोंच्या संख्येने आले आणि हॅलोविन डे अमेरिकेत लोकप्रिय झाला.
अमेरिकेतल्या मिनिसोटा राज्यातील 'अनोका' शहर हॅलोविनची राजधानी मानलं जातं. तिथे जवळजवळ आठवडाभर ’हॅलोविन डे’ साजरा होतो. तिथल्या मिरवणुकीत सहभागी होत असलेल्या पथकांची संख्या वाढती आहे. आता या मिरवणुकांमध्ये मध्य-पश्चिम भागातील अनेक ठिकाणांहून पथकं सहभागी होतात. मिरवणुकीच्या आधीच्या शुक्रवारी, वेगवेगळ्या वेशभूषा केलेले विद्यार्थी मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढतात.
आमच्या शेजार्‍यापाजार्‍यांची भूतांनी घेरलेली घरं तुमच्यासाठी. काही छायाचित्र आंतरजालावरुन.
हा लेख खूप वर्षांपूर्वी लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झाला होता.















No comments:

Post a Comment

तुम्हाला माझ्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल. एखादी छोटीशी प्रतिक्रिया लिहणा‍र्‍याला खूप उत्साह देते. मग कळवाल ना मला तुम्हाला काय वाटलं वाचून ते? तुमच्या प्रतिक्रियेने मला कदाचित आणखी विषय सुचतील, सुधारणेला वाव मिळेल आणि मुख्य म्हणजे आपली ओळख होईल.