Wednesday, August 21, 2019

शार्लट आणि जवळपासच्या मित्रमैत्रीणींनो नाटकाला नक्की या!


प्रेमाची, गोंधळाची, हेव्याची, वयाची ही गंमत- जंमत; पण या सार्‍याची सूत्र एक नाही, दोघांच्या हातात जातात आणि सुरु होते धरपकड.
तारीख: शनिवार, २१ सप्टेंबर
वेळ:दुपारी ३.३० ते ६:००
स्थळ:  Matthews Play House,
100 W McDowell St, Matthews, NC 28105
  Directions


कलाकार प्रवेशानुक्रमे- पर्णिका जोगळेकर, समीर चौधरी, मोहना जोगळेकर, अतुल रिसवडकर, चिन्मय नाडकर्णी, दीप्ती ओक.

जाहिरात: वेदिका तोंडे, मूळ कल्पना:आनंद वाकणकर. छायाचित्र: नितीन पटवर्धन. रंगभूषा: कश्मिरा वानखेडकर, रुपाली नाडकर्णी. प्रकाश योजना: शंतनु निलावर. 
गायक: दीप्ती ओक, संदीप कुलकर्णी. नृत्यदिग्दर्शन: कश्मिरा वानखेडकर, श्रेया इनामदार.
संगीत नियोजन: विरेन जोगळेकर, गीता गुर्जर. नेपथ्य:विरेन जोगळेकर, गौरव लोहार, शंतनु निलावर.

Purchase tickets here: Paypal, Debit or Credit Card
ज्येष्ठ नागरिकांसाठी (60 +) पहिल्या दोन रांगा राखीव.
बुधवार, १८ सप्टेंबरपासून पासून तिकिट दर:
प्रौढ (Adult )- $15, मुलं - (Kids) $08, खेळघर (Babysitting) - $08
आयत्यावेळी (At the Gate) प्रौढ(Adult ) - $17, मुलं - (Kids) $10, खेळघर (Babysitting) - $ 10




'अभिव्यक्ती' च्या  पूर्वीच्या निर्मितीची झलक पाहण्यासाठी आणि माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या.









Thursday, June 27, 2019

कथाकथन - अध्यक्षीय भाषण

कथाकथन या विषयावर माझे चार (?) शब्द.

कथाकथन हा शब्द खर्‍याअर्थी आपल्या रोजच्या आयुष्यात सतत आपल्या आजूबाजूला घोटाळत असतो. एखादा प्रसंग, किस्सा बोलता बोलता आपण सांगतो ते खरंतर कथाकथनच आहे फक्त त्याचं स्वरुप छोटं - मोठं असू शकतं. तुम्ही ती गोष्ट, किस्सा किती रंगवून सांगता यावर त्या कथनाची रंगत अवलंबून असते. यामुळेच कथाकथन हा प्रकार अस्तित्वात आला असावा. जो मुळात आपल्या सर्वांच्याच अंगात भिनलेला आहे. विचार केलात तर लक्षात येईल की तसं म्हटलं तर आपण ही भूमिका रोजच निभावत असतो. कधी यशस्वीरित्या तर कधी धडपडत. त्याचंच विस्तारित स्वरुप कथाकथन.

कथाकथन म्हटलं की मला एक प्रसंग नेहमी आठवतो. साधारण १९९१ मधली ही गोष्ट आहे.  माझे वडील जिल्हापरिषदमध्ये कार्यकारी अभियंता  होते. गणपत्तीनिमित्त कार्यक्रम असावा बहुतेक. गिरीजा किर, वि. आ. बुबा या दोघांच्या कथाकथनाचा. ऑफिसच्या आवारातल्या गॅरेजमध्ये कार्यक्रम होता. आता नवल वाटतं, गॅरेजमध्ये कार्यक्रम होता त्याचं. हौसेपोटी गाड्या हलवून कर्मचार्‍यांनी छानसं व्यासपीठ उभारलं होतं. जिल्हापरिषदचे सारे कर्मचारी आणि जवळपासची लोकं कार्यक्रमाला हजर होती. गॅरेजच्या समोर गर्दी करुन रस्त्यावरच सगळे बसलेले. आमच्या क्वार्टर्स समोरच होत्या. घराच्या पायरीवर पथारी पसरुन कार्यक्रम पाहायला आम्ही बहिणी, आई बसलो. आपापल्यापरीने सगळे जय्यत तयारीत होते.  पण कार्यक्रम काही सुरु होईना. हळूहळू कुजबूज सुरु झाली. वि. आ. बुवा बसलेले दिसत होते. गिरीजा कीरांची वाट पाहत असणार. तेवढ्यात ऑफीसमधलं कुणीतरी आमच्या घराच्या दिशेने यायला लागलं. वडिलांकडे असणार म्हणून सरकून आम्ही त्यांना आत जायला जागा करुन दिली. पण ते म्हणाले.
"मोहना तुझ्याशी बोलायचंय." गोंधळून मी पाहतेय तेवढ्यात ते म्हणाले,
"गिरीजाताई काहीकारणास्तव येऊ शकत नाहीत. तू कर आज कथाकथन. वि. आ. बुवा आलेले आहेत. तुझं आणि त्यांचं कथाकथन करु." गिरीजा कीरांच्या जागी मी? त्यांचं आभाळमाया पुस्तक मी वाचलं होतं. भारावून गेले होते आणि प्रचंड उत्सुकतेने त्यांची वाट पाहात होते. त्याऐवजी मी करायचं कथाकथन? माझी पुंजी फार थोडी होती. स्पर्धांमधली बक्षिसं आणि गणपतीउत्सवात रत्नागिरीकरांसमोर केलेलं कथाकथन. त्यावेळेस महाविद्यालयातले आम्ही तिघं चौघं या स्पर्धांमध्ये आघाडीवर होतो त्यामुळे जिकडे तिकडे गोष्टी सांगायला असायचो.  पण आज मला एकट्याने कथाकथन करायचं होतं तेही गिरीजा किर यांच्या जागी. हातापायला कापरं सुटलं. पण जिल्हापरिषदेचा कर्मचारीवर्ग कुठूनकुठून आलेला. गर्दी झालेली. कार्यक्रम रद्द करता येणार नव्हता कारण वि. आ. बुवा आलेले होते. पण ते एकट्याने पूर्ण कार्यक्रम सादर करु शकत नव्हते.  वि. आ. बुवांची एक कथा झाली आणि मी उभी राहिले. गिरीजा कीरांच्या ’मित्रा’ कथेने मला अनेक बक्षिसं मिळवून दिली होती. त्याच कथेन सुरुवात केली.  माझ्या शब्दांची गाडी धाडधाड करत सुटली. कथा सुरु कधी झाली आणि कधी संपली तेच कळलं नाही इतका वेग होता त्या कथेला. त्यावेळेला मी नुकतीच आकाशवाणीत निवेदिका म्हणून काम करायला सुरुवात केली होती. दुसर्‍यादिवशी आकाशवाणीत कार्यक्रमाला आलेल्या कुणीतरी माझ्या कथाकथनाची नक्कल करुन दाखवली त्यावेळेस सुटलेल्या गाडीची कल्पना आली....पण प्रसिद्ध लेखिकेच्या जागी, प्रसिद्ध लेखकासमवेत आयत्यावेळी केलेलं हे कथाकथन होतं. तर बघा, नकळत तुमचेही कान टिपत होते ना माझं बोलणं? हेच तर असतं कथेचं कथन.

आमची पिढी मोठी झाली ती व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांच्या कथाकथनाच्या कॅसेट ऐकत. ही नावं मी सांगतेय तेव्हा लक्षात येतं की यामध्ये स्त्री कथाकथनकार नाहीत. का? खरं सांगायचं तर फार विचारच केला नव्हता कधी. पण आज कथाकथन या विषयावर बोलायचं आहे म्हटल्यावर हे प्रकर्षाने जाणवतंय. स्त्री कथाकथनकार होत्या, त्यांचे कार्यक्रम होत होते पण कॅसेट रुपात आलेले पुरुष कथाकथनकार जास्त होते. मला आठवतंय, व. पु. काळेंची शिष्या मुग्धा चिटणीसचं कथाकथन त्यावेळेस आमच्यासारख्या महाविद्यलयीन विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होतं. निलम प्रभु यांच्या ’पप्पा’ कथेच्या सादरीकरणाला कोण विसरेल? पण त्यांचं हे कथाकथन व. पु. काळेंबरोबर होतं. स्वतंत्रपणे केलेलं नव्हतं. तरीही आज इतक्या वर्षांनीही पप्पा कथेमधील ती आणि नानासाहेब देशमुख यांचा विसर पडत नाही. दत्तक मुलगी आणि नानासाहेब यांच्या आयुष्यातील गुंतागुंत निलम प्रभु इतक्या प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोचवतात की ही कथा काळजात घर करुन बसते. कथा सांगणं हे कौशल्य आहे यात कथा निवड आणि श्रोता महत्वाचा. आपल्यासमोरचा वयोगट, त्यांची आवड - निवड हा मोठा भाग त्यात आलाच पण कोणत्याही कथेत ’कथा’ असायला हवी. रंजकता हवी. थोडक्यात ज्या कथेला उत्तम सुरुवात, मध्य आणि शेवट असेल अशा कथेत श्रोता रंगतो. कथाकथन करताना प्रेक्षकांचा अंदाज घेत आयत्यावेळी बदल करता आले पाहिजेत. हे सोपं नाही पण कठीणही नाही. अनुभवाने जमणार्‍या या गोष्टी आहेत.  कथाकथन सादर करताना खूपजणांचा गोंधळ उडतो. कथेतील पात्रांचे आवाज बदलायचे असतात असा समज असतो. पण प्रत्यक्षात तुम्ही स्त्री, पुरुष असा आवाजात बदल न करता, आवाजात चढ - उतार करुन ते पात्र डोळ्यासमोर उभं करायचं असतं. ते केलं नाही, तर त्याचं स्वरुप एकपात्री प्रयोग असं होतं.

अजूनही स्त्री कथाकथनकार म्हटलं की मुग्धा चिटणीस, निलम प्रभु, गिरीजा कीर  ही काही नावं ठळकपणे आठवतात. २० वर्षाहून अधिक काळ भारताबाहेर असल्याने नविन नावं मला ठाऊक नाहीत किंवा कानावर पडलेली नाहीत. हा विचार मनात आला की वाटतं, जर खरंच एकूणच कथाकथन हा प्रकार कमी झाला असेल तर तो माध्यमांच्या बदलामुळे झाला असावा. गोष्टी सांगणार्‍यामधे मुळात गोष्टी वाचण्याची आवड बहुतेकवेळा असतेच. पण इतर माध्यमांच्या प्रभावामुळे वाचन कमी झाल्यामुळे कथाकथन कमी झालं असावं.  वाचनाची आवड हा मुद्दा बाजूला ठेवला तर आपलं किंवा इतरांचं लेखन आपण कथाकथनाने दुसर्‍यांपर्यंत पोचवू शकतो. न वाचणारी मंडळीही गोष्टी उत्साहाने ऐकतात.  हाच विचार घेऊन मी माझ्या मेल्टिंग पॉट आणि नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ’रिक्त’ कथासंग्रहाबाबत केला. कथाकथनाचे कार्यक्रम केले. त्यामुळे माझ्या कथा मी श्रोत्यांपर्यंत पोचवली आणि त्यामुळे पुस्तकाबद्दलही उत्सुकता निर्माण झाली. लेखक म्हणून हेच तर हवं असतं ना आपल्याला? लेखकाला आपलं किंवा आपल्याला आवडलेलं इतरांचं लेखन इतरांपर्यंत पोचावं असं वाटत असतं. त्यासाठी कथाकथन हा उत्तम मार्ग आहे असं मला वाटतं.

