Sunday, February 28, 2016

सुपरबोल

(सुपरबोल. दरवर्षी हा खेळ खेळाइतकाच किंबहुना खेळापेक्षा इतर कारणांनीही गाजतो. गेल्या आठवड्यात

रविवारी खेळला गेलेला सुपरबोलही याला अपवाद नाही. सुपरबोलचं हे ५० वं वर्ष. मध्यांतरातील कार्यक्रमासाठी गायलेली बियॉन्से या वेळेला वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे
.)

फूटबॉल या खेळाच्या विजेतेपदासाठी दरवर्षी होणारी चुरस म्हणजे सुपरबोल. राष्ट्रीय फूटबॉल संघटनेत (NFL) असलेले ३२ संघ दोन गटात विभागलेले आहेत. ते राष्ट्रीय  फूटबॉल संघ (NFC) आणि अमेरिकन फूटबॉल संघ (AFC) या नावाने ओळखले जातात. दरवर्षी सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात हे संघ सुपरबोलपर्यंत पोचण्यासाठी खेळतात. आणि फ्रेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी अंतिम फेरीपर्यंत पोचलेले दोन संघ विजेतेपदासाठी लढतात.  फेब्रुवारी महिन्याचा  पहिला रविवार ’सुपरबोल सन्डे’ म्हणूनच ओळखला जातो. या ७ फेब्रुवारीला लढत होती कॅरोलायना पॅंन्थर आणि डेनवर ब्रॉन्को या दोन संघामध्ये.

हा खेळ जितका खेळासाठी प्रसिद्ध आहे तितकाच अनेक कारणांसाठी. काहींना खेळाची आवड म्हणून तर काहीजण केवळ जाहिरातीसाठी सुपरबोल पाहतात. मध्यांतरात होणार्‍या कार्यक्रमाचं आकर्षण असणारा वर्गही खूप मोठा आहे. मायकल जॅक्सन, मॅडोना, व्हीटनी ह्युस्टन अशा एकाहून एक नामवंत कलाकारांनी या वेळेला आपले कार्यक्रम सादर केले आहेत.

या वेळेला होते ब्रुनो मार्स, कोल्डप्ले आणि पॉपसिंगर बियॉन्से. बियॉन्से आणि तिच्या सहकारी नर्तिकानी घातलेल्या पोशाखावरून, गाण्यातील शब्दांवरुन सध्या हवा तापलेली आहे. आफ्रिकन - अमेरिकन नागरिकांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्यातील  एक चळवळ म्हणजे ब्लॅक पॅन्थर्स चळवळ. बियॉन्से आणि सहकारी नर्तिकांचा काळ्य़ा रंगाचा पेहराव आणि टोपी या दोन्ही गोष्टी त्या चळवळीतील कार्यकर्त्यांसारख्या होत्या,  नृत्यातून मालकम एक्स या मानवी हक्कासाठी जागरुक असलेल्या आफ्रिकन - अमेरिकन नेत्याबद्दलचा आदर साकारला, तसंच नृत्यातील  मुठी वळवून उंचावलेले हात म्हणजे ’ब्लॅक पॉवर सॅल्यूट’ ची आठवण करुन देण्याचा प्रयत्न होता. १९६८ च्या ऑलिम्पिकमध्ये पदक वितरणाच्या वेळेला  अमेरिकन राष्ट्रगीत सुरु झाल्यावर आफ्रिकन - अमेरिकन विजेत्यांनी मुठी उंचावल्या होत्या तशाच या नृत्यात वापरल्या गेल्या.  बियॉन्सेने सादर केलेल्या नृत्यानंतर चालू झालेल्या या चर्चेत भर पडली ती सुपरबोलच्या आधी म्हणजे शनिवारी बियॉन्सेने तिच्या चाहत्यांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या  ’फॉरमेशन’  हे शीर्षक असलेल्या गाण्याने. या गाण्यातून  आफ्रिकन - अमेरिकन लोकांवर पोलिसांकडून केले जाणारे अत्याचार थांबवावे असं सुचविण्यात आलं आहे. ते दाखविताना एक छोटा मुलगा रस्त्यावर पोलिसांच्या समोर हाताने थांबण्याची खूण करत उभा आहे असं दाखविलं आहे आणि पोलिसांच्या मागे असलेल्या भिंतीवर ’स्टॉप शूटिंग अॲट अस’ हे वाक्य दिसतं. गाण्यात, पाण्यात बुडणार्‍या पोलिसांच्या गाडीवर बियॉन्से बसलेली दिसते.  या गाण्यातून बियॉन्सेने पोलिसांची प्रतिमा  धुळीला मिळवली असा तिच्यावर आरोप होत आहे. जे पोलिस तिला, जनतेला संरक्षण देतात त्यांची बदनामी अशारितीने करुन बियॉन्सेने काय साधलं असं लोकांना वाटतं.  वर्णभेदाविरुद्ध विरोध दर्शविण्याची सुपरबोल ही योग्यं जागा नाही या मताच्या लोकांनी राष्ट्रीय फूटबॉल संघटनेच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचं निश्चित केलं आहे.

या आधी सुपरबोलच्या इतिहासात गाजलेला प्रसंग म्हणजे  जॅनेट जॅकसन आणि जस्टीन टिंम्बरलेक यांच्या गाण्याच्या वेळेला घडलेली घटना. जस्टीन टिंम्बरलेकच्या हातून ’रॉक युवर बॉडी’ गाणं म्हणताना जॅनेटने घातलेलं जॅकेट चुकून ओढलं गेलं, फाटलं आणि त्यामुळे वक्षस्थळ उघडं पडलं. लाखो लोकांनी हा प्रसंग दूरदर्शनवर पाहिला. वार्डरोब मालफंक्शन म्हणून कुप्रसिद्ध झालेला हा किस्सा कितीतरी महिने वादळ उठवणारा ठरला किंबहुना सुपरबोल म्हटलं की प्रथम या प्रसंगाचीच आठवण आज १२ वर्ष होऊन गेली तरी लोकांच्या मनात ताजी होते. या प्रसंगाची परिणिती म्हणून कोणत्याही कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण बंदच झालं. असे अनपेक्षित लाजिरवाणे प्रसंग टाळण्यासाठी  थेट प्रक्षेपण म्हणून जे आपण पाहतो ते काही क्षणानंतर दाखविलेलं दृश्य असतं. हा प्रसंग ज्यांनी दूरदर्शनवर पाहिला नाही त्यापैकी एक होते जावेद करीम. २००४ साली तो प्रसंग पुन्हा पाहण्यासाठी काही मार्गच नव्हता. आणि नक्की काय घडलं याचं कुतूहल असलेल्या जावेद आणि त्यांचे मित्र स्टीव्ह आणि चॅड यांच्या मनात लोकं स्वत:च चित्रीकरण अपलोड करु शकतील असं संकेतस्थळ निर्माण करण्याची कल्पना आली. या कल्पनेचं मूर्त्य रुप म्हणजेच यु ट्युब. एकाच प्रसंगाने प्रसारमाध्यमामध्ये घडलेले हे २ मोठे बदल!

 सुपरबोल जसा अशा घटनांनी गाजतो तितकाच तो प्रसिद्ध आहे जाहिरातींमुळे. सुपरबोल प्रक्षेपणाच्या दरम्यान  जाहीरात झळकण्यासाठी कंपन्यांना ३० सेकंदांसाठी जवळजवळ ३० लाख डॉलर्स मोजावे लागतात. ’ क्रॅश द सुपरबोल’ अशी स्पर्धाही फ्रिटो ले ही चिप्स उत्पादक कंपनी घेते. २०१६ हे या स्पर्धेचं शेवटचं वर्ष होतं. डोरीटो चिप्सच्या जाहीरात स्पर्धेत हातात कॅमेरा आणि कल्पना असलेल्या कुणालाही भाग घेता येत होता. शेवटच्या वर्षात कंपनीने विजेत्याला हॉलिवूडमध्ये प्रवेश मिळवून देण्याचीही जबाबदारी उचलली आहे. २००६ पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत २०१३ पासून जभभरातून  कुणीही भाग घेऊ शकत होतं.  आलेल्या जाहिरातीतील कमीत कमी १ जाहिरात या खेळादरम्यान दाखविण्य़ाची हमी कंपनीची. त्याव्यतिरिक्त युएसए टुडे च्या सर्वेक्षणात सर्वात जास्त गुण मिळालेल्या जाहिरातीला ४ लाख ते १० लाख डॉलर्सचं बक्षीसही कंपनीकडून मिळत होतं. या अखेरच्या वर्षी ४५०० स्पर्धकांनी यात भाग घेतला. त्यातील ५० स्पर्धकांनी उपांन्त्यपूर्व फेरी गाठली. उपांन्त्यफेरीतील ३ स्पर्धकांपैकी विजेती ठरली ती ’डोरीटोज डॉग्ज’ जाहीरात. ३ कुत्र्यांना डोरिटो चिप्स खायची इच्छा असते आणि ती ते कशी पुरी करतात ते विनोदीपद्धतीने दाखवलेली ही जाहिरात. अवघ्या १००० डॉलर्समध्ये पूर्ण झालेल्या जाहीरीतीने जेकब चेसला हॉलिवूड मध्ये प्रवेश तर मिळालाच पण त्याचबरोबर १० लाख डॉलर्सही.

युएसए टुडे च्या सर्वेक्षणानुसार व्यावसायिक जाहिरातींमध्ये या वर्षी हंडे कंपनीने बाजी मारली. गाडी आणि गाडीतील अत्याधुनिक यंत्रणेची जाहिरात करणार्‍या  जाहीरातीत मुलगी तिच्या मित्राबरोबर पहिल्यांदाच बाहेर जात आहे. वडील आग्रहाने नवीन हंडे गाडीची किल्ली मुलाच्या स्वाधीन करतात. गाडीमधील ’कार फाईंडर’ मुळे गाडी कुठे आहे ते वडिलांना कळत राहतं आणि त्या त्या ठिकाणी  ते पोचतात, दोघांना ’एकांत’ मिळूच देत नाहीत अशी ही जाहिरात. मुलगा कंटाळून थोड्याच वेळात मुलीला घरी सोडतो. आणि बाबा मुलीला विचारतात, ’मग काय केलं तुम्ही आज?’ आणि जाहिरातीचा शेवट होतो - ’बिकॉज डॅड गोट  डू व्हॉट डॅड गोट टू डू’ या वाक्याने. सुपरबोल मध्ये दाखविल्या गेलेल्या जाहिरातीत विनोद, प्राणी आणि सेलिब्रेटी ह्या ३ गोष्टींचा वापर प्रामुख्याने केलेला होता.

सुपरबोल म्हटलं की जाहिराती, वादग्रस्त घटना जितक्या महत्त्वाच्या तितकेच प्राणीही. दरवर्षी प्राणीही ही स्पर्धा कोण जिंकेल याचा अंदाज वर्तवायला पुढे सरसावतात. एका प्राणी संग्रहालयातील माकडांनी म्हणे त्यांच्यासमोर ठेवलेल्या चिठ्ठ्यांतून कॅरोलायना पॅन्थर लिहिलेला कागद उचलला तर दुसर्‍या प्राणिसंग्रहालयात कासवं संथगतीने मार्गक्रमणा करत ब्रान्को पर्यंत पोचली.  टेडी बेअर नावाच्या साळूचे  फेसबुकवर ४५००० चाहते आहेत तर यु ट्यूबवर २४००० अनुयायी. साळूचे आत्तापर्यंत ४ पैकी ३ अंदाज अचूक ठरले. यावेळीही डेनवर ब्रान्को जिंकतील हा साळूचा अंदाज खरा झाला.

या सगळ्यात सर्वसामान्यांनी तरी का बरं मागे राहावं? पैजा मारण्याची चढाओढ सुपरबोलच्या वेळी खेळात रंगत भरते. कुठला संघ जिंकेल यावरच पैजा मारण्याइतके लोक अल्पसंतुष्ट नाहीत. या वर्षी सुपरबोल होता कॅलिफोर्नियामध्ये. तिथे भूकंप होईल का, बियॉन्से कार्यक्रम सादर करेल तेव्हा कोणत्या रंगाच्या चपला घालेल, खेळ दूरदर्शनवर दाखविला जात असताना शहराला अभिमान असलेला असलेला गोल्डन गेट पूल कितीवेळा दाखवला जाईल, पेटन मॅनिंग निवृत्ती जाहीर करेल का, केली तर ते सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळतील का असे  प्रश्न घेऊन एकापेक्षा एक पैजा मारल्या गेल्या. या पैजांमुळे काही काही वेळा कंटाळवाणा होऊ लागलेल्या खेळातही रंगत यायला लागते. तसंही कुणाच्या मनोरंजनाची काय साधनं असतील हे ज्याचं त्यानेच तर ठरवायचं.

आता राहता राहिले खेळाडू. कोणत्याही गोष्टीत यश मिळविण्यासाठी प्रत्येकाकडे ’लाभदायक’ म्हणून काहीतरी गोष्ट असतेच. दोन्ही संघातील खेळाडू याला अपवाद नाहीत. कुणी काळ्या रंगाचे बूट घालतं तर कुणी खेळताना च्युईंगम चघळतं, ते कडक राहिलं तर आपण जिंकणार अशी त्या खेळाडूला खात्री वाटते.

एक ना अनेक... सुपरबोल आणि त्याचे हे असे भन्नाट किस्से! आता काही काळ बियॉन्से प्रकरण चघळायचं आणि नंतर वाट पाहायची ती पुढच्या वर्षीच्या सुपरबोलची. का? अर्थात या सार्‍याच कारणांकरिता...

मोहना प्रुभुदेसाई - जोगळेकर
mohanajoglekar@gmail.com


Monday, February 15, 2016

यु ट्युब

आतापर्यंत आम्ही केलेल्या एकांकिकापैंकी काहींची छोटीशी झलक -  खेळ, महाभारताचे उत्तर - रामायण, भिंत, सांगायचं राहिलंच, वेषांतर, भेषांतर.














आणि इथे एकांकिकांची माहिती

Tuesday, February 9, 2016

ट्रम्प नावाचं बेफाम वादळ

राजकारणावर तज्ञ व्यक्ती अभ्यासपूर्ण लिहितात, बोलतात तसंच  सर्वसामान्यही या विषयावर जिव्हाळ्याने,
हिरीहिरीने मत प्रदर्शित करतात. बहुतांशी सर्वांचं  राजकारणाबद्दल स्वतंत्र आणि ठाम मत असतं आणि प्रत्येकाला ते हक्काने मांडायलाही आवडतं.  अगदी हेच सध्या अमेरिकेतील निवडणुक उमेदवारांच्या बाबतीत चालू आहे.  ओबामांची ८ वर्षाची कारकीर्द आता संपणार आहे. ८ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष निवडून येतील. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षातील अंतिम उमेदवार कोण ते फेब्रुवारी ते जून या दरम्यान  निश्चित होईल. सध्या वेगवेगळ्या राज्यातील उमेदवारांमध्ये होणार्‍या चर्चासत्रातून कोणता उमेदवार कोणत्या राज्यात पुढे आहे याची चाचपणी सुरु आहे. सुरुवातीला डेमोक्रॅटिक पक्षातून हिलरी क्लिंटन निवडणुकीला उभ्या राहणार आहेत का नाही याची प्रचंड उत्सुकता जनमानसात होती, त्यांनी तो निर्णय घेतल्यावर  इतर उमेदवारातून अंतिमत: त्यांची निवड होईल का या प्रश्नाची चर्चा व्हायला लागली आणि अचानक सर्वांचा रोख वळला तो  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांच्याकडे.

