Tuesday, May 5, 2026

निरभ्र

आज तसं काम खूप होतं. आटपून घरी जायलाच रात्रीचे दोन वाजणार याची स्पंदनला खात्री झाली. पण इलाज नव्हता. कॉफीचे घोट रिचवत तो काम करत राहिला. घरी परतण्यापूर्वी गेल्या तासाभरातली इ मेल त्याने डोळ्याखालून घातली आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला.

’आनंदी...’ इथे? आपल्याच गावात? कधीही भेटू शकतो तिला? स्पंदनचा विश्वास बसत नव्हता. मैत्रिणीने पाठवलेलं इ मेल त्याने पुन्हा पुन्हा वाचलं. आनंदी नोकरीच्या शोधात होती. झटकन निर्णय घेत स्पंदनने पटकन चार ओळी लिहिल्या. इ मेल पाठवून झालं आणि नंतर मात्र कितीतरी प्रश्न मनात सतावत राहिले. मैत्रिणीशी  बोलून त्याला वाटणारी तीच ही आनंदी आहे याची त्याने खात्री केली. आणि इ मेल पाठवणं ही चूक झालेली नाही याबद्दल खात्री पटल्यावर तो निश्चिंत झाला. दोन्ही हात मानेमागे गुंफवून खुर्चीच्या पाठीवर त्याने डोकं टेकलं. विचारात गढून गेला तो. जवळजवळ चार वर्षांनी आनंदी पुन्हा संपर्कात येण्याची चिन्ह दिसत होती. या चार वर्षात काय झालं असेल? आता भेटून खरंच काय साध्य होईल? स्पंदन हे नाव तरी तिला आठवत असेल? इ मेल मिळाल्यावर आनंदीची प्रतिक्रिया काय होईल?

रात्री उशीरापर्यंत नोकरीचे अर्ज इकडे - तिकडे पाठवून देत आनंदी कंटाळली होती. पण इलाज नव्हता. ओळखीच्या लोकांना तिने नोकरी बघत असल्याचं कळवलं होतं. घाई नव्हती पण नुसतं बसूनही चालणार नव्हतं. एक प्रोजेक्ट संपायच्या आधीच दुसरा मिळाला तर मधले दडपणाचे दिवस वाट्याला येणार नाहीत. तेच या क्षणी आनंदीच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. इतके दिवस दोन - दोन आघाड्यावर लढणं चालू होतं.  एकीकडे नवीन नोकरी शोधावी लागणार याची चिन्ह आणि एकीकडे विशाल. अखेर मनावरचं ओझं उतरलं.  फरफट थांबली. मनावरचे काळे ढग आता दूर व्हायला हवे होते, मनःशांती हवी होती.  स्वत:च्या कर्तृत्वावर ती मिळेल याची तिला खात्री होती.  विशालचं मात्र तिला राहून राहून आश्चर्य वाटतं होतं. ऐन उमेदीच्या काळात पंख गमावलेलं पाखरू झालं होतं त्याचं. त्याचं त्याला तरी हे कळेल? कळलं तर कधी? का खूप उशीर झालेला असेल तेव्हा? त्याचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि तिच्या चेहर्‍यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. नंतर तिला हसायलाच यायला लागलं. त्याच्या वेडेपणाचं की भोळसटपणाचं तेच तिला समजेना. पण तो प्रसंग मात्र लख्ख आठवायला लागला तिला. आणि तसेच कितीतरी.

त्या दिवशी विशाल कामावरून परतला तोच चेहरा पाडून.

"आई ओरडल्यावर होतो तसा झालाय चेहरा. काय झालं?" आनंदीने हसत विचारलं.

"आपले लोकच त्रास देतात गं.  सातासमुद्राकडे गेलं तरी आपली वृत्ती बदलत नाही.  पाय ओढणं, दुसर्‍याचा दुःस्वास अगदी रक्तात भिनलेल्या गोष्टी आहेत या आपल्या." 

"चालायचंच."

"हो. पण मी अडकतो ना. दरवेळेला होतं असं. वैताग आलाय मला."

"तू रोखठोक बोलायला लाग विशाल. दरवेळी पडतं घेतोस त्यामुळे होतं तसं. आपली बाजू चुकीची नसेल तर कधीकधी लढूनच ते सिद्ध करावं लागतं." तिच्या आवाजातल्या ठामपणाकडे विशाल पाहत राहिला.  तिच्यातल्या आत्मविश्वासानं दरवेळी तो चकित व्हायचा आणि  त्याचवेळेला मनावर प्रचंड दडपणही यायचं.  तिच्यासारखं वागणं का जमत नाही याचा विषादही वाटायचा. त्याने तिला तसं बोलूनही दाखवलं कित्येकदा. आजही पुन्हा तितक्याच कौतुकाने त्याने त्याला काय वाटतं ते सांगितलं. आनंदी हसली. कामावर काय झालं ते तिने नीट समजून घेतलं. विशालचं कुठे चुकतंय, तो कुठे कमी पडतोय ते समजावून सांगितलं आणि काय करता येईल याबद्दल वेगवेगळे मार्गही सुचवले. आनंदीच्या बळावर हे करणं सहज जमेल असं त्याचं त्यालाच वाटलं. आनंदीच्या आश्वासक मिठीत स्वत:ला गुरफटवून तो शांतपणे झोपला.

सकाळी दोघं दचकून जागे झाले ते फोनच्या आवाजाने. टेबलावरच्या फोनकडे दोघांनी पाहिलं आणि परत डोळे मिटले. फोन वाजतच राहिला.  आनंदीने विशालला हातानेच ढकललं.  कूस वळवत विशाल पुन्हा झोपला. नाईलाजाने डोळे चोळत आनंदीने फोन उचलला. कुणाचा फोन आहे हेही तिने पाहिलं नव्हतं. फोनवर विशालची आई होती. आनंदीशी थोडंफार बोलून विशालला उठवायला लावलं तिने.

"तो झोपलाय. काल खूप उशीरा आला. आज शनिवार आहे तर निवांत झोपायचा बेत आहे त्याचा." आनंदी झोपलेल्या विशालकडे पाहत उत्तरली. 

"आम्हाला नंतर बाहेर जायचं आहे म्हणावं." बाबांचा आवाज तिच्या कानावर पडला. आनंदीने मुकाट्याने विशालला उठवलं. विशाल कुरकूर करत उठला. पण एकदा आईशी गप्पा सुरू झाल्यावर खुलला. कालचं सारं प्रकरण त्याने पुन्हा एकदा त्याच क्रमात त्याच्या आई - बाबांना सांगितलं. त्याचं आनंदीला विशेष वाटलं नाही. पण विशालचे बाबा जेव्हा भारतातून अमेरिकेत त्याच्या साहेबांशी बोलायला यायचं म्हणायला लागले तेव्हा तिला नवल वाटलं आणि धक्का बसला तो विशालच्या मान डोलावण्याचा. त्यांचं बोलणं संपल्यावर विशालकडून तिने फोन घेतलाच.

"बाबा, तुम्ही विशालच्या साहेबांशी बोलायला यायचं म्हणताय?" कानावर विश्वास बसत नसल्यासारखा स्वर होता तिचा.

"हो. का ? त्याची आईसुद्धा यायचं म्हणतेय." आनंदीला हसावं की रडावं तेच कळेना.

"त्या पण साहेबांना भेटणार आहेत का?" तिच्या आवाजातला उपरोधिकपणा विशालच्या बाबांना जाणवला असावा.

"हे बघ आनंदी. विशाल काही तुझ्यासारखा स्वतंत्र वातावरणात वाढलेला नाही. तू शिक्षणासाठी बाहेर राहिलीस. विशाल लग्न होईपर्यंत आमच्याच बरोबर होता. आमचं कायम लक्ष असायचं त्याच्यावर. जर त्याला त्रास होत असेल तर धावणारच ना आम्ही मदतीला?"

"बाबा, कामातल्या बारीकसारीक कुरबुरी सोडवण्यासाठी तुम्ही भारतातून इथे येणार? विशाल काही लहान नाही. तुम्हाला त्याला भेटायला यायचं असेल तर जरूर या. पण त्याच्या साहेबांना भेटण्यासाठी नक्कीच नाही. त्याचं त्याला तोंड देऊ दे या प्रसंगाला." आनंदीच्या स्पष्टवक्तेपणाचा विशालच्या बाबांना राग आला. त्यांनी काही न बोलता फोन ठेवून दिला.

"कशाला दुखवलंस तू बाबांना?" विशालचे डोळे भरून आल्यासारखे वाटले आनंदीला.

"विशाल, तू कमालच करतोस. मान काय डोलवतोस ते दोघं तुझ्या बॉसशी बोलायला येणार म्हणाले तर? स्वत:चं स्वत:  बाहेर पडायचं असतं अशा अडचणींतून..." विशालला आनंदीच्या बोलण्याला खीळ कशी घालावी ते समजत नव्हतं. फोन वाजला तसा त्याने सुटकेचा श्वास टाकला. आईचा फोन पाहिल्यावर मात्र कुचंबणा झाल्यासारखं त्याने आनंदीकडे पाहिलं.  लहान मुलाची समजूत घालतात तशी समजूत त्याची आई फोनवर तिकडून घालते आहे हे आनंदीला विशालच्या स्वरावरून जाणवत होतं. विशालची कीव आली आनंदीला. ती तिथून निघून गेली. स्वत:च्या मनाचा उद्वेग शांत कसा करावा तेच तिला समजेनासं झालं होतं. कणा नसलेल्या पुरुषाबरोबर वैवाहिक जीवनाची सुरुवात तर झाली होती. पण हे असंच चालू राहिलं तर...?

आनंदीने टाकलेला रागीट कटाक्ष पाहून विशालला आईबरोबरचं बोलणं थांबवावं असं वाटत होतं. पण आईच्या मृदू स्वराने त्याला बरं वाटत होतं. आनंदी रागाने तिथून गेली तसं घाईघाईने त्याने बोलणं आटोपतं घेतलं. तिचा राग शांत करायचा एकच मार्ग त्याला ठाऊक होता. त्याने कडक कॉफीचा कप आनंदीसमोर धरला. पण आनंदीची कळी खुलली नाही.

"आई रागवेल बरं बाळाला बायकोसाठी कॉफी केली म्हणून." धुसफुसत तिने कॉफीचा कप तोंडाला लावला.

"मी नाही सांगणार तिला तुझ्यासाठी कॉफी केली ते." निरागस चेहर्‍याने विशाल उत्तरला आणि आनंदीला पुढे काय बोलावं तेच कळेना. ती निमूटपणे कॉफीचे घोट घेत राहिली. पण तिला राहवलं नाही.

"किती बारीकसारीक चौकशा करत असते रे तुझी आई. जेवायला काय केलं. नीट जेवलास ना, पुरेसं होतं ना आणि तू पण श्रावणबाळासारखा उत्तरं देत असतोस." 

"आनंदी जाऊ दे ना." तो काकुळतीने म्हणाला. ती गप्प बसून राहिली. 

"आनंदी, मी एकुलता एक आहे त्यामुळे काळजी वाटते त्यांना आणि मलाही काही चुकीचं वाटत नाही." आनंदीचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. कसल्या विचारात गुंतली होती कुणास ठाऊक. विशालही कॉफीचा कप हातात धरून तसाच बसून राहिला. आनंदी समोर बसलेली असूनही त्याला खूप एकटं वाटत होतं. आनंदीचा आग्रह म्हणूनच तो नागपूर सोडून पार या देशात आला होता. आतापर्यंत नागपूर सोडून कुठे बाहेर स्थिर व्हायचा विचारही त्याच्या मनात डोकावलेला नव्हता. एकुलता एक. आई - बाबा दोघं वकील. बाबांनी मुद्दाम घराचा वरचा भाग त्याच्यासाठी ठेवला होता. सारं कसं छान सुरळीत चालू होतं. आनंदी आयुष्यात येईपर्यंत. आनंदीचं स्थळ सांगून आलं तेव्हा आई - बाबांचंच नक्की ठरत नव्हतं. मुंबईची मुलगी. नागपूरला कशी राहील हाच प्रश्न दोघांना छळत होता. आणि झालंही तसंच.

"मला संधी मिळाली तर परदेशात जायचं आहे."

"अमेरिका?" त्याच्या बाबांनी विचारलं होतं.

"असंच काही नाही. कोणताही देश. तिथे काम करण्याचा अनुभव घ्यायचा आहे. फार वेगळं वातावरण असतं बाहेरच्या देशात कामाबाबतीत असं ऐकलंय. मला त्याचा अनुभव घ्यायचा आहे ."