पूर्वी कथाकथनाचे कार्यक्रम होत असत. कॅसेटस निघत असत. आता समाजमाध्यमं  बदलली आहेत. काळानुसार बदलत  लोकापर्यंत पोचण्याचे मार्ग आपण शोधले पाहिजेत. किंबहुना कथा लोकांपर्यंत पोचवण्याचे मार्ग आता अधिक सुलभ झाले आहेत. ते वापरणं आपल्याच हातात आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे storytel. भारतात storytel app ला छान प्रतिसाद मिळतोय. त्याद्ववारे अनेक पुस्तकं आपण आता ऐकू शकतो. podcast हा दुसरा मार्ग. यासाठी आपण पट्टीचे कथाकथनकार नसलो तरी ऑडॅसिटीसारखी अॲप्स वापरुन आपल्या आवाजाला चढ उतार देता येतात.  youtube आहेच. ही सारी माध्यमं अशी आहेत की बसल्या जागी मराठी भाषिकांपर्यंत तुम्ही जगाच्या कानाकोपर्‍यात पोचू शकता. लेखक एकत्र येऊन असे कार्यक्रम  प्रत्यक्ष किंवा यामार्गे सादर करु शकतात. अगदी घरगुती स्वरुपात कथाकथनाचे कार्यक्रम करता येतील. वाचनालयात कथाकथन करता येईल. कथा ऐकायला कुणालाही आवडतं. सादरकर्त्याला आपली कथा उत्तम प्रकारे लोकांसमोर पोचवण्यासाठी कथाकथन करणं शिकलं पाहिजे. यासाठी सध्याच्या माध्यमांचाच उपयोग कसा करायचा हे आव्हान लेखकांनी झेललं पाहिजे. व्यक्तीगतपातळीवर किंवा एकत्रितपणे!

मार्ग बदलले तर लेखकांना आणि कथाकथनाला दिवस चांगले येतील अशी आशा, अपेक्षा करुन मी थांबते. पुन्हा एकदा यानिमित्ताने कथाकथनाबद्दल विचार करायला आणि तुमच्यासमोर माझे विचार मांडायला संधी दिल्याबद्दल मोहन कुलकर्णी यांची मी आभारी आहे. धन्यवाद.

Tuesday, May 14, 2019

होरपळ बालमनांची


"तू बातमी ऐकली असशील म्हणून फोन केला." मैत्रिणीचा फोन आला तेव्हा मी गाडी चालवत होते.  रेडिओवरआमच्या गावातल्या, शार्लटमधील विद्यापीठातल्या गोळीबाराबद्दलची बातमी सुरु झाली आणि पोटात गोळाच आला.  तेवढ्यात मैत्रिणीचा फोन आला. तिची मुलगी तिथेच शिकायला आहे. ती सुखरुप असल्याचं कळलं आणि जीव भांड्यात पडला. आजूबाजूची, ओळखीच्यांची  मुलं तिथे शिकायला त्यामुळे नक्की काय झालं ते कळेपर्यंत, सर्वांची खुशाली कळेपर्यंत चैन पडणार नव्हतं. विद्यापीठाच्या आवारात जायला - यायला ताबडतोब बंदी घातली होती. बंदी उठेपर्यंत विद्यार्थीवर्ग आपापल्या वर्गात होता. घरी मुलांनी खुशालीचे  टेक्स्ट केल्यानंतर फोन बंद होते. एका धाडसी मुलाच्या कृतीमुळे या हल्ल्यात कमी जिवितहानी झाली. दोन जण जिवाला मुकले तर चारजण जखमी झाले. या दोनजणापैंकी एक होता रायली होवेल. रायली जिवाची पर्वा न करता मारेकर्‍यावर चालून गेला. स्वत:च्या जिवाचं मोल देत रायलीने मारेकर्‍याला जमिनीवर लोळवलं, तिथे असलेली इतर मुलं रायलीच्या मदतीला धावली. पडलेल्या मारेकर्‍याला त्यांनी धरुन ठेवलं. पण पडता पडता मारेकर्‍याने झाडलेल्या गोळीत रायली मृत्यूमुखी पडला. २१ वर्षाच्या रायली होवेलच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल बोलताना प्रत्येकाचेच डोळे भरुन येतात, शब्द अपुरे पडतात. पळा, लपा किंवा धैर्याने मारेकर्‍याचा सामना करा ही तीन सूत्र हिंसेला तोंड देण्याच्या प्रशिक्षणात मनावर बिंबवली जातात. यातील रायलीने निवडलेल्या पर्यायाचं त्याच्या आई - वडिलांना आश्चर्य वाटत नाही तसंच त्याला ओळखणार्‍या सर्वांनाच.  त्याच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी सरकारनेही उचित पाऊल उचललं. सरकारी इतमामात गावी परतलेल्या रायलीच्या पार्थिवाची वाट पाहत नागरिक दोन तास  साश्रू नयनांनी उभे होते. 


अमेरिकेन जनतेपुढील ही समस्या गावागावात प्रत्येक घराच्या दारासमोर उभी आहे. आपल्या गावात, शाळेत असा प्रकार होणार नाही हा निव्वळ भ्रम राहिलेला आहे. UNCC मधील घडलेल्या घटनेआधी काही महिने आधी माझ्या मुलीच्या शाळेतला हा प्रसंग. ७ वीत शिकणार्‍या एका भारतीय विद्यार्थ्याने वर्गातल्या बाकावर लिहिलं. "I’ll get the guns by Thursday. Pitch in $200 for 5 Swisses." मुलांनी खोटं बोलणं, मारामारी करणं, इतरांना चिडवणं, वर्गातल्या बाकांवर, भिंतींवर मुलामुलींची नावं लिहिणं एवढीच मजल या वयात मुलं गाठतात असं गृहीत धरणं कालबाह्य झाल्यासारखं ही वाक्य वाचताना वाटलं होतं. या भारतीय विद्यार्थ्याने लिहिलेल्या या संदेशाचं  कुणीतरी छायाचित्र घेतलं आणि बातमी सर्वत्र पसरली. मुलाची चौकशी सुरू झाली. गंभीर स्वरूपाची हरकत असेल तर मुलांना तीन दिवस शाळेत यायला मनाई केली जाते पण त्याच दरम्यान  फ्लोरिडा राज्यातील  शाळेत घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे या प्रसंगाचे पडसाद तीव्र होते त्यामुळेच परिणामही. मुख्याध्यापकांनी झालेल्या घटनेची पोलिसांकडून चौकशी होऊन जास्तीत जास्त शिक्षा सुनावली जाईल याची ग्वाही दिली. त्याचाच परिणाम म्हणून ३ दिवस शाळेत न येण्याच्या शिक्षेवर न थांबता या मुलाला सुधारणागृहात दाखल केलं गेलं. या मुलाची पुढची शैक्षणिक प्रगती गोठल्यासारखीच आहे.  सुधारगृहाचा ठप्पा लागल्यावर त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली जाणार, त्याला मिळणारी वागणूक बदलणार, महाविद्यालयीन प्रवेश ही तर पार पुढची गोष्ट झाली. ही आम्ही जवळून पाहिलेली घटना. अशावेळेस  पालकांना मन घट्ट करुन अशी परिस्थिती उद्भवली  तर काय करायचं यावर मुलांशी बोलावं लागतं. मुलांच्या डोळ्यातले, मनातले प्रश्न वाचताना आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना नको वाटतं, जीव तुटतो.   कुणी कुणाचा जीव कसं घेऊ शकतं या निरागस प्रश्नाला उत्तर देताना या  कोवळ्या मनांना, अजाण मुलांना आपण अकाली  प्रौढत्वाकडे वळवतोय ही जाणिव वेदनादायी असते. पण या काळाचं हे वास्तव आहे. अशा घटना आणि मुलांवर होणारी कारवाई याचं प्रमाण शाळांतून खूप मोठं आहे. दुर्देवी घटनांची नक्कल मुलांना का करावीशी वाटत असेल? मुलं माध्यमातून या गोष्टी पाहत असतात, ऐकत असतात त्याचा नकळत मनावर परिणाम होत असावा का? असंच आपणही करावं असं वाटत असेल का?  शाळांना सातत्याने घडणार्‍या अशा घटनांमुळे यावर कडक कारवाई करणं भागच आहे . पण विद्यार्थ्यांना गंमत म्हणून केलेल्या उद्योगाच्या परिणामाची कल्पना तरी असेल का?  अशा घटना घडल्या की मन विषण्ण होतं. नानाविध उपायांची चर्चा होते. शिक्षकांच्या हातात बंदूका सोपवायला हव्यात या अंतिम निष्कर्षालाही बर्‍यांचदा खूपजणं  येतात.  पण शिक्षकांनी शिकवायचं की बंदूक चालवायला शिकून मुलांच्या सुरक्षिततेचीही काळजी करायची हा प्रश्नही त्याबरोबर येतोच.

मुळात मुलांच्या हातात बंदुका येतातच कशा हा सर्वसामान्य लोकांना पडणारा प्रश्न. कायद्याने वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत बंदूक विकत घेता येत नाही. आता तर काही राज्यात २१ ही वयोमर्यादा झाली  आहे पण यातून पळवाटा आहेतच. सर्वेक्षणातून जवळजवळ ६०% विद्यार्थ्यांनी बंदूक पाहिजे असेल तर सहज मिळू शकते अशी कबुली दिली आहे. बर्‍यांचदा घरातील मोठ्या माणसाची बंदूक मुलांच्या हातात पडते.  कधी हातात आलेल्या बंदुकीचा सहज वापर केला जातो. कधी मानसिक विकृतीमुळे बंदूक वापरली जाते तर काही वेळेला केवळ बढाई मारण्यासाठी शाळेत मुलं बंदूक आणतात. बर्‍याचदा आधीच कुणाच्यातरी लक्षात येतं आणि त्यांच्या हातातील बंदूक काढून घेतली जाते. कारवाई होते. पण जेव्हा असं होत नाही तेव्हा कितीतरी निष्पाप कळ्या उमलण्याआधीच संपतात. अंदाधुंद गोळीबार करुन ही मुलं काय साध्य करतात हा जसा प्रश्न आहे तसंच पूर्वी झालेल्या गोळीबारांचा पद्धतशीर अभ्यास करुन हिंसेची तीव्रता कशी वाढेल याचं व्यवस्थित नियोजन करण्याची  मुलांची मानसिकता चिंताजनक आहे. २००७ साली व्हर्जिनिया पॉलीटेक्निक मध्ये झालेल्या गोळीबारात ३२ मुलं आणि त्यांचे काही शिक्षक मारले गेले. या मुलाने आधीच्या गोळीबाराचा सखोल अभ्यास केला होता आणि अधिक मुलांचे बळी जाण्यात ती मुलं कुठे कमी पडली हे पाहून त्याप्रमाणे नियोजन करण्याची काळजी घेतली होती.