रिपब्लिकन पक्षांमधून जेब बुश (माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचे बंधू) यांच्यासह ११ उमेदवार या चुरसीमध्ये सामील झालेले आहेत. हिलरी क्लिंटन यांच्या विरुद्ध यातील समर्थपणे कोण उभं ठाकतं याबद्दल उलट - सुलट मतप्रदर्शन होत असतानाच डॉनल्ड ट्रम्पनी रिंगणात उडी मारली. त्यांनी ही उडी घेतली ती बहुधा मैदान गाजवण्याच्याच इराद्याने.  विरुद्ध असला तरीही डेमोक्रॅटीक पक्ष डॉनल्ड ट्रम्पवर खूश आहे. कारण? डॉनल्ड ट्रम्प तोंड उघडतात ते चौफेर फटकेबाजी करण्यासाठीच.  त्यामुळे रिपब्लिकन पक्षातील इतर उमेदवारांकडे कुणाचं लक्षच जात नाही. त्यांची मतं, योजना जनतेच्या मनात फार काळ रेंगाळत नाहीत कारण डॉनल्ड ट्रम्प सनसनाटी विधान करुन स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. या चौफेर फटकेबाजीतील ताजं  उदाहरण म्हणजे बेकायदेशीर रित्या मेक्सिकन लोकांनी अमेरिकेत प्रवेश करु नये म्हणून सीमेवर भिंत बांधण्याची त्यांनी केलेली घोषणा. या घोषणेने अमेरिकेत खळबळ माजली. मेक्सिकन जनतेत अर्थातच असंतोष पसरला.  काहीजण खूष झाले तर काहींना डॉनल्ड ट्रम्प ’... तारे तोडतायत’ असं वाटलं. प्रत्येकाला या भिंत बांधणीबद्दल आपलं  मत व्यक्त करावंसं वाटायला लागलं.  अगदी प्राथमिक शाळेत जाणारा विद्यार्थीही या  घोषणेने पेचात पडला. या मुलाने लिहिलेला  निबंधच त्याच्या शिक्षिकेने प्रसिद्ध केला. हा छोटा मुलगा म्हणतो,
"मला स्वप्न पडलं की डॉनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होणार नाहीत पण ते झाले तर आशियाई, मेक्सिकन आणि आफ्रिकन लोकांना त्यांच्या देशात परत जावे लागेल.  या देशात फक्त १२००० लोक राहतील. बरेच भारतीय अभियंते (इंजिनिअर) आहेत. ते इथे नसतील तर तंत्रज्ञान नसेल. आणि तंत्रज्ञान नसेल तर नेटफ्लिक्स नसेल. अशा देशात आवडेल राहायला तुम्हाला? अर्थात नाही!"  गमतीचा भाग सोडला तरी डॉनल्ड ट्रम्प ही वल्ली चर्चेचा विषय होण्यात यशस्वी झाली आहे.

कोण आहेत हे ट्रम्प? यशस्वी उद्योजक आणि करोडपती!  दूरदर्शनवरच्या त्यांच्या  ’अॲप्रेंटीस’ या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोचले.  १६ ते १८ व्यावसायिक या कार्यक्रमात भाग घेतात, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी.  प्रत्येक भागाच्या शेवटी ट्रम्प त्यातील एकाला काढतात तेच  ’यू आर फायर्ड’ म्हणत. हे त्यांचं वाक्य खूप प्रसिद्ध झालं तसा त्यांचा एक घाव दोन तुकडे हा खाक्याही. निवडणुकीच्या रिंगणातही ते मांडत असलेली विधानं लोकांकरता एकाचवेळी खळबळजनक, धक्कादायक तशीच मनोरंजकही आहेत .

ट्रम्प त्यांच्या बोलण्याने लोकांची करमणूक करतात त्याचवेळी एखाद्या गटाला नाखूष. मेक्सिकन लोकांनी अमेरिकेत प्रवेश करु नये म्हणून सीमेवर भिंत बांधायचं ते जाहिर करुनच ते थांबले नाहीत तर त्याचबरोबर  मेक्सिकन अमली पदार्थ या देशात आणतात, त्यांच्यामुळे या देशातले गुन्हेगार वाढतात आणि ते बलात्कारी आहेत असं त्यांना वाटतं. काही मोजकेच सभ्य मेक्सिकन या देशात आहेत असं म्हणून त्यांनी मेक्सिकन लोकांचा रोष ओढवून घेतला आहे. मेक्सिकन जनते नंतर ते मुसलमानांवर ताशेरे झोडतात. जोपर्यंत अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अंधातरी आहे तोपर्यंत मुसलमान लोकांना अमेरिकेत येण्यासाठी बंदी घालावी या विधानाने अमेरिकेत तर खळबळ माजलीच पण ब्रिटीश सरकारला ट्रम्पना ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यास बंदी आणावी की काय असं वाटून गेलं. देशाच्या भविष्याच्या बाबतीत त्यांच्या योजना ह्या अशा आहेत पण त्या पूर्णत्वाला कशा जातील या बाबत निश्चित आराखडा त्यांच्याकडे नाही त्यामुळे वास्तवापासून फारकत घेतल्यागत त्यांची योजना आणि विधानं आहेत असं मानलं जातं. हे कमी असल्यासारखं रिपब्लिकन पक्षातर्फे उभे असलेले ट्रम्प राजकारणातील व्यक्तींना वेळोवेळी आपण पैसे दिल्याचं अभिमानाने सांगतात आणि त्यांना पाहिजे ती कामं  देखील या व्यक्ती त्यामुळे करतात याचा दाखला देतात. हिलरी क्लिंटनना पैसे दिल्याचे ते मान्य करतात तेव्हा ट्रम्प यांचं कोणतं काम हिलरीनी केलं असेल असा साहजिकच प्रश्न मनात येतो. त्यावर ते सांगतात की मी हिलरीना लग्नाला हजर राहण्याचं आमंत्रण दिलं आणि विरुद्ध पक्षातील असूनही हिलरी ते नाकारु शकल्या नाहीत.

हल्लीच आयोवा येथील रिपब्लिकन पक्षाच्या वाद - विवाद सभेत सहभागी होण्याचं नाकारत त्यांनी मोठा जुगार खेळला आणि तो जिंकलाही. आयोवा येथील वाद - विवाद हा उमेदवारांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. कारण तेथील प्राथमिक निवडणुक जिंकणारा उमेदवार राष्ट्राध्यक्ष होतो असा बर्‍याच वेळा आलेला अनुभव. पण इथे येण्याचंच त्यांनी  नाकारलं ते मेगन केली या स्त्री वार्ताहारामुळे. आधीच्या एका वाद - विवादात  मेगनने त्यांच्याशी संवाद साधताना म्हटलं, की ते राजकीय व्यक्तींप्रमाणे तोलून मापून न बोलता त्यांना जे वाटतं ते बोलतात यामुळे लोकप्रिय आहेत पण कधीकधी हे बोलणं हिनपातळीकडे झुकतं. हे स्पष्ट करताना त्यांचे स्त्रियांबद्दलचे उद्गगार मेगननी त्यांना ऐकवले. त्यांनी स्त्रियांना डुक्कर, कुत्री आणि आळशी म्हटल्याची मेगननी आठवण करुन दिली. त्याला प्रत्युत्तर देताना डॉनल्डनी प्रसारमाध्यमातील रोझी ओडानल्डबद्दलच आपण तसं म्हटलं आहे असं सांगितलं. पण ते खरं नाही आणि सर्वच स्त्रियांबद्दल त्यांचं तसं मत असल्याचं मेगन यांनी ठामपणे सांगितल्यापासून डॉनल्डनी मेगन यांच्याशी कोणत्याही पद्धतीने संपर्क येऊ न देण्याचं ठरवलं. त्याचीच परिणिती म्हणून आयोवा मध्ये पुन्हा एकदा मेगन केलीच प्रश्नकर्त्या असणार हे समजल्यावर या चर्चासत्राला हजर न राहण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या अनुपस्थितीत आयोवा येथील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा  वाद - विवाद किती लोकं पाहतील? ट्रम्पनी ते नसल्याने लोकांचा या वाद - विवादामधला रस नाहीसा होईल असं म्हटलं आणि प्रत्यक्षात तसं झालंही. गेल्या उन्हाळ्यात रिपब्लिकन पक्षातील उमेदवारांचं वाद - विवाद सत्र २४ मिलियन लोकांनी पाहिलं तर आयोवातील वाद - विवाद  सत्र फक्त १३ मिलियन लोकांनी. कहर म्हणजे आयोवातील ही वाद - विवाद सभा जिंकली कुणी या प्रश्नाचं उत्तर पाहता निवडणूक पूर्व गोष्टी किती मनोरंजक आहेत याची खात्री पटते. सर्वसामान्यांच्या मते हा वाद - विवाद खर्‍या अर्थी जिंकला तो मेगन केलींच्या कृत्रिम पापण्यांनी!

ट्रम्प हे इतकं वादग्रस्त व्यक्तिमत्व असूनही ते लोकप्रियतेच्या शिखरावर  सातत्याने का आहेत आणि खरंच ते राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात असं कितीजणांना वाटतं? ते लोकप्रिय आहेत ते त्यांच्या वक्तव्यांमुळे. लोकांची प्रचंड करमणूक त्यांच्या उद्गगारांनी होत असल्यामुळे आता ट्रम्प काय बोलणार या प्रतीक्षेत लोक असतात. राजकारणाशी काडीचाही संबंध नसताना ते राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात असंही मानणारे असंख्य आहेत. त्यांना पाठिंबा असणार्‍यांच्या मते ते उत्तम व्यावसायिक आहेत त्यामुळे व्यवस्थापनचा उत्कृष्ट अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. डॉनल्ड राष्ट्राध्यक्ष झाले तर सीमेवर नुसतीच भिंत  बांधणार नाहीत तर त्याचा खर्च मेक्सिकन सरकारकडून घेण्याचा त्यांचा मानस आहे यामुळेही जनता खूष आहे. ते व्यावसायिक असल्याने नोकर्‍या निर्माण करण्याचा दांडगा अनुभव देशाचा कारभार हाकताना नक्कीच कामी येईल, या देशात नोकर्‍यांची उपलब्धता वाढेल याची खात्री अनेकांना आहे. त्यांच्या कंपनीचं अनेकवेळ दिवाळं निघूनही त्यातून ते बाहेर आले याचाच अर्थ ते पुनर्बाधणी करु शकतात.  ते राष्ट्राध्यक्ष झाले तर व्हाईट हाऊस मधील कामात गर्क होतील आणि वेळेच्या अभावी त्यांचा आता कंटाळवाणा झालेला ’अॲप्रेंटीस’ कार्यक्रम बंद करावा लागेल अशी स्वप्न पाहणारेही काहीजण आहेत.

घोडामैदान फार लांब नाही. रिपब्लिकन पक्ष त्यांना राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी देतो की नाही ते लवकरच कळेल. ८ वर्षापूर्वी रिपब्लिकन पक्षातील सारा पेलन नावाच्या वादळाने देशात खळबळ माजवली होती. याच सारा पेलन डॉनल्ड ट्रम्पना पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी नुकत्याच उभ्या राहिल्या आहेत. एका वादळाची दुसर्‍या वादळाला साथ. आता डॉनल्ड ट्रम्प नावाचं हे वादळ आणखी कोणाकोणाला झोडपतं ते पाहत राहायचं. दुसरं काय!

http://www.loksatta.com/lekha-news/popular-donald-trump-1199210/

Wednesday, January 27, 2016

लॉटरी!



अमेरिकेत गेल्या आठवड्यापासून सरकारी लॉटरीच्या आकड्यात ती अद्याप न जिंकल्याने भर पडत चालली
आहे तशीच ती विकत घेणार्‍यांच्या संख्येतही. १.५ बिलियन डॉलर्स!  लागली लॉटरी तर? फक्त २ डॉलर्समध्ये मिळणार्‍या एका तिकिटाला जिंकण्याची शक्यता किती? तर २९० मिलियन तिकिटातून एक. तरी दरवर्षी जवळ जवळ ७० बिलियन लोक लॉटरी तिकिट खरेदी करतात. या वेळेलाही प्रत्येकाला आपणही जिंकू शकू असा विश्वास वाटायला लागलाय. बातम्या पाहताना आम्हीदेखील घरात लॉटरी लागली तर काय करु याचे बेत करुन टाकले. लहानपणी वडील दर महिन्याला लॉटरीचं तिकीट घ्यायचे. कधी ५० रुपयांच्या वर लॉटरी लागली नाही तरी महाराष्ट्र राज्य लॉटरीचं तिकीट घरात यायचं. रोज लॉटरीच्या बातम्या पाहून आज आपणही तिकीट आणूया असा बेत करुन टाकला. पण लॉटरी जीवनात आनंद घेऊन येते की  शेवटी आनंद हा मानण्यावर हेच खरं?

अमेरिकेत, पॉवर बॉल आणि मेगा मिलियन ही  लॉटरींची दोन मोठी नावं. १९९२ साली सुरु झालेला पॉवरबॉल कमीत कमी ४० मिलियनचा तर १९९६ सालापासून सुरु असलेली मेगा लॉटरीची  कमीत कमी रक्कम १५ मिलियन डॉलर्स  असते. पॉवर बॉलचं १ तिकिट २ डॉलर्सला तर मेगा मिलियनच्या एका तिकिटाची किंमत १ डॉलर. सध्या कुणाकडेच विजेते आकडे नसल्याने पॉवरबॉलची रक्कम वाढत चालली आहे. दर बुधवारी आणि शनिवारी निकाल जाहीर होतो. ६९ चेंडूमधले ५ आकडे जुळले तर तुमचं नशीब उजळतं. पण त्या व्यतिरिक्त असणारा आणखी १ चेंडू तुमचं आयुष्य बदलून टाकणारा ठरतो. या भाग्यशाली चेंडूवरचा आकडा आणि उरलेले ५ आकडे तंतोतंत जुळले की झालात तुम्ही मिली किंवा बिलि नअर.

देशात विकली जाणारी सगळीच्या सगळी तिकिटं विकत घेतली तरीही लॉटरीतून तुम्हाला फायदाच होऊ शकतो इतकी मिळणारी लॉटरीची रक्कम जास्त आहे. सर्व तिकिटांची किंमत आहे ५८४ मिलियन डॉलर्स आणि यावेळची लॉटरी आहे ९३० मिलियन डॉलर्सची.  अडचण इतकीच की इतकी सगळी तिकिटं विकत घेणं एखाद्या व्यक्तीला शक्यच नाही. पूर्ण देशात तिकिट विक्री होते. प्रत्येक ठीकाणाहूनची सर्व तिकिटं घेणं निव्वळ अशक्य. तरीही फेब्रुवारी १९९२ मध्ये काही  कंपन्यांनी एकत्र येऊन हे करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला ज्यात सर्वांना मिळून २.५ मिलियन डॉलर्सचीच तिकटं विकत घेता आली. पण लॉटरीसाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या गेल्याच.  अशीच एक घडली २००५ साली. पॉवरबॉलच्या लॉटरीचे ११० लोकांचे ५ आकडे तंतोतंत जुळले आणि  जवळजवळ २० मिलियन डॉलर्सही या ११० जणांना मिळाले. काहीतरी गोंधळ असल्याची शंका अधिकार्‍यांना आली. आणि लवकरच त्याचं रहस्यही उलगडलं. न्यूयॉर्क मधील वोनटोन कंपनीने त्यांच्या बिस्किटांतून (फॉरच्यून कुकीज) ६ आकडे नशीबवान म्हणून वितरित केले होते आणि प्रत्यक्षात ते खरंच तसे निघालेही. पाच आकडे तर जुळले. जर सहावा आकडाही जुळला असता तर ह्या ११० लोकांना बिलिनिअर होण्याची संधी लाभली असती. बिस्किटांतला ६ वा आकडा होता ४० आणि लॉटरीमधील आकडा होता ४२.

मात्र आत्तापर्यंत जितक्या लोकांना लॉटरी लागली त्यातील फार कमी जणांनी ती खर्‍या अर्थी उपभोगली. बाकीच्यांना लॉटरीबरोबर आलेले ताण - तणाव झेपले नाहीत. अनपेक्षित धनलाभाने आयुष्यं खर्‍या अर्थी बदलतं. कधी सुखी जीवनाच्या मार्गावर पाऊल पडतं तर कधी हा पैसा डोकेदुखी होऊन जातो. अचानक तुमचं आयुष्य प्रकाशझोतात येतं. असंख्य समाजसेवी संस्था, उपचारांसाठी आर्थिक मदतीची अपेक्षा असणार्‍या रोग्यांचे नातेवाईक, गुंतवणुकीसाठी गळ घालणार्‍या कंपन्यां असे कितीतरी फोन वेळी अवेळी घणघणायला लागतात, कधीही न पाहिलेल्या नातेवाइकांचा जीवनात अलगद शिरकाव होतो, मित्र - मैत्रीणींची जवळीक नको तितकी वाढायला लागते. अशी एक ना अनेक उदाहरणं.

२००५ साली लॉटरी जिंकल्यावर लुईसने आपली स्वप्न पूर्ण केली. नवीन घर घेतलं. दाराशी नवीन गाडी आली. लुईसच्या नवर्‍याने, किथने बेकरीतली नोकरी सोडली आणि दिवस अंगावर यायला लागला. मन रमविण्यासाठी तो दारुकडे वळला. व्यसनाधीन झाला. दारुच्या व्यसनातून तो प्रयत्नपूर्वक बाहेर तर पडला पण जेम्स नावाच्या अनोळखी गृहस्थाने  नफ्याचं आमिष दाखवीत वेगवेगळ्यात धंद्यात त्याला पैसे गुंतवायला भाग पाडलं. त्याने गुंतवलेले सगळे धंदे नामशेष झाले. हातातला पैसा संपला तसा पुन्हा तो दारुकडे वळला. आत्तापर्यंत साथ देणारी त्याची पत्नीही कंटाळून वेगळी झाली. बेकरीतील कामगाराचं साधंसुधं जीवन पैसा आल्यावर रसातळाला गेलं आणि आलेल्या ताणातून, दारुने केलेल्या शारीरिक हानीमुळे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने किथचं २०१० साली निधन झालं.