"पण आम्हाला नागपूरमध्येच राहणारी मुलगी पाहिजे." विशालच्या आईच्या ठाम स्वराला उत्तर म्हणून आनंदीने फक्त विशालकडे पाहिलं. विशाल तिच्याकडे टक लावून पाहत होता. तिला त्याचा निरागस चेहरा विलक्षण आवडला.  सार्‍या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून नागपूर तर नागपूर असंही तिच्या मनात येऊन गेलं. पण क्षणभरच. कुणालाच काही बोलण्याची संधी न देता ती म्हणाली.

"जिथे माझं काम असेल तिथे राहायला आवडेल मला. काम न करता राहणं ही कल्पनाच करू शकत नाही मी." नंतरचं बोलणं, उपचाराचं, वरवरचंच होतं. दोन्ही बाजूंनी मनातल्या मनात नकार पक्के केले होते. 

आणि तरीही विशालचं लग्न आनंदीशीच झालं. विशालने कितीतरी मुली पाहिल्या पण आनंदी काही त्याच्या मनातून जाईना. आनंदीही मुलं पाहत होतीच. विशाल जसा तिच्यात अडकला होता तेवढं स्वत:ला गुंतवून घेण्याचा आनंदीचा स्वभाव नव्हताच. विशालकडून काही कळलं नव्हतं त्यामुळे तिने नकार गृहीत धरला आणि ती मुलांना भेटत राहिली. होकार, नकार चालू होते. तेवढ्यात त्याच्या घरुन होकार आला. नकार देण्यासारखं, मुद्दाम बोट ठेवण्यासारखं काही नव्हतंच. विशालने परदेशात जायची तयारी दर्शविली होती. त्याची शैक्षणिक कारकीर्द पाहता त्याला ते सहज शक्यही होतं. आनंदीला परदेशात काम करण्याच्या अनुभवाचं महत्त्व जास्त वाटत होतं. काही वर्षांनी ते परत गेलेच असते नागपूरला. 

"चूक झाली?" विशालला कॅनडात आल्यावर काही महिन्यातच हा प्रश्न पडायला लागला होता. सतत आई - वडिलांच्या छायेत वाढलेल्या विशालला स्वतंत्रपणे निर्णय घेणं म्हणजे दडपणच वाटायचं. नागपूरचे दिवस आठवायचे. कामावरून परत आलं की तिघं प्रत्येक गोष्टीची चर्चा करायचे. मतं मांडायचे. दोघांच्या मतानुसार वागणं विशालच्या अंगवळणी पडलं होतं. आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्याने कधी नुकसान झालं नव्हतं. आतापर्यंत सुरळीत पार पडलं होतं. घरी - दारी दोन्ही ठिकाणी. आनंदी घरात आल्यावर तिच्याशीही तो सहज जमवून घ्यायला शिकला. आनंदी मधला आग्रही ठामपणाही त्याला आवडायचा. तिच्या म्हणण्यानुसार आपसूकच तो वागायचा. मुळात त्याच्या स्वभावात आक्रमपणा नव्हता, निर्णयक्षमता होती की नाही हे त्याने कधी अजमावून पाहिलंच नव्हतं. कुणाचं मन मोडणं त्याच्या फार जीवावर येई आणि त्यासाठी स्वत:च्या मनाला थोडी मुरड घालण्यात त्याला कमीपणा वाटत नसे. पण आनंदी आल्यावर या त्याच्या भूमिकेमुळे येणार्‍या अडचणी त्याला जाणवायला लागल्या होत्या.  ना तो आई - बाबांना खूश ठेवू शकत होता, ना आनंदीला. त्याला त्याचा त्रास होत होता पण पर्याय सापडत नव्हता. आनंदीचे स्वाभिमान, कणा, आत्मविश्वास हे शब्द त्याच्या कानात घुमत राहायचे त्याचवेळेस त्याला त्याच्या आईचं म्हणणंही पूर्णपणे पटायचं. दरवेळी ती म्हणायची,

"कधी नजरे आड केलं नाही तुला आणि आता एकदम कुठच्या कुठे गेलास. त्यामुळे..." काय खाल्लं, कुणी केलं  पासून कंपनीत काय घडलं आणि तो नागपूरलाच असल्यासारखं चर्चासत्र. रोजची तीच प्रश्नोत्तरं. त्याला त्यात काही वावगं वाटायचं नाही. पण आनंदी काय म्हणेल हा विचार मनामध्ये असायचाच.  आनंदीचं म्हणणंही चुकीचं नव्हतंच.

"प्रत्येकवेळी तेच तेच विचारतात. आता लहान आहेस का तू? मी करून नाही घातले तुझा आवडीचे पदार्थ तर तू घे ना करून. बाहेर जाऊन खा. नाहीतर जरा तोंड उघडून सांग आईला इथे कसं असतं ते. स्वत: वकील आहेत. दिवसभर बाहेर असतात. कळत कसं नाही एकट्याने शक्य नसतं सर्व. दोघांनाही करावी लागतात कामं इकडे. नाहीतर हे पाहिजे, ते पाहिजेचा आग्रह तरी सोडायला हवा."  

"अगं, तिला नाही गं सांगून पटत. नागपूरला मी कधी इकडची काडी तिकडे केली नाही. आणि सगळी ऐकीव माहिती आहे तिच्याकडे बाहेरच्या देशाची. स्वत:ला करावं लागतं इतकंच माहीत आहे तिला. "

"पण म्हणजे तुला करावं लागत असेल तर ते आनंदीने करावं? मला पण तेच विचारतात. तू स्वयंपाक करून कामावर जातेस का? रात्रीचा स्वयंपाक कोण करतं, दिवसा कोण करतं. ऐकेन, ऐकेन आणि तुम्ही येऊन राहा म्हणून सांगेन." आनंदीचं असं बोलणं ऐकलं की विशाल धास्तावून जायला लागला. घरी बोलायचं तर शक्यतो आनंदी नसताना, नाहीतर ती आसपास नाही याची खात्री करायला लागला.

दोन वर्षांनी दोघं भारतात आले. मुंबईच्या विमानतळावर आनंदी आणि विशाल, दोघांचेही आई - बाबा आले होते. चौघांकडे पाहतानाच  प्रत्येकाच्या चेहर्‍यावरचा तणाव आनंदीला जाणवला.  खारला घरी पोचल्यावर दुसर्‍याच दिवशी सकाळी नागपूरला जायला निघायचं आहे असं विशालच्या बाबांनी म्हटल्यावर तिला धक्काच बसला.

"बाबा, आम्ही चार दिवस मुंबईत राहू आणि नागपूरला येऊ असं ठरवलं होतं ना आपण सर्वांनी? थोडे दिवस नागपूरला राहून मी परत मुंबईला येईन. विशाल राहील दोन आठवडे तिकडे. तुम्ही अशी घाई का करताय?"

"आम्हाला सुट्ट्या नाहीत. दोघांच्याही कोर्टाच्या तारखा आहेत लागलेल्या."

"पण तुम्ही आलातच का मुंबईला?" आनंदीच्या रोखठोक प्रश्नाने विशालची आई गडबडली. पण लगेच सावरून म्हणाली.

"मुलाला भेटावंसं वाटलं म्हणून आलो."

"अहो, पण त्यांनी बेत कळवला होता ना. तुम्हाला विचारूनच सगळं ठरवलं होतं." आनंदीचे बाबा मध्ये पडले आणि वादाला वेगळंच वळण लागलं. विशाल अस्वस्थ होऊन नुसताच बसून होता. विशालच्या बाबांनी सामान उचललं तशी त्याची आईही त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहिली.

"विशाल, तुला जायचं तर जा तू त्यांच्याबरोबर." आनंदीने विलक्षण शांत स्वरात म्हटलं आणि आता काय वादळ उठणार या शंकेने आनंदीच्या आईचा जीव भांबावला. ती न सुचून विशालकडे पाहत राहिली. विशाल दारात येऊन उभा राहिलेला पाहून आनंदीचा अगदी संताप संताप झाला. "विशाल, तू खरंच निघतोयस?"

"हो. तू पण चल." चाचरत तो म्हणाला. आईने तिलाही निघायची खूण केली. बाबांनीही तिला बाजूला घेऊन समजूत घातली. आनंदीने झाला तितका तमाशा पुरे म्हणत निघायची तयारी दर्शविली.

"मी पण निघते तुमच्याबरोबरच. पण सलग इतका प्रवास त्रासाचा होईल. आज इथे राहू. सकाळी निघू." ती स्वत:चं सामान आणायला वळली आणि विशालच्या आईच्या शब्दांनी थबकली. 

"विशालच येईल फक्त आमच्याबरोबर." 

"ठीक आहे. मी येईन ठरल्याप्रमाणे चार दिवसांनी." राग आवरत आनंदीने उत्तर दिलं.

"तू आली नाहीस तरी चालेल." विशालच्या आईच्या शब्दांचा अर्थ कुणाच्याच पटकन लक्षात आला नाही. पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला तसं आनंदीची आई पुढे झाली.

"जे झालं त्याबद्दल माफ करा. आता आणखी ताणू नका. चूक झाली असेल तर आपली सर्वांचीच. आनंदीला का शिक्षा करताय तुम्ही?"

"आणि विशाल, आनंदी बायको ना तुझी. मग तू का नाही काही बोलत? जो बेत ठरला आहे तसा पार पाडू इतकं साधं तू तुझ्या आई - बाबांना सांगू शकत नाहीस?" आनंदीच्या बाबांनी विषादाने विचारलं.

"तुम्ही आमच्याबद्दल त्याच्या मनात अढी निर्माण करताय." विशालचे बाबा ताठर स्वरात म्हणाले.

"का? त्याला स्वत:चं मत नाही? प्रत्येकाने त्याच्या मनात भरवायचं आणि त्याप्रमाणे तो भरून घेणार." आनंदी विशालसमोर जाऊन उभी राहिली. "असा उठसूठ प्रत्येकाला खूश ठेवायला लागलास ना विशाल तर कुणीच सुखी होणार नाही. ना तू, ना मी आणि ना तुझे आई बाबा. विचार कर विशाल. खरं सांगतेय मी." आनंदी ताडताड बोलली आणि आतल्या खोलीत जाऊन बसून राहिली. विशाल त्याच्या आई - बाबांबरोबर निघून गेला. ते त्याचं शेवटचं दर्शन. नंतर सगळे धागे उसवतच गेले. विशालला त्याच्या आई - बाबांच्या शब्दाबाहेर जायचं नव्हतं. आनंदीच्या ठाम मतांपासून तिचे आई - बाबा तिला परावृत्त करू शकत नव्हते. आनंदीला होईल तेवढी तडजोड तिने हे लग्न टिकवण्याकरता केली होती. विशालने संसार कुणाशी करायचा हे ठरवावं या मतावर ती ठाम होती. कॅनडाहून भारतात येताना एकत्र झाल्या आहेत असं वाटणार्‍या दोघांच्या वाटा वेगळ्या कधी झाल्या तेच कळलं नव्हतं दोघांनाही. सुट्टी संपल्यावर कॅनडात परत जायचा आनंदीचा निर्णय बदलला नाही. त्याचवेळी विशालच्या आई - बाबांनी विशाल नागपूरलाच राहील हे पक्कं केलं. 

कॅनडाला आल्यावर विशालचं सामान दोन खोक्यात भरून तिने एका खोलीत ठेवून दिलं. सहा महिने वाट बघायची, नाही आला तर कुठल्या तरी संस्थेला सामान दान करायचं तिने ठरवून टाकलं. रिकाम्या खोलीत मोकळा श्वास घेतला आणि एकदाच फक्त एकदाच ती हमसून हमसून रडली. आयुष्यभरासाठी घेतलेला हात निसटून जाण्याच्या मार्गावर कधी पोचला? चूक कुणाची? परिस्थिती बदलेल? बदलावी अशी इच्छा तरी राहिली आहे का? विचार करून करून तिचं मन थकून जात होतं. दोन टोकाच्या स्वभावाची माणसं एकत्र आल्याचा हा परिणाम? आई - वडिलांचा पदर न सुटलेल्या विशालला दोष द्यायचा, त्याच्या आई - बाबांना की स्वत:लाच आणि तडजोडीचं बाळकडू पाजायला विसरलेल्या स्वत:च्या आई - वडिलांना? उत्तर सापडत नव्हतं. बरेच दिवस विचार करत पर्याय शोघत राहिली आनंदी. अखेर कंटाळून तिने  तो नाद सोडून दिला. एका वळणावर येऊन ती स्थिर झाली. अलिप्ततेने मनाला वेढून टाकलं. तरी कितीतरी दिवस तिला वाटत राहिलं. एकदा तरी विशाल आणि ती दोघं, दोघांनी बोलायला पाहिजे  सारं संपवण्यापूर्वी. कदाचित विशाल इथे असता तर ते शक्य होतं. भारतात गेलं की अस्तित्व हरवून जातं. दुसर्‍यांच्या मताचं ओझं बाळगून वावरायला लागतो आपण हे तिचं तिलाच जाणवत होतं. मग आज्ञाधारक विशालचं दुसरं काय होणार. संबंध कायमचे संपवण्याआधी तिला काय वाटतंय ते मनापासून तिने लिहून काढलं. विशालला पाठवूनही दिलं. त्याचे आई - बाबा प्रत्येक शब्द  वाचतील ही कल्पना असूनही तिला स्वत:च्या मनाचं समाधान करून घ्यायचं होतं. 