२०१२ साली सॅंडीहूक  प्राथमिक शाळेतली २० चिमुरडी मुलं आणि ६ शिक्षक अशाच गोळीबाराला हकनाक बळी पडले. पण यावेळेस जे झालं ते केवळ पुरेशी काळजी घेऊनही नविन आणि त्यादिवशी वर्गावर असलेल्या बदली शिक्षिकेला याबद्दल माहिती नसल्याने कारण जशी गोळीबाराची संख्या वाढली आहे त्याप्रमाणेच अशा परिस्थितीत काय पावलं उचलायला हवीत त्यासाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नांचीही. याही शाळेत प्रशिक्षण दिलं होतंच. पण ज्या वर्गातील मुलं बळी पडली त्यातील एका वर्गात  शिक्षिका नविन होती. काहीतरी विपरीत घडतंय ही सूचना मिळताच तिने वर्गाचं दार  लावण्याऐवजी प्रथम  मुलांना बाकड्याखाली लपवलं. त्यानंतर दार बंद करायला ती गेली तोपर्यंत बंदूकधारी मुलाने दार उघडलं. मुलं कुठे आहेत या त्याच्या प्रश्नावर तिने वर्गात कुणी नाही हे उत्तर दिलं. त्या मुलाने तिच्यावर  गोळी झाडली आणि लपलेल्या चिमुरड्यांचा भयाने थरकाप उडाला.  मुलं सैरभैर झाल्यासारखी धावली. आणि बंदूकधारी मुलाने अंदाधुंद गोळीबार केला. काही मुलांचा जीव वाचला काहींनी जीव गमावला.  दुसर्‍या वर्गात फक्त त्यादिवशी शिकवण्यासाठी आलेली शिक्षिका होती. दुर्देवाने तिच्याकडे दाराला कुलूप लावण्यासाठी किल्ली नव्हती. प्रशिक्षणातील सर्व बाबी योग्यं तर्‍हेने अमलात आणल्यामुळे इतर वर्गातील मुलं सुरक्षित राहिली आणि या दोन वर्गातील बहुतेक मुलांचा अंत झाला.

अशा घटना आता दैनदिन जीवनाच्या घटक होऊ लागल्या आहेत पण याची सुरुवात झाली ती २० एप्रिल  १९९९ साली  कोलोरॅडो राज्यातील लिटीलटन कोलंबाईन हायस्कूल मध्ये दोन तरुणांनी अंदाधुंद केलेल्या गोळीबारात १३ मुलं मारली गेली तर ३० हून अधिक जखमी झाली तिथून. या नंतर अनेक राज्यात शाळांना अशा प्रसंगांना सामोरं जायला लागलं आहे, लागत आहे. जिथे जिथे जिवितहानीचं प्रमाण जास्त आहे त्या घटनांची माहिती माध्यमातून लोकांपर्यंत पोचली, त्याची चर्चा होत राहिली. आत्तापर्यंत ७००० हून अधिक मुलं यात बळी पडली आहेत. यावर उपाय शोधण्याचे अथक प्रयत्न चालूच आहेत. बंदुकांवर नियंत्रण आणणं हा महत्वाचा उपाय NRA नॅशनल रायफल असोसिएशनच्या  वर्चस्वामुळे आणि त्यात गुंतलेल्या सर्वांच्या हितसंबंधामुळे  दरवेळी मोडीत निघतो. पोटचे जीव गमावल्यावर पालक पेटून उठतात, कायद्यात बदल करण्यासाठी धडपडतात. त्यांना सर्वसामान्य साथ द्यायचा प्रयत्न करतात. यात भर पडली आहे विद्यार्थ्यांची.  मुलंही आता जाब विचारायला लागली आहेत, विरोधाची पावलं उचलत आपला आवाज मोठ्यापर्यंत पोचवण्याचा  प्रयत्न करत आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे, March of Our Lives. गेल्यावर्षी विद्यार्थ्यांनीच सुरु केलेली ही संघटना त्यांच्या पिढीला ज्या असुरक्षिततेला तोंड द्यावं लागतंय ते बदलण्याचा निश्चय करुन प्रयत्न करत आहे. मागच्यावर्षी फ्लोरिडा राज्यातील डग्लस शाळेत घडलेल्या दुर्देवी घटनेतून या लढ्याची सुरुवात झाली आहे.   सरकारने या समस्येवर पावलं उचलावीत यासाठी विद्यार्थी जिवाचं रान करत आहेत.  शस्त्र नियंत्रण कायद्यात बदल आणि शस्त्र विक्री अगोदर त्या व्यक्तीची पूर्ण चौकशी. या दोन मुख्य मागण्या पुर्‍या होत नाहीत तोपर्यंत ही चळवळ चालूच ठेवण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार आहे March of Our Lives ची अलिकडची  चित्रफित हृदयद्रावक  आहे. या चित्रफितीत एका कार्यालयात गोळीबाराला तोंड कसं द्यायचं त्याचं प्रशिक्षण सुरु होताना दाखवलं आहे.  प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ म्हणून निमंत्रित केलेली व्यक्ती पाहून कर्मचार्‍यांना जसा धक्का बसतो तसाच चित्रफित पाहणार्‍यालाही. ती तज्ज्ञ व्यक्ती आहे, शाळकरी मुलगी!   ही छोटी मुलगी प्रौढांना गोळीबाराला तोंड द्यायला काय करायचं ते  सांगताना दाखविली आहे.  शेवट होतो त्या मुलीच्या शिक्षिकेने सांगितलेल्या खालील ओळींनी.

"Lockdown, lockdown let's all hide,

Lock the doors and stay inside,

Crouch on down, don't make a sound,

And don't cry or you'll be found."

जनरेशन लॉकडाऊन असं या चित्रफितीचं नाव आहे.


अमेरिकन शालेय जीवनात, अभ्यास आणि विविध विषयांचं ज्ञानार्जन  हा जसा अविभाज्य भाग आहे तसं हिंसेला तोंड देण्याचं प्रशिक्षण हा विषयही आता अनिवार्य झाला आहे. चुकीच्या हातांमध्ये बंदूक पडू नये याबाबात कायदा करण्याऐवजी राजकारणी मुलांना प्रशिक्षण मिळत आहे यातच समाधान मानत आहेत. बाह्य घटकांकडे बोट दाखवताना जी मुलं या मार्गावर पाऊल टाकतात त्यांचे पालक मुलांची मनं ओळखायला कमी पडत आहेत ते का,  त्या मुलांचे शिक्षक, मित्रमैत्रिणी यांनाही अशा मुलांच्या मनांचा थांगपत्ता लागत नाही तो का याकडेही लक्ष देणं भाग आहे. या समस्येवर  नक्की उपाय काय हे काळच ठरवेल पण तोपर्यंत किती बालमनं यात होरपळून निघणार, किती आपल्या जीवाला मुकणार हाही प्रश्न अनुत्तरीतच राहणार!

Thursday, March 21, 2019

दारू

मी दारू कधी प्यायला लागले? हा प्रश्न मी तुम्हाला का विचारतेय असा प्रश्न पडला ना? आणि उगाच प्रश्न विचारून प्यायची तर घरात पी आम्हाला कशाला सांगतेस असं म्हणत असाल तर म्हणा बापडे. दुसरं काय म्हणणार मी. पण झालं असं समाजमाध्यमातला एक मित्र याला जबाबदार आहे म्हणजे माझ्या दारू पिण्याला नव्हे त्या आठवणी जागवण्याला. त्याने खाल्ली मिसळच पण तो मिसळ खायला जिथे गेला ते निघालं आमच्या रत्नागिरीच्या दारू अड्ड्याचं वर्णन. त्या वर्णनामुळे मुळात मला तो अड्डा कसा ठाऊक असा प्रश्न खूपजणांना पडला. मग मलाही त्याचं उत्तर सार्वजनिक देण्याचा मोह पडला त्यामुळे इथे कुणी रत्नागिरीकर असतील वाचणारे  तर त्यांच्या नाहीतर तिथे जाऊ पाहणार्‍यांच्या ज्ञानात थोडी भर.  तिथेच बसून हे वाचत असाल तर मग प्रश्नच मिटला.

तर आमच्या पुण्याच्या काकांना कुणीतरी रोपं आणण्यासाठी ’हा’ पत्ता दिला होता. ’हा’ म्हणजे दारूच्या अड्ड्याचा. आम्ही बहिणी उत्साहात तो पत्ता दाखवायला निघालो.  गोखले नाक्यावरून डावीकडे वळलं की थोडं चालायचं मग उजवीकडे जे बोळकांडं लागेल तिथून रोपं दिसतीलच वगैरे वगैरे म्हणत काकांबरोबर निघालो.  एका बोळकांडीसमोरून जाताना रोपं दिसली. आम्ही तिकडे वळलो. तर ती शोभेकरता ठेवली होती.
"असंच जा पुढे" असं कुणीतरी सांगितलं.  आम्ही पुढे जात राहिलो. आत, आत. पुढे काही बाकडी दिसली. थोडीशी रोपंही दिसली. काका म्हणाले,
"तुम्ही बसा इथे." मी चौकशी करून येतो.

 मरायला टेकलेल्या ट्यूबलाईटच्या प्रकाशात आम्ही दोघी एका रिकाम्या बाकड्यावर जाऊन बसलो. आजूबाजूच्या बाकड्यांवर बसलेले आयुष्यात कधी मुली न पाहिल्यासारखे डोळे विस्फारून आमच्याकडे पाहायला लागले. ते पाहायला लागले म्हणून आम्हीही त्यांच्याकडे पाहायला लागलो.  ट्युबलाईट मरायला टेकली होती त्यामुळे  कुणी एकमेकाला नीट दिसत नव्हतंच.  बसलोय तर काहीतरी मागवणं भाग होतं.
"पाणी माग." मी बहिणीच्या कानात कुजबुजले. तेवढ्यात पोऱ्या आला. त्याने हातातल्या फडक्यानं बाकड्याची सफाई केली. ते फडकं खरं तर खूप कळकट होतं, पण त्यानं ते बाकड्यावरून अतिशय पटकन फिरवलं. त्यामुळं बाकडं खरंच स्वच्छ झालं की अजून घाण झालं हे कळू नये एवढी सफाई त्या सफाईत निश्चितच होती. एव्हाना बाकिचे लोक आमच्याकडे बघतायत हे आम्हाला कळू नये म्हणून आम्ही मान खालीच घालून ठेवली होती. मी त्या पोर्‍याने फडकं फिरवताच म्हटलं,
"दोन ग्लास."  त्याच्या हातातला फडका क्षणभर अंधातरीच राहिला. त्या फडक्याचं काय करावं हे त्याला कळेना तेवढ्यात काका आले ते अक्षरश: धावतच.
"उठा, उठा, चला पटकन." आम्ही गडबडीत उठलो. बहिणीला पाणी सोडवेना. ती म्हणाली.
"त्या पोर्‍याला पाणी आणायला सांगितलंय."
"राहू दे तुमचं पाणी. चला." काका धाप लागल्यासारखे धावत बाहेर गेले. त्यांच्यामागून आम्ही. मोकळ्या हवेत आल्यावर ते म्हणाले,
"तो दारूचा अड्डा होता." आम्ही दोघी काकांच्या घाबरलेल्या चेहर्‍याकडे पाहत होतो. काहीही न होता काका इतके घाबरले होते. त्या पोर्‍याने खरंच दोन ग्लास आणून दिले असते आणि आम्ही दोघी पाणी प्यायल्यासारखे ते प्यायलो असतो तर?

