Wednesday, April 16, 2025

आशा

मध्यंतरी एक चित्र पाहिलं त्यावरुन एक कविता सुचली. कविता हा माझा प्रांत नाही पण कवी लोकांना म्हणे कविता होतात, तशी ती मी कवी नसूनही झाली :-) त्यामुळे कविवर्य प्रमोद जोशी, गुरु ठाकूर यांना पाठवून आधी ती कविता आहे ना याची खात्री केली, त्यांच्या काही सुचना प्रत्यक्षात आणल्या आणि खरंच एक कविता तयार झाली. गुरुने, वृत्ताचा नीट विचार कर सांगितलं. मी व्याकरणाचं पुस्तक उघडून बसले.  कविता झाली ती अक्षरगणवृत्तात झाली आहे इतकं समजलं. आता कोणाचीही, कोणतीही कविता वाचताना मी अक्षरगणवृत्ताचे निकष लावूनच वाचते आणि ते अक्षरगणवृत्त नसेल तर ही कविताच नाही असं ठामपणे म्हणते इतकी प्रगती आहे...

कविता झाल्यावर याचं आता गाणं व्हायला हवं असं वाटलं. पदार्थ केला की खायलाच हवा या धर्तीवर. मी केलेला पदार्थ निदान मी एकटीतरी खाऊ शकते पण मी गायलेलं गाणं कोण ऐकणार त्यामुळे गायिकेचा शोध सुरु झाला आणि आमच्या शार्लटची गुणी गायिका अदितीच डोळ्यासमोर आली. तिने या कवितेला चालही लावली आणि कवितेतलं गांभीर्य सुरांमध्ये ओतलं. गौरी आपटेने गाण्याला मुद्राभिनयाने जिवंत केलं आहे आणि माझ्या शार्लटमधल्या मैत्रिणींनी तिला छान साथ दिली आहे. आजारी व्यक्तीला भेटायला गेलेल्या प्रसंगात या मैत्रिणींना काहीही बोला; तुमचे आवाज दाबून टाकणार आहे म्हटल्यावर चेहरे गंभीर ठेवून त्यांनी जो काही शब्दाविष्कार केला तो हसूनहसून पोट दुखेल असा होता. तो फक्त मला एकट्यालाच चित्रीकरण करताना अनुभवता आला. 

... तर आम्ही सार्‍या शार्लटमधल्या मैत्रिणींनी एकत्र येऊन हे केलं आहे. पाहा आणि अभिप्रायही द्या. 

दिसे लगबग,
लख्ख प्रकाशाची 
अंतरात घुमे 
गाज अंधाराची!

आनंदाचे बीज,
मला सापडेना!
कशा पाणी घालू,
काही समजेना!

देहाचे दुखणे,
सहजची दिसे!
भोवताल जमे,
काळजीने बसे!

सैरभैर मन,
शोधती आधार
होऊ बरे असा
विश्वासच दाट!



Tuesday, April 1, 2025

अमेरिकेतील भारतीय रिक्त का संपृक्त ?


आशुतोष जावडेकर हे नाव‌ लेखक, कवी, संगीतकार म्हणून सुपरिचित आहे. त्यांनी माझ्या 'रिक्त' कथासंग्रहाचं केलेलं रसग्रहण तसंच कथांमागची लेखक म्हणून माझी भूमिका. 

लेखिका म्हणून माझ्या मुलाखती झाल्या आहेत पण प्रथमच माझ्या पुस्तकाबद्दल स्वतंत्रपणे भाग झाला आहे आणि तोही अशा दर्दी, सुप्रसिद्ध व्यक्तीकडून. 

 आशुतोष यांचं मनोगत:

"अमेरिकेतील भारतीय रिक्त का संपृक्त ?" - या आणि स्थलांतराच्या अनुषंगाने मागोमाग येणाऱ्या अनेक प्रश्नांचा, भावभावनांचा वेध घेणारा कथासंग्रह अमेरिकास्थित लेखिका मोहना प्रभुदेसाई - जोगळेकर यांनी लिहिलेला आहे. 'बुक ब्रो' चा हा ८७ वा एपिसोड त्यांच्या 'रिक्त' या कथासंग्रहावर आहे. 