आनंदीचं पत्र वाचल्यानंतर अगदी लगेच तिला भेटावं, तो तिच्या प्रेमात कसा आकंठ बुडालेला आहे हे सांगावं असं वाटत राहिलं विशालला. लग्नानंतरची दोन वर्ष आठवत राहिली. आनंदीचा उत्साही स्वभाव, तडफदार वागणं याचंच तर त्याला आकर्षण होतं. किती पटकन ठरवायची ती कोणतीही गोष्ट. अगदी लांब पल्ल्याचा प्रवास असला तरी दोन मिनिटात ठरवून निघायचं. सुरुवाती सुरुवातीला राहायचं कुठे, जायचं कसं असे प्रश्न विचारून तो तिला हैराण करे. अनुभवाने, तिला सगळं जमतं असंच त्याला वाटायला लागलं होतं. साध्यासाध्या बाबतीत तिच्यावर अवलंबून राहायला लागला तो. तेच चुकलं? तो विचार करत राहिला. तसंही ठाम निर्णय त्याने कधी कुठे घेतले होते? आत्ताही त्याला आपलं चुकलं की नाही ते ठरवता येईना. सवयीने त्याने ते पत्र आईला दिलं. आनंदीच्या वागण्याची पुन्हा चिरफाड झाली. तिला उत्तर पाठवायचीही तसदी घेऊ नकोस असं त्याच्या आईने त्याला बजावलं आणि त्याने ते मानलं. आनंदी उत्तराची वाट पाहत असेल या विचाराने अधूनमधून तो अस्वस्थ होई.

महिना दोन महिने खरंच त्याच्या उत्तराची वाट पाहिली आनंदीने. पण हळूहळू ती स्वत:च्या व्यापात गर्क झाली. एकटी राहत होती. कामाचा ताण वाढत होता. संध्याकाळी परत आलं की जेमतेम पोटात काहीतरी ढकलून ती दिवस संपवे. विचार करायला वेळ नव्हता, इच्छाही नव्हती. शनिवार - रविवार मात्र एकटेपणाची भावना वेढून टाके. भूतकाळ अस्वस्थ करत राही. अशावेळी ती भटकंतीत मन रमवायला शिकली. धावणं, फिरणं झालं की मन प्रसन्न होऊन जाई. मरगळ झटकून ती पुन्हा आपल्या कामात व्यग्र होऊन जाई. निराशावादी ती नव्हतीच त्यामुळे लवकरच एकटेपणातला आनंदही  लुटायला शिकली. चालू असलेला प्रोजेक्ट संपण्याची चिन्ह दिसायला लागल्यावर  पुन्हा  नोकरी शोधण्याच्या वणवणीला तयार झाली. ओळखीपाळखीच्या लोकांना लगेचच तिने कळवलं. हे काम संपायच्या आधीच दुसरं काम मिळेल तर किती बरं असं वाटत असतानाच आलेल्या इ मेलने क्षणभर तिच्या छातीत धडधडलं. स्पंदन? हा तोच स्पंदन असेल? चार वर्ष तरी झाली असतील भेटून. त्याच्या इ मेल मध्ये काही उल्लेख नाही पण हा तोच आहे.... भेटायचं की टाळायचं? 

अस्वस्थपणे ती ’स्टार बक्स’ च्या बाहेर येरझारा घालत होती. जरा लवकरच पोचली होती. लांबून स्पंदन येताना दिसला आणि तिच्या हृदयाचे ठोके चुकले.

"ओळखलंस?" त्याने हसत हात पुढे केला. त्याच्याशी हस्तांदोलन करून तिने फक्त मान डोलवली.

"चल. आत बसू." तिला काय बोलायचं तेच सुचत नव्हतं. मनातले प्रश्न ओठावर येऊ द्यायचे नाही असं ठरवूनही ती बोलून गेली.

"नोकरीसाठी खरंच मदत करणार आहेस की मला ओळखत होतास म्हणून..." तो हसला.

"दोन्ही."

"दोन्ही? म्हणजे?" त्याला काय म्हणायचं आहे ते तिच्या लक्षात येत नव्हतं.

"तुझ्याशी बोलायचं होतं. पुन्हा भेटशील असं कधी वाटलंच नव्हतं. आणि माझ्याच कंपनीत नोकरी मिळू शकते. म्हणून दोन्ही म्हटलं."

"चार वर्ष झाली स्पंदन आपण भेटून. एकदाच तर भेटलो होतो आणि एक दोन वेळा फोनवर बोललो होतो. म्हणजे तुला काय बोलायचं असेल तेच समजत..."

"मी अजून लग्न केलेलं नाही आनंदी." तिला तोडून टाकत त्याने म्हटलं आणि ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली.

"आणि त्याचं कारण तू आहेस." तो घाईघाईने बोलला.

"मी?" आता तर ती अगदीच गोंधळली.

"हो."

"अरे, पण मी होकार कळवला होता. नकार तुझ्याकडूनच होता स्पंदन."

"खरं आहे तुझं. तुला भेटलो तेव्हा असं एखाद्या मुलीला ठरवून भेटणं वगैरेचा पहिलाच प्रसंग होता. माझ्या अपेक्षा काय आहेत हे माझं मलाच कळलेलं नव्हतं. मग सर्वांचं म्हणणं पडलं की घाई करू नये. पटलं मला ते. पण नंतर प्रत्येक मुलीची मनातल्या मनात तुझ्याशी तुलना करायला लागलो. शेवटी तुला फोन केला."

"फोन केलास?"

"हो. विसरलीस?" आनंदी विचार करत राहिली.

"फोन केला पण माझ्या मनातलं बोलायची संधी दिलीच नाहीस तू." तो काय म्हणतो आहे ते हळूहळू तिच्या लक्षात आलं. विशाल बरोबर लग्न पक्कं झालं आणि स्पंदनचा फोन आला होता. त्या वेळेस क्षणभर प्रश्न पडला होता स्पंदनने फोन का केला असेल म्हणून. पण विशालमय झाली होती ती. स्पंदनने भेटायची इच्छा व्यक्त केल्यावर लग्न ठरल्याचं तिने आनंदाने सांगितलं होतं. त्यामुळे पुढे काहीच बोलला नसेल का स्पंदन? तिच्या मनातले विचार वाचल्यासारखं स्पंदन उत्तरला.

"तू इतक्या पटकन तोडून टाकलंस की पुढे काही बोलताच आलं नाही." आनंदी हसली.

"तुझा नकार पचवला होता त्यामुळे झालं असेल तसं.  माझं लग्न ठरलं होतं आणि तू पुन्हा भेटू या का असं विचारत होतास. मी स्पष्ट विचारलं नाही तरी तेव्हा अंतर्मनाला तुला का भेटायचं आहे ते जाणवलं असणारच. पण तुझ्यासारखंच जाणवून घ्यायचं नसेल."

"हं. तुझं लग्न ठरलं म्हटल्यावर पुढचे मार्ग खुंटलेच. मी मुलींना भेटत राहिलो. नकार देत राहिलो. प्रत्येकवेळेला मुलींना असं नकार देणंही रुचत नव्हतं आणि कुठलीच मुलगी मनापासून पसंतीला का उतरत नाही तेही कळत नव्हतं.  आनंदी मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. पण हे माझं मलाच जाणवायला खूप दिवस लागले. कुणालाही भेटून आलो की  तुझा सावळा, तरतरीत चेहरा आठवायचा. त्यापेक्षाही तुझं बोलणं, वागणं..." स्पंदनचं बोलणं मनापासून ऐकत होती आनंदी.  नकळत आनंदीच्या तोंडून निघून गेलं.

"बोलणं, वागणं?" स्पंदनला आपल्या वागण्या बोलण्यात असं काय आढळलं की तो विसरू शकला नसेल? तिचा स्वर उत्सुक होता.

"आपण भेटलो त्या वेळेस उगाच आमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नाही केलास. बाबांची मतं तर एक दोन वेळा तिथल्यातिथे खोडून काढलीस. आणि त्यात कुठेही उर्मटपणाची झाक दिसली नाही. उलट त्या विषयावरचा अभ्यास जाणवला."

"अरे वा. पण हेच तुझ्या बाबांचं पण मत होतं का?" आनंदीने साशंक स्वरात विचारलं. घाईघाईत तिने ती तसं का विचारते आहे ह्याचाही खुलासा केला. " मला आठवतंय,  माझी आई म्हणाली होती नंतर की मी फार अटीतटीवर येते. पण एखाद्या विषयाचा अभ्यास असेल तर कुणी चुकीचा मुद्दा मांडला की राहवतच नाही."

"बाबांना जाणवला तुझा अभ्यास.  पण महत्त्वाचं ते नाही. मत मांडण्यातला तुझ्यातला आत्मविश्वास, ठामपणा आणि तरीही वागण्यातलं सहजपण. ते वेगळं होतं आणि जसजसं मी मुलींना भेटत गेलो तसतसं ते प्रकर्षाने जाणवायला लागलं. प्रत्येक मुलीशी माझं मन तुझ्याबरोबर तुलना करत राहिलं तेव्हा लक्षात आलं मी तुझ्या प्रेमात आकंठ बुडालो आहे.  शेवटी कंटाळून घरी लग्न न करण्याचा निर्णय सांगितला. काही पर्यायच नव्हता. आनंदी..." त्याला काहीतरी बोलायचं आहे हे आनंदीच्या लक्षात आलं  पण अंदाज येत नव्हता. आणि नोकरी शोधण्यासाठी मदत करणार आहे म्हणून इथे भेटायला बोलावलं स्पंदनने की त्याला विशालबद्दल...?  स्वभावाप्रमाणे ती स्पष्ट विचारणार तेवढ्यात स्पंदनच म्हणाला,

"आनंदी, तुझा घटस्फोट झालेला मला ठाऊक आहे." आता मात्र तिला काय बोलावं ते सुचेना. दोघंही अस्वस्थपणे कॉफीचे घुटके घेत नजर टाळत राहिले. कसंनुसं हसून आनंदी म्हणाली.

"हे सांगायला बोलावलंस की काय?" अवघडल्यासारखा स्पंदन हसला.

"छे. तुला वेगळंच विचारायचं होतं." आनंदीच्या काळ्याभोर डोळ्यात डोकावत तो म्हणाला.

"विचार ना. नोकरीचं म्हणशील तर हा प्रोजेक्ट संपला की लगेच दुसरा शोधणं भाग आहे मला.  तुझ्याच कंपनीत आहे का जागा?" स्पंदनला काय विचारायचं असावं याचा अंदाज आला तरी ती मुद्द्यावर आली. तिला तो विषय नकोच होता. पुन्हा त्या वाटेकडे वळायचा विचार तिच्या मनात आतापर्यंत क्षणभरही डोकावला नव्हता. बेसावध क्षणात तिला स्वत:ला गुंतवू द्यायचं नव्हतं. पण आनंदीच्या प्रश्नाकडे कानाडोळा करत स्पंदनने विचारलं,

"माझ्याशी लग्न करशील?" आनंदीच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे पाहून तो हसला. मोकळेपणाने हसला. मनावरचा ताण निघून गेला होता. आनंदीच्या उत्तराचीही आता त्याला काळजी नव्हती. मनावरचा दडपण उतरल्याचा आनंद त्याला जास्त वाटत होता.  आनंदी आपल्याच गावात आहे आणि  नोकरी शोधते आहे या योगायोगाचं त्याला आधी आश्चर्य वाटलं होतं.  साशंक मनाने त्याने चौकशी केली होती. तिच्या घटस्फोटाचं कळल्यावर किंचित हळहळ वाटली होती. पण लगेच मनाने उचल खाल्ली. सुखाचा शोध संपल्यासारखं वाटायला लागलं. पण विषय कसा काढायचा? ती ’हो’ म्हणेल? आधी आपल्याकडून मिळालेला नकार तिच्या लक्षात असेल? एका अनुभवाने पोळल्यावर पुन्हा त्या फंदात पडेल? मनात प्रश्न असंख्य होते पण उत्तरं ठाऊक नव्हती. आनंदीशी बोलल्याशिवाय तिच्या मनाचा थांग लागलाही नसता. पण त्या क्षणापासून जी अस्वस्थता आली होती ती एकदाचा तो प्रश्न विचारल्यावर एकदम नाहीशी झाली. जास्तीत जास्त काय ’नाही’ म्हणेल. त्याने प्रसन्न चेहर्‍याने तिच्याकडे पाहिलं. आनंदी त्याच्याकडेच टक लावून पाहत होती.