Tuesday, February 26, 2019

संवाद

२८ वर्ष महाराष्ट्रात राहिलेली, मराठी माध्यमात शिकलेली आई आणि जन्माने अमेरिकन, फक्त घरातच मराठीशी संबंध येणारी १४ वर्षांची तिची लेक यांच्यामधील ’प्रेमळ’ संवाद.

आई: तुमच्या जनरेशला हे कळणं कठीण आहे.
लेक: पिढीला.
आई: ओ.के. पिढीला.
लेक: ठीक आहे.
आई: तुझा प्रॉब्लेम काय आहे? काही बोलायला गेलं की मध्येमध्ये अडवतेस. लिंक लागत नाही.
लेक: मला कुठली अडचण नाही. (प्रश्न/समस्या असे वाक्यानुरुप योग्य बदल करत) नाही. तू मला मराठी शिकवलंस पण तुला इंग्रजी शब्द वापरलेस म्हणून अडवलं की चिडतेस आणि विसरतेस.
आई: कळलं. पण खरंच इरीटेट व्हायला होतं.
लेक: वैतागायला होतं. तुमच्या पिढीचंच कळत नाही आई मला. तुम्हीच कुठली भाषा नीट बोलत नाही. किती इंग्रजी शब्द.

संभाषणाचा अंत: लेक आईचं मराठी बघून हताश. तणतण करत स्वत:च्या खोलीत प्रस्थान. आई आपला वारसा पुढच्या पिढीकडे सोपवला जाणार आहे या जाणीवेने लेकीकडून मराठीची उजळणी करायला नाईलाजाने तयार.

लेकीची तमाम मराठी इंग्रजी बोलण्यार्‍यांसाठी सूचना: इंग्रजीला मराठी शब्द सुचत नसेल तर वाक्य बदलून दुसर्‍या शब्दाचा वापर करायचा. सोप्पं आहे. जमेल तुम्हालाही.

Saturday, December 29, 2018

पुस्तकं आमची...

यात माझं ’रिक्त’ पुस्तक आहे याचा आनंद वेगळाच.


Friday, December 7, 2018

जॉर्डन, इस्त्राइल आणि आम्ही

देश, शहरं पायी धुंडाळले की चांगले समजतात हा कधीतरी पाजलेला ’डोस’ मुलांनी आता आम्हाला पाजायला सुरुवात केली आहे. ती चालतात, नवरा त्यांच्यामागोमाग त्यांना गाठत राहतो आणि मी सर्वांना गाठण्यासाठी शर्यतीत भाग घेतल्यासारखी धावते. त्यामुळे दोन - एक - एक अशा क्रमात आमची चांडाळचौकडी इस्त्राइल, जॉर्डन, तुर्कस्थानात नुकतीच फिरुन आली. धावताना मला प्रत्येकवेळी फेसबुकवर जी मित्रमंडळी 5 k, 10 k असे चढत्या भाजाणीसारखे आकडे फोटोसह टाकत असतात त्यांची आठवण येत होती. कशाला त्या शरिराला इतकं दमवतात असं पुटपुटत पण त्यांच्याकडूनच स्फुर्ती घेत मी मुलांना गाठण्यासाठी पळापळ चालूच ठेवली. तीन देश असे फिरलो (धावलो) आम्ही ८ दिवसात. नशीब, शार्लटहून तिथे पोचायला विमान होतं!

मे महिन्यात लेकाने म्हटलं,

"इस्राइलला जायचं का?"

"कशाला? मरायला?" मी भेदरून विचारलं. पुढची १० मिनिटं  ऐकीव माहितीवर विधानं करायची नाहीत असं ऐकवण्यात आलं. मध्येच मी, मी तुझी आई आहे की तू माझा बाबा असं विचारून त्याला गोंधळवलं. पण गाडी पुन्हा मुद्द्यावर आणण्यात तो पटाईत.  बसल्याबसल्या इस्राइलबद्दल इतकं ऐकलं की त्याला म्हटलं,

"आता कशाला जायला हवं तिकडे?" त्याने फोनच बंद केला. पण हुकुमाप्रमाणे मी ’चालायला आणि सायकल हाणायला’ सुरुवात केली. मे महिना ते सप्टेंबर रोज. ऑक्टोबर महिना थंडी, थंडी करत वाचवला.  ८ दिवस होणारी तंगडतोड झेपायला हवी म्हणून प्रवासाच्या ६ महिने आधी दरवर्षी हे चक्र सुरू.  करता करता १४ नोव्हेंबर येऊन ठेपला.

दिवस पहिला: वॉशिंग्टन डी. सी. ते इस्तांबूल थेट विमान होतं.  पुढच्या २ तासाच्या विमानासाठी १० तास थांबणार होतो. त्यापेक्षा गाडीने पोचलो असतो या माझ्या वक्तव्यावर घरातल्यांनी फक्त नेत्रकटाक्ष टाकला. मुलगा म्हणाला,

"आई, आपल्याला दुसर्‍या गावाला नाही दुसर्‍या देशात पोचायचंय." तर काय झालं असं सवयीने येणारं वाक्य गिळलं आणि इस्तांबूल पालथं घातलं. फिरता फिरता प्रवासी कुठले ते ओळखून त्यांच्या भाषेत पुकारा करत खायला बोलावण्याची इथल्या माणसांची कुशलता अचंबित करत होती. नमस्ते, नमस्ते झालं तसं आम्हीही खूष होऊन आत शिरलोच. दर पाच मिनिटांनी आतून  मातीचं छोटं भांडं,  ठेवणी घेऊन कुणीतरी येत होतं.  ज्वाळेवर वर - खाली करत हातातल्या हुंडीचं  झाकण अलगद फोडून छोट्या मातीच्या भांड्यात शिजवलेली गरम गरम  भाजी ताटात ओतत होते.  आम्हीही तेच मागवलं. चविष्ट भाजी होती.

दिवस दुसरा: इस्तांबूलहून जॉर्डनला (अमान)  पहाटे पोचलो. डोळ्यावरची झोप उडवली उबर चालकाने. रस्त्यावर शुकशुकाट असला तरी गाडी जबाबदारीने चालवतोय म्हणेपर्यंत चालवता, चालवता त्याने आपला फोन काढला, फोन मांडीवर ठेवून, त्यात डोकं खुपसून गाडी चालवायला लागला. ’रस्ता समोर आहे, डोकं वर कर’ हे ’गूगल’ करून त्याला सांगेपर्यंत तो दिवा हिरवा असतानाच थांबला. दुसर्‍या दिवशी आम्हालाच गाडी चालवायची होती. या देशात हिरव्यावर थांबायचं की काय अशा प्रश्नचिन्हांकित चेहर्‍याने एकमेकांकडे पाहत राहिलो. चालकाचा चेहरा वर होईपर्यंत दिवा हिरव्याचा पिवळा, लाल आणि परत हिरवा झाला. अचानक  आमचा चालकही जागा झाला. सुटलाच मग तो. त्याने आम्हाला घरापाशी आणल्यावर आम्ही सुटलो. पैसे दिल्यावर सुटे पैसे काही त्याने परत केले नाहीत त्यामुळे एरवी सढळ हस्ते ’टिप’ देणार्‍या मुलाचं अमेरिकनत्व जागं झालं. आता मी नाही देणार त्याला आणखी पैसे असं छातीठोकपणे मराठीत त्याने जाहीर केलं. आपली भाषा दुसर्‍याला कळत नसली की पटकन परक्या देशात ’हुशार’ व्हायला होतं.

 संध्याकाळी गावात चक्कर टाकली. रस्त्यावर स्त्रिया फारश्या दिसल्या नाहीत. तिथल्या किल्ल्याकडे जाताना भाषेचा गोंधळ होताच. पण पोचलो. भारतीय म्हटल्यावर तिथे काम करणारे खूश झाले. हिंदी सिनेमाचे संदर्भ देत राहिले. कुणीही कुठून विचारलं की नवर्‍याचं सुरू, "मुळचे  भारतीय आता अमेरिकेत..." अमेरिकेच्या ’गन’ संस्कृतीवर ताशेरे ऐकल्यावर आम्ही त्याचं ’अमेरिका’ बंद करून टाकायचा प्रयत्न केला. पण तो दोन्ही देशाचा अभिमानी नागरिक त्यामुळे जिकडे तिकडे भारत - अमेरिका चालूच राहिलं. झालं असं, किल्ल्यावरून मशिदीत गेलो. मशिदीत प्रवेश करण्यासाठी दुकानातून जावं लागतं.  तिथे मशिदीत जाण्यासाठी स्त्रियांसाठी असलेला अबया घालायला लावतात, दूध नसलेला तरीही चविष्ट चहा अतिशय आग्रहाने पाजतात.  वस्तू बघता बघता एका तलवारी समोर आलो. विक्रेते दोन तरुण मुलं होती. कुठून आलात विचारल्यावर  भारत - अमेरिका झाल्याझाल्या तो मुलगा म्हणाला,

"तुमच्या देशात आमच्या तलवारींचा चांगला ’बिझनेस’ होईल. नाहीतरी सर्रास बंदुका वापरता तुम्ही." त्यानंतर असेच काहीतरी विनोद केले त्याने. कर्मभूमीची ही प्रतिमा पचवणं कठीण गेलं. शेवटी अमेरिकेची ही गंभीर समस्या आहे हे सांगितल्यावर त्या मुलांनी विनोद थांबवले. पण  त्या मुलांच्या मनातल्या अमेरिकेच्या प्रतिमेचं दर्शन दु:खदायक होतं.

दिवस तिसरा: भाड्याची गाडी करून पेट्राच्या दिशेने प्रवास. चार तासांचा प्रवास आहे. डेड सी बघायचा असल्यामुळे गावातून गेलो. नाहीतर तीन तासात पोचता येतं. गावातून म्हणजे अक्षरश: गल्लीबोळातून. अमान सोडल्यावर नंतर तर वाळवंटच. पहाटेची वेळ असल्यामुळे आमची एकमेव गाडी रस्त्यावर. डेड सी खरंच ’डेड’ होत चालला आहे. मिठाच्या लाद्या तयार झाल्या आहेत. त्यावरून आरामात चालता येत होतं. मिठागरच झालं आहे.  डेड सी ने निराशा केली. जितकं वाचलं, ऐकलं होतं तेवढं विशेष काही वाटलं नाही. पेट्राची रात्र मात्र रंजक ठरली. ज्याचं घर होतं त्याचा मेव्हणा गप्पा मारायला आला. तो बेडूविन जमातीचा. त्याने उत्साहाने त्याच्या लग्नाची ’स्टोरी’ सांगितली. १६ व्या वर्षी त्याने वडिलांना लग्न करायचं आहे हे आपल्या मनाचं गुपित सांगितलं. त्याला आवडणार्‍या मुलीच्या घरी या मंडळींनी जाऊन मागणी घातली. मुलीला द्यायची रक्कम मोठी होती. वर्षभर मुलगा पैसे जमवत राहिला. जेव्हा जेव्हा मुलीला भेटावंसं वाटायचं तेव्हा तेव्हा दोन्ही घरातली माणसं एका खोलीत जमत. दोघांनी सर्वांच्यासमोरच बोलायचं. वर्षाने लग्न झालं. ’स्टोरी’ संपवत म्हणाला,

"आता लवकरच दुसरं लग्न करणार आहे."