अमेरिकेतून लेखिकेने मांडलेले मनोगत आणि भारतातून लेखक, समीक्षक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी त्या मनोगताला मांडलेली पूरक निरीक्षणे असे या 'बुक ब्रो' च्या एपिसोडचे आगळे वैशिष्ट्य आहे. 

जरूर बघा, शेअर करा, कॉमेंट करा. बुक ब्रो चे आधीचे सगळे भाग बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती.


Saturday, January 25, 2025

नथांग

 मानसी होळेहोन्नूर यांचा ’नथांग आणि इतर कथा’ हा कथासंग्रह डिसेंबर २०२४ ला पुणे पुस्तक महोत्सवात पद्मगंधा प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला. त्यातील नथांग कथेचे अभिवाचन. अभिवाचन - प्रसाद घाणेकर.



Thursday, January 16, 2025

पोर्तोरिको

 आम्हाला एकदम ट्रम्प प्रचारभेत ऐकलेला floating island of garbage  बघायची इच्छा झाली. पोचलो उडत, उडत पोर्तोरिकोला. इथूनच सुरुवात झाली. लेक आमच्याकडून तिला पाहिजे तसा (बहुतेक पुएर्तोरिको) उच्चार घोटून घेत होती आणि आमची गाडी पोर्तोरिकोवर अडकलेली. शेवटी स्थलांतरित पालकांची अडचण समजल्यासारखं 'म्हणा काय हवं ते' अशी आम्हाला परवानगी मिळाली.

प्रवास म्हटलं की घरातला प्रत्येकजण वेगवेगळ्या परीने सज्ज होत असतो. लेकीला काळजी असते आम्ही तिला कुठेतरी लाज नक्कीच आणणार ह्याची. त्याचवेळी नवरा  सगळी काळजी सोडून द्यायच्या तयारीत असतो याची मला काळजी वाटायला लागलेली असते. घरात कमीत कमी बोलणाऱ्या नवऱ्याला प्रवासात कंठ फुटतो‌. बायको पोरं सोडून हा कंठ कुठेही फुटतो ‌त्यामुळे तो सोडून इतर सगळे काळजीत पडलेले असतात. ह्यावेळी त्याचा कंठ फुटला तो उबर चालकांशी बोलताना.

बसलो गाडीत की काढायचा प्रश्नसंच बाहेर हे त्याचं या प्रवासातलं बहुतेक ध्येय होतं. पोर्तोरिकाचा उच्चार, 'कचऱ्या' बद्दल मत काय, चांगलं खायला कुठे मिळेल आम्ही इकडे काय बघू आणि सगळं महाग सूर त्यामुळे   स्वस्त कुठे आणि काय मिळतं.‌ उत्तरं पण तितकीच रंजक मिळत होती. प्रत्येक उबर चालक आमचं मनोरंजन करत होता, ज्ञानात भर घालत होता. ही काही उत्तरं.

विधानसभेच्या आवारात ओबामानंतरच्या अध्यक्षांचे  पुतळे नाहीत यात काय ते समजा,  आमच्याकडे माहीमाही मासा जास्त आहे. कचऱ्यावरच जगतो तो. बघा कचऱ्याचा फायदा, आम्ही विनोद म्हणून ऐकलं आणि सोडून दिलं. तिकडे बोलले म्हणून सुटले... अशी उत्तरं floating island of garbage बद्दल मिळाली.

बऱ्याच चालकांना भारताबद्दल माहिती होती. एकाने तर सांगितलं bolt action, world war2 गेममधून भारताबद्दल माहिती समजली... तर एकाला भारतात फिरायला जायची इच्छा आहे पण बायकोचे स्वच्छतेबद्दलचे निकष कडक आहेत म्हणाला. आम्ही काही बोलायच्या आधीच त्याने सांगितलं हे माझं मत नाही. बायकोचं आहे.

नारळ भरपूर असूनही सरकारने नारळाचं तेल वापरण्यावर निर्बंध लादले आहेत. मक्याच्या तेलाचा वापर इथे जास्त दिसला. 