"बोल ना." तो काकुळतीने म्हणाला.

"मला नाही काही सुचत."

"ठीक आहे. विचार कर."

"पण माझ्या नोकरीचं?" त्याला हसायला आलं.

"तुझ्या निर्णयामुळे त्यात काही बदल होणार नाही." दोघंही मनापासून हसले. आनंदीने अचानक विचारलं.

"तू घरी सांगितलं आहेस तुझ्या?" त्याने मान डोलवली.

"परवानगी दिली?"

"सहज. लग्न करायचंच नाही या बद्दल ठाम होतो. लग्नाला तयार झालो यातच खूष आहेत. त्यात जिच्या प्रेमात पडलोय तिच्याशीच लग्न करतोय याचं समाधान असेलच ना."

"पण घटस्फोटित बाईशी लग्न. आधीची परिस्थिती वेगळी होती."

"माझ्या दृष्टीने प्रेमात पडलेल्या मुलीशी लग्न आनंदी!" आनंदीकडे एकटक पाहत स्पंदन म्हणाला. त्याची नजर टाळत ती म्हणाली,

"मी उत्तर दिलेलं नाही स्पंदन."

"मग दे ना. म्हण ना हो. आधी होकार होताच की तुझा."

"स्पंदन, तुझं हे पहिलं लग्न असणार आहे. मी नुकतीच वेगळी झाले आहे. आणि कितीही म्हटलं तरी अजून त्यातून सावरलेले नाही."

"लगेच नाही गं लग्न करायचं. थांबू आपण काही दिवस. इतकी वर्ष थांबलो मी तसं अजून थांबेन. पण तुझा होकार ऐकायचा आहे मला आनंदी." 

"माझ्या विस्कटलेल्या संसाराचे व्रण तुला दुखावतील वेळोवेळी. माझं विटलेलं मन पाहून तू वैतागशील. माझं तोलूनमापून वागणं तुला निरुत्साही करेल. झेपेल?" स्पंदन हसला.

"इतकी बदलली आहेस?"

"हो. माझं मलाच जाणवतं ते. आणि माझा घटस्फोट का झाला याबाबत तू काहीच विचारलेलं नाहीस अजून."

"त्या आठवणींनी तुला त्रास व्हायला नको म्हणून विचारलं नाही."

"मी जे सांगेन ती अर्थात माझी बाजू असेल स्पंदन. विशालचीही बाजू असेलच."

"खरं आहे. पण त्याची बाजू काय होती हे तुला ठाऊक असणारच ना? तूच सांग दोन्ही बाजू." स्पंदनकडे  आनंदी मूकपणे पाहत राहिली. 

"हो म्हण आनंदी. उभं आयुष्य आहे आपल्यासमोर. होशील पुन्हा तू हसतीखेळती. मी करेन तुला तुझ्या नावाप्रमाणे आनंदी." स्पंदनने आनंदीचा हात हात धरला आणि तो तिच्या डोळ्यात खोल डोकावला. आनंदीच्या सार्‍या शरीरावर रोमांच उभे राहिले. मनावर रेंगाळत राहिलेले काळे ढग विरून निरभ्र आकाश दृष्टिक्षेपात आल्यासारखं वाटत होतं. इतक्या पटकन कोणत्याच निर्णयाप्रत पोचायला नको हे कळत असलं, व्यावहारिक मन मागे ओढत असलं तरी आनंदीचे  बोलके डोळे भावुक झाले, भविष्याची स्वप्न अलगद त्या डोळ्यांमध्ये उतरली.  स्पंदनच्या चेहर्‍यावर समाधानाचं हसू उमटलं.  एकमेकांच्या डोळ्यातील भविष्याची रांगोळी अधीर मनं  निरखीत राहिली. मधली चार वर्ष पुसून नव्याने आयुष्याच्या रांगोळीचे ठिपके जोडण्यासाठी आतूर झाली.



Monday, April 27, 2026

एक होती माया

 १९ तारखेला zoom वर एका अप्रतिम पुस्तकातील काही भाग वाचायची संधी मिळाली तसंच लेखकाशी संवाद साधण्याचीही. 'एक होती माया' पुस्तक माझ्याकडे नसल्यामुळे मी पूर्ण वाचलेलं नाही पण जी प्रकरणं मी कार्यक्रमात वाचली ती अप्रतिम आहेत. ओघवतं वर्णन, किस्से आणि छायाचित्र वाचकाला हमखास मायाच्या प्रेमात पाडतात.
 
माझ्याकडे मराठी शिकणार्‍या विद्यार्थ्यांना बोलणं, वाचणं, लिहिणं याव्यतिरिक्त सतत नवं काहीतरी देण्याचा माझा ध्यास असतो. जगातल्या घडामोडी त्यांना मराठीतून समजल्या पाहिजेत, सांगता आल्या पाहिजेत त्याबरोबरच जे वेगळं, अद्भुत असेल ते कळावं यासाठी माझा प्रयत्न चालू असतो. मुलांना जेव्हा सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी आणि अशा अनेक कर्तुत्ववान व्यक्तींबद्दल सांगता येतं, आनंदीबाईंचं अमेरिकेतील स्मारक बघावसं वाटतं तेव्हा माझ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. 

यावर्षी माझ्या मुलीने कॉलेजच्या एका प्रकल्पासाठी आनंदीबाई जोशींवर निबंध लिहिला आणि त्यानिमित्ताने केलेल्या वाचनानंतर स्वातंत्र्यचळवळीतील स्त्रियांबद्दल तिला किती अभिमान वाटला हे ऐकलं तेव्हा भरुन आलं.


या माझ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मायाबद्दलची प्रकरणं मी माझ्या विद्यार्थांना वाचून दाखवली. सुखद धक्का बसला तो माझ्या कॅलिफोर्नियाच्या एका विद्यार्थीनीला ताडोबा अभयारण्य, माया ठाऊक होती ह्याचा. इतर विद्यार्थ्यांनाही  माया आणि ताडोबाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.  


तुम्हीही ’माया’ ची जीवनकहाणी आणि किस्से नक्की ऐका, अभिप्राय नोंदवा, कार्यक्रम आवडला तर माझ्या वाहिनीचे सभासद व्हा. (मराठीत - Please, like, comment, and subscribe) 


अभिवाचन - प्रसाद घाणेकर, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर, निलेश कोदे.


झलक:





            





 

पूर्ण कार्यक्रम:


Book is available in English as well

https://www.amazon.com/Maya-Biography.../dp/9365694418...

Monday, April 13, 2026

निसर्ग

नाशिकमधील झाडांबद्दलच्या बातम्या वाचताना मनात डोकावलेले विचार. 
  
पक्षी किती ते परसदारी,
सूर्यकिरणांची लगबग न्यारी!

भ्रमणध्वनी जणू आकांत करी,
झाडे सारी पडली मृत्यूमुखी!

मनात गर्दी अतोनात प्रश्नचिन्हांची,
संकुलं अन् रस्त्यांच्या जाळ्यांची ही घाई—

निसर्ग जोपासनेतच का कुचराई? 
आपणच त्याचे असे कसाई?


So many birds in the courtyard,
Sunbeams scatter, soft and bright!

Trees are felled on mobile screens,
Questions gather in my mind!

Rising malls and racing roads—
Must nature always pay the price?


Saturday, April 11, 2026

रिकामपण


ती शांत बसलेली, पण विचार करत
तोही शांतच… पण खरंच शांत!

खिडकीतून ऐकू येणारा किलबिलाट

त्यांच्या पाखरांची आठवण देणारा!


दोघं उठतात

अंगणात बसतात!


झाडावरच्या पक्षांकडे बघत

आपल्या पाखरांच्या आठवणी जागवत!


चंदन उगाळत आठवणींचं

स्वतःच चंदन होतात…


मुलांच्या वावराने घर उजळतं

रिकामपण बहरून जातं


पुन्हा ती दोघं

आता दोघंही खरी शांत - निवांत!


ऐकत तृप्तीने

अंगणातला किलबिलाट


आश्वासक!


AI च्या मदतीने इंग्रजी अनुवाद.


She sits in stillness, yet her thoughts keep moving

He too is still… but a deeper stillness lives within!


From the window drifts a chirping sound

Carrying back the memory of their little birds!


They both rise together

And settle in the courtyard!


Gazing at the birds on the tree

They awaken the sleeping traces of their own children!


Grinding sandalwood, steeped in remembrance

They slowly turn into sandalwood themselves…!


The home once again lights up with children’s presence

And emptiness begins to flower!


And then the two of them

Becomes quiet in a truer way… calm, unbroken!


Listening, with quiet fulfillment

To the courtyard’s chirping!


Reassuring…!



Sunday, April 5, 2026

बाईच्या कविता २

 


किरण येलेंच्या कविता ऐकणं, वाचणं हा एक अनुभव असतो. दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी इथून मी आणि कणकवलीहून प्रसाद घाणेकर आणि zoom वर अभिवाचन करतो.


गेल्या महिन्याच्या कार्यक्रमात किरण येले यांच्या बाईच्या कविता २ ह्या त्यांच्या नवीन काव्यसंग्रहावर कार्यक्रम होता ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. ते काव्यसंग्रहाबद्दल बोलले आणि काही कविताही त्यांनी वाचल्या. 


शेवटी मी, अमेरिकेतील स्त्री आणि भारतीय स्त्री असा स्वानुभावावर तुलनात्मक लेख वाचला. 


ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा.




Friday, March 13, 2026

निर्णय

निर्णय हा माझा १२ वा लघुपट. १२ पैकी २ भारतातल्या व्यावसायिक दिग्दर्शकांनी केले. दोन्हीसाठी कथा माझी आणि मी त्यात भूमिकाही  केल्या. उरलेले मी हळूहळू इथे महणजे अमेरिकेत सर्व शिकत, शिकत केलेले.

निर्णय हा लघुपट माझ्यासाठी महत्त्वाचा आहे कारण लेकीने उत्साहाने (!) काम केलं आहे. कधी नव्हे ते मी सांगेन ते न कुरकुरता तिला करावं लागत होतं आणि ती ते आनंदाने करत होती. तरी आईवर चिडायची संधी तिने लघुपटातल्या आईवर चिडून घेतली आहे आणि ते तिला चांगलं जमलं आहे कारण वेगळं काही करावं लागलं नाही, घरी जे करते तेच तिथे 😊.

लघुपट आवडला तर अभिप्राय द्या, आवडल्याचा शिक्का (like) उमटवा, इतरांना पाठवा आणि ९४ लोकांनी वाहिनीचे सभासद (subscriber) व्हा म्हणजे मला माझा परिवार १००० लोकांचा झाला याचा आनंद उपभोगता येईल.




Friday, February 20, 2026

अरुणा ढेरे कथा - निर्णय

लेखिका अरुणा ढेरे ह्यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त एकूण ७० अरूणाताई या उपक्रमात मी त्यांची एक कथा वाचली आहे त्याचा दुवा.



Saturday, December 20, 2025

आपलं आपणचा सोस (DIY)

"पडलं, पडलं, पडलं..." नक्की कोण किंचाळलं आणि काय पडलं हे कळलंच नाही त्यामुळे वरुन खाली येणारं ’ऑनिंग’ (आता हे काय? असा प्रश्न पडला असेल तर जरा दमानं घ्या. समजेलच.) बघताना मला गोवर्धन; मित्र नव्हे - पर्वत आठवला. कृष्णाने एका बोटावर गोवर्धन उचलला. आम्ही प्रत्येकी एक बोट वापरायचं की प्रत्येकी एक पंजा या धर्मसंकटात सापडल्यागत हातात धरलेल्या ऑनिंगच्या दांड्यांवरचा जोर आणखी वाढवला. आमच्या जोराला धुडकावत ’ऑनिंग’ धाडदिशी कोसळलं. धडाडधुम! पोरांच्या कानात पांढरी बोंडकी असल्यामुळे त्यांना हा आवाज ऐकू गेलाच नाही. समोर पडलेलं धूड दिसलं हे नशीब. ती तिथल्यातिथे मागे झाली. 