केली रॉजरने ३ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकल्या जिंकल्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींवर गाडी, घर अशा महागड्या भेटवस्तूंचा वर्षाव केला. कपडे, सुंदरतेचा हव्यास बाळगत त्या पायी केलेल्या अतोनात उधळपट्टीतून  हाती आलेला पैसा केव्हा वाहून गेला  ते केलीला समजलंही नाही. मित्र - मैत्रिणींना आनंद मिळावा ही तिची इच्छा असली तरी लवकरच प्रत्येकजण तिच्या पैशावर डोळा ठेवून तिच्याशी मैत्री करत आहेत असं तिला वाटायला लागलं. आलेल्या अनुभवांनी निराश होत दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्नही तिने केला आणि अखेर सर्व पैसा गमावल्यावर आता मोलकरणीची कामं करणारी केली लॉटरीपायी आलेले अनुभव विसरुन आनंदी जीवन जगण्याची इच्छा व्यक्त करते.

५५ वर्षाच्या कत्रांटदार कंपनीचे अध्यक्ष असलेल्या व्हिटेकरनी ३१५ मिलियन डॉलर्सची लॉटरी जिंकली तेव्हाच त्यातील बरीचशी रक्कम देणगी, ट्रस्ट यासाठी राखली इतकंच नाही तर जिथून त्यांनी हे तिकिट घेतलं होतं त्या दुकानातील कर्मचारी स्त्रीलाही त्यांनी घर, गाडी आणि रोख रक्कम दिली. असं असताना मग काय चुकलं? व्हिटेकर मित्र - मैत्रिणींसमवेत आनंद साजरा करायला वेगवेगळ्या क्लबमध्ये जायला लागले, दारुच्या अधीन झाले, जुगाराचा नाद लागला. मुलीला, नातीला वेळोवेळी आवश्यकता नसताना ते पैसे देत राहिले आणि त्यांच्याबरोबरीने त्या दोघी अमली पदार्थांच्या आहारी गेल्या.  त्यातच दोघींनी आपला जीव गमावला.  सुखासीन आयुष्य जगणार्‍या व्हिटेकर कुटुंबाचं आयुष्य लॉटरीच्या पैशांनी धुळीला मिळालं.

३१ मिलियन डॉलर्सची लॉटरी अब्राहमनी जिंकली. सुरुवातीची ३ वर्ष  सुखसमाधानातही गेली. पण अचानक एके दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचा खून करणार्‍या स्त्रीला अटक झाल्यावर अब्राहमनी लॉटरी जिंकल्यावर त्यांच्याशी मैत्री करुन जवळजवळ २ मिलियन डॉलर्सला त्यांना लुबाडल्याचं आणि नंतर मारल्याचं कबूल केलं. शिकागो येथील उरुज खानही  लॉटरी लागल्यानंतर महिन्याभरात मॄतावस्थेत सापडले. भारतातून आलेल्या खान कुटुंबाचं जीवन सुखी म्हणावं असंच. उरुजना असलेला लॉटरीचा नाद सोडल्यास. लॉटरी लागल्यावर मिळालेल्या पैशाचं काय करायचं याबद्दल त्यांच्या कुटुंबात वाद - विवाद होते आणि त्यातूनच त्यांना विष घालून मारण्यात आलं असावं अशी शंका असली तरी त्यांच्या मारेकर्‍याचा शोध अद्याप लागलेला नाही.

बिलींच्या आयुष्यानेही लॉटरीमुळे वेगळ्या मार्गावर वाटचाल सुरु केली. मोठ्या घरात राह्यला जायचं घरातल्या सर्वांचंच स्वप्न पूर्ण झालं. बायको, मुलांना नवीन गाड्या घेऊन देता आल्या. इतकंच नाही नातेवाइकांनाही त्यांनी खूश ठेवलं. कुणालाही मदतीची गरज असली की रोख पैसे देण्याची त्यांची तयारी असे. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येकालाच त्यांची गरज आहे आणि इतक्या सर्वांना एकट्याने पुरं पडणं निव्वळ अशक्य. पण ते जमेल तशी मदत करत राहिले. पत्नीबरोबर सतत दुसर्‍यांना अशी पैशाची मदत करण्याबद्दल त्यांचे वाद व्हायला लागले आणि अखेर लॉटरी जिंकल्यावर केवळ दीड वर्षात निर्माण झालेल्या ताण तणावांनी आपलं जीवन संपवून त्यांनी सगळ्याला पूर्ण विराम दिला.

अर्थात लॉटरीचा पैसा व्यवस्थित गुंतवून, आपला दिनक्रम व्यवस्थित सांभाळणारीही माणसं अनेक आहेत. एमा आणि ल्युक त्यातलेच एक. ल्यूक आणि एमा मॅकडोनल्ड मध्ये काम करता करता प्रेमात पडले पण स्वतंत्र घरासाठी दोघांचा एकत्रित पगारही पुरेसा नसल्याने पालकांच्या घरीच त्यांना राहावं लागत होतं. मिलियन डॉलर्सची लॉटरी लागल्यावर नोकरी सोडायची नाही हा निश्चय काही काळापुरता टिकला. पण मुलाबरोबर वेळ घालवण्याला दोघांनी प्राधान्य दिलं, त्याचबरोबर नोकरीचा राजीनामा. पण काही दिवसातच सहकारी, नोकरी यांच्या आठवणीने चैन पडेनासं झालं. ल्यूकने पुन्हा जुन्याच जागी नोकरीला सुरुवात केली. लॉटरी पैशावर मिळणारं व्याजंही त्या दोघांच्या पगारापेक्षा जास्त होतं पण दैनंदिन जीवन न बदलता लॉटरीच्या पैशाचा आनंद उपभोगणं दोघांना जास्त सुखावह वाटलं.

रॉबिनसनने लॉटरी जिंकल्यावर शाळेतील शिक्षकांमुळे प्रेरित होऊन मुलांसाठी कार्यशाळा उभी करण्यासाठी लॉटरीतील बरीचशी रक्कम देऊ केली. आज २० वर्षानंतर ती कार्यशाळा उत्तमरीत्या चालविली जात आहे. बर्‍याच जणांनी मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे गुंतवले तर काहीजणांनी आपल्याला लॉटरी लागली आहे हे काही महिने इतरांना कळू न देता पुढचे ताण टाळण्याचा प्रयत्न केला.  बहुतेकांनी सामाजिक जाणिवेने आपल्याला मिळालेल्या रकमेतील बरेच पैसे देणगी म्हणून देण्याला प्राधान्य दिलं.  थोडक्यात काही जण आधीही आनंदी होतेच. श्रीमंतही झाले. मनाने होतेच आता आर्थिक दृष्ट्याही.

खरंच पैशाने आयुष्यात आनंदाचा शिरकाव होतो का? यावर झालेल्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की पगारवाढ झाली की नक्कीच सुखात भर पडते पण एका विशिष्ट वाढीनंतर त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. किंबहुना पैशाने सुख विकत घेता येत नाही ह्याचाच पैशाचा ओघ स्वत:कडे वळल्यावर बहुतेकांना शोध लागतो.

आणि तरीही आपण लॉटरी लागली तर... हे स्वप्न पाहणं विसरत नाही!

 

पूर्वप्रसिद्ध - लोकसत्ता - चतुरंग पुरवणी - http://www.loksatta.com/lekh-news/lottery-1192070/

Saturday, January 16, 2016

ग्लोबल कोकणी - अमेरिकन मंचावर...

(लोकमतच्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल कोकणी विशेषांकातील माझा लेख.)

"आय हॅव टू पिक अप द रोल." वाटेत घोकून घोकून पाठ केलेलं वाक्य म्हटलं आणि विक्रेतीच्या चेहर्‍यावरचे गोंधळलेले भाव बघून मी बावचळले.
"रोल?" तिने चमत्कारिक उच्चारात विचारलं.
"यस." मी तोंड वेडंवाकडं करत उच्चार केला. गोर्‍यांशी बोलताना तोंड थोडं वाकडं केलं की आपल्या फ्लाइंग राणीच्या वेगाला जरा खीळ बसते आणि आपण काय बोलतोय ते त्यांना समजतं असा एक फंडा कुठूनतरी माझ्या डोक्यात शिरला होता. तो वापरायची ही पहिली संधी. माझं तोंड बराचवेळ वाकडंच राहिलं पण तिला काही रोल म्हणजे काय ते समजेना. कुठून ही दुर्बुद्धी सुचली कोण जाणे.  या देशात पाऊल टाकलं आणि आठवड्याच्या आत रोल आणायला बाहेर. काय करणार? विमानतळापासून फोटो काढायला सुरुवात केली होती. विमानातल्या  संडासाचंही अप्रूप होतं २० वर्षापूर्वी. रोल पटकन संपलाच त्यामुळे. आता फोटो भारतात पाठवून देण्याची घाई. तरी नवरा म्हणत होता,
"जरा टी. व्ही. बघ थोडेदिवस. त्या टी. व्ही. तली माणसं जशी बोलतात ना तशीच बोलतात ही सगळी. त्यांचं कळायला लागलं तरी आपलं बोलणं त्यांना कळणं हे पण लढाईवर जाण्यासारखंच असतं. तेव्हा सबुर!" पण नवर्‍याचं न ऐकणं हा पत्निधर्म निभावत मी आखाड्यात उतरले. आता रोल, रोल करता करता नवराच काय, माझी  शाळाही आठवली. कणकवलीच्या एस. एम. ज्युनिअर महाविद्यालयात शुक्ल सर इंग्रजी बोला, इंग्रजी बोला म्हणून कानीकपाळी ओरडायचे तो सल्ला ऐकला नाही याचा पश्चाताप व्हायला लागला. अखेर माझ्या आणि विक्रेतीच्या मध्ये असलेल्या अभेद्य भितींतून म्हणजे काचेच्या लांबलचक टेबलावरुन बोट दाखवत, खाणाखुणा करत तिच्या पाठीमागे असलेल्या मोठ्या कपाटातल्या वरतून चौथ्या रांगेतल्या कप्प्यात असलेला कॅमेरा तिला दाखविण्यात मी यशस्वी झाले. मग तो कॅमेरा हातात धरुन, फोटो काढण्याची कृती करत, रोलची जागा दाखवण्याचा कार्यक्रम पार पडला. अखेर तिला मला काय हवंय ते समजलं आणि ती आनंदातियाशाने किंचाळली,
"यु मीन फिल्म?" आता मी गोंधळले. ही लोकं रोलला फिल्म म्हणतात? पण तोंड वाकडं करत बोलण्याची माझी खुमखुमी थंडावली होती. आता ती जे काही देईल ते रोल म्हणून वापरायला मी तयार होते. रोल घेऊन घरी आले आणि नवर्‍याला म्हटलं,
"शाळेत शिक्षकांचं ऐकायला हवं होतं रे."
"आम्ही ऐकायचो." त्याचा शांतपणा ढळला नाही.
"मी माझ्याबद्दल बोलतेय."
"बरं, बरं पण इतकं का भाग्यं उजळलं शिक्षकांचं?"
"हे बघ, तुला माहितीच आहे. माझं काही तुझ्यासारखं शिकण्याचं माध्यम इंग्रजी नव्हतं. मराठी माध्यमातून शिकलेली, कोकणात जन्मलेली, वाढलेली मी."
"तू पालघरला होतीस ना? ते कुठे कोकणात?"
"तू म्हणजे ना. काही वर्ष होतो रे पालघरला. पण जन्म कणकवलीचा, प्राथमिक शिक्षण देवरुखच्या भोंदे शाळेत, उच्चमाध्यमिक कणकवलीच्या एस. एम. हायस्कूलमधून आणि त्यानंतर कणकवली महाविद्यालयात.  महाविद्यालयीन आणि उच्चमहाविद्यालयीन रत्नागिरीला गोगटे जोगळेकर महाविद्यालयात. फक्त माध्यमिक शिक्षण पालघरच्या आर्यन एज्युकेशन मध्ये. म्हणजे अमेरिकेत यायच्या आधीचं आयुष्य जवळजवळ कोकणातच गेलं ना?"
"पण हे तू मला का ऐकवते आहेस?"
"कधी वाटलंच नव्हतं ना  परदेशात येईन म्हणून. इंग्रजी हीच बोलण्याची भाषा होऊन जाईल याची कल्पनाही केली नव्हती. तुझ्याबरोबर म्हणून या देशात पाऊल टाकलं पण तिकडे जशी माझी स्वत:ची ओळख होती आकाशवाणी, लेखन, अभिनय या माध्यमातून  तशीच इथेही ती व्हायला हवी असं वाटतं. पण सुरुवात उच्चारांपासून आणि इंग्रजी बोलण्याच्या आत्मविश्वासाच्या अभावापासून होतेय ना म्हणून वाटतंय ऐकायला हवं होतं शिक्षकांचं. आम्हाला इंग्रजीचे शिक्षक नेहमी म्हणायचे अभ्यासापुरतं इंग्रजी शिकू नका. ते वापरा, बोला. कुठेही तग धरता येईल त्यामुळे. आज ते पटलं."
"तुझ्या शिक्षकांना कळवून टाक हे. बरं वाटेल त्यांना. आणि इतकं काही कठीण नाही इंग्रजीची सवय करणं. जमेल तुला." त्याने विषय संपवला. माझ्या मनात मात्र बराचवेळ अमेरिकेला येईपर्यतचा काळ फेर धरत राहिला.

वेगवान आयुष्य मागे पडून अचानक शांतपणाने प्रवेश केला होता. नव्या देशाची, नवीन जगाची अपूर्वाई होती तशीच इथे कसं रुळणार याची धास्तीही. H4 वर आल्याने नोकरी करता येणार नव्हती, काही शिकायचं म्हटलं तर त्या त्या राज्यात किमान १ वर्ष राहिल्यानंतरच शिक्षणाचा खर्च कमी होऊ शकत होता. २ च वर्ष भारतीय कंपनीने पाठवलं होतं तर फारशी कशाची चिंता न करता हे नवं जग अनुभवावं असंही वाटत होतं. शेवटी सुरुवातीला तेच केलं. हातात लेखणी होती. रत्नागिरी आकाशवाणीसाठीचं लेखन, रत्नभूमीसाठी महाविद्यालयीन जीवनात चालवलेलं ’तरुणाई’ सदर, आमचं दिनांक साठी केलेलं लेखन आणि अधूनमधून सकाळ, रत्नागिरी टाईम्स, साप्ताहिक सकाळ, लोकसत्ता तसंच विविध मासिकांमधून लिहिलेले लेख, कविता, कथा या बळावर अमेरिकेतले अनुभव वेगवेगळ्या स्वरुपात कागदावर उतरायला लागले. १९९५ च्या काळात लेखन पोस्टाने किंवा तत्कालिक घडामोडींवरील लेख वर्तमानपत्रांना फॅक्सने पाठवणे हे दोनच मार्ग होते. लिहिण्यासारखं खूप होतं. त्यात दिवस पुरेनासे झाले. दरम्यान नवर्‍याच्या नोकरीमुळे भटकंतीही चालू होती. अमेरिकेतल्या राज्याराज्यामधलं जीवन म्हटलं तर एकसारखंच पण तरीही किती वेगळे पैलू असलेलं आहे ते जाणवायला लागलं. अमेरिकन मित्र, मैत्रीणींबरोबरच इतर देशातल्या लोकांशीही  मैत्री व्हायला लागली. भारतात महाराष्ट्रापुरतं मर्यादित असलेलं अनुभवविश्व व्यापक झालं. लेखनातून व्यक्त होत राहिलं. त्याचाच परिपाक म्हणजे,  उन्मेष प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला ’मेल्टिंग पॉट’ हा कथासंग्रह, ज्याला कोमसापचा उत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार प्राप्त झाला. पाहता पाहता २ वर्षांची आणखी काही वर्ष झाली आणि अजून काही वर्ष इथेच राहायचं ठरल्यावर नोकरीचे आणि इथल्या प्रवाहात सामील होण्यासाठी  लागणार्‍या शिक्षणाचे वेध लागले. संगणकीय शिक्षणाला तेव्हाही तेवढंच महत्व होतं पण ते आवडेल की नाही याची खात्री नव्हती त्यामुळे आधी छोटे छोटे कोर्स करुन अंदाज घ्यायचं ठरवलं. वयाच्या ३० शी नंतर पुन्हा महाविद्यालयात पाऊल टाकायचं आणि तेही पूर्णपणे परक्या देशात या विचारानेच अस्वस्थपणा आला होता. अस्वस्थ मनाने वर्गात प्रवेश केला आणि क्षणात तो पळालाही. माझ्या आई - वडिलांच्या वयाचे विद्यार्थी पाहून मी अगदीच बालवयात महाविद्यालयात आल्याची खात्री झाली आणि एक वेगळाच आत्मविश्वास आला. नंतर वर्ग शिक्षक आणि विद्यार्थ्यांमुळे तो टिकलाही. इथल्या शिक्षणाचा ढाचा वेगळा आहे. प्रात्यक्षिकांवर जास्त भर असतो, पाठांतरापेक्षा विषय समजण्याला महत्त्व आणि शिस्तीपेक्षा मित्रत्वाचा मार्ग स्वीकारला जातो. एकमेकांच्या अडचणी ओळखून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासंदर्भात अजूनही एक आठवण मनात ताजी आहे.
मुलाला सांभाळणारी मुलगी त्या दिवशी येऊ शकली नाही तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून मुलगा माझ्याबरोबर आला तर चालेल का असं मी मिस्टर स्मिथना घाबरत घाबरत विचारलं. तात्काळ त्यांनी होकार भरला. मुलाला घेऊन वर्गात पाऊल ठेवलं आणि मिस्टर स्मिथनी माझ्याकडे हसून पाहिलं. तिथेच थांबायला लावलं.
"आज आपल्या वर्गात एक छोटा दोस्त आला आहे." पूर्ण वर्गाला मिस्टर स्मिथनी माझ्या मुलाची ओळख करुन दिली. ६ वर्षाच्या माझ्या मुलाने लाजत लाजत ’हाय’ केलं. वर्ग होता महाविद्यालयाचा आणि मुलं होती वय वर्ष ३० पासून ७५ च्या आसपास. तो दिवस त्याच्यासाठी आणि माझ्यासाठीही कायमचा स्मरणात राहिला