पोर्तोरिकोला अमेरिकेचा एक राज्य म्हणून मान्यता हवी आहे पण गेली सहा वर्षे प्रयत्न करूनही उपयोग झालेला नाही.

नवऱ्याचे प्रश्न इतके पाठ झाले की उबर दिसल्यावर आम्ही प्रत्येकवेळी आणखी एखादा प्रश्न त्याला सांगायचो. तेच तेच प्रश्न ऐकणार तरी कितीदा. नशीब एकच उबर चालक दोनदा नाही आला.

सगळे बघतात ती ठिकाणं बघायचीच पण लोक जिथे सहसा जात नाहीत तो भाग पण बघायचा असं दरवेळेला आम्ही करतो तेच यावेळीही केलं. लेकीने सगळं ठरवलं होतं. आम्ही गुणी विद्यार्थ्यांसारखं सूचना पाळत होतो; इतक्या की एकदा तर चुकीच्या ठिकाणी पोचून चुकीच्या रांगेत उभे राहिलो. तिथे टकाटक पोषाख करून आलेली माणसं संभ्रमित नजरेने आमच्याकडे बघायला लागली. ती आमच्याकडे बघतायत म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघायला लागलो मग आमच्या कपड्यांवरून आणि त्यांच्या कपड्यांवरून कुछ तो गडबड है हे लक्षात आलं तेवढ्यात कोणीतरी आमची चौकशी करायला आलंच लेकीने तिचं स्पॅनिश फाडत चुकीच्या रांगेत उभं राहिल्याची खात्री केली आणि मग आम्ही तिथून पळ काढला. बहुतेक कसल्यातरी प्रशिक्षणासाठीची रांग होती ती. अशा चुका झाल्या की लेक तिच्या भावानेही या चुका केल्या होत्या याची खात्री करून घेत होती. 

सॅनहुआनचा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे. तिथल्या रस्त्यावरून फिरताना नजरबंदी होणारी घरं पाहिली. तिथले काही रस्ते त्यासाठीच प्रसिद्ध आहेत. Airbnb त जाताना स्थानिक लोक जातात तसा मुद्दाम फेरीने प्रवास केला. कॅमुई गुहा (Camuy Caves) बंद होत्या म्हणून आडगावातल्या कुठल्यातरी गुहा बघायला गेलो. गुहेपर्यंत पोचायचं तर समुद्राच्या आजूबाजूला असलेल्या कातळावरूनच जायचं. चालताना थोडी पावलं टाकली की उजवीकडे,  डावीकडे, समोर भली मोठी भगदाडं बघितल्यानंतर चुकून पाय आत गेला की  अडकलो नाही तर सरळ समुद्रात या विचाराने मी एक खडक पकडून ठिय्या दिला. आजूबाजूचा समुद्र बघण्यातच वेळ घालवला. तसंही आत जाण सोपं नव्हतंच आणि आत गेल्यानंतर बाहेर येणं मुश्कीलीचं होतं. लेक आत गेली आणि अडकली. तिला वर येता येईना त्यामुळे त्या चिंचोळ्या खिंडीत तिच्या बरोबरीने बाकीचे अडकले. मग कोणाचा तरी मार्गदर्शक होता त्याने तिला कसं वर चढायचं ते सांगितलं आणि एकदम सगळी जनता गुहेबाहेर आली. अर्थात हे सगळं नंतर तिच्याकडून कळलं आणि तिथला एक माणूस कोणीतरी अडकलं, अडकलं अशी जाहिरात करत होता आणि आम्ही उत्साहाने ती आमचीच मुलगी, आमचीच मुलगी असं सांगायला लागलो. लेकीने आमचा हात ताबडतोब सोडला आणि सरळ आम्हाला जंगलातच नेलं. तिथेच सोडून देणार की काय...

एलयुन्के जंगल (El Yunque National Forest) ‍म्हणजे कोकणातल्या घाट्या‌. त्या शिताफीने चढलो. धबधबे बघितले, गार वाऱ्यात गरम गरम पदार्थ हादडले. आमच्या दृष्टीने कठीण, लेकिच्या दृष्टीने सोपे ट्रेक आम्ही करत होतो त्यामुळे ती  कठीणातला कठीण 'ट्रेक' करायला आम्हाला खुषीत सोडून पळाली.