गवतातल्या खड्डयात अडखळून पडतील म्हणून ऑनिंगवरचा सुटलेला माझा पंजा मी त्यांच्या पाठीवर टेकवला. दोघांच्या पाठीवर एकेक पंजा. माझ्या भक्कम आधाराने ते ताठ उभे राहतील असं वाटत असतानाच मी ऑनिंग पडलं तेवढाच आवाज करत मागच्यामागे पडले. पोरांच्या कानातही आवाज चक्क शिरला आणि त्यांनी मागे वळून पाहिलं. त्यातही ऑनिंगला उचलू की आईला या संभ्रमात दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. मी उजवा हात वर करुन बुडत्याला काठीचा आधार या म्हणीसारखं, आईला मुलांचा आधार असा दर्दभरा चेहरा केला. दोघं नेहमीप्रमाणे पक्ष बदलत त्यांच्या वडिलांना मदत करायला धावले. एका पंजावर ’ऑनिंग’ धरताधरता त्यांच्या परमपूज्य वडिलांचा पंजा ऑनिंगखाली अडकलेला होता. पडलेल्या अवस्थेत डोकं बाहेर, पंजा गोवर्धन उचलल्यासारखा ऑनिंगवर. मुलांना लहानपणी ते करायची ती Tipi (छोटा तंबू) आठवली. दोघं आत घुसले. आत जाऊन तंबूला आधार दिला मग बाबाला आत खेचलं. उठताच येईना म्हणून पडल्यापडल्या DIY च्या सोसाला आता तरी आळा बसेल या आनंदावर आतल्या हशाखिदळण्याने पडल्यापडल्या विरजण पडलं! 

... तर ऑनिंग म्हणजे ताडपत्री. या ताडपत्रीची ही कहाणी! कशाला अशी कठीण, कठीण नावं देतात काय माहित. जिन्याच्या दांड्यांना बलुस्टर म्हणायचं. का? जाऊ दे, ताडपत्रीकडे वळू.

रोजच्यासारखं मी त्यादिवशीही २० मिनिटं सायकल चालवायला गेले. भारतात फिरायला बाहेर पडलं की शेजारीपाजारी भेटतात, आपण ख्यालीखुशाली विचारतो भेटणार्‍यांची आणि आजूबाजूच्यांचीही. कोणाच्या घरात काय चालू आहे याबद्दल बोलताना व्यायाम झाला कधी हेही कळत नाही. इथे रस्त्यावर माणसं दिसत नसली तरी चिटपाखरं दिसतात त्यामुळे चिटपाखरुही दिसत नाही असं म्हणता येणार नाही. कधी कासव हळूहळू रस्ता ओलांडत असतं, हरणं उड्या मारत पळतात. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत, थांबून, थांबून मी शेजार्‍यांची अंगणं, फुलझाडं बघते. घराच्याबाहेर काही बदल झाला असेल तर तो टिपते. घरी आल्यावर आपल्या घराबाहेर काय करता येईल याबद्दल रोज एकेक भन्नाट कल्पना मांडते. कधी त्या माझ्या स्वत:च्या असतात, कधी शेजार्‍याच्या बघितलेल्या तर कधी ’हायब्रीड’! तर आजच्या सायकलस्वारीत मला अशीच दिमाखात ४ दांड्यावर उभी असलेली, घराच्या भिंतीला जोडलेली हिरव्या चट्ट्यापट्ट्यांची ताडपत्री दिसली. परत आल्याआल्या माझ्या भन्नाट कल्पनांना सोयीस्करपणे वार्‍यावर सोडणार्‍या नवर्‍याला आणि मुलांना ताडपत्रीचं महत्व पटवायला सुरुवात केली. ताडपत्री म्हणजे काय हे न कळल्यामुळे घरातून बाहेर पडा, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सरळ, उजवीकडे अशा सहज समजणार्‍या पद्धतीने ताडपत्रीवाल्या शेजार्‍याचं घर कुठे आहे ते सांगून बघायला पाठवलं. 

"ऑनिंग म्हणतात त्याला." खाऊ की गिळू नजरेने पोरांनी परत येऊन सांगितलं. गुगल केलं असतंत तरी समजलं असतं असं म्हटल्यावर डोळे गरागरा फिरवत दोघांनी बोंडकं परत कानात घातली आणि मी नवर्‍याला पटवायला बसले. नेहमीप्रमाणे आमचा शेजारचा परममित्र चक्कर मारायला आला आणि मुळात ’ऑनिंग’ हवंच कशाला असा मुद्दा त्याने उपस्थित केला. तो हाणून पाडायला मला तासभर लागला. 

आता सुरु झाला ताडपत्रीचा शोध. Amazon वर ७०० - ८०० डॉलर्सला दिसणारी ताडपत्री दुकानदार दुप्पट भावाने विकत होते. दुकानही जवळपास नाही. मग नेहमीप्रमाणे आपणच मागवू आणि आपणच बसवू असं म्हणत आम्ही Amazon वरुन ताडपत्री मागवली. त्याच दरात आम्हाला पाहिजे त्यापेक्षा मोठी ताडपत्री मिळतेय म्हणून भलीमोठी मागवून टाकली. अख्खं घर ताडपत्रीनेच झाकायचं आहे की काय असं ती ताडपत्री आल्यावर वाटलं. आकार पाहून आम्ही तिला आडवं केलं. ती ६ महिने अख्खं गॅरेज अडवून पडून आडवीच. तिच्याकडे बघितलं की हे आपलं DIY नाही एवढं लक्षात यायचं पण कोणाचं ते कळायचं नाही.

ताडपत्री आपण लावू शकत नाही एवढंच आम्हाला ६ महिन्यात कळलं. ऑनिंग बसवणार्‍याचा शोध सुरु केला. दरम्यान शेजार्‍यापाजार्‍यांच्या चार शिड्याही आणून ठेवल्या. कशाला? पूर्वतयारी. मुलांच्या जागी शिड्या! ऑनिंगला शिड्यांच्या आधारावर उभं ठेवावं लागणार हे त्यांच्या उत्साहावरुन आम्हाला आधीच कळलं होतं. 

दरम्यान ताडपत्री लावणारे अनेक आले आणि गेले. घराची भिंत फोडून त्यातून दिव्यांसाठी तार बाहेर काढायला कोणी तयारच होईना. एक महाभाग झाला शेवटी तयार. तासाला ७५ डॉलर्स घेईन म्हणाला. कोणाच्या तरी घोड्याने आता आम्हाला गंगेत न्हायचंच होतं. तो सामान आणायला दुकानात गेला. आम्ही घड्याळात वेळ लावून बसलो.

"अर्धा तास झाला. एवढं काय शोधतोय?" साडेपस्तीस डॉलर्स इथेच संपले. बघता बघता दीडशे डॉलर्स संपले आणि महाशय आले. बराच वेळ त्यांनी घराच्या भिंतीचं निरीक्षण केलं. आम्ही त्याचं. अखेर महाशय म्हणाले,

"आय बॉट रॉंग मटेरियल...अॲड आय डोंट नो हाऊ टू ड्रील!" मुलांनी असे तारे तोडले असते तर ढुंगणावर चार फटके देईन असं निदान म्हणता तरी आलं असतं. आता त्याला हे म्हणणार कसं आणि तेही इंग्रजीत त्यामुळे मी दात ओठ खात नवर्‍याकडे पाहिलं.

"तूच शोधलेला बंदा आहे." त्याने माझ्यावर आगपाखड केली.

"माझी निवड नेहमी अशीच चुकते." मी ड्रीलवाल्याकडे बघत म्हटलं तरी बोट नवर्‍याकडे होतं. नवर्‍याने त्याच्या हातातून घाईघाईने त्याने दुकानातून आणलेलं सामान घेतलं. पावती घेऊन दहावेळा त्याने दिलेलं आणि पावतीतलं सामान याचा हिशोब मांडला. त्यालाच परत देऊन यायला सांग असं तावातावाने मी म्हणणार होते पण लक्षात आलं त्यालाही हा माणून १ तास लावेल. जड अंतकरणाने दिडशे डॉलर्स त्याला दिले. पुन्हा ताडपत्री बसवणार्‍याच्या शोध सुरु!

नवरा म्हणाला,

"मीच भिंतीला भोक पाडून टाकतो. तो एक प्रश्न मिटला की होईल आपलं काम." 

"तरी मी सांगत होतो ऑनिंगची गरजच नाही. सावली असते तुमच्याइथे संध्याकाळी." नवर्‍याचा मित्र आगीत तेल ओतणारा.  

"मला सकाळी बसायचं असेल बाहेर निवांत तर तू येणार आहेस का छत्र धरायला?" त्याला आणि त्याच्यामागून नवर्‍याला चेव चढायच्या आधी मी तो बेत हाणून पाडला.

"आयला, तुम्हा बायकांच्या डोक्यात काहीही येतं आणि उगाच आम्हाला कामाला जुंपता." मित्र सहज हार मानणारा नव्हताच.

"तू लेका लग्न झालं नाही म्हणून बोलतोस बिनधास्त." नवर्‍याला त्याचा एकदम कळवळा आला.

"तेपण दुसर्‍याच्या बायकोला. स्वत:ची आली की बघ काय होतं." मी फणकारले. तो निरुत्तर झाला आणि खसकन नवर्‍याच्या हातातली हातोडी त्याने ओढली. माझ्या डोक्यातच हातोडी हाणतो की काय म्हणून मी नवर्‍याची ढाल पुढे केली; पटकन नवर्‍याच्या मागे लपले. खूनशी हसत नवर्‍याचा मित्र माकडासारखी उडी मारुन स्वयंपाकघराच्या ओट्यावर चढला आणि दाराच्यावर नवर्‍याने खुणा केलेल्या चौकोनावर हिच्या नाहीतर तिच्या डोक्यावर या आवेशात त्याने भिंतीवरच्या त्या चौकोनावर हातोडी हाणली! भिंतीला भोकाऐवजी भगदाड पडलं. भगदाड बुजवलं की भोक उरेल अशा विश्वासात दिमाखात दोघांनी काम सुरु केलं. ’मदतीला या’ ह्या दोघांच्या पुकार्‍याला मुलं काही दाद देईनात. त्यांना मुळी ऐकूच जात नव्हतं. फारच कटकट केल्यावर त्यांच्यावेळेची आम्हाला किंमत नाही, आधी विचारलं नाही, काम नक्की काय ते सागिंतलं नाही याची जाणीव करुन देतच मदत केली. मित्रही मार्गदर्शन करुन गेला. परत येईन तेव्हा ताडपत्री लागलेली दिसली पाहिजे असा त्याचा आविर्भाव होता.

मी आणि नवराही ताडपत्री आज बसवूच या थाटात कामाला लागलो. अधूममधून मुलं मदत करतोय असं दाखवल्यासारखं करत ये - जा करत होती. अखेर कानात बोळे कोंबलेल्या मुलांना हलायचं नाही असं सांगून शिड्यांच्या जागी उभं केलं. मुलांना आधार म्हणून शिडी लावावी असं वाटत होतं पण मुलं शिडीपेक्षाही स्थिर स्थितप्रज्ञासारखी एकेक दांडी धरुन उभी राहिली त्यामुळे तो बेत बारगळला. संध्याकाळी ऑनिंगच्याखाली चहाचे घुटके घेत बसलो आहोत असं डोळ्यासमोर दृश्य दिसायला लागलं आणि त्याच डोळ्यांसमोर ते कोसळलं, भंगलंच. पडलेल्या ताडपत्रीचा तंबू झाला. तंबूच्या आत नवर्‍याने अंग टाकून दिलं, मुलांनी पथार्‍या पसरल्या. माझ्या आधाराच्या काठ्या तंबूत वडीलांबरोबर लोळत पडलेल्या. उचललेला हात मी खाली केला आणि जितक्या जोरात आयओय करता येईल तितक्या जोरात करत उठताउठता ही ताडपत्री परत करुनच टाकायची असं ठरवून टाकलं.

"वर्ष झालं घेऊन. आता कोण घेणार परत?" नवर्‍याने कुरकुर केली.

"भिंतीला भगदाड पाडलंत, त्याचं भोक केलंत, आम्हाला कामाला लावलंत, लोकांकडच्या शिड्या आणल्यात. आता माघार?" मुलांचे चेहरे बोलले.

"परत करणार म्हणजे कसं? घालणार कोण खोक्यात? पोचवणार कसं Amazon कडे? त्याचाच दुप्पट खर्च. तरी मी..." नवर्‍याचा अतिशहाणा मित्र पुढे काय बोलणार ते माहित होतं त्यामुळे मीच Amazon ला फोन लावला. 