शिक्षण चालू असतानाच नोकरीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र आली.   मी शिकता शिकता बदली शिक्षकांची तात्पुरती नोकरी करायचं ठरवलं. त्या वेळेला शिक्षकांची आवश्यकता आहे असं सतत टी. व्ही. वर आवाहन असायचं. म्हटलं, जमलं तर करुन पाहू.   मुलगा म्हणाला,
"आई, तू  शिकवणार शाळेत जाऊन?"
"मग? शिकलेली आहे मी भारतात."
"पण तुला नाणी कुठे येतात ओळखता?"
"तुला कुणी सांगितलं?"
"मी क्वार्टर मागितलं की तू एकेक नाणं काढून त्याच्यावरचं चित्र बघतेस, चित्र कुणाचं ते कळत नाही तुला."
"हे बघ, गांधीजी असतात का त्या नाण्यावर? नाही ना? मग कसं ओळखणार रे?"
"पण मग कशाला बघतेस चित्र?"
"उद्योग नाही म्हणून. पुढे बोल."
"क्वार्टर म्हणून डाईम देतेस असं सांगत होतो."
"भारतातली नाणी आणून दे मला. बघ किती पटकन ओळखते ते. तू अभ्यासाला बस आता."
त्याला घालवला खरा, पण शिकवायला सुरुवात केल्यावर इथली शिक्षणपद्धती, शिकवण्यातील पद्धतशीरपणा, प्रयोग, वेगळेपणा याचा सुखद अनुभव घेतानाच काही गमतीदार प्रसंगही घडले.

शाळेचा पहिलाच दिवस. दुसरीचा वर्ग. मार्च महिन्यातला सेंट पॅट्रीक डे.
गोष्ट वाचून दाखवायची होती. तसं सुरळीत चाललं होतं. Leprechaun इथे गाडी अडली. उच्चार लेप्रचॉन की लेप्रचन? का काहीतरी वेगळाच. मी  एकदा हा एकदा तो, दोन्ही उच्चार करत गाडी हाकली. घरी येऊन म्हटलं आज लेपरचनची गोष्ट सांगितली. मुलाचं आपलं खुसखुस, खुसखुस.
"हसू नको. नीट सांग काय ते."
"लेप्रीकॉन आहे ते" वर म्हणाला,
"तू माझ्या वर्गावर येऊ नको. घरीच शिकव मला काय असेल ते."
त्याच्या नाही पण दुसर्‍या वर्गांवर जाण्याची माझी चिकाटी दांडगी. दुसर्‍या दिवशी गेले तर संगीताचा वर्ग.  मराठीतही संगीताचा गंध नसताना एकदम इंग्रजीत संगीत कसं शिकवायचं?
मी कार्यालयात गेले. माझे थरथरणारे हात, भेदरलेला आवाज याने काही फरक पडला नाही,
"आज वेळ मारून ने. उद्या कुणालातरी आणतो आम्ही."
उडालेच, बदली शिक्षकाचं माझं हे काम वेळ मारून नेणं होतं?  मेलं, घरी तसंच, इथेही तेच. कुणाला म्हणून किंमत नाही माझ्या कामाची... आलीया भोगासी!
त्यानंतर रोज रात्री इंग्लिश गाणी शिकण्याचा सपाटा लावला मी घरी कारण दुसर्‍या दिवशी आणखी कुणाला तरी न आणता वेळ मारुन न्यायला त्यांनी मलाच तिथे ठेवलं. शाळेने माझी सलग पंधरा दिवसासाठी संगीत शिक्षिका म्हणून नेमणूक करून टाकली. पोरं कितपत शिकली देवजाणे पण मला बरीच गाणी यायला लागली आणि नवरा, मुलगा दोघांना जी काही इतर गाणी येत तीही विसरले ते दोघं. नवरा तर म्हणाला,
"तसा मी बरा कमावतोय की, तुला खरंच गरज आहे का गाणीबिणी शिकवण्याची?" मी उत्तर न देता मोठ्याने गाणं म्हणत राहिले आणि आगळेवेगळे अनुभव घेत  ३ वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत राहिले.

दरम्यान हातात पदवी आली होती. जिथे शिकत होते तिथेच आधी इंटर्नशिप करुन वेब प्रोग्रॅमर म्हणून स्थिर झाले. महाविद्यालयात असलेले जवळजवळ १८० वेगवेगळे विभाग आणि त्यांची संकेतस्थळं तयार करणं, अद्ययावत ठेवणं हे आमच्या गटाचं काम. कार्यालयात सर्वांना नावानेच संबोधण्याच्या प्रथेमुळे आपसूकच जवळीक निर्माण होते.  एकमेकांना सांभाळून, अडीअडीचणी ओळखून मार्ग काढणं महत्वाचं मानलं जातं. कोणत्याही कामाचं व्यवस्थित नियोजन,  कागदावर सारा आराखडा करणं हे सुरुवातीला फार कंटाळवाणं वाटायचं पण त्याचमुळे ठरल्याप्रमाणे काम  पार पाडलं जातं आणि त्याचा दर्जाही उत्तम राखता येतो हे लक्षात आलं आणि तेच अंगवळणीही पडलं.

एकीकडे नोकरी बरोबरच लेखनही चालू असतानाच अभिनयाची मूळ आवड स्वस्थ बसू देत नव्हती. कणकवलीच्या नाथ पै एकांकिकांमधून आधी शालेय गटातून, नंतर बागेश्री संस्थेतून काम करुन मिळवलेली अभिनयाची बक्षिसं, रत्नागिरीच्या जिज्ञासा संस्थेतून गाजवलेल्या अनेक स्पर्धांच्या आठवणी स्वस्थ बसू देत नव्हत्या. त्यातूनच ’अभिव्यक्ती’ या नाट्यसंस्थेची निर्मिती झाली. दरवर्षी व्यावसायिक रंगमंच भाड्याने घेऊन दोन एकांकिकाचं सादरीकरण सुरु झालं. दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, काहीवेळा एकांकिका लेखन, जाहीरात, तिकीट विक्री अशा सगळ्या बाजू नवर्‍याच्या आणि माझ्या मुलांच्या मदतीने  तसंच येथील स्थानिक कलाकारांच्या मदतीने सांभाळत गेली ८ वर्ष दरवर्षी इथे एकांकिका सादर करतोय. त्याला मराठी प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे.

मागे वळून पाहताना जाणवतं ते हेच की परक्या देशात १९९५ च्या आसपास मुळं रुजवणं सोपं नक्कीच नव्हतं. आतासारखी संपर्काची आधुनिक साधनं नव्हती. १५ दिवसांनी भारतात फोन व्हायचे. पत्र पाठवलं की ३ आठवडे आतुरतेने उत्तराची वाट पाहण्यात जायची. पण हा परका देश ’आपला’ कधी होऊन गेला तेच समजला नाही. भारतात कुणी अमेरिकेबद्दल ऐकीव माहितीवर तारे तोडले की तळमळीने आम्ही खर्‍या परिस्थितीची जाणीव करुन देतो आणि इकडे आमच्या सहकार्‍यांनी, अमेरिकेन मित्र, मैत्रिणींनी भारताबद्दल काही शेरे मारले की त्याच कळकळीने गैरसमज दूर करण्याच्या प्रयत्नाला लागतो. दोन्ही देश आमचेच. एक कर्मभूमी, दुसरी मातृभूमी!

Tuesday, January 5, 2016

पोस्ट

"बॅग भर." बहीणीने हुकुम सोडला.
"पोस्टात जायचं आहे ना? मग बॅग कशाला?" माझ्याकडे सहानुभूतिपूर्वक नजर टाकून दोघी बहिणी हसल्या,
"पोस्टाचा कारभार विसरलेली दिसतेयस. भर बॅग तू. कळेलच तुला"
"३ दिवसांचे कपडे टाक. फक्त बाहेरचे. आतले नको. बाकीचं मी बघते." बहिणाबाईंचा झपाटा पाहून मी बॅग भरली.
"चलाऽऽऽऽ" तिने आरोळी ठोकली. मी चाकाची बॅग, ती पत्र्याची बॅग आणि तिसरी एकावर एक भलेमोठे डबे रचलेला जेवणाचा डबा घेऊन बाहेर पडलो.

घराच्या बाहेर पाऊल टाकलं. बाहेर पडल्या पडल्या चार - दोन रिक्षा सामानाकडे वळून बघत बघत रिकाम्याच नाहीशा झाल्या. अखेर एक थांबला.
"ताई, येवढालं सामान आणि तुम्ही तिघी, कोनी बी थांबनार नाय."
"तुम्ही थांबलात ना."  रिक्शा भुर्कन निघायच्या आधी आम्ही सामानाला आत कोंबलं. एका बहिणीला त्या सामानावर बसलं. आणि मग आम्ही दोघी मांड्या घालून स्थानापन्न झालो. रिक्षावाला खदाखदा हसला.
"दात काढायला काय झालं?" बहिण करवादली.
"सेल्फी काढा आनि टाका  फेसबुकवर. लई भारी पिक्चर येईल."
ट्रंकेवर बसलेल्या बहिणीला सेल्फीची कल्पना एकदम आवडलीच. पण चालत्या देहाचा कोणताही भाग हलवता येणार नाही इतके घट्ट आम्ही बॅगांच्या आसपास अडकलो होतो.
"द्या मी काढतो."
"तुम्ही रिक्षा चालवा हो." तिघींमधली कुणीतरी एवढ्या जोरात खेकसली की त्याची रिक्शा हवेत उडाल्यासारखी एकदम पोस्टासमोरच थांबली.
आखडलेले हातपाय आधी बाहेर टाकत, आमची अंगंही बॅगासकट बाहेर पडली.

चाकवाली बॅग विमानतळावर चालवल्यासारखी मी खडे असलेल्या रस्त्यावर चालवली. त्यामुळे निर्माण झालेल्या एकदम भारी पार्श्वसंगीताच्या साथीने पत्र्याची बॅग सावरत आम्ही पोस्टात झोकदार ’’एंट्री’  घेतली. आणि रामा रामा.... पोस्टातली तोबा गर्दी पाहून एकदम विमानतळावर आल्यासारखं वाटलं.
"इथेही इतकी गर्दी?" माझ्या प्रश्नाला उत्तर न देता बहिण तरातरा पत्र्यांची बॅग घेऊन आत जायला निघाली.
"अगं, अगं..." करत आम्ही दोघी तिच्या मागे. गिर्‍हाईक आणि कर्मचार्‍यांच्या मधला अभेद्य दरवाजा तिने मोडला आणि पोस्टाच्या कर्मचार्‍यासमोर बॅग आपटली. त्या आवाजाचा  शून्य परिणाम म्हणून  कर्मचार्‍याची नजर संगणकावर खिळलेलीच राहिली. त्यामुळे संगणकात आहे तरी काय ही माझी उत्सुकता चाळवली. मी घाईघाईत चष्मा शोधून, डोळ्यावर चढवून त्याला काय दिसतंय ते मलाही दिसेल का म्हणून पाहायला लागले. एवढ्यात लक्षात आलं, काचेच्या पलिकडे उभी असलेली हजारो माणसं आमच्याकडे पाहत होती, आम्ही कर्मचार्‍याकडे आणि कर्मचारी संगणकाकडे. म्हणजे थेट कुणीच कुणाकडे पाहायचं नाही असा नियम आहे की काय पोस्टात?
"बॅग उघड." बहिण म्हणाली. नक्की कुणी बॅग उघडायची हे न कळल्याने मी म्हटलं,
"बॅग उघड." तेवढ्यात दुसरी बहिण पण तेच म्हणाली. कुणीच बॅग उघडेना तसा तो कर्मचारी ओरडला,
"बॅग उघडा." बहिण एकदम घाबरुन खाली बसली. तिने बॅग उघडली.
"विजेचं बील, पत्ता, पासपोर्ट, आधारकार्ड, पॅन कार्ड....." मोठी यादी सांगत होती, छोटी एकेक कागद पुढे करत होती. आता त्या बॅगेचं रहस्य उलगडलं. अर्ध्या तासाने संगणकातून डोकं बाजूला काढून आम्ही पत्र्याच्या ट्रंकेतून काढलेल्या कागदपत्रावर त्याने नजर टाकायला सुरुवात केली.
"साक्षीदार आणा."
"ही आहे ना." माझ्याकडे दोघींनी सराईतासारखं बोट दाखवलं.
"या नाही चालणार."
"का नाही चालणार?" मी बुचकळ्यात. तेवढ्यात बहिण म्हणाली,
"अहो, मागच्यावेळी नात्यातला साक्षीदार चालला की."
"आता नाही चालणार. तुम्ही बाहेर इतके उभे आहेत त्यातल्या आणा कुणाला तरी."
"आमच्या कुणी ओळखीचं नाही त्यात."
"चालतंय."
"चालतंय काय? आम्हाला नाही चालणार." तिघींपैकी कुणाचा तरी आवाज चढला.
"हे बघा, हे पण चालणार नाही." सप्पाट स्वर.
"काय चालणार नाही?" हळूहळू आमचे आवाज वेगवेगळ्या टिपेला पोचले.
"हेऽऽऽ" कागदाच्या चळतीतला  कुठलातरी कागद फलकावत कर्मचारी उत्तरला. दोन्ही बाजूने वणवा पेटल्यासारखंच झालं.  पोस्ट कर्मचारी आणि ३ गिर्‍हाइकं यांची तिथे जी काय जुगलबंदी सुरु झाली ती झाली. मला धड काहीच माहीत नाही त्यामुळे आपण फक्त २ बहिणींची बाजू घ्यायची या निकराने मीही पोस्ट लढवायला घेतलं.
"ओ, मी लिहिते हा प्येपरात. थांबा आता तुमच्याबद्दल लिहितेच." कर्मचार्‍याच्या चेहर्‍यावरची माशीही हलली नाही.
"पुरे तुझ्या त्या लिखाणाचं कौतुक. काहीतरी लिहशील आणि आपलं काम होणार असेल तर तेही व्हायचं नाही." बहिणीने हाताला धरुन मला मागे ओढत म्हटलं. पण कर्मचार्‍याच्या हातात कोलीत मिळालं होतं. त्याने असहकार पुकारायचं नेहमीचं धोरण तेवढ्याच उत्साहाने पुन्हा राबवलं.
"मी काही करु शकत नाही. तुम्ही पोस्टमास्तर कापश्यांना भेटा. ते म्हणतील तसं करु."
"भेटतोच. २ महिन्यापूर्वी हेच काम होतं तेव्हा ही कागदपत्र चालली. साक्षीदार म्हणून बहिणही चालली. तुम्ही ना गिर्‍हाईकाला अडवायचं कसं हेच बघता. हे आणा, ते आणा, ते नाही, हे चालायचं नाही.  आधीच नीट सांगा ना सगळं. आणि दर २ दिवसांनी नियम बदलतात कसे? अं कसे हो बदलतात तुमचे नियम? सांगा कशाला गुंतवायचे आम्ही पैसे तुमच्या पोस्टात? ..." कर्मचार्‍याने पुन्हा नजर संगणकावर खिळवली त्यामुळे पुढची वाक्य टाकायला आम्ही कापश्यांकडे पोचलो.