त्यानंतर पुढचे दिवस डोंगरदऱ्यांमधल्या छोट्या छोट्या गावात  फिरलो. एका गावात चिंचा आंब्यानी लगडलेली झाडं बघितली आणि ड्रमवर ताल धरताना भारतातले म्हटल्यावर तबल्याची आठवण काढणारा वादक. त्यांच्या बहिणीने तेवढ्यात नवर्‍याला नृत्याचे धडे दिले.

 पोन्चे  नावाच्या गावात रस्त्यावर आपल्या वडापावसारख्या गाड्या होत्या आणि काहीतरी तळत होते. सहज  हे काय आहे विचारललं पण स्पॅनिश पदार्थाचं नाव काही केल्या समजेना. तिथे तेच खात  बसलेलं कुटुंब त्यांच्या हातातला तो पदार्थ घेऊन आले. आम्हाला चव घ्यायचा आग्रह केला. भरपूर गप्पा रंगल्या त्यांच्याबरोबर. त्यांच्यातल्या तरुण मुलाला इथे नोकरीची संधी नाही म्हणून अमेरिकेत यायचं आहे. ऐकताना वाटलं सगळीकडे तीच कहाणी. पोन्चेगाव नाताळच्या कार्यक्रमात दंग होतं.

एका अगदी डोंगराच्या कुशीतल्या गावात खायला थांबलो. छोटीशी सुबकशी जागा होती हसतमुख मालकच स्वतः सगळं करत होता. त्याही गावात नाताळची झलक पाहिली‌. 

कातळशिल्प असलेलं एक ठिकाण पाहीलं. आदिवासींच्या प्रार्थनेची जागा आणि त्यांनी सांकेतिक भाषेत लिहिलेले संदेश असलेले कातळ होते. तिथे पोचायची वाट आणि शांतता विलोभनीय होती. आमच्या व्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हतं. 

समुद्रकिनारे, बेटं आणि निसर्गाच्या सान्निध्यात काही दिवस घालवायचे असतील तर पोर्तोरिको मस्त आहे. आम्ही नाताळ सुरू व्हायच्या आधी गेल्याने गर्दीही नव्हती.


तुमच्यासाठी छायाचित्रं आणि झलक.






















Wednesday, January 8, 2025

निघते आहेस ना?



आई - वडिलांकडे आलं की माहेरपण संपू नये, त्यांच्या सहवासाचं सुख निरंतर राहावं असं वाटत असतं अगदी स्वत:च्या घरकुलाकडे खेचणारे परतीच्या प्रवासाचे वेध लागले तरी. परिस्थितीच तशी असते.‌ शेवटी एक क्षण आणि परिस्थितीच अशी येते की वडिलच विचारतात, "निघते आहेस ना?" त्या क्षणाची ही कहाणी.

Wednesday, December 11, 2024

जल, जंगल, जमीन वाचवण्यासाठी कोकणची पायी यात्रा!


 प्रगतीचा मार्ग म्हणजे औद्योगिकरण असं कोकणी माणसाच्या मनात अनेक मार्गे भरवलं जात आहे आणि त्यांची अक्षरश: लूट चालू आहे असं आशुतोष जोशीला का वाटतं आणि त्यासाठी तो काय करतो आहे ते ऐकू त्याच्याच शब्दांमध्ये.


Wednesday, November 20, 2024

मग ओळ शेवटाची!

अल्झायमरवरसारख्या रोगावर डॉक्टर नात आजोंबासाठी उपचारपद्धती निश्चित करते. काय आहे हा उपाय आणि होतात आजोबा तयार या उपचारासाठी?


कथासंग्रह - राणीमाशी
विज्ञानाचा पाया असलेला कथासंग्रह! 
भविष्यातील मानवी जीवन, नातेसंबंध, सामाजिक वर्तन, नैतिक व कायदेशीर समस्या आणि निवारण या कथांचा गाभा! 
कथा - मग ओळ शेवटाची! 
अभिवाचक : प्रसाद घाणेकर, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर, अदिती जोशी आणि डॉ. बाळ फोंडके.