"७०० डॉलर्सचं ऑनिंग परत करायला १२०० डॉलर्स जातील, उचलणार कोण ते धूड? घालणार कसं खोक्यात? गाडीत बसेल का?" नवर्‍यापेक्षा जास्त प्रश्न त्याच्या मित्राने उपस्थित केले.

"तू जा रे तुझ्या घरी." अशा हाताने खाणाखुणा करत मी Amazon शी बोलणी करायला सज्ज झाले. रंगवून, रंगवून सारी हकीकत त्यांना सांगितली. मरता मरता आम्ही कसे वाचलो ते ऐकवलं. बुवा पाघळला असं वाटलं पण नक्की कळत नव्हतं.

"गोरे लोक बरे असतात. उगाच जास्त प्रश्न विचारत नाहीत. ’सू’ करतो म्हणून धमकाव आणि पाठवायच्या खर्चाचंपण विचार." मित्र घरी न जाता नाटक सुरु असल्यासारखं ’प्रॉम्टींग’ करत म्हणाला.

"देसी आहे." मी हातवारे करत खाणाखुणांनी सांगितलं आणि एकदम परत धापकन आवाज झाला.

"काय झालं?" Amazon वाला बुवाच घाबरला. मित्राने उगाचच काहीतरी धापकन आपटलं होतं. त्याने फोन घेतला आणि सांगितलं.

"परत पडला त्यातला एक भाग. काही झालं तर Amazon जबाबदारी घेतं का?"

"असं करा, तुम्ही पाठवा परत." Amazon बुवा घाईघाईत म्हणाला.

"कोणीतरी न्यायला येईल ना? खोक्यात घालताना दुखापत..." 

"आमचीच माणसं भरतील, नेतील आणि नेण्याचा खर्चही करतील." तिकडचा देसी amazon बुवा मित्राला पुढे बोलू न देण्याची संधी देत म्हणाला. फोन ठेवला आणि ताडपत्री गेल्यावर भिंतीतलं भोक भगदाड न होऊ देता कसं बुजवायचं यावर आमची चर्चा सुरु झाली. DIY!


पूर्वप्रसिद्धी - निनाद दिवाळी अंक २०२५






Saturday, December 13, 2025

सोबत, बरोबर, खाणे, जेवणे

माझ्याकडे मराठी शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पर्णिकाने काही शब्दांमधला फरक सांगण्यासाठी गायलेलं हे गाणं (गद्यकाव्य?). सद्यपरिस्थिती पाहता मुलानींच काय मोठ्यांनीही हा फरक लक्षात घ्यायला हवा. 



Sunday, November 16, 2025

कॅमेरा

काही वर्षापूर्वी आमच्या शेजारच्या घरी चोर आला होता. स्वतःच. शेजाऱ्यांनी चोराला आमंत्रण दिलं नव्हतं. तोच आला. त्याला माहित नव्हतं घरात कोणी असेल आणि तिला माहित नव्हतं की आपल्या घरी चोर येईल. तो आला, तिने त्याला बघितलं, त्याने तिला बघितलं. दोघांचे डोळे विस्फारले भितीने आणि दोघंही जीवाच्या आकांताने ओरडले. कोण कोणाला घाबरलं हे एकमेकांना समजायच्या आधीच चोर आल्यापावली मागच्यामागे मागच्या दाराने मागे बघत पळाला त्यामुळे पळतापळता अडखळला. ती पुढच्या दारातून मागे न बघता पळत सुटली ती तिच्यासारखंच दार उघडं टाकून बसलेल्या शेजारणीच्या घरात जाऊन धडकली. इथे गोष्ट संपायला हवी; पण झालं काय, आजूबाजूच्या सगळ्ळ्यांना ही बातमी कायप्पामुळे (whatsapp) त्वरीत समजली. प्रत्येकाला वाटायला लागलं की आता आपल्या घरी चोर येणार. त्यातला त्यात स्त्रीवर्गाला तर जास्मृच. त्यात मीही होतेच.


घंटा वाजली की वाटायचं चोर आला. मी जिथे असेन तिथे लपायचे, इकडून तिकडून डोकावून दाराबाहेरची व्यक्ती दिसते का ते पाहायचं. व्यायामाचे सगळे प्रकार त्मावेळात वाकण्याच्सा, लपण्याच्या, न दिसण्याच्या नादात व्हायचे. काचेच्या घरात राहत असल्यासारखं आमचं घर. आतल्याला बाहेरचं आणि बाहेरच्याला आतलं अगदी सहज दिसेल असं. कुठल्याही खिडकीला पडदे नाहीत त्यामुळे लपाछपीच्या इतक्या व्यायामप्रकारात खूप वेळ जायचा आणि चोर नसलेले सज्जन परत जायचे. सज्जन म्हणजे अॅमेझॉन, टपालखातं किंवा FedX वाले सज्जन. भेट झाली नाही म्हणून चुटपुट लागल्याच्या चिठ्ठ्या दाराबाहेर रोज ते डकवायला लागले. येऊन सामान न्नावं असा आदेशही त्यात असायचा. सामान आणायला गेलं की दुसरी चक्कर मारलेला सज्जन चिड्डी टाकून निघून जायचा. मग मी पुन्हा सामान आणायला निघायचे. शेजारणीकडे आलेल्मा चोराने माझं रोजचं काम प्रचंड वाढवलं.


माझी रोजची तीच कथा आणि भुणभुण ऐकायला नको म्हणून अखेर नवऱ्याने कॅमेरा लावला. त्माचं काम म्हणजे आज सुरु केलं की ६ महिन्यांनी संपणार, कॅमरा लागला पण तो जोडलेला कशालाच नाही. कोण, कोणाला, कुठून, कसं दिसणार हा प्रश्न तसाच.


"उपयोग काय त्याचा?" मी फणकारुन म्हटलं.


'होईल. कॅमेरा दिसला की चोर फिरकणारच नाही आणि मी दोन चार पाट्यापण लावून टाकल्या आत्ताच.' तो उत्साहाने म्हणाला.


'कसल्या?' विचारायच्या आधीच मला त्या पाट्या दिसल्या.


'अरे, त्या विक्रेत्यासाठी असतात." एवढंही माहित नाही, कळत म्हणून नाही इत्यादी अक्कल काढण्याचे सूर मी कौशल्याने एका वाक्यात गुंफले.


'चोर माल न्यायला येतो. त्यालाही तोच नियम. कोण कोणाला मूर्ख बनवतंय तेच कळेना. असो. कॅमेरा लागला पण त्यातून कधी काही दिसलंच नाही. जेव्हा केव्हा दिसायला लागलं म्हणजे नवरोजींनी काम पूर्ण कैलं तेव्हा चोराने आपलं बस्तान आमच्या भागातून हलवलं होतं. चोऱ्यांचे किस्से दुसरीकडून ऐकायला यायला लागले होते. आता कॅमेराचं करायचं काय? लावला आहे म्हणून तरी वापरायला हवा !


नुकतंच आम्ही मांजर आणलं होतं. तिचं नाव त्सुनामी. बाहेरगावी गेलं की तिच्यावर नजर ठेवायला वापरु असं कधी नव्हे ते एकमत झालं. तोपर्यंत सुरक्षेसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅमेराचे रक्षण सोडून एकशेएक उपयोग मित्रमंडळीकडून ऐकले होतेच.


'मी असं म्हटलंच नव्हतं' असा मुलं वाद घालायला लागली की आमची एक मैत्रीण त्यांना कॅमेरा दाखवायची आणि चोर पकडल्यासारखी मुलांना शब्दात पकडल्यावर खूष व्हायची. आता तरी मुलं खोटं बोलायचं थांबवतील असा भाबडा आशावादही एकदा तिने मांडला. आम्ही तिच्या घरी गेलो तेव्हा घरातले सगळे बोलताना कॅमेराकडे बघत आणि कुजबूजल्यासारखंच बोलत.


'हा काय प्रकार?" आम्हाला आधी आपण बोलायचं की नाही ते कळेना, मग कुजबूजायचं की मोठ्याने बोललं तरी चालेल हे कळेना. हे कोणाला विचारण्यासाठी तरी तोंड उघडायला हवंच तेही उघडायचं की नाही हे कळेना. शेवटी खाणाखुणाच सुरु झाल्या. तिनेही खाणाखुणा करुन बाहेर नेलं. बाहेर सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.


"कार्टी येताजाता कॅमेरा दाखवत बसतात. किती खोटं बोलतेस, किती नावं ठेवतेस सगळ्यांना असले फालतू आरोप करतात."

"काय मेलं धाडस पोराचं. इतकं खरं सांगतात तुझ्याबद्दल तुलाच?" मी आश्चर्याने विचारलं. मी काय म्हणाले ते लक्षात यायच्याआधीच


'कॅमेरा काढून टाका." दुसरी मैत्रीण जोरात म्हणाली.


'चोर आला तर?" तिने घाबरुन विचारलं.


'सध्या तुमच्या भागात आहे की काय?" मी नवलाने विचारलं. कॅमेराचा मैत्रिणीकडे उपयोग करतात तसा करावा का याची चक्रही डोक्यात सुरु झाली आणि तेवढ्यात आमचं जपानला जायचं ठरलं.


भरभक्कम डॉलर्स देऊन आमच्या मांजरावर, त्सुनामीवर लक्ष ठेवायला, तिला खायला प्यायला घालायला डॉली नावाची बाई नेमली. ती रोज येणार होती. आम्ही पहिल्यांदाच त्सुनामीला सोडून चाललो होतो. आमच्या मित्रमैत्रीणींनाही आम्ही कामाला लावून टाकलं. त्सुनामीबरोबर खेळायचं. डॉली तिचं खाणंपिणं बघणार, मित्रमैत्रीणी रोज येऊन खेळणार. जपानला पोचलो आणि पोचल्यापोचल्या कॅमेऱ्याचा उपयोग लक्षात आला. डॉली तर दिसलीच, आमचे मित्रमैत्रिणीही दिसले. मला नादच लागला. डॉलीची वेळ झाली की सुरु करायचं 'अॅप'. डॉली आली, डॉली गेली, डॉलीने फ्रिज उघडला. मग मला आमचे मित्र मैत्रिणीही कॅमेऱ्यात बघायला आवडायला लागले. अधूनमधून त्सुनामीही दिसायची. इतका आनंद व्हायचा पार कुठल्यातरी दुसऱ्या देशातून आपण आपल्या घरातलं सारं काही बघू शकतो याचा. क्रिकेटपेक्षाही धावतं समालोचन मी सुरु केलं. नवरा आणि मुलांना आपण जपान बघायला आलो आहोत की इथून आपलं घर हा प्रत्येकवेळी प्रश्न पडायला लागला. तो सोडवायच्या आधीच आम्ही परत आलोही.


चोराच्या निमित्ताने कॅमेरा लागला. दाराबाहेरचा चोर कधी दिसला नाही पण कॅमेराचा उपयोग अखेर झाला. डॉलीला अशा कॅमेऱ्यांची सवय असावी. तीही कॅमेऱ्याकडे बघून गोड हसायची पण आमच्या मित्रमैत्रीणींना मी चुकून उत्साहाने १०२ वा उपयोग सांगायला गेले आणि त्या नादात त्यांचं कसं रोज दर्शन व्हायचं तेही सांगून टाकलं. मग काय झालं ते तुम्ही विचारु नका आणि मी सांगणार नाही. मांजरावर लक्ष ठेवण्याऐवजी माणसांवर ठेवलं तर इतकं काय त्यात पण मित्रमैत्रिणीच ते. त्यांनी बदला घेतलाच. आता प्रत्येकाची मांजरं - कुत्रे सांभाळायला मी जाते आणि ते कुठेतरी जाऊन कॅमेऱ्यातून माझ्यावर लक्ष ठेवतात. काय म्हणायचं आता ह्याला? आलीया भोगासी असावे सादर, कॅमेऱ्याच्या उपयोगाचे किती ते पदर!


हा लेख माझा मराठीचा बोल या फेसबुक समूहावरील मित्रमंडळींनी कढलेल्या दिवाळी अंकात आला आहे.


Wednesday, November 5, 2025

घुसमट

पुरुषावर जोडीदाराकडून होत असलेल्या अत्याचाराची नोंद फार होत नाही त्यामुळे ठोस आकडेवारी उपलब्ध नाही. तरीही साधारणपणे  मानसिक छळाचं प्रमाण भारतात ५१ - ५२ टक्के (विशेषतः हरियाणा राज्यात अधिक) आहे.  जागतिक स्तरावर तेच प्रमाण १२% ते ५८ % आहे.

या समस्येवर अधिक जागरूकता निर्माण होणं, पुरेशी मदत उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. हाच विषय घेऊन कवितेचं गाणं आणि गाण्यावर केलेलं चित्रीकरण. कविता वाचा आणि चित्रीकरण पाहाही.