तीन बायका एकदम आत आल्याने हल्ला झाल्यासारखे आधी कापशे बावचळले. मग निर्विकार चेहर्‍याने त्यांनी आमच्याकडे पाहिलं. तो निर्विकारपणा शेवटपर्यंत तसाच राखलाही.  एव्हांना बाहेरची हजारो गिर्‍हाईकं आणि पोस्टातले कधीही न हसणारे कर्मचारी कामं टाकून शिनेमा बघायला मिळाल्याचा आनंद लुटायला लागले. आम्ही हातातले अनेक कागदपत्र नाचवित, कधीकधी त्यांच्यासमोरच्या टेबलावर ठेवत आम्हाला मॅच्युअर्ड झालेल्या विकासपत्राचे पैसे मिळायलाच हवेत ते पटवून दिलं. कापश्यांनी तितक्याच निर्विकारपणे ’त्या’ कर्मचार्‍याला बोलावलं,
"साहेब, मागच्यावेळेला आपण ॲडजेस्ट केलं ते करायलाच नको होतं..." ॲडजेस्ट हा शब्द ऐकला आणि आम्ही तिघी वेगवेगळ्या तर्‍हेने उखडलो.  मला नक्की काय चालू आहे ते कळत नसलं तरी आम्ही  भारत देशाचे प्रामाणिक सक्षम नागरिक (बहिणी) असल्याने कुणालाही काही ’ॲडजेस्ट’ करायला लावत नाही हे पक्कं ठाऊक होतं. मी बिनदिक्कत प्रामाणिक सक्षम नागरिकाची बाजू मांडली.
"आम्ही नव्हतं तुम्हाला ॲडजेस्ट करायला सांगितलं. हेच कागद आहेत असं तुम्हीच म्हणाला होतात."  याच अर्थी उरलेल्या दोघींनी तोंडसुख घेतलं तसं कर्मचारी त्याच्या साहेबांकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत राहिला. कापशेंना एकदम पोस्टाचं कामकाज आमच्यामुळे कमीतकमी २ तास थांबल्याचं जाणवलं असावं. ते म्हणाले.
"लगेच करतो तुमचं काम" क्षणभर सन्नाटाच. भांडांयचे बरेच मुद्दे तसेच राहिले होते  आमचे. आणि मुख्य म्हणजे आम्हाला तिघींना एकमेकींशी न भांडता तिसर्‍याशी एकत्रित भांडता येतं याचाही साक्षात्कार झाला होता त्यामुळे इतक्यात भांडण संपून कसं चालेल?
"अहो असं काय? एकदम असं कसं काम होईल?" आम्ही तिघी काकुळतीलाच आलो.
"झालं ना. लगेच देतो तुमचा चेक. बाहेरुन घ्या." त्यांनी प्रकरण संपवलंच. चाकातली हवा गेल्यासारख्या आम्ही बाहेर आलो. भानावर आल्यावर, बघे आपापल्या कामाला लागण्याआधी आतल्या आणि बाहेरच्या बघ्यांकडून ५-५ रुपये करमणूक आकार मी वसूल करुन टाकला. बहिणीकडे  पैसे दिले,
"हे काय?"
"जाताना रिक्षाच्या भाड्याला होतील. कसली करमणूक झाली आज लोकांची.  त्यांनी पण हसत हसत दिले पैसे."  रिक्शाचे पैसे वाचल्याच्या आनंदात बहिण म्हणाली,
"तू राहा रांगेत उभी."
"बरं. पण तुम्ही दोघी काय करणार?" असं विचारेपर्यंत चाकाची बॅग उघडून त्यातली सतरंजी तिने अंथरलीही  कोपर्‍यात. दुसर्‍या बहिणीने डब्याची झाकणं उघडली. माझ्याकडे बघून दोघी म्हणाल्या.
"गेल्या दोन्ही वेळेला तू नव्हतीस. चार चार दिवस यावं लागत होतं. दिवसभर इथेच. त्यामुळे अशी व्यवस्था करावी लागते." हे त्या दोघी सांगतायत तेवढ्यात एका माणसाने घाईघाईने त्यांच्यासमोर थर्मास उघडला,
"घ्या आमचं आत्ताच झालंय. ताक आहे." पोस्टातल्या सुखदु:खाच्या गोष्टी करत मग तो तिथेच बसला.  आपापला नंबर ठेवून त्या दोघींभोवतीचं पोस्टातल्या गिर्‍हाइकांचं कोंडाळं बदलत होतं.

पुढच्याला लागणारा किमान अर्धा तास पाहिल्यावर माझा नंबर ठेवून मध्येच मीही जेवून आले. शेवटी अखेर पोस्ट ’सर’ झालं. काम झालंच च्या समाधानात मी विजेत्यासारखी  काचेच्या अलिकडे. पलिकडे कर्मचारी कसलेतरी आकडे लिहिण्यात मग्न.  त्यात उजवीकडची विकास पत्र आणि डावीकडची जेष्ठ नागरिक पाटी सतत डोळ्यासमोर.
"किती वेळ लागेल हो अजून?" कर्मचार्‍याने आठ्या घालून का होईना चक्क माझ्याकडे पाहिलं.
"हे बघा. इथे लिहिलं आहे विकास पत्र आणि इथे जेष्ठ नागरिक. विकास पत्राची वाट पाहत पाहत  जेष्ठ नागरिक व्हायची वेळ होईल. इतके तास उभी आहे मी इथे." हा असा विनोद पहिल्यांदाच ऐकल्यासारखा तो कर्मचारी जोरात हसला आणि धनादेश हातात येण्याआधीच मी पोस्टातला कर्मचारी हसला या धक्क्याने खाली कोसळले.

Wednesday, December 2, 2015

नातं

"हा हा म्हणता आला की निघायचा दिवस." खचून भरलेली, करकचून बांधलेली बॅग भितींपाशी ठेवली. एकाच बॅगेचं बंधन घातल्याबद्दल एअरलाईन्सचे मनातल्या मनात आभार मानले. सोफ्यावर टॅबलेटमध्ये डोळे खुपसलेल्या, टेबलावर लॅपटॉपमध्ये जवळ जवळ घुसलेल्या नवर्‍याकडे नजर टाकली. पुन्हा म्हटलं,
"चला, निघणार मी उद्या." आईचं व्याकुळ हृदय, नवर्‍यासाठीची विरहवेदना वगैरे वगैरे सगळं डोळ्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या अभिनयक्षमतेचं कौतुक करायला कुणीच राजी नव्हतं.  मग म्हटलं आवाज ऐकला की नजरा वर वळतील. हुंदके काम बजावतील. काहीतरी विचित्र आवाज ऐकल्यासारखं दचकून दोघांनी वर पाहिलं.
मुलगी घाईघाईने येऊन मिठी मारुन, एक दोन पापे देऊन पुन्हा टॅबलेटकडे वळली. नवर्‍याने तेवढीही तसदी न घेता :-) मान पुन्हा लॅपटॉपमधे टाकली.
"बाहेरच सोडेन एअरपोर्टच्या. का यायला हवं आत?" याचं हे नेहमीचं. कामं उरकायची नुसती.
"बघ, तुल सोयीचं पडेल ते कर." विषय संपवला तरी मला सोयीचं होईल ते तो कसं करेल या विचारात रात्र सरली.

सकाळी सकाळी तिघांनी चेहर्‍यावरच्या खर्‍या भावना लपवित साश्रु नयनांनी एकमेकांना निरोप दिला. मुलीचे, आई नाही तर काय धिंगाणा घालता येईल याचे बेत सुरु झाले असावेत, नवर्‍याच्या ’ आता काय वाट्टेल ते करु’ च्या यादीत काय काय भर पडली कोण जाणे. मी देखील रांधा, तुमचं तुम्ही घ्या, भांडी डिशवॉशरमध्ये विसळून घाला आणि कुणीतरी लावा रे धुतलेली ती भांडी डिशवॉशरमधून असं ठणाणा बोंबलण्याच्या  काढून ह्या माझ्या रोजच्या कामगिरीवरुन मुक्तता मिळाल्याच्या आनंदात विमानतळाच्या दिशेने प्रस्थान केलं. पण ३ -३ माणसांना एकाचवेळी इतकं सुख द्यायला बहुधा एअरलाइनला जड गेलं असावं.
"आजचं विमान रद्द." तीन शब्दांची १ ओळ कितीजणांचं भावविश्व कोलमडून टाकते त्याचं प्रत्ययकारी दर्शन एकमेकांना ताबडतोब झालं.
मुलगी,
"आज जाणार नाहीस तू?" विश्वाचं सारं दु:ख तिच्या आवाजात उतरलं होतं.
नवरा,
"असं करु, दुसरं कुठलं विमान मिळतं का पाहू." आधीच वेगात असलेली गाडी त्याने आणखीन वेगाने पळवायला सुरुवात केली.
"अरे ती काय एस. टी. आहे का? ही नाही तर ती पकडायला?"
"हे बघ, तुझं पुढचं विमान जाणारच आहे. तिथपर्यंत कसं पोचायचं हे पाहायचं आता." नवर्‍याचा कधी नव्हे तो इतका पक्का निर्धार पाहून कौतुकाचं भरतंच आलं मला. ह्या त्याच्या निर्धाराला योग्यं दिशा द्यायला हवी अशी खुणगाठ बांधत मी नुसतीच मान डोलवली. विमानतळावर जाऊन आम्ही आपापल्यापरिने तिथल्या आधीच उद्धट असलेल्या कर्मचारी बाईला जितकं जेरीला आणता येईल तितकं आणायचं काम केलं. पण खिंड काही लढवता आली नाही. माझं निघणं एक दिवस लांबलं ते लांबलंच.
"तुझं आणि विमानाचं नातं असंच आहे. दरवेळेला असं काहीतरी होतं." नवरा कुरकुरला आणि आमची यात्रा पुन्हा घराच्या दिशेने वळली. तिघांची कितीतरी स्वप्न एकाचवेळी भंग केल्याचं पाप  एअरलाईन्सच्या माथ्यावर पुन्हा एकदा पडलं.

घरी आलो तेव्हापासून घरातलं प्रत्येकजण पुन्हा पुन्हा एअरलाईन्सच्या वेबसाईटवर दुसर्‍या दिवशीचं विमान वेळेवर आकाशात झेपावणार आहे याची खात्री खरुन घेतंय. सांगेनच तुम्हाला, मी निघाले की नाही :-)

Monday, October 19, 2015

झलक

 ’वेषांतर’ एकांकिकेची झलक.



वेषांतर: तामिळनाडू मधील अळमग्गळ नावाचं एक खेडं. जेमतेम पाचशे उंबरठे असलेलं. इथल्या एका पडीक अवस्थेतल्या वाड्यात वेषांतर एकांकिकेतील नाट्य घडतं. वाड्यातील शास्त्रीबुवा मूळचे गोमंतक. उपजिविकेसाठी पार दक्षिणेत येऊन स्थिरावलेले. मराठी भाषिक तरुणींच्या आगमनाने मुलखातलं कुणीतरी भेटल्याचा शास्त्रीबुवांना आनंद होतो. पण हा आनंद क्षणभुंगुर ठरावा अशा घटना घडत राहतात. घडणारं सारं प्रत्येकाच्याच दृष्टीने अकल्पनीय,धक्कादायक. निर्माण झालेल्या वादळाला कसं तोंड देतात या वाड्यातील व्यक्ती?  सत्यघटनेवर आधारित एकांकिका.