 

Thursday, October 31, 2024

देवरुखच्या सावित्रीबाई - इंदिराबाई हळबे - अभिवाचन

 देवरुखच्या सावित्रीबाई ही चरित्रकथा आहे इंदिराबाई उर्फ मावशी हळबे यांची. औषधोपचाराअभावी दोन मुलींचं निधन आणि पाठोपाठ वयाच्या पंचविशीत आलेलं वैधव्य अशा अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत पूज्य साने गुरुजींच्या वैचारिक सहवासाने  प्रभावित होवून सामाजिक कार्यात झोकून देणार्‍या मावशींची जीवनगाथा थक्क करणारी आहे. शेकडो अनाथ मुलींचा आधार असणार्‍या मावशींनी मातृमंदिर संस्थेच्या माघ्यमातून संपूर्ण कोकणात उभारलेल्या कामाची जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या पुरस्काराने विशेष नोंद घेतली गेली. मावशीचं कार्य आणि जीवनचरित्र म्हणजे हे पुस्तक देवरुखच्या सावित्रीबाई. 

अभिजित हेगशेट्येंनी लिहिलेल्या या कांदबरीची ही तिसरी आवृती आहे. या पुस्तकाचं सध्या मी अभिवाचन करत आहे. कृपया मावशींची कहाणी सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचू द्या. सहकार्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.



आत्तापर्यंतचे सर्व भाग -


Wednesday, October 9, 2024

३५०० मैल. शार्लट ते बिग बेंड



https://youtu.be/U80Z6_qHReQ


हल्ली सारेच जगभर हिंडत असतात तसेच आम्हीही. प्रवास प्रवासाला निघण्याआधी सुरू होतो. आमच्या कुटुंबाची तयारी, प्रवासाला सुरुवात आणि प्रवासाबद्दल.‌‌ आमच्या प्रवासाचे किस्से, छायाचित्रं, चित्रफिती. 


आजचा प्रवास आहे शार्लट ते बिग बेंड राष्ट्रीय उद्यान.


Saturday, October 5, 2024

बाईच्या कविता

 


किरण येले यांच्या ग्रंथाली प्रकाशित या कवितासंग्रहात पुरुषाने वेगळ्या जाणिवेने लिहिलेल्या 'बाईच्या कविता' आहेत.


सह-अनुभूतीच्या या कविता मराठी कवितेतील एक वेगळे वळण आहे.


ज्यांनी या आधी वाचल्या-ऐकल्या असतील त्यांना पुन: प्रत्ययाचा आनंद देतील, अस्वस्थ करतील. पहिल्यांदाच ज्यांची या कवितांशी ओळख होईल त्यांना या कविता हळूहळू समजायला लागतील. 


आगामी कवितासंग्रहातीलही काही कवितांचं वाचन या कार्यक्रमात आहे.

Saturday, September 14, 2024

इस्राइल आणि जॉर्डन

कोणताही देश दीर्घ वास्तव्य असल्याशिवाय तुम्हाला खऱ्या अर्थी कळत नाही. आम्ही प्रवासी म्हणून पाहिलेल्या  इस्राइल आणि जॉर्डन या देशांबद्दल आमच्या दृष्टिकोनातून छायाचित्रं आणि चित्रफितींसह.

Sunday, August 25, 2024

इच्छा


माझी निर्मिती आणि भूमिका असलेला 'इच्छा' हा लघुपट (१४ मिनिटं) Digital filmmakers या वाहिनीने प्रसिद्ध केला आहे.


माझ्या कथेला दिग्दर्शक, संकलक शिवाजी कचरे यांची जोड मिळाली आणि पुणे, रत्नागिरीच्या कसलेल्या कलाकारांनी एक हृदयस्पर्शी कलाकृती घडवली. आई-वडील आणि मुलांच्या नात्यामधील विविध पदर आणि समाज यांचं बोलकं चित्रण म्हणजे हा लघुपट.


subtitles आहेत त्यामुळे इतर भाषिकांनाही हा लघुचित्रपट नक्की पाठवा. जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला मदत करा - मोहना.