त्याच्या पहिल्या लग्नाच्या ’स्टोरी’ त आम्ही इतके गुंतलो होतो की दुसर्‍या लग्नाचा विचार मानवेना. बोलणंच खुंटलं. तसं उठता उठता सकाळी नाश्ता करून द्यायचं कबूल करत तो गेला. ठरल्याप्रमाणे सकाळी ७ वाजता येऊन त्याने चविष्ट नाश्ता केला. शाकशुक नावाचा पदार्थ, ऑलिव्ह्ज, हमस आणि नान. नान सगळीकडे गार द्यायचे. सांगितल्यावर गरम करून दिलं. भारतीयांना चहा आवडतो म्हणून त्याने आमच्यावर बिनदूधाच्या चहाचा माराच केला. पण मन लावून खाऊ पिऊ घातलं.  नाश्त्याने तृप्त होऊन पेट्रा पाहायला बाहेर पडलो. बाहेर पडताना खिडकीतून पाहिलं तर सगळीकडे बैठे एकावर एक ठेवल्यासारखे ठोकळ्यासारखे दिसणारे डोंगर. छायाचित्र काढली पण प्रत्यक्ष दिसतात तसे फोटोत नाही येत.

दिवस चौथा: पेट्रा सुंदरच आहे. निवांत फिरायचं असेल तर हातात दोन - तीन दिवस हवेत . दगड कोरून बांधलेलं हे पुरातत्त्व वास्तुकलेचं उत्कृष्ट दर्शन आहे.  आम्ही एकच भाग केला. जाऊन येऊन तीन तासांच्यावर पायपीट. एवढं केलं तरी पूर्ण पेट्राच्या बांधणीची कल्पना येते. घोड्यावरून गुहेच्या दारापर्यंत जाता येतं. पुढे बग्गीतून. साधारण तासाभराने ट्रेझरीची इमारत लागते. त्या पुढे गाढवांची सत्ता. असं का या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळालं.  आतमध्ये एक दोन ठिकाणी खायची प्यायची व्यवस्था आहे. त्या मालकाशी गप्पा मारल्या. त्यावरून समजलं की  आताचं पेट्रा हे बेडूविन जमातीचं निवासस्थान. इथल्या गुहांमध्येच ते राहत. पेट्रा पर्यटनस्थळ करायचं ठरल्यानंतर या जमातीला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून इथेच काम किंवा व्यवसाय करण्याची मुभा दिली गेली. राहण्यासाठी स्वतंत्र वस्ती उभारली गेली. यामुळेच जॉर्डन सरकारच्या हद्दीत घोडा आणि बग्गी तर पुढे गाढव असा नियम आहे. हे सांगतानाच त्याच्या गुहेत सलमानखानच्या चित्रपटाचं चित्रीकरण झालं, तो इथे राहायला होता वगैरे माहिती  त्याने दिली. आम्ही काही धन्य धन्य होऊन फोटो काढले नाहीत त्या जागेचे. कदाचित नाट्यकलावंत किंवा लेखकाचे पाय त्या जागेला लागले आहेत हे कळलं असतं तर काढले असते :-). गाढवावर बसा म्हणून कुणी मागे लागलं नाही पण घोडेवाल्यांनी मात्र पिच्छा पुरवला. आणि गिर्‍हाईक पकडण्यासाठी आपापसात हुज्जतही घातली.

दिवस पाचवा: पेट्रापासून  दोन तासाच्या अंतरावर वादीरम.  वाळवंटातल्या मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवताना आपण चित्रपटात एकच गाडी वाळवंटातून बराचवेळ मार्गक्रमणा करताना बघतो तसंच वाटत होतं. गाडीसमोर एक उंटही डुलत डुलत आला. आमचं आश्चर्य ओसरुन फोटो काढायचं सुचेपर्यंत त्याने रस्ता ओलांडलाही. वादीरमचं सौंदर्य अविस्मरणीय आहे. नजर टाकू तिकडे लालसर रंगाची वाळू, वाळूचे डोंगर आणि प्रचंड मोठाल्या शिळा. सुरुवातीला उंटावरून सैर केली. आधी उंचाला उंट धप्पकन खाली बसला तरी तो उंचच होता. कसंबसं त्याच्या पाठीवर स्थानापन्न झाल्यावर असा काही उठला की तोल सावरता सावरता मुष्किल. मुलाचा उंट तर इतका खादाड की जरा काही त्याला  हिरवं दिसलं की थांबलाच. मुलगा आपल्यासारखाच आणखी एक प्राणीही आहे म्हणून खूष झाला. माझा आणि मुलीचा उंट एकामागोमाग होते. माझा उंट सारखा मुलीशी ’लगट’ करे. त्याची लगट आणि तो बाजूला व्हावा म्हणून माझा आरडाओरडा एकाचवेळी चालू होता. मुलगी उतरुन चालायला लागेल की काय असं वाटायला लागलं. त्यात कुठल्या भाषेत आरडाओरडा केला की उंटाला आणि त्याच्या माणसाला कळेल हा प्रश्न होताच. घाबरुन उंट पळत सुटला तर काय घ्या. शेवटी सहस्त्र खाणाखुणा आणि वेगवेगळ्या उच्चारात तेचतेच उंटवाल्याला न कळणारं बोलत राहिले. अखेर त्याचा बंदोबस्त झाला. त्याची दोरी अधिक गुंडाळली  आणि उंटाचं  तोंड मुलीच्या आसपास पोचेनासं झालं. उंटावरुन उतरल्यावर  जीपमध्ये. बर्‍याच ठिकाणी भल्या मोठ्या शिळा चढायच्या होत्या, अरुंद खडकांवर पाय टाकत डोंगरांचं टोक गाठायचं होतं. निमुळत्या फटींमधून देह आत सरकवायचे होते. बर्‍याच कसरती पार पाडल्या. रात्री मुक्कामासाठी तंबूत, तिथेच कापडी भोजनालयात वाळूत भट्टी पेटवून केलेल्या जेवणावर सर्वांनीच ताव मारला. जेवण, गप्पा आणि हुक्का. रात्री इतर काहीच उद्योग नसल्याने भोजनालयाचं विश्रांतीगृह झालं.  नॉर्वे, जपानहून आलेल्या लोकांशी गप्पा झाल्या. पण बरेचसे हुक्कातच गर्क होते. आम्ही आपले चहा रिचवत होतो.

दिवस सहावा: वादीरमहून इस्राइल. पुन्हा वाळवंटच. वाहतूक जवळवळ नाहीच. मी गाडी चालवायला लागल्यावर वाटेत लागणार्‍या लहान गावातल्या नजरा आश्चर्याच्या होत्या.  आकाबाला  गाडी परत केली. आकाबा मोठं शहर आहे. गाडी परत करून पायी समुद्रावर चक्कर मारून आलो. तिथून इजिप्त, सौदी आणि इस्राइल  असे समुद्रापलीकडे असलेले तीन देश दिसतात. ज्यांच्याकडून गाडी भाड्याने घेतली होती त्यांनी जॉर्डनच्या हद्दीशी सोडलं. जॉर्डनमधून इस्राइलमध्ये प्रवेश. इस्राइलमध्ये गेलात तर अरब राष्ट्रात प्रवेश नाही या अरब राष्ट्रांच्या खाक्याला प्रत्युत्तर म्हणून इस्राइल पासपोर्टवर  शिक्का न मारता एक कागद हातात ठेवतात.

दिवस सातवा: इस्राइलमध्ये तेलवीवला आलो. बाहेर पडल्यावर तिथली हसतमुख कर्मचारी मदतीला तत्पर होती. उबर न करता त्यांचं तिथलं अॲप डाऊनलोड करायला लावून तिने टॅक्सी बोलवायला लावली. टॅक्सीलासुद्धा तिने ती उभी होती तिथपर्यत यायला लावलं. ती आम्हाला तिथून हलूच देत नव्हती. सुरुवातीला मदतीचा प्रयत्न वाटला पण नंतर तेच वागणं खटकलं. शेवटपर्यंत कारण कळलं नाही पण सुरक्षितता हे कारण असावं.  तेलवीववरुन जेरुसलम. धार्मिक स्थळ.  भक्तांची गर्दी अतोनात तेवढीच बंदूकधारी सैनिकांचीही. रस्त्यावर, लोकल, मॉल सर्वत्र. २० - २५ वर्षाची सैन्यातील मुलं - मुली बंदूक (स्टेनगन्स) घेऊन वावरताना पाहिलं तेव्हा सुरुवातीला विचित्र दडपण आलं मनावर. उगाचच कुणी हल्ला तर करणार नाही ना अचानक या दृष्टिकोनातून माझीच टेहळणी सुरू झाली. पण काहीवेळातच बंदूकामध्ये वावरायची  ’सवय’ झाली.

’वेस्टर्न किंवा वेलिंग वॉल’ हे ज्यू लोकांचं प्रार्थनास्थळ आहे. स्त्रिया आणि पुरुषांसाठी दोन वेगवेगळे भाग आहेत. अंगभर कपडे असणं आवश्यक आहे. भिंतीवर डोकं टेकून लोक इथे रडतात ते रोमनांनी ’टेंपल’ उद्धस्त केल्याचा निषेध म्हणून. तसंच आपल्या इच्छा लिहिलेल्या चिठ्ठ्या भितींतल्या फटीत लोक ठेवतात. याच आवारात असलेलं ज्यू आणि मुस्लिम लोकांचं ’टेंपल माऊंट/डोम ऑफ रॉक’ बाहेरुनच बघता येतं मुस्लिमाखेरीज इतर धर्मीयांना आत प्रवेश नाही.  आम्ही सहज एका स्थानिक जोडप्याला आत जाण्यासाठी काय करावं लागेल विचारलं. दोघांमधला पुरुष आत जाता येणार नाही यावर ठाम होता तर स्त्री अशा निर्बंधांना काय अर्थ म्हणून त्याच्याशी वाद घालत होती. अर्थात नियमापुढे ती काय करणार? पण दोघांच्या मनोवृत्तीतला फरक पाहताना गंमत वाटली. हा सगळा भाग फिरून झाला की बाजारातच बाहेर पडायला होतं. तिथेही जागोजागी बंदूकधारी सैनिक.  जेरुसलमहून पॅलिस्टाईनची हद्द अवघी अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.  पॅलिस्टिनियन सतत हद्दीवरून दगडफेक करत असतात असं ऐकलं. आम्ही सगळा धोका पत्करून जायचं ठरवलं. पॅलिस्टाईनियनना जेरुसलममध्ये सहजासहजी येता येत नाही. फक्त शुक्रवारी त्यांना जेरुसलममध्ये येता येतं. पण जेरुसलमहून तिकडे जाणार्‍या गाड्या सारख्या सुटत असतात. गाडी खचाखच भरलेली होती. रस्त्यावरही तोबा गर्दी वाहनांची. पुण्याची आठवण झाली. आम्हाला जेमतेम निम्मं अंतर जायलाच २ तास लागले. अजून दोन तास पोचायला लागतील असं बसमध्ये कुणीतरी सांगितलं. परत येताना ’तपासणी’ चक्र असणारच होतं. सगळा विचार करून आम्ही अर्ध्यावर उतरून हळहळत परत फिरलो.

दिवस आठवा: परतीचा. तेलवीव ते इस्तांबूल, इस्तांबूल ते वॉशिंग्टन डी. सी. डी. सी. ते शार्लट.