Monday, October 12, 2015

काळीज कुरतडणारी वेदना


"आर यू ख्रिश्चन?" या प्रश्नावर ज्यांनी माना डोलवल्या, उभे राहिले त्यांच्यावर "गुड, विदीन अ मिनिट यु विल सी गॉड" असं म्हणत त्या तरुणाने गोळ्या झाडल्या. ऑरेगन राज्यातील एका आडगावातील कम्युनिटी कॉलेजमधील अनेक तरुण जीव नाहक प्राणाला मुकले. या वर्षात विद्येच्या आवारात घडलेली ही ४५ वी घटना. दरवेळेसारखाच पुन्हा एकदा ’गन कंट्रोल’ हा विषय चघळला जाईल ते पुढची घटना घडेपर्यंत. मोजणंही कठीण होऊन जावं इतक्यांदा हे असे प्रसंग घडतायत या देशात. दरवेळेला भयभीत चेहर्‍याची मुलं शरण आल्यासारखी दोन हात डोक्याच्या मागे धरुन आवाराच्या बाहेर पडतात. पोलिस, ॲम्युबलन्सेस, प्रसारमाध्यमांसमोर हमसाहमशी रडणारे तरुण जीव आणि पोटच्या जीवांच्या काळजीने धावत पळत पोचलेले पालक हे असं दृश्य दुर्देवाने वारंवार पाहायला मिळतं. दरवेळेला कुणाच्यातरी माथेफिरुपणामुळे निष्पाप मुलांना, त्यांच्या शिक्षकांना प्राण गमवावा लागतो. धक्कादायक म्हणण्याच्या पलिकडे गेलं आहे हे.
शाळांमध्ये होणार्‍या गोळीबारांबद्दल चर्चा सुरु झाली की हमखास ती पोचते १९९९ सालापर्यंत. २० एप्रिल १९९९ साली कॉलोरॅडो राज्यातील लिटीलटन कोलंबाईन हायस्कूल मध्ये दोन तरुणांनी अंदाधुंद केलेल्या गोळीबारात १३ मुलं मारली गेली तर ३० हून अधिक जखमी झाली. ह्या घटनेने देश हादरला पण त्या आधी आणि नंतरही सातत्याने हे सत्र चालूच आहे. २००७ साली व्हर्जिनिया पॉलिटेक्नीक मध्ये झालेल्या गोळीबारात ३२ मुलं आणि शिक्षक मारले गेले. या घटनांचा गाजावाजा जास्त झाला कारण मृत्यू पावलेल्या मुलांची संख्या. इतर ठीकाणी बळी गेलेल्यांची संख्या कमी असली तरी शाळेत होणार्‍या गोळीबारांच्या संख्येत वाढच होत चालली आहे. वर उल्लेख केलेल्या घटनांचे पडसाद हळूहळू हवेत विरतायत तोच २०१२ साली सॅंडीहूक प्राथमिक शाळेतली २० चिमुरडी मुलं आणि ६ शिक्षक अशाच गोळीबाराला हकनाक बळी पडले. या घटनेने सारा देश सुन्न होऊन गेला. त्यानंतर म्हणजे, १ ऑक्टोबर २०१५ ला घडलेला हा वर्षभरातला ४५ वा गोळीबार. प्रत्येकवेळेला मारेकर्‍यांने हे का केलं असावं याचा शोध, सोशल नेटवर्कवरचा मारेकर्‍याचा वावर, त्याने वेळोवेळी व्यक्त केलेली मतं, फोटो यावरुन बांधला जाणारा अंदाज यालाही अंत नाही. यात भर म्हणून आता कधी गोळीबार करणार्‍या मुलांच्या पालकांना, त्यांचं आपल्या मुलांवर नियत्रंण नाही म्हणून, सरकारला, शाळा मुलांचं रक्षण करु शकली नाही म्हणून, काही ठीकाणी शाळेतील कर्मचार्‍यांना, सरतेशेवटी आता बंदूक उत्पादक तसंच २५ कंपन्यांना चित्रपट आणि संकेत स्थळांवर खेळल्या जाणार्‍या खेळांमुळे मुलं हिंसकतेचा मार्ग चोखाळतात म्हणून काही पालकांनी कोर्टात खेचलं आहे. या सार्‍यातून अशा घटनांना आळा घातला जाऊ शकेल असा मार्ग खरंच सापडणार आहे की त्यातही स्वत:च्या फायद्याचा रंग आहे हे उमजणं आतातरी कठीण आहे. काळच ते ठरवील. दरवेळेला अशा घटनांची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न होत राहतो. निघालेल्या निष्कर्षातून उपायाची अमंलबजावणी किती वेळा होते हा भाग वेगळा. राजकारणाचे रंग इतके गडद आहेत की त्यातून ’गन कंट्रोल’ सारखे सर्वसामान्यांच्या दृष्टीने सहजसाध्य असणारे उपाय किती जणांचे बळी गेल्यावर होणार ते राजकारणीच जाणोत. तोपर्यंत हे असे प्रसंग वारंवार सर्वांच्या वाट्याला किती दिवस येत राहणार याचाच विचार मन कुरतडत राहणार. ह्याच पार्श्वभूमीवर गोळीबार करणार्‍या काही तरुणांच्या आई - वडिलांच्या मनाचा प्रसारमाध्यमांनी घेऊ पाहिलेला वेध महत्वाचा ठरावा.
कोलंबाईन हायस्कूल मधील गोळीबार करणार्‍या डिलनच्या आई - वडिलांनी त्या घटनेनंतर जवळ जवळ १५ वर्षांनी ’फार फ्रॉम द ट्री’ या पुस्तकासाठी अॲड्रुयु सोलोमनला मुलाखत दिली. प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी संपर्क साधूनही इतके दिवस मौन बाळगलेल्या सुझनने अखेर आपलं मन मोकळं केलं. गुन्हा करणार्‍या मुलांच्या पालकांकडे सर्वात प्रथम दोषी म्हणून पाहिलं जातं. पालक म्हणून या मुलांचे आई - वडिल काय करत होते असं म्हटलं जातं. डिलनची आई सुझन यावर सांगते, की जेव्हा कोलंबाईन शाळेत गोळीबार झाला तेव्हा डिलनच्या मित्राचा, डिलनचा पत्ता लागत नाही हे सांगण्यासाठी फोन आला. त्यावेळेस आपला मुलगाच यात सहभागी असेल अशी पुसटशी शंकाही मनाला शिवली नाही. पण सुझन घरी येईपर्यंत घराला पोलिसांनी वेढा घातला होता. हताशपणे या सार्‍याला सामोरं जाताना इतक्या जणांच्या मृत्यूला आपला मुलगा कारणीभूत ठरला यावर विश्वास ठेवणं सुझनला कठीण जात होतं. डिलनबद्दल सांगताना ती म्हणते, ’चार चौघांच्या मुलांसारखाच तोही वाढला. किंबहुना त्याची ओळख हुशार मुलगा म्हणूनच होती. जी गोष्ट करेल ती मन लावून करणारा मुलगा होता तो. वडिलांबरोबर तास न तास बुद्धीबळ खेळणं हा त्याचा आवडता छंद. पालक म्हणून आमच्या समोर कधीच कोणतीही आव्हानं त्याने उभी केली नाहीत. व्हिडीओ गेम्स, स्वत:च्या खोलीत तास न तास काढणं हे जी इतर मुलं या वयात करतात तेच तोही करत होता. एकमेव प्रसंग होता तो, कधीतरी रात्री त्याने आणि एरिकने रस्त्याच्या कडेला उभी असलेली गाडी उघडल्याचा. त्याची शिक्षाही त्याने भोगली होती. मात्र त्यावरुन तो हे टोक गाठेल किंवा ही त्याच्यातील विक्षिप्तपणाची लक्षणं आहेत अशी शंकाही आली नाही.’
डिलनच्या या कृत्यानंतर सुझनच्या मनात कितीतरी वेळा आत्महत्येचा विचार डोकावून गेला. तिचं बाहेर जाणं बंद झालं, नोकरीवर पुन्हा रुजू होऊनही कामातलं लक्ष उडालं. तिच्या वेळी अवेळी रडण्याने आजूबाजूच्या लोकांची अवस्था अवघड होऊन जाई. ते जाणवत असूनही तिला जोरजोरात रडावंसं वाटे. आडनाव सांगण्याचीही शरम वाटायला लागली. रेडिओ, टीव्ही लावण्याचं बळ गेलं. आपल्या मुलाने असं करावं यावर विश्वास ठेवणं जितकं कठीण जात होतं तितकाच पालक म्हणून डिलन आणि एरीकचे आई - वडिलच गुन्हेगार आहेत असा प्रसार माध्यमांतून आळवला जाणारा सूरही सुझनचं काळीज भेदून टाकत होता. मुलाखतकर्त्याला ती सांगते, ’माझं मुल गमावल्याचा शोकही मी करु शकत नव्हते अशी अवस्था होती. काय चुकलं माझं? लाड केले जास्त की फार जास्त स्वातंत्र्य दिलं? नक्की काय चुकलं की त्याने असं वागावं? पालक म्हणून आमचं काय चुकलं ह्या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळणार नाही का? हे कृत्य करण्याच्या थोडे दिवस आधी मी त्याचा हात तळव्यात धरुन माझं त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं होतं, आई म्हणून त्याचा अभिमान वाटतो हे सांगायला विसरले नव्हते. याचाच विपरित परिणाम झाला असेल? माझ्या अपेक्षांना तो पुरा पडणार नाही हे तर त्याच्या मनाने घेतलं नसेल? खूप विचार करते तेव्हा आता मनातल्या मनात मीच त्याची क्षमा मागते कारण, कदाचित त्याला माझ्या मदतीची गरज असेल हे ओळखण्यात मी अपयशी ठरले.’ हे सांगून त्या गोळीबारात बळी पडलेल्या काही पालकांनी संपर्क साधला तो क्षण गहीवरुन टाकणारा असल्याचं ती सांगते. या गोळीबारात ठार झालेल्या मुलांच्या आई - वडिलांनी जेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हा गहिवरलेल्या डिलन आणि एरिकच्या आई - वडिलांनी मुलांनी आपल्याला मुर्ख बनवल्याची भावना व्यक्त केली.

सॅंडी हुक प्राथमिक शाळेत गोळीबार केलेल्या घटनेतला गुन्हेगार होता अॲडम लान्झा. याच्या बाबतीत मात्र त्याचे वडिल त्याचं वेगळेपण नमूद करतात. लहानपणी लक्षात न आलेलं अॲडमचं वेगळेपण तो माध्यमिक शाळेत जायला लागल्यावर जाणवायला लागलं. काहीतरी चुकत होतं. अॲडम एक्कल कोंडा व्हायला लागला, नजर टाळायला लागला. त्याची झोप हरवली. शाळेत येऊन गोळीबार करणार्‍यापूर्वी स्वत:च्या आईला ठार मारणार्‍या अॲडम बाबत पालक म्हणून त्याची आई कमी पडली हे मात्र ते अमान्य करतात. अॲडम वडिलांबरोबर राहत नसला तरी अॲडमच्या आईने त्याच्यावर उपचार व्हावेत म्हणून प्रयत्न केला होता. मात्र आपल्याला उपचाराची गरज आहे हे मान्यच नसणार्‍या अॲडमचा उपचारांना दिला जाणारा प्रतिसाद उत्साहवर्धक नव्हता. मानसोपचार तज्ञांकडे त्याने कधीच मोकळेपणाने आपल्याला काय वाटतं ते सांगितलं नाही. यामुळेच पालक म्हणून आपण काही निराळं करु शकलो असतो हे त्यांना मान्य नाही. या सार्‍याचा वडिल म्हणून झालेल्या परिणामाबद्दल ते म्हणतात, ’रात्री खूपदा एकच स्वप्न पडतं. ज्यात दाराच्या पलिकडे कुणीतरी संतप्त नजरेने आपल्याकडे पाहतंय असं वाटतं. त्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर माझी गाळण उडते. विचार केल्यावर लक्षात येतं की दारात उभा असलेला तो चेहरा अॲडमचा असतो आणि अॲडमच्या हातून प्राण गमावलेल्या मुलांचं मी प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे माझी भितीने गाळण उडते. ’
वरील २ उदाहरणं सोडल्यास आत्तापर्यंत शाळेच्या आवारात घडलेल्या गोळीबाराच्या घटनांतून गुन्हेगारांचे पालक फारसे बोलते झालेले दिसत नाहीत. जे झाले ती घरं आपल्यासारखीच मध्यमवर्गीय वातावरणाची वाटतात. ते सांगतात त्यापेक्षा खरंच काही पालक म्हणून ते वेगळं करु शकले असते असं वाटत नाही. मग ही मुलं अशी का वागतात या प्रश्नाची उकल तशीच राहते. मुलांच्या कर्मांचं ओझं वाहण्याखेरीज पालकांसाठी अशाने काही पर्यायच उरत नाही. मग नक्की प्रतिबंध तरी कसा करणार या गोष्टींना? बंदूक नियत्रंण? मानसिक विकृतीचा वेळीच शोध आणि त्यावर त्वरित योग्यं उपचार? सळसळत्या तरुणाईला अयोग्यं मार्गाकडे जाण्यापासून रोखणं? मुलांमध्ये होत असलेल्या सुक्ष्म फरकाचीही नोंद घेऊन त्यांना बोलतं करणं? प्रश्नांच्या जंजाळातून खात्रीलायक नसले तरी हे काही मार्ग दिसतात. प्रश्न आहे तो त्या मार्गावर पाऊल टाकण्याचा. कधी होणार हे, कोण करणार आणि कसं?


लोकसत्तेच्या, ११ ऑक्टोबरच्या ’लोकरंग’ मध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे.   दुवा:काळीज कुरतडणारी वेदना

Monday, September 21, 2015

मोकळे केस

"बाबा" बागेत खेळणारी माझी चिमुरडी धावत धावत माझ्या दिशेने येत होती. मी पाहत राहिलो तिच्या केसांकडे. कापलेल्या कुरळ्या केसांचं टोपरं इतकं गोड दिसत होतं. मला येऊन घट्ट बिलगली. तिला जवळ घेत मी पापा घेतला तसं तिने माझ्या गालांवर ओठ टेकले.
"काय रे पिल्ला?" लेकीच्या केसातून माझे हात मायेने हात फिरले.
"बाबा, मला तू आवडतोस."
"हो? का गं?"
"आवडतोस." लेक आणखी बिलगली. मी तिच्या लाडिक स्वरात रमून गेलो. ती पुन्हा खेळायला गेली. आणि मनात काही बाही विचार घोळायला लागले. मिटलेल्या डोळ्यांसमोर ’ती’ उभी राहिली.

गिरगावच्या आमच्या इमारतीत दाराबाहेर उभं राहिलं की पलिकडच्या इमारतीत अगदी समोरच्या घरात राहणारी ’ती’. तिच्या घरातला पलंग खिडकीला लागून होता. जेव्हा पाहावं तेव्हा पाठमोरीच बसलेली दिसायची. काय करत असायची दिवसभर त्या पलंगावर बसून कोण जाणे. पण नजरेला पडायचे ते तिचे मोकळे सोडलेले काळेभोर लांबसडक केस. अधूनमधून ती त्याचा आंबाडा बांधायची. पण थोड्याच वेळात ते सुटायचे. किती वेळा मी कठड्याला टेकून कधीतरी तिचा चेहरा दिसेल म्हणून वाट पाहिली. खूपदा वाटायचं रस्ता ओलांडला की तिची इमारत. हाकेच्या अंतरावर. जावं खाली धाडधाड पायर्‍या उतरुन आणि शिरावं तिच्या इमारतीत, मग घरात. निदान त्या मोकळ्या केसा मागचा चेहरा एकदा तरी दिसावा. कधीतरी माझी बहिण येऊन उभी राहायची बाजूला.
"शिट्टी मार ना. मग बघेल ती वळून मागे." बहिणीला माझी प्रतिक्षा एव्हाना समजली होती.
"वा, काय डोकं चाललंय. खालच्या गोंधळात माझी शिट्टी तिच्यापर्यंत पोचेल तरी का?"
"हे बरं आहे तुझं. मदत करायला गेले तर अक्कल काढतोस माझी." आम्हाला वाद घालायला कारण काही लागायचं नाहीच. त्या वादात कधीतरी लक्षात यायचं ’ती’ तिथून उठून गेली. बहिण पुटपुटायची.
"आईला दाखव रे ती मुलगी एकदा."
"का? मी प्रेमा बिमात नाही पडलेलो हा तिच्या. चेहरासुद्धा नाही पाहिलेला अजून."
"केस पाहतोस ना?"
"ते तर तू पण बघतेस. आवडतात की नाही तुलाही ते मोकळे केस पाहायला?"
"भावड्या म्हणूनच म्हणतेय आईला दाखवूया ती मुलगी एकदा." मी तिची अक्कल पुन्हा काढायच्या आधीच ती घाईघाईने म्हणाली.
"मला अजिबात मोकळे केस सोडायला देत नाही आई म्हणून म्हणतेय. एकदा त्या मुलीला बघच म्हणावं. सतत केस मोकळे." आमचं हे बोलणं आईच्या कानावर अर्थात पडलेलं असायचं. ती आतूनच ओरडायची.
"सोडा केस मोकळे आणि फिरा इकडे - तिकडे. जेवणात केस मिळाला म्हणून माझ्यावर डाफरु नका. सांगून ठेवतेय आधीच."

त्या मुलीचे ते मोकळे केसच कायम लक्षात राहिले. चेहरा कधीच दिसला नाही. पण अगदी तसेच लांब केस असलेली बायको मात्र मिळाली मला. पहिल्यांदा तिच्या केसांवर गजरा माळला तो आनंद काही औरच. गावी गेलेलो त्यावेळेस. रमत गमत संध्याकाळच्या वेळेला गडनदीच्या पुलावर जाऊन उभे राहिलो. खूप वेळ. पुलाखालून वाहणार्‍या पाण्याकडे एकटक नजरेने पाहत बसलो होतो दोघं. इतक्यात घंटा वाजली म्हणून मान वळवून पाहिलं. सायकलवरुन गजरे घेऊन चालला होता चिंद्या. सुंरगीच्या फुलांचा वास मन अगदी मोहवून टाकत होता. दोन - तीन होते त्याच्याकडे. उत्साहाने त्याने एक बायकोच्या हातात ठेवला. तो निघून गेल्या गेल्या संधिप्रकाशात माळला मी तिच्या केसांवर. त्या सुवासाने जसं वेड लावलं तसं रात्री गजरा काढून ठेवल्यावर तिच्या मोकळ्या केसांनी. केसांना वेढून राहिलेला तो सुरंगीचा गंध अजूनही माझ्या आजूबाजूला दरवळतोय.

कधीतरी माझ्या बायकोने तिचे ते लांबलचक केस आधुनिक दिसणं अनुभवावं म्हणून छोटे करुन टाकले. आता ते नेहमीकरताच मोकळे असतात, तसंही आता आजूबाजूला मोकळे केसच दिसतात म्हणा. म्हटलं तर मोकळे केस सर्वत्र सारखेच पण स्थळ, वेळ, जागा आणि मोकळे केस सोडलेली व्यक्ती, त्या केसांमध्ये अडकलेल्या माणसाचं भावविश्व किती बदलून टाकते. मोकळ्या केसांकडे पहाण्याची दृष्टी, स्पर्श किती वेगवेगळा असतो नाही? विचारांच्या नादात होतो तितक्यात माझी चिमुरडीने पुन्हा येऊन बिलगली. सवयीने तिच्या कुरळ्या, आखूड पण मोकळ्या केसातून हात फिरवायला लागलो आणि भटकून आलेलं मन एकदम जाग्यावर आलं.
"छान दिसतायत तुझे मोकळे केस." मी कौतुकाने म्हटलं. लेकीने मान डोलवली आणि मैत्रीणींच्या दिशेने खेळायला ती धावत सुटली.

(सुदर्शन रंगमंचच्या ओंकार सिन्नरकरच्या विनंतीवरुन त्यांच्या साहित्य मंडळात झालेल्या कार्यक्रमासाठी 'मोकळे केस' या विषयावर लिहलेला लेख/गोष्ट - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर)

Friday, September 11, 2015

वेषांतर

नुकत्याच म्हणजे १५ ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे आम्ही २ एकांकिका सादर केल्या.  मी लिहिलेली  ’वेषांतर’ ही एकांकिका सत्यघटनेवर आधारित आहे. संगीत, प्रकाशयोजना, ध्वनि, नेपथ्य, सशक्त कथा आणि अनुभवी कलाकार या सार्‍याचा सुंदर मिलाफ आणि रसिक प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं प्रेक्षागृह  यामुळे ४ महिने आम्ही सर्वांनी केलेल्या श्रमांचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.  तुम्हा सर्वांसाठी ’वेषांतर’ एकांकिकेचे फोटो या दुव्यावर:

 https://marathiekankika.wordpress.com/

Saturday, August 1, 2015

व्यक्तिचित्रे

बृहनमहाराष्ट्र वृत्तासाठी लिहीत असलेल्या लेखमालिकेतील हा माझा शेवटचा लेख.