Thursday, August 22, 2024

धुकं


वडिलांकडे अमेरिकेत आल्यावर छोट्या जितचा भ्रमनिरास होतो, त्याच्या मनातली अमेरिका फार वेगळी असते; त्यात वडिलांचं काम पाहून तर त्याला त्यांची लाजच वाटायला लागते. वडील आणि मुलाच्या नात्याचा पदर उलगडणारी कथा.

Monday, August 12, 2024

माणसांची भाषा

माणसांची भाषा ही प्रसिद्ध लेखक सुबोध जावडेकर यांची कथा.


त्यांना जेव्हा मी ही कथा कथाकथनस्पर्धेत सांगायचे आणि हमखास बक्षीस घ्यायचा हे कळवून अभिवाचनासाठी परवानगी मागितली तेव्हा त्यांनी आवर्जून त्या कथेची अभिवाचनाच्या दृष्टीने सुधारित आवृत्ती पाठवली. अतिशय वेगळ्या पार्श्वभूमीवरची आणि वेगळा विषय असलेल्या या कथेचा आणि दृश्य अभिवाचन केलं आहे. नक्की पाहा ऐका आवडलं तर इतरांनाही पाठवा.


स्त्री संशोधकाला माशांवर प्रबंध पूर्ण करत असताना प्राण्यांच्या आणि माणसांच्या भाषेचा आलेला अनुभव आणि प्राण्यांवर प्रयोग करताना तिला दिसलेलं माणसांच्या आणि प्राण्यांच्या मनातलं थक्क करुन टाकणारं विचाराचं चक्र म्हणजे कथा - माणसांची भाषा.


कथा - माणसांची भाषा

लेखक - सुबोध जावडेकर

अभिवाचन - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर, नेहा केळकर, मिलिंद मराठे, समीर चौधरी.

मासे - अनया चक्रपाणी, पर्णिका जोगळेकर, ओम शेंडे, आरोह बिद्रे, इधिका आणि शार्विल करोडी.

Thursday, August 8, 2024

कांताबाईची करामत!


अमेरिकेतल्या आपल्या मुलाकडे जाण्याचं अर्धशिक्षित कांताबाई ठरवते. मुलाचा आईच्या आगमनाच्या कल्पनेने जीव धास्तावतो. ती इथे येऊन काय गोंधळ घालेल याची त्याला कल्पनाही करवत नाही. सुनेला तर भूकंप झाल्यासारखी ही बातमी वाटते.

आहे तरी कशी आपली कांताबाई? ऐका तिची करामत प्रसाद घाणेकर यांच्या आवाजात.

लेखन - मोहना प्रभुदेसाई जोगळेकर

अभिवाचक - प्रसाद घाणेकर

Thursday, July 25, 2024

बेघरांना हटवा

 आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेला लेख    

   