गाडी चालवताना आठ दिवस पुन्हा पुन्हा शब्दांतून रंगत होते. ठिकाणं, माणसं, खाणं... वेगवेगळे अनुभव पोतडीत जमा झाले. आमच्यासारख्या खादाडखाऊ लोकांची या देशात मजा आहे.  चिकन श्वॉरमा, बाकलावा, मलाबी, शाकशुक एक ना अनेक.  परत येताना पुढच्यावेळेला कोणत्या देशात जायचं  आणि काय खायचं याबद्दल चर्चा रंगली आणि  या प्रवासाची सांगता झाली.

























Tuesday, November 13, 2018

दुकान, गिरण आणि...

अनुराधा २०१८ दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध
काटकुळ्या शरीरयष्टीचा त्रिंबककर पिशवी हलवत बाजारातून साहेबांच्या घराकडे निघाला. रस्त्याच्या कडेने सवयीने अंग चोरत तो पावलं टाकत होता. चालता चालता ’थूऽऽऽ...’ विचित्र आवाज करत पान कोंबलेल्या तोंडानेच तो रस्त्याच्या बाजूला थुकला. त्याचे एक दोन थेंब फाटक्या विजारीवर उडाले. त्याला दु:ख झालं. घरी गेल्यावर कैदाशीण जिवंत ठेवणार नाही याची त्याला खात्री होती. थुकी लावून ते छोटे ठिपके त्याने घालवायचा प्रयत्न केला पण विजार आणखीनंच रंगली. काय करावं ते त्याला कळेना तितक्यात कुणीतरी त्याच्या पाठीवर जोरात थाप मारली. त्याचं बारकुळं शरीर हादरा बसल्यासारखं डळमळलं. कसाबसा त्याने तोल सांभाळला. पुढे आलेले दात दाखवत वर्दमशी तो दोन शब्द बोलला आणि मार्गाला लागला. साहेबांची बायको त्याच्या बायकोच्या वरताण होती. उशीर झाला भाज्या आणायला तर उशीराबरोबर तिने त्याचं अजागळासारखं राहणं, सतत पान खाणं, त्याच्यावर होणारा खर्च, आजार सगळी जंत्री लावली असती. आणि साहेबांची हरामखोर कार्टी आणि तिच्याबरोबरची  क्वार्टर्समधली माजोरडी पोरं; त्याला ठाऊक होतं त्याची पाठ फिरली की सगळीच त्याच्या दुडक्या चालीची खिल्ली उडवतात. त्याची मुलं असती तर तुडवून काढलं असतं त्याने. तो भराभर पाय उचलायला लागला.  साहेबांच्या घरी भाजीची पिशवी आपटली की घरी जाता येणार होतं. वाटेत एक दारुची बाटली ढोसली की झालं. भाजीच्या पैशातले तसे त्याने बरेच पैसे ढापले होते. त्या पैशातून पहिल्या धारेची घेता आली असती.  मळकट लेंग्याच्या खिशात हात घालून त्याने नोटा चाचपडल्या आणि बंगल्याच्या दिशेने तो चालत राहिला. बंगल्यावर पोचल्यावर साहेबांच्या बायकोने तोंड सोडलंच,
"त्रिंबककर, किती वेळा सांगितलं भाजी निवडून घ्यायची. कुसलेली आहे सगळी." त्रिंबककर रंगलेले दात दाखवून ओशाळवाणं हसत राहिला. खरं तर त्याला म्हणावंसं वाटत होतं, ’अगं बये, तू कर  बाजार इतकी मस्ती असेल अंगात तर. तुजा घोव सरकारचा नोकर, मी त्येचा. पन घरगड्यागत राबवते तू मला महामाये.’ पण नेहमीप्रमाणे त्रिंबककरने ते शब्द मनातल्या मनात गिळून टाकले. त्याचं सगळं लक्ष खिशातल्या नोटांकडे लागलं होतं. एकदा दारुची बाटली तोंडाला लागली की त्याचा जीव शांत होणार होता.

साहेबांच्या घरातून बाहेर पडायला सात वाजले. दिव्यांच्या अंधुक प्रकाशात रस्ता पिवळसर दिसत होता. नगरपरिषदेचा भोंगा वाजायला लागला तसा त्रिंबककर वैतागला. काय सारखा ठणाणा बोंबलतो हा भोंगा. तो मनातल्या मनात कुरकुरला. त्याने पुन्हा एकदा पैसे चाचपले.  साटम दिसल्या दिसल्या धूळ झटकत लेंग्याला हात पुसून तो पारावर साटम शेजारी बसला.
"बाटली आन्लीस का?" बसल्याबसल्या त्याने कुजबूजल्यासारखं विचारलं.
"आनली. तीस दे."
"इतकं न्हाईत." त्रिंबककरने दहाच्या दोन नोटा त्याच्या हातात कोंबल्या. साटमने त्रिंबककरला देण्याआधी बाटली तोंडाला लावली. पाव बाटली संपवल्यावर त्याने ती त्रिंबककरच्या हातात ठेवली. त्रिंबककर खिक्ककन हसला.
"दहा रुपयाची नरड्याखाली घातलीस नव्हं. तिच्यामारी." पण दारु प्यायला कुणीतरी बरोबर आहे यामुळे तो खूश होता. दोघं सुखदुखा:च्या गोष्टीत रंगून गेले. सायबाच्या घरात त्याच्या बायकोने सर्वांना कसं ताब्यात ठेवलंय हे सांगताना त्रिंबककरला हसू आवरत नव्हतं. साटमने सुद्धा बिगारीची कामं करणारी भिकू सातपुतीण कंत्राटादाराला ’लागू’ आहे याचे असंख्य पुरावे दिले. बायकांना वेळीच आवरलं नाही तर त्या मोकाट सुटतात यावर दोघांचं एकमत झालं. दोघंही आपल्या बायकांना आपण कसं त्याब्यात ठेवलं आहे याबद्दल बढाया मारत राहिले ते साटमची बायको तिथे येईपर्यत.
"मुडदा बसवला मेल्या तुजा. गिलायचं हाय का न्हाय? कोन आननार रं बाजार आजचा?..." पारावर बसलेल्या टोळक्याच्या नजरा त्या तिघांच्या दिशेने वळल्या. बायकोची टकळी थांबणार नाही हे ठाऊक असूनही साटम तसाच बसून राहिला. साटमच्या बायकोचं डोकं फिरलंच. तिने त्याच्या हातातली बाटली हिसकावली आणि तिथेच पारावर आपटली. साटम लगबगीने उठला. बाटलीतली दारु आधीच संपविल्याचा त्याला आनंद झाला. त्याच्या चेहर्‍यावरची सार्थकता त्रिंबककरने ओळखली. त्याने तोल सांभाळत उठलेल्या साटमकडे मिश्किल नजरेने पाहिलं. त्यांची नजरानजर साटमच्या बायकोने पकडलीच. तिने त्रिंबककरकडे जळजळीत कटाक्ष टाकला. त्रिंबककरने मान खाली घातली.
"चला..." ती साटमवर खेकसली. ती पुढे, आणि तिच्या मागे भेलकांडत जाणार्‍या साटमकडे पाहत पारावरच्या टोळक्याची  थोडावेळ करमणूक झाली. त्रिंबककरही पाय हलवत तिथेच बसून राहिला ते त्याचा मुलगा येईपर्यंत.
"बाबा, आई वाट बघतेय केव्हाची." स्वत:ला सावरत त्रिंबककर कसाबसा उठला. राजेश आला की त्रिंबककरला धास्तावल्यागत होई. मुलाची सरबत्ती सुरु होण्याआधीच ताठ उभं राहण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला,
"शान्यसारकं वागायचं. व्हय ना? आता वागनार हाय मी शान्यासारका."  तोल सावरत, दात दाखवत, लटपटत तो राजेशबरोबर चालायला लागला. "दारु पियाची नाय, व्यसन हाय ते. मानूस मरतं. आनि परमानिक आसलं की टाईम लागला तरी सगलं चांगलं व्हनारच. व्हय ना? माजी गिरन व्हनार, दुकान बी व्हनारच." त्रिंबककरचं बरळणं चालूच होतं. "बाला, ए बाला,  तुला तुजा मास्तर ना कायबी सिकवतो. फकस्त वंगालच व्हतं परमानिक मानसांचं."  चालता चालता राजेशच्या हातातला हात सोडवायचा त्रिंबककर प्रयत्न करत राहिला. पण राजेशची पकड घट्ट होती. चाळीपाशी आल्यावर राजेशनेच त्रिंबककरचा हात सोडला. रॉड्रीक्सच्या चाळीत कालवणाचा घमघमीत वास पसरला होता. त्याची भूक चाळवली. आत जाऊन त्याने फतकल मारली. बायकोने त्याच्यापुढे ताट आपटलंय हेही त्याच्या लक्षात आलं नाही.  तो बकाबका खात सुटला. आता यापुढे एकही घास खाता जाणार नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याचं लक्ष सुका भात चिवडणार्‍या दोन्ही मुलांकडे आणि बायकोकडे गेलं. तो ओशाळला.
"तुमचं जालं नवतं व्हय." तो दात दाखवत हसत म्हणाला. त्रिंबककर कसाही हसला तरी ते केविलवाणंच वाटायचं.  धर्मेन्द्र त्या हसण्याने वैतागला.
"कदीच कसी आमची प्वाटं दिसत न्हाइत रं तुला?" केसाची झुलपं वाढवलेल्या धर्मेन्द्रकडे त्रिंबककर पाहत राहिला. ’आक्सी धरमिदंरवानी दिसतु लेकाचा.’ त्याला कौतुक वाटलं.  त्याच्या तरुणपणी टुरींग टॉकीजमध्ये जाऊन राजेश खन्ना आणि धर्मेन्द्रचे पिक्चर पाहायचा तो. एकदोन वेळा त्याने आपल्याला त्यांच्यासारखंच बनायचंय असं त्याच्या मित्रांना बोलूनही दाखवलं होतं. त्यावरुन कितीतरी दिवस त्याला सगळे चिडवायचेही. पण धर्मेन्द्र व्हायला नक्की काय करायचं ते ठाऊक नव्हतं त्यामुळे त्याने तो नाद सोडून दिला होता. मुलं  झाल्यावर मात्र त्याने राजेश आणि धर्मेन्द्र नावं ठेवली मुलांची.
"तू  धरमिंदरवानी दिसाया लागला रं." कौतुकाने तो म्हणाला.
"उगाच चढवू नका बाबा त्याला." राजेश वैतागला.
"तू गप रे. सालत जातो तर लइच सिकवायला जातो सारका." धर्मेन्द्र खेकसला. राजेशने दुर्लक्ष केलं.  त्रिंबककरच्या मनात काहीतरी घोळत असावं. तो धर्मेन्द्रला म्हणाला,
"तुजी साला न्हाय ना. मग उद्या सायबाकडं कामाला ये माज्याबरुबर. जादाचं काम हाये उद्याच्याला." धर्मेन्द्रने नकारार्थी मान हलवली.
"तू सालंत जातोस म्हनून इचारत नाइ मी. पण तू जमवसील का?" राजेशला नाही म्हणावंसं वाटत होतं. उत्तर न देताच तो पानावरुन उठला. त्रिबंककर त्याच्याकडे पाहत पुटपुटला.
"इचित्रच हाय हा पोरगा. सायबाकडं चल म्हटलं की टकुरं पिरल्यागत करतो." पिरताला राजेशच्या मागून उठून जावंसं वाटत होतं पण ताटातला उरला सुरला भातंही त्रिंबककरच्याच पोटात जाईल या काळजीने ती उठली नाही.