साहावे मुकपणे

शब्द ओठी न यावे!

हे समाज शिकवे 

पुरुषार्थ हा म्हणे!

सदा रडगाणे कशाचे

शांततेचे जणू वावडे!

सपासप वार शब्दांचे

कशाला बंधन जन्माचे!

विरती प्रितीचे धागे

वेढती द्वेषाचे जाळे!

तरी पुरूषाला म्हणे 

पुरुषागत वागावे!

होईल हसे 

व्यक्त होण्याने !

काळीज जळे

याच चिंतेने!

आज वाटे बोलावे

हे असे का साहणे?

माझे हेच सांगणे

सोसू नये मुक्याने!


Friday, October 31, 2025

वेळकाळ!

 




निवांत दुपारी मैत्रिणींच्या गप्पा आणि खाणं रंगात आलेलं असतानाच अचानक दारावर थाप पडते. गप्पांचा रंग तर बदलतोच आणि... वेळकाळही!


कथा, पटकथा, लेखन, दिग्दर्शन, संकलन

मोहना प्रभुदेसाई जोगळेकर.


चित्रीकरण आणि उपशीर्षकं

प्राची सलारिया.


कलाकार:

बार्बरा डिकोस्टा, तेजस्विनी दलाल, प्रज्ञा आपटे, गौरी आपटे, ज्योती कुलकर्णी, रश्मी नळदकर, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर.

Monday, September 15, 2025

अंतराय

ही कथा मी मुग्धा गोडबोलेंच्या वाचनव्रत उपक्रमात वाचली आहे. इथे वाचा किंवा तिथे ऐका. अभिप्रायही नक्की द्या.

शमिकाने समोरच्या बाकड्यावर पाय ताणून आजूबाजूला नजर फिरवली. रेल्वेने थोडासा वेग घेतला होता. आखूड ब्लाऊज, खोचलेला पदर आणि आबांड्यावर लाल पिवळी फुलं घातलेल्या दोघीतिघी शांतपणे खिडकीबाहेर बघत होत्या. खिडकीची जागा असूनही ती जरा बाजूलाच बसली होती. कितव्यांदा कोण जाणे पण पुन्हा एकदा तिने बसलेल्या जागेवरची धूळ झटकल्यासारखं केलं. दीड दोन तासात रेल्वे तिला आणि रतनला त्या आडगावात नेऊन सोडणार होती.

"केवढं बदललं आहे नाही सर्व? बावीस वर्षांनी चाललोय आपण त्यामुळे वाटतंय मला, की खरंच बदललंय सगळं?"

रतन मनापासून हसली.

"अगं तू नाहीस का या बावीस वर्षात बदललीस? मग आम्हीही बदललो तर नवल का वाटतंय तुला?"

"खरं आहे तुझं." शमिकानं विषयच थांबवला. आपण उगाचच धाडस करतोय का सांगोल्याला जायचं हे तिचं तिलाही ठरवता येईना. ती ऑस्ट्रेलियाहून तीन आठवड्यांसाठी सोलापूरला येते काय आणि अचानक बाजारात रतनची गाठ पडते काय, सगळीच अपूर्वाई.

रतननेच तिला ओळखलं. बघता बघता आठवतील त्या मैत्रिणींना फोन करुन रात्र जागवायला त्या एकत्र जमल्याही. सगळ्यांच्या आयुष्यांची बेरीज वजाबाकी झाली.  तिच्या ऑस्ट्रेलियन दिनक्रमाबद्दल तर सर्वांनाच कोण उत्सुकता. त्यांच्या कंपूतली परदेशात स्थायिक झालेली ती एकटीच. नकळत गप्पांचा ओघ तिच्याभोवती केंद्रित झाला. पण नोकरीच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात गेलेल्या शमिकाकडे  सांगण्यासारखं फारसं काही नव्हतं. बोलण्याच्या ओघात सांगोल्याचा विषय आला तेव्हा मात्र शमिकाला उत्साहाचं भरतं आलं. शाळेतली आणि कॉलेजमधली काही वर्षे रतन आणि ती सांगोल्याला एकत्र होत्या. एकदम दोघींनी सांगोल्याला जायचं ठरवूनही टाकलं. हॉटेलमध्ये उतरायचं  की एखाद्या मैत्रिणीकडे ते मात्र ठरता ठरेना. शेवटी दोघींचीही चांगली मैत्रीण असलेल्या नीनाकडे उतरायचं पक्कं झालं. दोन दिवसात त्या निघाल्याही. कधी एकदा सांगोला गाठतोय असं होऊन गेलं तिला. बावीस  वर्षांनी ती पुन्हा त्या गावाला चालली होती. अस्वस्थ, अस्थिर, उत्सुक!

गाडी कुरकूर करत थांबली ती विचारांची साखळी खेचत. नीनाचे विचार डोकावायला लागले मनात. अबोल, तशी अलिप्तच राहणारी नीना धर्माच्या बाहेर लग्न करण्याचं धाडस करेल अशी पुसट शंकासुद्धा तिच्या मनात कधी डोकावली नव्हती. नीनानं लग्न केलं तेव्हा ती ऑस्ट्रेलियात होती. तिच्या आईनं ही बातमी सांगितल्यावर शमिकाला धक्काच बसला होता. मनात येऊनही नीनाला पत्र पाठवणं, फोन करणं राहूनच गेलं होतं. आता मात्र मधली सगळी वर्ष पुसून काढायची होती. कसं असेल तिचं घर, नवरा, घरातली मंडळी? मनात विचार फुगडी घालत होते; पण नजर गाडीतल्या त्या बायकांवर खिळली होती.  अचानक, या क्षणी रेल्वेतून उतरावं, सांगोल्याला जाऊच नये असं फार तीव्रतेने वाटलं तिला. त्याच तंद्रीत तिने तोंड उघडं टाकून घोरत पडलेल्या रतनला हलवलं. ती गडबडून उठली. 

"परत जाऊया सोलापूरला रतन."

"तुला वेड तर नाही ना लागलं? नीना न्यायला येणार आहे स्टेशनवर." झोपमोड झालेली रतन भडकलीच.

"घर मोठं आहे म्हणत होती. तू गेली आहेस कधी?" तिच्या मनात दडून राहिलेल्या शंकांना अचानक तिने वाट मोकळी करून दिली, तरीही शमिकाला स्वच्छता, बाथरूम, घरातली माणसं याबद्दल फटकन विचारता येईना. 

"नाही पण एकदम तिच्या घराबद्दल का उत्सुकता वाटतेय तुला?"

"भेटतेस सगळ्यांना?" रतनचा प्रश्न न ऐकल्यागत शमिकाने विचारलं.

"नाही गं. कामासाठी येते ना. ठरवते दरवेळेस पण नाही होत भेटणं कुणाला. आपल्या वर्गातली मुलं दिसतात बर्‍यांचदा, पण मुली तर लग्नं होऊन बाहेरगावीच असणार."

ती गप्प झाली. रतननेही पुन्हा डोळे मिटून घेतले. सांगोल्याला जायचा उत्साह नष्ट होतो आहे असं वाटत होतं. तेवढ्यात रेल्वेचा वेग कमी होत फलाट दिसायलाही लागला.

"ती बघ नीना!" रतन एकदम ओरडली. अंगात वीज संचारल्यागत आता तिनेही खिडकीतून डोकावायचा प्रयत्न केला. 

तरीही गाडी थांबल्यावर ती तशी सावकाशच उतरली. पुढे झेपावत रतनने नीनाच्या मुलीला कौतुकाने जवळ घेतलं. शमिका मात्र अवघडून उभी होती.

"शिष्ट कुठली." तिचा हात आनंदाने हातात घेत नीना पुटपुटली.

"चल गं, काहीतरीच काय बोलतेस? मी आहे तशीच आहे."

"म्हणजे शिष्ट म्हणायचं आहे तिला." रतनही नीनाच्या बोलण्यात सामील झाली.

रिक्शात बसल्याबसल्या बाहेर डोकावत कॉलेजच्या दिवसातल्या खुणा तपासणं सुरू झालं तिचं.

"शमे, तू प्रयत्नसुद्धा नको करू काही आठवण्याचा, सांगोला फार बदललंय."

"माझ्या सगळं लक्षात आहे. पाच वर्ष काढली आहेत ना. काय धम्माल करायचो आपण."

जुन्या आठवणीत घर कधी आलं तेही तिला कळलं नाही. रतनने उत्साहाने घरातल्या प्रत्येकाची ओळख करून घेतली. गरम वाफाळलेला चहा घेत शमिका अवघडल्यासारखी बसली, गर्दीत श्वास कोंडल्यासारखी. छोटं घर आणि भरपूर माणसं हे समीकरण ती कधीच विसरली होती. रतन गप्पामध्ये रमलेली बघितल्यावर ती उठली.

स्वयंपाकघरात दाराला टेकून बराच वेळ ती नीनाच्या हालचाली निरखत राहिली.

"कोण मुलं आहेत गं इथे आपल्या वर्गातली?"

"खूप आहेत."

"नावं सांग ना. भेटेन तरी कुणाला ना कुणाला."

"उद्या जा सावकाश. आज गप्पा मारू रात्रभर तिघींजणी."

नीनाने म्हटल्याप्रमाणे खरंच रात्रभर तिघींच्या गप्पा रंगल्या. रतनने नीनाच्या लग्नाबद्दल विचारलंच.

"तू धाडसी नीना. नोकरीसुद्धा नव्हती ना शशांकला तुम्ही लग्न केलंत तेव्हा?"

क्षणभर नीना गप्प राहिली. शमिकाला राहवलं नाही.

"आम्ही सहज विचारतोय गं. तुझ्या मनात नसेल तर राहू दे."

"नाही, तसं नाही. पंधरा वर्ष होऊन गेली. इतक्या वर्षांनंतर लग्नानंतर पहिल्यांदाच हा विषय निघतोय. त्यामुळे जरा अडखळल्यासारखं झालं." ती पुढे बोलत राहिली.

"तुला माहीत आहे ना सांगोल्याला मी बहिणीकडे राहायचे. इतकी कटकट, सूचना, त्यातून विरंगुळा म्हणजे शशांकची मैत्री. त्या मैत्रीवरूनही संशय घ्यायला लागली बहीण. गावालाच पाठवून दिलं परत. कोंडल्यासारखं झालं होतं आयुष्य. एक दिवस शशांक गाडी घेऊन आला आणि मागचा पुढचा विचार न करता आले मी निघून." बराचवेळ नीना तिच्या बदललेल्या आयुष्याबद्दल बोलत राहिली.

"पण माहेरी जातेस ना आता?" शमिकाने विचारलं.

"नाही. ते दु:ख मात्र आता शेवटपर्यंत राहणार." 

नीनाचे डोळे तुडुंब भरून आले.  रतनने पुढे होऊन पटकन नीनाला कुशीत घेतलं.  हुंदक्यांनी गदगदलेल्या नीनाकडे शमिका भरलेल्या डोळ्यांनी पाहत राहिली.

"तुझी आई हल्लीच गेली ना? तेव्हाही नाही गेलीस?

"कोणी कळवलंच नाही गं मला. कळलं तेव्हा फार उशीर झाला होता." थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही."

"तू केदारच्या घरी जाणार असशील ना?" अचानक नीनाने शमिकाला विचारलं.

"अर्थात. भावासारखाच होता तो मला."

"बघवत नाही त्याचा भितींवर लावलेला फोटो."

"आपल्यात तुमची दोघांची मैत्री जास्त."

"काय हुकूमशाही चालायची तुझ्यावर केदारची. आठवतंय? रक्षाबंधनाच्या दिवशी राखी घेऊन आला होता स्वत:च. आम्ही होतो ना तिथेच." शमिकाला तो प्रसंग आताच घडतोय असंच वाटत होतं.  

तिच्या घरी त्या सर्वजणी जमल्या होत्या. तावातावाने, एखाद्याला मित्र तर मित्र म्हणा ना, भाऊ मानायची कसली नाटकं वगैरे बोलणं चाललं होतं. अशा वादविवादात शमिकाचा नेहमीचा पुढाकार. तेवढ्यात केदार टपकला तो राखी घेऊनच. शमिकाच्या पुढ्यात त्याने राखी धरल्यावर सगळ्या हसायला लागल्या.

"शमिका, केदार तुझा मित्र आहे ना? मग राखी नको बांधू." तिच्यावर हल्लाच चढवला प्रत्येकीने. शमिका गांगरली, केदारला आपलं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न करत राहीली.  शेवटी केदारच्या हट्टापुढे तिने हात टेकले. तो खर्‍या अर्थी तिचा भाऊ झाला. ती एकाएकी उदास झाली.