अमेरिकेतल्या काही राज्यात प्रशासन जिथे - जिथे बेघर लोकांच्या वस्त्या आहेत तिथे - तिथे कायदेशीर कारवाईचा फलक लावते आहे. पोलिस प्रत्यक्ष जाऊन बेघर लोकांना आपला मुक्काम तीन दिवसांच्या आत हलवण्याची सूचना करत आहेत. कारण? कारण आहे उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय. २८ जूनला उच्च न्यायालयाने बेघरांना रस्त्यावर थारा नाही, तसे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाईचे आदेश जारी केले आहेत. कारवाई म्हणजे काय तर त्यांना न परवडणारा दंड ठोठावला जाणे किंवा त्यांची एक महिन्यासाठी तुरुंगात रवानगी. हे कारवाई करण्याआधी बेघर नागरिकांना सूचना मिळते पण त्यांनी निवाराछ्त्राचा आसरा घेणं अपेक्षित आहे. कितीतरी बेघर लोक निवारा केंद्रात राहायला जाण्याऐवजी रस्त्यावर राहणं पसंत करतात. निवार्‍याला न जाण्याची अनेक थक्क करणारी कारणं आहेत त्यातलं मुख्य कारण आहे, प्रतिक्षा यादी. त्यामुळे आला आदेश, गेलं निवाराछात्रात असं होत नाही. राहायला जागा नाही म्हणून रस्त्यावर तंबू ठोकणार्‍या लोकांकडून दंड भरण्याची अपेक्षा करणं उचित आहे का? दंडांचे पैसे भरायला मुळात त्यांच्याकडे पैसे कसे असणार? असे असंख्य प्रश्न या निर्णयाने उभे केले आहेत. उद्यानात आणि रस्त्याच्याकडेला टाकलेले तंबू शहराच्या सौदर्याला, आरोग्य आणि सुरक्षिततेला हानीकारक आहेत. करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या सोयिसुविधांचा लाभ नागरिकांना घेता येत नाही, उद्यानं बेघर लोकांच्या वस्त्या झाल्यामुळे लोक उद्यानात फिरकत नाहीत.  त्यांना त्यांच्या सुरक्षिततेची खात्री अशा भागांमध्ये वाटत नाही अशी दुसरी बाजू उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य वाटणारे मांडतात तर काहीजणांच्या मते राहायला जागा नाही म्हणून शिक्षा सुनावणं हा त्या व्यक्तीच्या अस्तित्वावरच घाला घालणारा हा निर्णय आहे. जिथे बेघर लोकांची संख्या जास्त आहे अशा नऊ राज्यात या निर्णयाची अमंलबजावणी होईल. या निर्णयाबद्दल अर्थातच राज्याराज्यातल्या महापौरांच्या, सामान्यजनतेच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. मुळात हा खटला आहे तरी काय ज्यासाठी  प्रशासनाला उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले?


२०१८ साली ऑरेगन राज्यातील ग्रॅटपास शहरात सत्र न्यायालयात ऑरेगन कायदा केंद्राच्यावतीने बेघर लोकांसाठी खटला दाखल केला गेला. कायद्याने सार्वजनिक ठिकाणी झोपणे दंडनीय आहे पण शहर निवारा पुरवू शकत नसेल तर त्यांनी कुठे जायचं आणि घटनेनुसार असा नियम अवैध आहे असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. हा खटला होता ब्लेक या नागरिकाच्यावतीने. ग्रॅटपासमध्ये दहा वर्ष स्वत:चं घर नसल्याने, भाड्याने घर घेणं परवडत नसल्याने ब्लेक बेघर होता. अधूनमधून सरकारतर्फे चालवणार्‍या जाणार्‍या तात्पुरत्या निवार्‍याचा तो आधार घेत होता. तात्पुरतं निवारा केंद्र ही नोकरी असणार्‍या पण भाड्याचं घर न परवडणार्‍या किंवा बेरोजगार व्यक्तींना अल्पमुदतीने मिळू शकतं पण काही प्रमाणात भाडं तर द्यावं लागतंच तसंच दोन वर्षात स्वत:च्या पायावर उभं राहणं अपेक्षित असतं. ब्लेक या निवार्‍याचा आधार घेत होता पण तिथे तो टिकू शकला नाही. उद्यानं आणि रस्त्याच्याकडेला झोपण्यावरुन त्याला अनेकदा दंड ठोठावण्यात आला. ब्लेकसारखे त्या भागात जवळजवळ सहाशे निराधार नागरिक होते जे सरकारच्या कडक नियमात पोळून निघाले होते. साधारण चाळीसहजार वस्ती असलेल्या या गावात रात्री रस्त्यावर झोपलेल्या माणसाला चादर, उशी  वापरण्यावर बंदी घालण्यात आली आणि उलटसुलट मतप्रवाहांचं गावात वादळ उठलं . गावातील या सर्व निराधार व्यक्तींचा प्रतिनिधी म्हणून ब्लेकला निवडण्यात आलं. ब्लेकद्ववारा ऑरेगन कायदा केंद्र या संस्थेमार्फत  खटला दाखला करण्यात आला. २०२० साली ब्लेकचं निधन झालं आणि त्याच्याजागी ग्लोरिया जॉनसन आणि जॉन लोगन यांची बेघरांची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. शासनातर्फे असलेल्या निवाराकेद्रांमध्ये समाधानकारक परिस्थिती आढळून न आल्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित करावं, केंद्रांची संख्या वाढवावी तसंच बेघरांना शिक्षा ठोठावलं जाणारं कलम काढून टाकावं याला सत्र न्यायालयाने अखेर समंती दिली तरी हा खटला पुढे चालूच राहिला. ग्रॅटपास शहर प्रशासनाने उच्च न्यायालयाकडे धाव घेतली.