स्वयंपाकघरातल्या ट्रंकेवर बसून राजेश विचारात गढला. साहेबांच्या घरी कामाला जाणं म्हणजे संकट वाटायचं त्याला. बागेची, माळ्याची स्वच्छता, फांद्या कापायच्या असं काही ना काही काम असायचं. त्रिंबककरला मदत करायची त्याची तयारी होती पण साहेबांची मुलगी त्याच्याच वर्गात होती आणि साहेबांच्या बायकोचं अतिकौतुक त्याला अजीर्ण व्हायचं. राजेश परिस्थिती समजून घेऊन कामं करतो आणि आपल्या लेकीला कशाची किंमत नाही हे उगाळत राहणार हे ठरलेलं. दोघं कानकोंडे होऊन जात. पण बाबांना नाही म्हणणंही नको वाटत होतं. चार पैसे हातावर टेकवत होती साहेबांची बायको, झालंच तर आईसाठी एखादी जुनी साडी मिळेल हे  ठाऊक होतं राजेशला. हे सारं, तिचं उतू जाणारं कौतुक टाळायचं म्हणून नाकारायचं का आतापर्यंत दाखवला तसा कोडगेपणा दाखवायचा? काही झालं तरी त्याला आता लवकर  मोठं व्हायचं होतं. परिस्थितीपासून सुटका करुन घ्यायची होती. स्वत:ची, जमलं तर घरातल्या सगळ्यांची. नाहीतर फक्त त्याची आणि आईची तरी. दारुड्या बापाबद्दल त्याला आस्था नव्हती आणि मटक्याचा नाद लागलेल्या धर्मेन्द्रपुढे त्याने हात टेकले होते.  तो विचार करत बसून राहिला. तेवढ्यात धर्मेन्द्र समोर येऊन उभा राहिला.
"तू बस  बेवड्याबरोबर  फालतू कामं करत. दुकान आनि गिरन टाकायची हाय त्येला. पैका लागतो त्ये ठाव हाय ना? मी मटक्यात पैका मिळाला की चाललो मुंबयला. खरा धरमिंदर व्हतो की नाय बग."
"जा." रुक्ष स्वरात राजेश म्हणाला.
"राजेस, या सिक्सनाने तुजं काय बी भलं व्हनार न्हाय. दहावी पास ला कोन नाय इचारत."
"मी पुढे शिकणार आहे."
"पैका लागतो. हाय का तो आपल्याकडे. बगू. हात पुडं कर."
"नाही." धर्मेन्द्रने त्याचा हात ओढलाच. काही कळत नसतानाही राजेशच्या हातावरच्या रेषा निरखीत तो म्हणाला,
"वंगाल हाय तुजं नसीब. दरिद्री बापाच्या पोटी जलमलास आनि  इमलं बांदतोय सायेब व्हन्याचे."
"धर्म्या, तू जरा नीट बोल रे. पाचवीपर्यंत शिकलायस ना? काय ही भाषा."
"गप ए. उचकवू नको हा मला. मी कसाबी बोलन. तू न्हाय मला सिकवायचं.  समजलं ना." धर्मेन्द्रच्या मग्रुरीने राजेश वैतागला.
"पुरे मग. बोलूच नकोस काही. बाबांच्या पण डोक्यात असंच खूळ होतं नट व्हायचं. जे त्यांनी केलं तेच तू करु नकोस धर्म्या. डोळे उघड. कामाला लाग." धर्मेन्द्र खी खी करुन हसला. बाजूलाच भिंतीला टेकून त्यांचं संभाषण ऐकणार्‍या पिरताचं मस्तक फिरलं.
"टकूर्‍यात हानीन हा धर्म्या. राजेस सांगतोय ते घे मनावर. रस्त्यावर चल खडी टाकायला. मुकादमाशी बोलते मी. नट व्हायाचं म्हनं. तो येडा बग.  नट व्हनार व्हता. दारुड्या जाला आनि सगल्या आयुक्शाचा पिक्चर केला मुडद्यानं. आता गिरन खोलनार आनि दुकान चालवनार म्हनत गावभर फिरत असत्यो." पिरताची बडबड चालूच राहिली.  त्रिंबककर खोलीत डोकावला तसं दारुच्या भपकर्‍याने त्या एवढ्याशा खोलीला विळखा घातला. धर्मेन्द्रने नाकावर हात धरला. त्रिंबककरने त्याच्या नाकावरचा हात बाजूला ओढला.
"बापाला हिनवतोस? साल्या, एक दिवस तुजा बाप पैक्याची पोती आनल. माज नाय करायचा. समजलं काय? मा - ज करायचा नाय. दुकान जालं की सेट व्हसील तू. गिरनपन आसल." त्रिंबककरच्या तोंडातून शब्द धड बाहेर पडेनासे झाले तसं नाईलाज झाल्यागत तो आडवा झाला.  तिघंही त्या खोलीतून बाहेर पडले. बाहेरच्या खोलीत संतरजी घालून अंग टाकलेल्या तिघांना त्रिंबककरच्या घोरण्याच्या आवाजात कधीतरी झोप लागून गेली.

जड झालेलं डोकं कराकरा खाजवीत त्रिंबककर उठला. राखुंडीने दात चोळता चोळता त्याचं  विचारचक्र चालू झालं. वैतागला होता तो या आयुष्याला. कसलं सालं आयुष्य हे? नट होता आलं नाही. आता हे कुत्र्यासारखं जीणं. कशाला? कुठूनतरी पंचवीस हजाराची व्यवस्था व्हायला हवी. किराणामालाचं दुकान टाकायचं.  शेठसारखं बसायचं. मुलं आणि बायको पण दुकानातच काम करतील. बाजूला गिरण. बास. आता हेच करायचं. पैशाची व्यवस्था करायची आणि मग राजावाणी जगायचं. खळखळून चूळ भरताना मनातल्या या विचारांनी त्याला ताजतवानं केलं.
"चला." राजेश तयार होऊन उभा होता.
"कुटं?" त्रिंबककरने आश्चर्याने विचारलं.
"साहेबांकडे. काल म्हणाला होता ना तुम्ही." त्रिंबककर एकदम भानावर आला.
"हा. हा ते होय. सालंत न्हाय जायाचं का तुला?"
"काम झालं की तिकडूनच जाईन." काही न बोलता दोघं निघाले. वाटेत त्रिंबकरला राहवलं नाही. त्याने दुकान, गिरण सगळे बेत राजेशला पुन्हा सांगितले.
"आपन लइ गरीब मानसं पन सपान बगायला  पैका नाय पडत." केविलवाणं हसून त्याने पुस्ती जोडली. राजेशला गहिवरुन आलं.
"कधीतरी आपलं स्वप्न पूर्ण होईल. स्वप्नं पाहणं जसं आपल्या हातात असतं तसंच पूरं करणंही. नेकीने काम करत राहिलं की पाहिजे ते मिळतं बाबा. दारुचा नाद सोडा तुम्ही तरच या स्वप्नांना अर्थ आहे..." त्रिंबककरला राजेश काय बोलतोय ते पचवणं जड गेलं. पण नेहमीसारखंच काहीतरी भारी बोलला असणार पोरगा याची त्याला खात्री होती. त्याच्या दुडक्या चालीत उत्साह संचारला. दोघंही आपापल्या बेतांची मनात उजळणी करत साहेबांच्या घरी कामं करत राहिले. राजेशला साहेबांच्या मुलीची चाहूल लागली की थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं पण ती तिच्याच नादात होती. शाळेतही कधी तिने कुणाला सांगितलं नव्हतं तो त्यांच्या घरी कामाला येतो ते. आता फक्त तिच्या आईचं व्याख्यान नको अशी मनोमन प्रार्थना केली त्याने. पण वेळ आल्यावर निर्विकार मनाने सगळी बडबड त्याने कानाआड केली. शाळेत न जाता आईसाठी दिलेली साडी आणि पैसे घेऊन घराच्या दिशेने तो धावत सुटला. त्रिंबककर आनंदाने खुललेला राजेशचा चेहरा मनात साठवत कामाला लागला. दिवसभर कामाच्या नादातही किराणा मालाचं दुकान टाकायला पैसे कुठून आणायचे याचाच विचार चालू होता त्याच्या मनात.

संध्याकाळी पारावर बसलेल्या साटमलाही त्याने अनेकदा सांगितलेला बेत पुन्हा सांगितला. बराचवेळ मनातलं स्वप्न शब्दांनी तो स्वत:च्या, साटमच्या डोळ्यासमोर उभं करत राहिला.  साटमला आधीच चढली होती. आणखी रिचवत तो मान डोलवत राहिला. लांबून त्याला त्याची बायको दिसली तसा त्याने तिथून पळ काढला. त्रिंबककर बसून राहिला. काळोखात पार बुडून गेला तरी त्याला तिथून उठण्याची इच्छा होईना. पारावर कुणीच उरलं नव्हतं. तो रस्त्याकडे नजर लावून बसला. तुरळक गाड्यांची ये - जा आणि अधून मधून जाणवणारा पायरव. बाकी सारं शांत होतं.  पेंगुळलेला त्रिंबककर मध्येच रस्त्यावरुन जाणार्‍या गाडीच्या आवाजाने दचकत होता. शेवटी त्याने आपलं अंग पारावर टाकलं. पारंब्यांच्या काळोखात दिसणार्‍या विचित्र आकारांकडे तो कपाळावर हात टेकून पाहत राहिला. आपसूकच त्याचे डोळे मिटले. घाबरुन तो जागा झाला ते किंचाळीच्या आवाजाने. काहीतरी भयानक स्वप्न पडलं असं वाटलं त्याला. कसाबसा तो बसता झाला आणि रस्त्यापलिकडचं दॄश्य पाहून त्याचा बारकुंडा देह थरथरायला लागला. अंधारात चकाकणारा सुरा बघून त्याची घाबरगुंडी उडाली. ओरडावंसं वाटत होतं पण तोंडातून अवाज निघेना. सावंत असावा तो. झिंगलेल्या अवस्थेत आणि काळोखातही त्याने ओळखलं. त्रिंबककर मागच्यामागे  पळत सुटला. सावंतने कुणाला मारलं? सावंतचे उद्योग गावाला नवीन नव्हते. येताजाता शिवीगाळ, धमक्या, मारहाण असं कानावर यायचं त्याच्याबद्दल. तोच असणार.  पण किंचाळलं कोण ते त्रिंबककरला कळलं नव्हतं.  त्याला त्याची पर्वाही नव्हती. कसंही करुन त्याला स्वत:ला वाचवायचं होतं. सावंतने गाठलं तर? तो जीव खाऊन पळायला लागला. अचानक त्याचा तोल गेला. कुणीतरी ढकललं होतं त्याला . सावंत? पण मागे वळून बघण्याआधीच त्याची  दारुने पोखरलेली कुडी जमिनीवर आपटली. चेहरा दगडावरच आपटला नेमका. कपाळातून रक्ताचे ओघळ वाहायला लागले.  ओघळणार्‍या रक्ताचा स्पर्श जाणवायला लागला तसा त्रिबंककर घाबरला. आपण मेलो याची त्याला खात्रीच पटली. कुणाचातरी आवाज कानापाशी जाणवत होता. उत्तर देण्यासाठी तो  तोंड उघडू पाहत होता पण त्याच्या हालचाली मंदावल्या. हळूहळू सारं शांत झालं.