सांगोला सोडून दोन वर्ष झाली असतील तेव्हा. अधूममधून तो सोलापूरला आला की भेट होत होती. एकमेकांना पत्र तर सारखी पाठवत होते दोघं. आणि अचानक त्या बातमीने सारं बदललं. मित्रांबरोबर फिरायला गेलेला केदार परत आलाच नव्हता. पडला कड्यावरुन पाय घसरुन. तिला समजल्यावर  मिळेल ती गाडी पकडून ती धावली होती सांगोल्याला.  तुषारच्या, केदारच्या भावाच्या खांद्यावर मान टाकत तिने दु:खाला वाट मोकळी करून दिली. त्यानंतर या गावात ती परतली नव्हती. पण केदारच्या घराचा तीही एक भाग बनून गेली होती हे तिला कधीच विसरता आलं नाही. अधूनमधून पत्र लिहीत राहिली. ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर हळूहळू सगळं मागे पडत गेलं.

"तुषारला बोलले आहे मी तू येणार आहेस ते." तिच्या मनातलं ओळखल्यासारखं नीना म्हणाली.

"कधी येणार आहे तो? नाही तर मीच सकाळी जाऊन भेटून येईन."

"रात्रीच चक्कर टाकेन म्हणाला होता. नऊ वाजलेयत. येईल कदाचित अजूनही."

तिचे कान तुषारच्या पायरवाची चाहूल घेत राहिले. तुषार आलाच नाही.  केदार असता तर झालं असतं असं? केदारबरोबरच्या गप्पा, एकत्र केलेला अभ्यास, सहली, रुसवेफुगवे सगळं आजूबाजूला ठाशीवपणे उभं राहिलं. एकमेकांची घरं तर अगदी जवळ. सारखं भेटणं चालू असायचं. केदारची शांत स्वभावाची आई फार आवडायची तिला. त्याही मुलीसारखं कौतुक करायच्या. तिची आई फिरतीच्या निमित्तानं वरचेवर बाहेर, वडील तर तिला आठवतही नव्हते. सहाजिकच केदारचं घर म्हणजे विसावा होता तिच्यासाठी. आज तुषार आला नाही म्हटल्यावर क्षणभर तिला केदारच्या मैत्रीत ती उगाचच घरादाराला तर गुंतवत नव्हती ना असा प्रश्न पडला. एक माणूस जीवनाचा खेळ अर्ध्यावर सोडून गेला तर सगळी नातीच बदलावीत?

सकाळी भराभर सगळं आटपून दाराच्या चौकटीत ती उभी राहिली. जुन्या दिवसांचा लवलेश शोधूनही सापडत नव्हता. ती तशीच नजर लावून उभी राहिली. बराचवेळ. भरभर चालत येणारी चाल ओळखीची वाटल्यावर ती टक लावून पाहत राहिली. केदार? छातीत धस्स झालं. कितीदा तरी कुठून तरी अचानक तो समोर उभा ठाकेल असं वाटायचं तिला. इतक्या वर्षात तो या जगात नाही हे सत्य तिने  स्वीकारलं होतंच कुठे?

"रात्रीच यायचं होतं पण आलोच अकरा वाजता. तरी निघालो. आई म्हणाली, उद्या सकाळी जा लवकर. कशी आहेस? चल आता आमच्याकडे." घाईघाईत खुलासा करणार्‍या तुषारकडे ती पाहत राहिली. बावीस वर्षात कुणामध्ये काहीच कसा फरक नाही पडला? नीना, रतन आणि आता तुषार. सगळी आहेत तशीच वाटतात. तुषारकडे बघता बघता ती रतन आणि नीनाला विसरलीच. कुणालाही काहीही न सांगता पटकन इथून तुषारबरोबर निघावं असं तीव्रतेने वाटलं तिला. कधी एकदा केदारच्या घरी पोचतोय असं झालं होतं का? तिने स्वत:लाच प्रश्न केला. नीना म्हणत होती तो भितींवर टांगलेला त्याचा फोटो पाहायला की केदारची मैत्री ती विसरू शकलेली नाही हे दाखवायचा वेडा प्रयत्न करायला?  केदारचं घर  कर्त्या सवरत्या मुलाला मुकलं होतं तसं तिने नव्हता का तिचा परममित्र गमावला? त्या घराचं दु:ख सर्वांनी गृहीत धरलं; पण तिच्या चिघळत्या जखमेवर कोण मारणार फुंकर? केदार गेल्याचं कळल्यावर फार एकटं पडल्यासारखं वाटायचं तिला बरेच दिवस. दोन दिवस पत्रांचा गठ्ठा उलगडून बसली होती ती. 

’तुझं आणि माझं नातं काय आहे कुणास ठाऊक; पण मागच्या जन्मात बहीण असावीस बहुधा माझी तू... काय दादागिरी करतेस गं, तुझ्याशी गप्पा मारताना मी स्वत:शीच बोलतो असं वाटतं मला. तू माझ्या आयुष्यात आलीस ती मैत्रीण म्हणून. हळूहळू भाऊ, बहीण अशी सगळी नाती मला तुझ्यातच सापडली.’ पत्र वाचताना ती हमसून हमसून रडली होती. 

तुषारला पाहिल्यावर मनातल्या विचारांबरोबर कुठल्या कुठे भरकटली ती. नीनाच्या घरातल्या माणसांबरोबर तुषार इकडचं तिकडचं बोलत होता. हरवल्या नजरेने तुषारकडे बघताना तिला ओरडून सांगावंसं वाटत होतं. अरे, मी सुद्धा तुमच्या घरातलीच आहे. सगळे बारीकसारीक, छोटे मोठे प्रश्न ठाऊक आहेत मला तुमच्या घरातले. पण मनातले तरंग बाहेर उमटू न देण्याची खबरदारी घेत शमिका तुषार बरोबर निघाली.

"तू चांगलं केलंस शमिका. बाहेर पडलीस या खुराड्यातून. ऑस्ट्रेलिया काय म्हणतंय? किती वर्ष झाली गं तुला तिकडे जाऊन? मी पाठवलं होतं तुला एक पत्र. नंतर राहिलंच."

घडाघडा बोलणारा तुषार तिला वेगळाच वाटत होता. तिच्या डोळ्यांसमोर केदारच्या घरी आलं की भेटणारा तुषार आला. अलिप्त, तुटक. आज मात्र भडभडून बोलत होता. केदारसारखा!

तिला एकदम जवळचा वाटला तो. घरी पोचल्यावर चप्पल काढतानाच ती काहीतरी शोधत राहिली. कुणाच्या लक्षात येणार नाही याची काळजी घेत केदारच्या फोटोकडे तिने पाहून घेतलं. छातीत एक सूक्ष्म कळ उठली. तिला किती तरी बोलायचं होतं केदारबद्दल. पण मन अस्वस्थ झालं होतं. केदार असताना त्या घराची लेकच असल्यासारखी वावरलेली ती आज गोंधळून उभी होती. अंतर राखून केदारच्या आईशी ती बोलत राहिली. आठवणींची उजळणी झाली. कोण कोण भेटतं, सगळीजणं कशी आहेत असं वरवरचं बोलणं चाललं होतं. क्षणभर तिला वाटून गेलं की नाही म्हटलं तरी जखमेवर खपली धरली आहे. आज आपण येऊन ती खसकन ओढल्यासारखं तर नाही ना होत? काळ काही कुणासाठी थांबत नाही. त्याच्याबद्दलच्या आठवणी त्याच होत्या पण तो गेल्यानंतर दोन तपांचा कालावधी गेला होता. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. तिला मात्र केदारच्या आठवणींनी घेरून टाकलं होतं. ती आडून आडून पुन्हा पुन्हा तेच बोलत राहिली. अचानक कुठेतरी एकदम संभाषणाला खीळ बसल्यासारखं वाटलं तिला. नाक्यावर गेलेला तुषार परत आल्यावर मात्र ती सैलावली.

"चल, अख्खा गाव परत एकदा बघ. मगच कळेल तुला सांगोला किती बदललंय." त्याच्या आपुलकीने ती सुखावली. तुषारचं हे रूप तिला नवीन होतं. त्याने म्हटल्याप्रमाणे खरंच सगळं सांगोला पालथं घालून झालं. तिच्या जुन्या घरावरून चक्कर मारून झाली. खरं तर आत जाऊन डोकावायचं  होतं, पण तसं तुषारला सांगणं तिला जमलं नाही. केदारने न सांगताच ओळखलं असतं माझ्या मनातलं. ती स्वत:शीच पुटपुटली. जरा अतीच होतेय ही तुलना असं तिचं तिलाच वाटून गेलं. तुषार काही तिचा मित्र नव्हता तरी तो भावाची जागा भरून काढण्याचा प्रयत्न नव्हता का करत? त्यांच्या मैत्रीचा साक्षीदार असल्यासारखा प्रत्येक ठिकाणी केदारची जागा घेत होता. त्याच्यासारखेच प्रश्न, त्याच्याचसारखं तिच्या मनातलं ओळखून एकेका ठिकाणी तिला नेणं. आणि तरीही केदार असता तर... असा आपण विचार करतोय आहोत या जाणिवेने ती ओशाळली, पण न राहवून म्हणालीच,

"तू बदललास तुषार."

पुन्हा तो हसला

"त्या वेळेस माझा कंपू वेगळाच होता. मला कल्पना आहे तुला आश्चर्य वाटत असेल मी इतका रस घेऊन तुला नेतोय सगळीकडे, पण हल्ली हल्ली जाणवायला लागलंय की केदारच्या मित्रमैत्रिणींत मी सहज सामावून जातो. तीच जवळची वाटतात मला."

शमिका त्याच्याकडे बघत राहिली. त्या वेळेस केदारचा मोठा भाऊ म्हणून केवढं आकर्षण होतं सगळ्यांना. तो मात्र त्याच्याच 

तोर्‍यात! तुटक, अलिप्त. त्यांच्या घरी गेलं की कितीदा तरी तो बोलायचाही नाही. आज त्याच्याकडून हे ऐकणं कठीण जात होतंच, पण त्यापेक्षाही ते स्वीकारणं फारच अवघड होतं. तिला वाटलं ओरडून सांगावं त्याला की नको प्रयत्न करू तू केदारची जागा घेण्याचा. तू तसाच राहा. आपल्याच धुंदीत, रुबाबात! प्रत्यक्षात मात्र ती बोलून गेली,

"केदारच बरोबर आहे असं वाटतंय मला आज."

तुषार एकदम गप्प झाला.  तिच्या मनाला वाटणारं  विचित्र अवघडलेपण तिला अधिकच घेरुन गेलं.

रात्री आग्रह करूनही ती थांबली नाही. तिला सोडायला आलेल्या तुषारशीही तिला फार बोलावंसं नव्हतंच वाटत. नीनाकडे तिला सोडल्यावर ’उद्या स्टेशनवर येत’ म्हणून त्याने तिचा निरोप घेतला. रात्र जागवून रतन आणि नीना गप्पा मारत राहिल्या. तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत राहिल्या; पण झोप येते आहे म्हणत तिने बोलणं टाळलं. स्वत:च्या मनालाच विळखा घातल्यासारखी मुक होऊन गेली.

सकाळी तुषार तसा लवकरच आला. नीनाचा निरोप घेऊन रतन आणि तुषारबरोबर ती स्टेशनवर पोचली. 

"आता केव्हा येणार तू? केदार असता तर खूश झाला असता." तुषारच्या डोळ्यात पाणी तरळल्यासारखं वाटलं तिला.

"तुषार, केदार व्हायचा नको रे प्रयत्न करू. तू आहेस तसाच राहा." त्याचे दोन्ही हात हातात घेऊन सांगावंसं वाटत होतं, पण ती फक्त पाणावल्या डोळ्यांनी पाहत राहिली.

"येईन रे, नक्की येईन भारतात आले की...." पुढे काही बोलण्याआधीच रेल्वे आली.  गाडीने वेग घेतला तशी ती हात हालवत राहिली. गजातून जाईल तेवढं डोकं बाहेर काढून ती तुषारला डोळे भरून साठवून घेत होती. केदारला तर काळाने हिरावून नेलं होतं, पण केदारने जाताजाता तुषारलाही बरोबर नेलं होतं. बावीस वर्ष, एकदा तरी सांगोल्याला जायला हवं म्हणणारी शमिका आता पुन्हा कधीही इथे येणार नव्हती.                


(मेल्टिंग पॉट या कोकण साहित्य परिषद उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कारप्राप्त कथासंग्रहातील कथा.)