बेघरांचेही सामान्यत: दोन प्रकार असतात. निवारा केंद्रात राहणारे आणि निवारा केंद्र नाकारुन रस्त्यावर जीवन जगणारे. मुळात कितीतरीजण सर्वसामान्य जीवन जगणारी माणसं असतात पण घरभाडं परवडत नाही म्हणून त्यांच्यावर ही वेळ आलेली असते. नातेवाईकांची मदत मिळणं कठिण होतं कारण सर्वचजण साधारण त्याच आर्थिक स्तरातले असतात. काहीवेळा मादक पदार्थाच्या आहारी गेल्यामुळे घरात थारा मिळत नाही. सरकारच्या ताब्यात असलेल्या युवकांना सज्ञान झाल्यावर म्हणजे अठरा वर्षांनंतर निवारा केंद्रात राहता येत नाही त्यामुळे ही तरुण मुलं रस्त्यावर येतात आणि त्यानंतर सर्वसामान्यांसाठी असलेल्या निवारा केंद्रात जाण्याची त्यांची इच्छा उरलेली नसते. बर्‍याच निवारा केंद्रातून सकाळी बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी परत आल्यावर जागा असेलच असं याची शाश्वती  नसते. सेवाभावी संस्था अशी केंद्र चालवतात पण त्याठिकाणचे नियम बेघरांना जाचक वाटतात. धार्मिक पाया असणार्‍या काही केंद्रात तुम्ही पाऊल टाकलं की तीस दिवस इतरांच्या संपर्कात राहण्याची बंदी असते, रोज दोनवेळा चर्चमध्ये जाणं बंधनकारक असतं तसंच नोकरी असेल तर पगारातील दहा टक्के रक्कम ही केंद्र घेतात. कितीतरी केंद्रात ठराविक वेळेनंतर परत आलात तर प्रवेश नाकारला जातो. रात्री उशिरापर्यंत काम करणार्‍या लोकांना अशा केंद्रांचा निवारा घेता येत नाही.


संपन्न देशात गरीबी नसते असं आपण गृहीत धरतो पण अमेरिकेत ३३६,७५१,०६१ मिलियन लोकसंख्येपैंकी सध्या ६,५३,१०० इतकी रस्त्यावर तंबू ठोकून राहणार्‍यांची संख्या आहे.  गेल्या एका वर्षात १२ टक्क्यांनी बेघरांची संख्या वाढली आहे ती कोविड काळानंतर झालेल्या महागाईमुळे. २००७ नंतर प्रथमच ही संख्या इतकी वाढली. उच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय काही राज्यांपुरताच मर्यादित आहे तसंच त्या त्या राज्याला  निर्णयाची अमंलबजावणी किती कठोरपणे करायची याची मुभा आहे. नियमाची कठोरपणे अमंलबजावणी झाली तर बेघर लोक देशोधडीला लागतील, या गावातून त्या गावात भ्रमंती त्यांच्या वाट्याला येईल आणि काही हालचाल केली नाही तर उद्यान, रस्ते अशा सार्वजनिक जागांवर बेघरांनी आक्रमण केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्याच शहरातील उत्कृष्ट नियोजन करुन बांधलेल्या उद्यान, रस्त्यावर फिरकणं मुष्किल होईल. प्रश्न गुंतागुतींचा आहे. प्रशासनाने योग्य ते बदल करुन निवारा केंद्र पुरवणे हा मार्ग असला तरी बर्‍याच राज्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची तेवढी क्षमता नाही. आता ९ राज्य या निर्णयाची अमंलबजावणी करताना काय पावलं उचलतात हे पाहाणं हे महत्वाचं ठरेल. 


https://marathi.indiatimes.com/editorial/article/us-supreme-court-decision-on-homeless-special-report/articleshow/112005896.cms