अत्यानुधिक तंत्रज्ञानामुळे संवाद साधणं सोपं आता सहज सोपं होऊन गेलं आहे. परदेशात जाणं, ताबडतोब तिथे रुळणं ही नवलाईची गोष्ट राहिलेली नाही. पण हे झालं हल्ली हल्लीच्या काळात. ज्यांना इथे येऊन दशकं उलटली आहेत त्यांच्यासाठी मधल्या काळातील ही स्थित्यंतरं अचंबित करणारी आहेत. तरीदेखील असं वाटतं की ही प्रगती घडत असताना अनुभवाचं, प्रश्नाचं स्वरुप बदलत गेलं तरी मानवी मन मात्र तेच राहिलं. कधी अनाकलनीय तर  काहीवेळा ठोकताळे मांडता येणारं. प्रत्येकाचे अनुभव आणि प्रश्न वेगळे तसे ते अनुभवण्याचे, प्रश्न सोडवण्याचे मार्गही विविध. या सार्‍याचा वेध घेण्याचा प्रयत्न मी या लेखमालिकेतून केला.

मी अमेरिकेत आले तो काळ आणि आताचा काळ यात खूप फरक आहे. १९९५ च्या दरम्यान भारतात  संपर्क साधण्याचे मार्ग म्हणजे फक्त पत्र आणि फोन. साधारण त्या काळात जे इथे आले त्यांना नक्की आठवत असेल, फोन करायचा तर  MCI किंवा AT&T  हेच दोन पर्याय बहुतांशी उपलब्ध होते. दर मिनिटाला आपण ७५ सेंट खर्च करतोय याचं भान ठेवायला लागायचं. पत्र पाठवलं की पोचायला तीन आठवडे, उत्तर यायला तीन आठवडे. आपल्याकडून भारतातून आलेल्या पत्राला अगदी एक दोन दिवसात उत्तर लिहिलं गेलं तरी तिकडून तसं होईलच याची खात्री नसे. मायदेश सोडून आलेले आपण भावनिक गुंतवणुकीत अधिक गुंतलेले. तिकडे त्यांच्या दैनंदिन जीवनात फारसा फरक पडलेला नसायचा. मला आठवतंय, सासर - माहेरच्या सख्ख्या नातेवाइकांव्यतिरिक्त, मावश्या, मामा, मैत्रिणी झाडून सार्‍यांना तेव्हा मी पत्र लिहीत असे. मग  प्रतिसादाबद्दल आशा - निराशेचा खेळ चालू राही.  हळूहळू इ मेलचा जमाना आला. पण घरातल्या वयस्कर मंडळीना इ मेल कसं वापरायचं कुठे ठाऊक होतं? ते पत्राकडे डोळे लावून बसलेले असत. फोनचे दर स्वस्त झाल्यावर मग मात्र फोन मुळे हळूहळू पत्र लेखन कमी आणि  नंतर जवळजवळ  बंदच झालं. फोननंतर आता स्काइप, फेसटाइम, व्हॉट्सअॲप, गूगल टॉक....अशा अत्यानुधिक तंत्रांनी मात्र क्रांतीच केली. या सार्‍यामुळे आपल्या आयुष्यात झालेल्या बदलांचा मागोवा म्हणजेच ही लेखमालिका होती.

तळ्यात मळ्यात: आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण संवाद तर हरवून बसलेलो नाही ना ही जी शंका प्रत्येकाच्या मनात डोकावते त्यावरुन ’तळ्यात मळ्यात’ ची कल्पना सुचली.  दामले कुटुंबांवरचा हा लेख. केतन, मीरा आणि मुलं नानांच्या, केतनच्या वडिलांच्या घरी येतात. आईच्या निधनानंतर आग्रह करुनही अमेरिकेत न आलेल्या वडिलांना भेटायला केतन वर्षभराने भारतात येतो.  केतनच्या मनात नानांना भेटायची अनिवार ओढ  आहे. नानाही त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले.. घरी आल्या या सार्‍याचं प्रतिबिंब प्रत्येकाच्या वागण्यात उमटतं. पण थोड्याच वेळात केतन आणि मुलं आपापले लॅपटॉप, फोन घेऊन बसतात. नानांचा नाराजीचा सूर जाणवतो आणि मीराला त्यांच्या मनातला एकटेपणा तीव्रपणे बोचतो. संपर्कात रहाण्याच्या आधुनिक साधनांबद्दल आनंद मानायचा की प्रत्यक्ष भेटीतली मजा त्यामुळे पटकन संपुष्टात येते याचं दु:ख हा प्रश्न मीराला छळत रहातो आणि निदान त्या क्षणीतरी नानांचा एकटेपणा घालवायचा मार्ग तिला सापडतो. असा या लेखाचा विषय होता. माझी खात्री आहे की अनेकांनी अंशतः तरी हे अनुभवलेलं असणारच. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: ऑगस्ट २०१३)
मी काय करु?: अर्थाजन आलं की बचतही आलीच. पण याचा कधीकधी अतिरेक होतो आणि आपलेच जीवलग त्यात पोळले जातात हे लक्षातही येत नाही. यावरुनच हा लेख सुचला.
नोकरी करणारी मीना, आपल्या आई वडिलांना दर वर्षी मुलांना सुट्ट्या लागल्या की अमेरिकेत बोलवून घेते. डे केअर, आफ्टर स्कूल हे पर्याय असतानाही पैसे वाचवण्याच्या नादात, आईला आता झेपत नाही, तिची इच्छाही नाही हे जाणवूनही आजी आजोबांचा सहवास मुलांना मिळावा हे निमित्त पुढे करते. लेखातील, मीरा,  तिचे आई - बाबा, मीराचा नवरा, या सार्‍यांनाच प्राप्त परिस्थितीबद्दल पडलेला प्रश्न म्हणजेच, ’मी काय करु?’ (बृहनमहाराष्ट्र वृत्त:  ऑक्टोंबर २०१३)

कृतज्ञ: वर्षानुवर्ष परदेशात राहूनही आपल्या मनाचं पारडं मायभूमीकडे जास्त झुकलेलं असतं. कर्मभूमीचं काय? हे अनेकदा मनात येतं. त्याच विषयावरचा हा लेख.
समाजसेविका असलेल्या इराला अनिकेत जेव्हा भारतातल्या संस्थेला मोठी देणगी द्यायची इच्छा व्यक्त करतो तेव्हा सखेद आश्चर्य वाटतं. मातृभूमीच्या ऋणात रहायला हवंच पण कर्मभूमी विसरु नये हे अनिकेतला पटवून ती द्यायचा प्रयत्न करते.  इरा हे पटवून देते तेव्हा जे जग आपल्या समोर उभं करते ते मला महत्त्वाचं वाटलं. इथेही सारं काही आलबेल नाही आणि आपण ते बदलायला हातभार लाऊ शकतो ह्याचाच दाखला म्हणजे तिचं या क्षेत्रातील काम. हा लेख शारलटमध्ये गेली कितीतरी वर्ष समाजसेवा करणार्‍या मैत्रिणीच्या अनुभवावरून लिहिला. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: डिसेंबर २०१३)

बोनसाय: महत्त्वाकांक्षी स्त्री आता नवलाची बाब राहिलेली नाही. एकमेकांच्या सहाय्याने आपली महत्त्वाकांक्षा उत्तम रितीने जोपासणारे पती - पत्नीही आता अगदी सहज दिसून येतात. पण तडजोडीची तयारी दोन्ही बाजूने नसते तेव्हा  परिस्थितीच्या चक्रात भरडल्या जाणार्‍या मुलांवर जो परिणाम होतो तो या लेखाचा विषय.
डिपेंडंट व्हिसावर आलेली स्वाती स्वत:च्या शिक्षणाला अमेरिकेत वाव दिसत नाही म्हटल्यावर केदारची इच्छा नसताना मुलाला, मंदारला घेऊन  भारतात ’ट्रायल’ म्हणून  परत जायचा निर्णय घेते. सततच्या वाद - विवाद आणि चर्चेतून ती स्वत:च्या निर्णयावर ठाम रहाते. केदार मात्र अनेक कारणांसाठी अमेरिकेतच रहातो. तो भारतात येण्याची आतुरतेने  वाट पहाणार्‍या  मंदारच्या मनावर, वागणुकीवर होणारा परिणाम म्हणजेच ’बोनसाय’  लेख. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: फेब्रुवारी २०१४)

इच्छा: मृत्युची सावली पडलेल्या घरातलं शोकदायक वातावरण आणि भेटायला येणार्‍यांचं वागणं याचा होणारा मनस्ताप आपण ऐकलेला, अनुभवलेला असतो. पण घरातलेही काही जीवलगाच्या जाण्याचं दु:ख विसरतात तेव्हाची घरातल्या प्रत्येकाची मानसिक स्थिती दर्शविणारा लेख.
निलेश हा परदेशी रहाणारा आई - दादांचा मुलगा. स्मिता, सुनिल ही त्याची भारतातली भावंडं. अमेरिकेतून दादांच्या निधनानंतर दिवसांसाठी आलेला मुलगा आणि त्याची भारतातील भावंडं यांच्यामध्ये होणारे वाद, दोषारोप, उणीदुणी काढणं पाहून अखेर मुलांची आई फक्त एकच मागणं मुलांकडे मागते. तोच लेख ’इच्छा’. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: एप्रिल २०१४)

रिंगण: आयुष्यात असे काही क्षण येतात की आपण रिंगणात अडकून पडलो आहोत असं वाटायला लागतं. तशाच एका प्रसंगातून जाताना या लेखातील रमाकांतच्या शोधयात्रेच्या प्रवासाचा वेध म्हणजे हा लेख.
भारतात कायमसाठी परत चाललेला संतोष रमाकांतना भेटायला येतो आणि ३० वर्षाहून अधिक काळ इथे राहिलेल्या रमाकांतचं मन आपल्या अमेरिकेत येण्याच्या निर्णयामागची कारणं शोधायला लागतं. आई - वडिलांची इच्छा? समाजात प्राप्त होणारी प्रतिष्ठा? की स्वत:चाच निर्णय या प्रश्नांचा गुंता सोडवणार्‍या मनाचा शोध म्हणजे म्हणजे ’रिंगण’. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: जून २०१४)

सीमारेषा: परदेशात मूल वाढवताना कधी ना कधी, मायदेशीच असतो तर हा प्रश्न आणि तिथलं आणि इथलं ही  तुलना कधी उघड उघड तर कधी मनातल्या मनात केली जातेच. गिरीश, श्रावणी त्यांच्या मुलांच्या बाबतीत अशा एका प्रसंगाला सामोरे जातात आणि जर इथे राहिलो नसतो तर, भारतात असतो तर ह्या जर- तर ने श्रावणी  अस्वस्थ होते पण त्यांचा तरुण मुलगा, साकेतच त्यांची अस्वस्थता घालवायला मदत करतो. दोन पिढ्या आणि त्यांची मानसिकता आणि वेगवेगळ्या देशात मूल वाढवणं यावरचा  लेख म्हणजे ’सीमारेषा’. (बृहनमहाराष्ट्र वृत्त: ऑगस्ट २०१४)

दोन ध्रुवांवर - परदेशात गृहीणी असणं कधीकधी किती अवघड होऊन जातं यावर प्रकाश टाकणारा हा लेख.
नोकरी न करणारी सीमा आणि सतत कामाच्या व्यापात अडकलेला निलेश यांच्या संसाराची कथा म्हणजे दोन ध्रुवांवर. परिस्थितीला दोष देता देता, निलेशला दोषी मानणारी, त्याने परिस्थितीतून काढलेल्या मार्गांचा अवलंब करायला नकार देणारी सीमा आणि सीमाला आनंदी ठेवण्यासाठी धडपडणारा पण चुकत जाणारा निलेश. कोंडीत सापडल्यासारखं आयुष्य जगताना त्यांनी स्वत:साठी निर्माण केलेलं स्थान म्हणजेच, ’दोन ध्रुवावर’ हा लेख.  (बृहनमहाराष्ट्र वृत्त: ऑक्टोबर २०१४)

मंडळोमंडळी: भारताच्या बाहेर पडलं की मराठी माणूस एकत्र येतो आणि मंडळाची स्थापना होतेच. या मंडळांवरचा हा लेख. गावोगावी असणार्‍या महाराष्ट्र मंडळात सामील होण्याची प्रत्येक मराठी माणसाची कारणं वेगळी असतात. कधी मुलांसाठी, कधी ओळखी व्हाव्यात म्हणून तर कधी मुलांना, स्वत:ला व्यासपीठ मिळावं या हेतूने मंडळाचं सभासदत्व घेतलं जातं. पण मंडळाचा कारभार आणि लोकांची मानसिकता सर्वत्र सारखीच. राधा नावाच्या एका लहानग्या मुलीच्या, तसंच नाटकवेड्या नरेन आणि मंडळाच्या कार्यकारीणीच्या नजरेतून मंडळांच्या मानसिकतेचा वेध घेणारा लेख ’मंडळोमंडळी’.  (बृहनमहाराष्ट्र वृत्त: डिसेंबर २०१४)

अळवावरचे थेंब: हातातून निसटून गेलेले क्षण अळवावरच्या पाण्यासारखे घरंगळून गेलेले असतात. तसंच आयुष्यातल्या घटनांचंही. त्याच कल्पनेवरचा हा लेख.
प्रणिता आणि तिच्या दोन मुली, तितिशा आणि दिशा.   स्पर्धेच्या युगात त्यांनी मागे पडू नये म्हणून घाण्याला जुंपल्यागत सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीत त्यांना अडकवून टाकलेल्या आई - बाबांना या मुलींनी घातलेलं साकडं म्हणजे ’अळवावरचे थेंब’ हा लेख.
(बृहनमहाराष्ट्र वृत्त: फेब्रुवारी २०१५)

धागे: परदेशात रहाताना मायभूमीतील आपल्या जीवलगांशी मुलांची जवळीक रहावी यासाठी आपण अतोनात प्रयत्न करत असतो. आशा - निराशेच्या या खेळात कधीतरी दिसणार्‍या प्रकाशाच्या तिरीपिने हरखून जायला कसं होतं यावरचा हा लेख.
 भारतातल्या नातेवाइकांपासून मुलगा अलिप्त असतो याचा सल बाळगणारे केतकी - सारंग.  नीलला त्यांच्याबद्दल ओढ वाटावी यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करणारी केतकी. अखेर नील महाविद्यालयीन शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यावर सगळे मार्ग खुंटल्यासारखे वाटत असतानाच नील अचानक एक सुखद धक्का देतो त्याची कथा सांगणारा लेख म्हणजे, ’धागे’.
(बृहनमहाराष्ट्र वृत्त: एप्रिल २०१५)

Thursday, July 23, 2015

परवाना

काल प्रेमपत्र आलं सरकारचं. हल्ली कुणाची पत्रच येत नाहीत त्यामुळे सरकारचं तर सरकारचं. कुणाला तरी झाली आठवण असं म्हणत नाचवत नाचवत ते पत्र पेटीतून घरात आणलं. चष्मा लावला तरी काय लिहलंय ते दिसेना तेव्हा दार उघडलं. पत्र उन्हात धरलं आणि एकदा थोडं जवळ, एकदा लांब असं करत कुठल्या कोनातून नीट वाचता येईल याचा अंदाज घेत वाचायला सुरुवात केली. हे रामा, डोळ्यांचीच परिक्षा घेणार होते म्हणे. "लायसन्स रिन्यूअल" गाडी चालवण्याच्या परवान्याची मुदत संपत आली. द्या परिक्षा पुन्हा. खुणा ओळखा, डोळे चांगले असल्याची खात्री पटवा. सुतकी चेहर्‍याने ते प्रेमपत्र पुन्हा पुन्हा वाचलं.

परिक्षा म्हटलं की आधीच घाबरगुंडी उडालेली असते आणि द्यायच्या तरी किती या परिक्षा.  सरकारी खात्यातली लोकं आपलं ओझं त्यांच्या खांद्यावर असल्यासारखा चेहरा करुन बसलेली पाहिली की पास होणारेही धाडधाड नापास होत असतील.  या देशात पहिल्यांदा अशी परिक्षा द्यायला गेले तेव्हा कणकवली, रत्नागिरीत दिलेल्या ’परिक्षा’ लक्षात होत्या. 8 आकडा तर काढायचा, आहे काय नी नाही काय असं म्हणत गाडीत बसले. बाजूला परिक्षक दार उघडून बसला आणि मग मात्र  गोंधळ सुरु झाला. एकतर या देशात नवीन, त्याचे उच्चार मला कसे समजायचे आणि मी बोललेलं त्याला कसं समजायचं. मी पेचात पडले. तोही त्याच पेचात असावा. चेहरा हुप्प करुन बसला होता.
’स्ट्रेट’ एका शब्दात दिलेले हुकूम पाळायची मला कधीच सवय नव्हती. संदर्भासहित स्पष्टीकरण असलं तरच जमतं बाई. तो पुढे काही बोलेल याची क्षणभर वाट पाहिली आणि विचारलं.
"स्ट्रेट.. यु मीन आय हॅव टू ड्राइव्ह स्ट्रेट?"
"लेफ्ट..." तो खेकसला. विचारता विचारता पुढे नेलेली गाडी मी घाबरुन एकदम लेफ्टली.
"ब्रेक, ब्रेक." तो माझ्यापेक्षा घाबरला असावा. फाटल्यासारखा ओरडला आणि अमेरिकन माणसाला कसं घाबरवलं या आनंदात मी जोरात ब्रेक दाबला. गाडी कशी कुणास ठाऊक पुन्हा जिथून सुरुवात झाली होती तिथेच आली होती. त्याने धाडकन दार उघडलं. तो श्वास वर खाली करत थोडावेळ तसाच बसून राहिला. धाप लागल्यासारखा. मला कळेना आता उतरायचं की तसंच बसून राहायचं, पास की नापास? त्याच्या लाल झालेल्या चेहर्‍याकडे हळूच पाहत विचारलं.
"आर यू ओके?"
"आय आस्क्ड यू टेक लेफ्ट."
"यस. ॲड आय डिड टेक लेफ्ट."
"थॅक गॉड." मग कशाला भडकला हा माणूस? मी हसून पाहिलं.
"यू डिड नॉट गो टू लेफ्ट लेन." तो गुरगुरल्यागत पुटपुटला.
"फॉर व्हॉट?"
"टू टेक  अ लेफ्ट टर्न..."
"असं जायचं असतं?" चुकून मराठीत विचारलं आणि त्याने खाऊ की गिळू नजरेने माझ्याकडे पाहिलं.
"सॉरी." आता नापास होणार या कल्पनेनं मला धाप लागली. तोपर्यंत त्याची धाप नष्ट झाली होती. तो गाडीतून उतरला. मी त्याच्या मागून मागून. सावित्रीच्या मनात यमाच्या मागून जाताना काय काय विचार येत असतील ते मला आत्त्ता कळत होतं.  आता, ’या पुन्हा’ सांगणार या तयारीतच त्याने दिलेला कागद डोळ्यासमोर धरला.  आनंदाने त्यालाच मिठी मारावीशी वाटली तरी शहाणपणा करुन त्याला अधिक पेचात न पाडता विजयी चेहर्‍याने मी माझा मोर्चा नवर्‍याच्या दिशेने वळवला. आता ही काय दिवे लावणार असा चेहरा करुन तो दूर कुठेतरी कोपर्‍यात लपला होता.

त्यानंतर सरकारला अशी अधूनमधून आठवण होतंच असते. मग व्हा सज्ज पुन्हा परिक्षा द्यायला. करा गोंधळ, निस्तारा असं चालू होतं. चुकीच्या वर्गात गेलो, चुकीचा पेपर लिहिला, चुकीच्या विषयाचा अभ्यास केला, परिक्षा काल आणि आपण आज तिथे गेलो अशी स्वप्न परिक्षा होईपर्यंत पडत राहतात. पुन्हा एकदा शाळेत गेल्याचा अनुभव आमचं हे सरकार देतं ते काय कमी आहे. चला लागा आता तयारीला....

Thursday, July 16, 2015

माझ्या मैत्रीणीची...

नुकतीच श्रीदेवीला, माझ्या मैत्रीणीला नोकरी लागली. ती नोकरीच्या शोधात बरेच महिने होती. नोकरी मिळवण्यासाठी काय काय करु शकतात लोकं याबद्दलचं माझं ज्ञान तिच्या नोकरी संशोधन काळात पीएचडी मिळवण्याइतपत वाढलं.
"आज मुलाखत द्यायला यायची आहे."
"यायची आहे? म्हणजे तुला मुलाखत द्यायला जायचं आहे का?"
"नाही फोनवर आहे ना मुलाखत. नाव माझं पण मुलाखत ती देईल. म्हणून ’यायची’ म्हटलं." हे असं चालतं ही ऐकीव माहीती उदाहरणासकट समोर आल्यावर बसलेला धक्का न दर्शविता मी ’अधिक’ माहितीसाठी बाजारात भाजी घ्यायला गेल्यासारखं विचारलं,
"सध्या काय दर आहे?"
"काम फत्ते झालं तर 500 डॉलर्स." ती ज्या कामासाठी या मुलाखती देत होती तेच मी पण करते त्यामुळे आपणही या ’बिझनेस’ मध्ये घुसून जोडधंदा सुरु करावा का असा विचार मनात चमकून गेला. तो चेहर्‍यावरही दिसला असावा.
"तू देशील का मुलाखत? मला काय तिला द्यायचे ते तुला देईन." माझं पापभीरु मन शहारलंच. असली बेकायदेशीर कामं आम्ही ’मराठी’ लोक करत नाही (?) हे ठसवायला घाईघाईत म्हटलं,
"नको नको, मला नाही अशा मार्गाने पैसे मिळवणं बरं वाटत. आणि तसंही माझ्याकडे भरपूर पैसे आहेत." म्हटलं आणि ती आता मग ते पैसे मला दे म्हणाली तर म्हणून घाबरले.
आधी तिची मुलाखत ती दुसरी देणार म्हणून घाबरले, आता माझ्याकडचे भरपूर पैसे तिने मागितले तर म्हणून पुन्हा घाबरले. माझं हे घाबराघुबरी प्रकरण संपेपर्यंत तिला नोकरी लागलीही. आणि काम करायला ती माझ्याच कार्यालयात रुजूही झाली....

एका दिवसानंतर...
कार्यालयात कसलातरी उग्र दर्प पसरला होता. बरीचजणं काम सोडून त्याची चौकशी करण्याकरता इकडे तिकडे करत होती. सहा सात जण वास सहन होत नाही म्हणून घरुन काम करायची परवानगी मिळवावी का याची चर्चा करण्यात मग्न झाले. थोड्याच वेळात त्यात ते यशस्वीही झाले. कार्यालय ओस पडलं. आम्ही आपले एकदोघं जण टकटक करत संगणक बडवत होतो. एकदम माझ्या लक्षात आलं, कालच नव्याने रुजू झालेली श्रीदेवी कुठे दिसत नाही. हिला आधीच समजलं की काय आज घरुन काम करता येईल म्हणून. आम्ही जेमतेम तिघंजणं उरलो होतो. पोनीटेलला विचारलं,
"श्रीदेवी कुठे आहे?"
"सिरी इज नॉट कमिंग बॅक."
धक्काच बसला.
"का? कालच तर तिचा पहिला दिवस होता. "
"हो, पण नो कम्युनिकेशन स्किल्स म्हणून शी गॉट फायर्ड यस्टरडे ओन्ली." मला तिच्या अशा येण्याचं आणि जाण्याचं प्रचंड दु:ख झालं. आली काय नी गेली काय. घरी गेल्या गेल्या मी तिच्याघरी धावले. खरं तर म्हणायचं होतं, बघ असले उद्योग करावेतच कशाला. नोकरी काय कधी ना कधी मिळालीच असती. केवढी नामुष्कीची गोष्ट आहे ही एकाच दिवसात हायर आणि फायर, उगाचच सार्‍या भारतीयाबद्दल पण मत.... पण नुसतीच लटकलेल्या चेहर्‍याने मी तिच्यासमोर उभी राहिले. तिने माझ्या पाठीवर थोपटलं,
"अगं इतकं काय मनाला लावून घेतेस. मिळेल मला नोकरी. एक दिवसाचा अनुभव माझ्या दृष्टीने खूप मोठा आहे. या एका वर्षाच्या अनुभवामुळे उद्याच एक मुलाखत आहे...."

Wednesday, June 24, 2015

एकांकिका

दरवर्षीप्रमाणे यंदाही एकांकिकांची तयारी जोरात सुरु आहे. पाहायला आलात तर नक्की आवडेल.


वेषांतर:
तामिळनाडू मधील अळमग्गळ नावाचं एक खेडं. जेमतेम पाचशे उंबरठे असलेलं. इथल्या एका पडीक अवस्थेतल्या वाड्यात वेषांतर एकांकिकेतील नाट्य घडतं. वाड्यातील शास्त्रीबुवा मूळचे गोमंतक. उपजिविकेसाठी पार दक्षिणेत येऊन स्थिरावलेले. मराठी भाषिक तरुणींच्या आगमनाने मुलखातलं कुणीतरी भेटल्याचा शास्त्रीबुवांना आनंद होतो. पण हा आनंद क्षणभुंगुर ठरावा अशा घटना घडत राहतात. घडणारं सारं प्रत्येकाच्याच दृष्टीने अकल्पनीय,धक्कादायक. निर्माण झालेल्या वादळाला कसं तोंड देतात या वाड्यातील व्यक्ती?
कलाकार : रणजित गुर्जर, मेघनाकुलकर्णी, सुप्रिया गरुड, मोहना जोगळेकर, बोस सुब्रमणी.

धोबीपछाड – कुस्तीमधला एक डाव. काळ बदलला, साधनं बदलली तसं डावपेचांचं स्वरुप बदललं. रंगमंचावरचा धोबीपछाडही असाच. या डावात कुस्तीपटू आहेतस्वत:ला यम म्हणविणारे दोघं. हे दोघं रंगमंचावरच शड्डू ठोकून उभे ठाकतात. सावित्री- सत्यवान भूमिका करायची की नाही या संभ्रमात पडतात. तेवढ्यातदुसरा यमदूतही उभा ठाकतो. नाटकातलं नाटक रंगायला लागतं. अखेर कोण होतं चितपट? यम की यम? आणि कोण होतं यमदूत…? विनोदी एकांकिका - धोबीपछाड.
कलाकार: संदीप कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, प्रशांत सरोदे, प्रिती सुळे, चिन्मय नाडकर्णी, गिरीश भावठाणकर.
अधिक माहिती:

Tuesday, June 2, 2015

जागो हिंदुस्तानी

रंगमंचावर  रंग दे बसंती चोला हे गाणं सुरु झालं आणि एका कडव्याला त्यातील गाण्याच्या ओळी म्हणत  गायक रंगमंचावरुन खाली उतरले, मंचावरचे दिवे अंधुक होत गेले आणि उजळलेल्या प्रेक्षागृहात गायकांमधील एक  कलावंत प्रेक्षकांमधील आजींच्या चरणांशी वाकला. आजींनी डोळ्यांमधून ओघळणारे अश्रू पुसत गायकाला आशीर्वाद दिला. आपल्या मनात अढळ स्थान निर्माण केलेली गाणी तितक्याच ताकदीच्या गायकांकडून ऐकण्यात प्रेक्षक रमलेले असतानाच या प्रसंगाने सार्‍यांचीच मनं भारावून गेली. कार्यक्रम होता कोल्हापूरच्या स्वरनिनाद संस्थेचा जागो हिंदुस्तानी.


जागतिकीकरणाने सगळीच समीकरणं बदलली. कोणतंही गाणं इंटरनेटवर आता सहज उपलब्ध आहे. भारतातून सांस्कृतिक कार्यक्रम परदेशात येण्याचं प्रमाणही प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे, नाटक, संगीत, वादन, चित्रपट अशा कार्यक्रमांची रेलचेल चालू असते. सादरकर्त्यांची आणि पाहणार्‍यांची अभिरुचीही बदलली आहे. मग आवर्जून पहावं असं जागो हिंदुस्तानीमध्ये काय आहे? या कार्यक्रमाचं वेगळेपण कशात आहे? जागो हिंदुस्तानीचं यश आहे ते रंगमंचावर निवेदन आणि गायनाच्या साथीने रसिकांना आठवणींच्या राज्यात नेणं, विस्मृतीत जात चाललेल्या घटनांचा हात हाती घेऊन, प्रसंगाना उजाळा देत अलगद त्या काळात नेऊन सोडणं तर काहीवेळा आपल्या ऐकण्यात, माहितीत नसलेला एखादा प्रसंग, घटना डोळ्यासमोर जसा घडला तसा उभा करणं यामध्ये आहे. दोन - अडीच तासाचा हा कार्यक्रम आपल्याला एका वेगळ्या विश्वात नेतो, गत आणि वर्तमान काळाची सैर चालू रहाते ती नव्या - जुन्या गाण्यांच्या साथीने. अभिमान, खेद, हळहळ, चुटपूट, स्फूर्ती, उत्साह अशा सार्‍या भावना या वाटेवर आपल्या सोबतीने येत रहातात आणि एक अविस्मरणीय कार्यक्रम पाहिल्याचं समाधान मनात  तरळत रहातं.
जागो हिंदुस्तानी कार्यक्रमात निवेदक भूषण शेंबेकर आपल्या डोळ्यासमोर प्रत्येक प्रसंग ताकदीने उभा करतात. भूत - वर्तमानाची पानं अलगद उलगडत राहतात. प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा करण्यात ते यशस्वी होतात. उधमसिंग ह्यांनी पंजाबच्या गव्हर्नर मायकल ओव्हायरची जालियनवाला हत्याकांडाला जबाबदार धरत गोळ्या झाडून हत्या केली. हा प्रसंग ऐकताना उधमसिंगांनी दिलेला कबुलीजबाब ऐकताना आपला उर  अभिमानाने  भरुन येतो. प्लासीच्या विजयानंतरच्या जल्लोषात पराजित हिंदुस्तानी काय करु शकत होते याबद्दल त्या मिरवणुकीत सामील असलेल्या परकीयाचे शब्द ऐकताना चुटपूट लागते, खेद वाटतो. निवेदनातून येणार्‍या या अशा आणि अनेक घटना ऐकता ऐकता  सर्वांच्याच मनात प्रसंगांची गर्दी व्हायला लागते. देशासाठी लढलेल्या, प्राण गमावलेल्या अनामिक वीरांच्या बलिदानाची आठवण येऊन हळहळ वाटते आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीनंतरचा भारत नजरेसमोर आला की आपण काय काय गमावलं, कुठून कुठे पोचलो ह्याचा हिशोब मन मांडायला लागतं. 

भारत १९९७ साली स्वातंत्र्याचं ५० वे वर्ष साजरं करत असताना निर्माते सुनील सुतार आणि दिग्दर्शक सुरेश शुक्ल यांनी आपल्या स्वरनिनाद या संस्थेतर्फे जागो हिंदुस्तानी चा पहिला प्रयोग रंगमंचावर आणला. आणि त्यानंतर सातत्याने त्यांचे प्रयोग भारतभर चालू आहेत. या कार्यक्रमाला नेपथ्य आहे ते भारतीय ठेव्याचं,  रेखाटनं आहेत ती ऐतिहासिक ठिकाणांची. उत्कृष्ट प्रकाशयोजनेमुळे ह्या रेखाटनांचा ३D परिणाम छान साधला जातो. 

स्वरनिनादने गेले २६ वर्ष सातत्याने गर्जा महाराष्ट्र, देस मेरा रंगीला, गीत बहार, लख लख चंदेरी, शब्द सुरांच्या झुल्यावर असे वेगवेगळे हिंदी, मराठी गीतांचे कार्यक्रम भारतभर सादर केले आहेत.

जागो हिंदुस्तानी हा जो कार्यक्रम सध्या अमेरिकेत चालू आहे त्याचे भारतात आत्तापर्यत सर्वत्र प्रयोग झाले आहेत. वाघा सरहद्दीवरही हा कार्यक्रम झाला आहे याचा प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो. इतकंच नाही तर तुरुंगातील कैद्यांना घेऊन त्यांच्याकडूनच हा कार्यक्रम करुन घेण्याचा आगळावेगळा प्रयोगही स्वरनिनादने यशस्वीरीत्या केला. २ राष्ट्रीय तर २ राज्य पातळीवरच्या पुरस्काराने हा कार्यक्रम सन्मानित झालेला आहे. उत्कृष्ट संगीत, गाणी, नेपथ्य, प्रकाशयोजना असलेला हा दोन - अडीच तासांचा कार्यक्रम आपल्याला खिळवून टाकतो.  गाण्यातील भावना थेट हृदयापर्यंत पोचवणारे समर्थ गायक यात आहेत. आणि सध्याच्या काळातील कार्यक्रमांच्या बदललेल्या स्वरुपाच्या पार्श्वभूमीवर संदेशे आते है, फिर भी दिल है हिंदुस्तानी, बोलो मेरे संग,  भारत के रहनेवाला, ए मेरे वतन के लोगो, सारे जहॉंसे अच्छा, वंदे मातरम अशी एकापेक्षा एक सरस गीतं असलेला हा कार्यक्रम पहाताना आपण वेळेचं भान विसरुन जातो. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, ध्वनी - प्रकाश - नेपथ्य - गायन - वादन - निवेदनाचा जमलेला सूर म्हणजे जागो हिंदुस्तानी हा कार्यक्रम. प्रत्येकाने एकदा तरी अनुभवून डोळे आणि कान तृप्त करावेत असा!  


BMM वृत्तमध्ये प्रसिद्ध - http://bmmonline.org/sites/default/files/BMM/BMM/2015_6_BMMVrutta_MohanaJoglekararticle.pdf