त्रिंबककरने डोळे उघडले तेव्हा घरात विचित्र शांतता होती.  आपण जिवंत आहोत हे त्याला जाणवलं तसा तो एकदम उठायला गेला. पिरताने त्याच्या खांद्यावर तिचा दणकट हात ठेवला. त्रिंबककरने तिच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं. बाजूला राजेश आणि धर्मेन्द्र. त्याला कळेना सगळी त्याच्याभोवती का जमा झाली आहेत. अंग ठेचकाळल्यासारखं दुखत होतं पण निकराने तो उठून बसला. तेवढ्यात राजेश आणि धर्मेन्द्र त्याच्यासमोर येऊन बसले.
"काल रातच्याला तू त्या सावंताला पायलंस का?" त्रिंबककरला काही आठवत नव्हतं. कपाळाला बांधलेल्या पांढर्‍या फडक्यावरुन त्याने हात फिरवला.
"लई दुखतंया. काय जालंय?"
"बेशुद्ध होऊन पडला व्हतास ."
"रात्र झाली तरी आला नाहीस म्हणून शोधत होतो. तेव्हा सापडलात. त्या खवळेच्या घराच्या बाजूला पडला होता. तसंच दवाखान्यात नेलं." राजेशने व्यवस्थित काय झालं ते सांगितलं.
"बाबा, तू त्या सावंताला पायलं का? पटकन सांग." धर्मेन्द्र घायकुतीला आला.
"बाबा, पटकन सांगा." राजेशचा आवाज ऐकून मात्र त्रिंबककर सुतासारखा सरळ झाला.
"हा, म्हनजी त्यो सावंतच व्हता असं वाटतंया."
"पन जालं काय? पलत व्हतास म्हनं." धर्मेन्द्र फिस्सकन हसला तसा त्रिंबककरला राग आला.
"मग काय मराया पायजे व्हतं की काय? त्यो मानूस हाय का मेला? सावंताचं काम ना हे? साला, त्येचं रगत तसलंच हाये. सगल्यांच्या जमिनी गिलनार. लई तरास हाय या मानसाचा. आता खूनखराबा बी सुरु केल्यान की काय?"
"खूनखराबा सोड. त्यो तुजं सपान पुरं करनार हाय." धर्मेन्द्रच्या आवाजातला उत्साह पाहून तो खोटं बोलत नाही याची खात्री पटली होती त्रिंबककरला.
"सपान? माजं? त्येला कसं माहित माजं सपान? आनी त्यो कसापायी पुरं करनार त्ये?" त्रिंबककरला काय चाललंय तेच कळत नव्हतं.
"तुजं त्वांड गप करायला तुजं सपान पुरं करत्यो म्हनाय लागलाय." धर्मेन्द्रच्या आवाजात उतावीळपणा होता.
"बाबा, तुमचं स्वप्न अख्ख्या गावाला ठाऊक आहे. येता जाता सांगता तुम्ही प्रत्येकाला." राजेश हसत म्हणाला. त्रिंबककर लाजलाच.
"पन..." राजेश आणि धर्मेन्द्र त्रिंबककरशी बोलत असतानाच सावंत आला. नुसताच बसून राहिला. उत्सुकतेने तिथे थांबलेले दोघं उठले शेवटी. पिरता चहाचं निमित्त करुन उठली. आता सावंतने तोंड उघडलं.
"पॉईटवर येतो मी डायरेक्ट. मी काय पवाराला दगाफटका केलेला नाही. धडा शिकवला. पायावर निभावलं. ऐकंना किती समजावून सांगितलं तरी. किती दिवस सांगतोय जमिन विक पण नाय. चांगला रेट देतोय. तरी बापजाद्याची जमीन नाही द्यायची म्हणून हटून बसलाय. आता बरा आहे. पण महिना जाईल चालायला लागेस्तो. तुला पाहिलं मी लेका. पळालास कशाला?" थोडावेळ त्रिंबककर काहीच बोलला नाही. वाट बघून सावंतने पुन्हा तोच प्रश्न विचारला.
"घाबरलो." चाचरत त्रिंबककर म्हणाला.
"मीच आलो मागून तुझ्या. पवारासारखा धडा तुला पण शिकायचा आहे का?" हळूहळू सावतंच्या आवाजात मग्रुरी डोकावायला लागली. पिरता कधी एकदा चहा घेऊन येईल असं झालं त्रिंबककरला.
"नशीब डोक्यावर निभावलं." त्रिंबककरला आता सारं स्पष्ट आठवलं. सावंतनेच ढकललं होतं तर. काही न बोलता दात दाखवत ओशाळं हसत तो सावंतकडे बघत राहिला.
"तर तो पवार जमिन देईलच आता. पण आखडू बेणं आहे. जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत काय चान्स नाही घेणार मी.  तुझं स्वप्न पुरं करणार आहे मी."
"का?" पटकन त्रिंबककरच्या तोंडून गेलं.
"तोंड बंद ठेवायला. उद्या पंधरा हजार घेऊन जा. दुकान सुरु कर. गिरणीसाठी नंतर लागतील तसे देईन." तो पुढे काही बोलणार तेवढ्यात पिरता चहा घेऊन आली.
"तुजा पैका नको आमाला सावंता. या भानगडीत नाय पडनार आमी."
"वैनी, मोठी रक्कम आहे. पवार जाणार नाही पोलिसात याची खात्री आहे मला. तसा मला कसलाच धोका नाही तरी देतोय मी. विचार करा. त्रिंबककर संध्याकाळपर्यंत काय ते सांग. पैसा मिळाला की तोंड गप ठेवायचं." सावंत निघून गेला.

राजेश, धर्मेन्द्र परत आत येऊन बसले.
"पवारच्या जखमा गंभीर नाहीत. पण तुम्ही एकमेव साक्षीदार आहात. वेळ आलीच तर तोंड बंद ठेवण्यासाठीचा आकडा आहे हा." त्रिंबककरने चमकून राजेशकडे पाहिलं.
"तू पैका वाढवून माग. सावंत न्हाई म्हनायचा नाही. चान्स हाय हा चांगला बाबा.  सिरीमंत व्हता यिल आपल्याला. पंधरा हजारात दुकान नाय व्हनार" धर्मेन्द्र कुजबूजत बराचवेळ सांगत राहिला त्रिंबककरला. दोघांचं बोलणं राजेश शांतपणे ऐकत होता. त्यांचं बोलणं संपल्यावर त्रिंबककरने राजेशकडे पाहिलं.
"बाबा, असलं काही करायचं नाही." राजेशच्या आवाजात ठामपणा होता.
"घ्या वो बाबा तुमी. इतका पैका नायतर आपल्याला कोन देनार. काय करसील रं बाबानं पैका घेतला तर? " धर्मेन्द्रने गुरकावत राजेशला विचारलं.
"तू भरीला घालू नको बाबांना. आणि तसं केलंत बाबा तर तुमचा माझा संबंध संपला." त्रिंबककर राजेशकडे पाहत राहिला.
"आरं, आसं नको बोलू रं. इतका पैका हाडाची काडं केली तरी नाय गावायचा. लक्स्मी आली हाये दारात तर...."
"खोटं बोलायला इतका पैसा? जमिनीचे वाद आहेत त्या दोघांचे. पवारला कळलं की तो तुमचा जीव घेईल.  आणि दारु पिऊन कुठे बरळलात तर सावंत सोडणार नाही. एकदा अडकलात की पाय खोल रुतत जाईल. स्वप्न पुरं होणार नाहीच.  तुरुंगाची हवा खायला मिळेल. ते दोघं बाहेर आरामात वर तोंड करुन फिरत राहतील."
"पुडचं पुडं. आता ह्यो पैका दुकान सुरु कराय उपयोगी व्हईल. मी घेनारच हाय. इतका पैका मी कदी पायला नवता. आनि मिलायचा बी न्हाई." त्रिंबककर हटून बसला. धर्मेन्द्रचा त्याला पाठिंबा मिळत होता. शब्दाला शब्द वाढत गेला. कुणीच माघार घेईना. पिरता राजेशच्या बाजूने कचाकचा भांडत राहिली.  धर्मेन्द्र आणि त्रिंबककर एक झालेले. सगळे हमरातुमरीवर आले. रागाच्या भरात धर्मेन्द्रने राजेशला ढकललं. राजेशनेही तितक्याच जोरात त्याला ढकलंल. पिरताने पुढे होत दोघांनाही ढकलून दिलं. स्वत:ला सावरत राजेशने निर्वाणीचा इशारा दिला.
"बाबा, पुन्हा सांगतोय. मी निघून जाईन घरातून." राजेश जोरात ओरडला.
"जा." त्रिंबककर थरथरत म्हणाला. धर्मेन्द्रने राजेशला दाराबाहेर ढकललंच. राजेशच्या डोळ्यात आग पेटली. रक्त साकळल्या नजरेने तो  त्रिंबककरकडे पाहत राहिला. त्याला अडवू पाहणार्‍या पिरताला बाजूला करत राजेश घरातून बाहेर पडला. त्याच्यामागून पिरता धावली. धर्मेन्द्र आणि त्रिंबककरही  त्या दोघांच्या मागे धावले.

"कुटं जानार हायस? उगा आपलं मी निगून जाईन, निगून जाईन. कुटं जायाचं न्हाय..." त्रिंबककर त्याच्या पाठीमागून जात ओरडला. पण राजेश थांबला नाही. त्याची तरुण पावलं गावातल्या वाड्या ओलांडत राहिली. त्याच्या मागे धावून धाप लागलेला त्रिंबककर अखेर एका ठिकाणी थांबला. धर्मेन्द्र त्रिंबककरच्या बाजूला उभा होता. पिरता दोघांकडे बघत तिथेच उभी राहिली. दोघांच्या नावाने तिने तिथेच बोटं मोडायला सुरुवात केली. त्रिंबककर मात्र विचारात गढून गेला. राजेश गेलेल्या दिशेने पाहत. राजेश कुठे  जाईल? पिरता पण त्याच्यामागून गेली तर? ती जाणारच लेकाबरोबर. राजेशची शाळा?  येतील परत? कितीतरी वेळ तो तसाच उभा राहिला. मग त्याने ठरवलं,  नाही आले तर बोलवून आणू. तसंही दुकान आणि गिरण आयुष्य बदलून टाकेल. त्याच्या बदललेल्या राहणीमानाची खात्री पटली की येतील दोघं परत. तोपर्यंत धर्मेन्द्र असेल बरोबर. पण आता सावंतकडे जायचं. सावंतकडे गेलं नाही तर हातातोंडाशी आलेला घास जाईल. पिरताकडे  त्याने कटाक्ष टाकला, मागे राहिलेल्या घराच्या दिशेने त्याने नजर टाकली आणि राजेश गेला त्या फाट्याकडे बघत निश्चल नजरने तो बराचवेळ उभा राहिला.  अखेर निर्णयाचा खुंटा बळकट केल्यासारखी त्याने स्वत:ची पावलं सावंतच्या घराकडे वळवली. धर्मेन्द्रच्या चेहर्‍यावर आनंदाचं चांदणं पसरलं. लगबगीने त्रिंबककरच्या बाजूने तो चालायला लागला. दोघांच्या पाठमोर्‍या आकृत्यांकडे पिरता ताटकळल्यासारखी बघत राहिली आणि राजेश गेलेल्या पायवाटेवर तिने आपलं पाऊल टाकलं.






Thursday, November 8, 2018

Monday, November 5, 2018

दिवाळी आणि दिवाळी अंक


प्रत्येकाच्या मनात बालपणीची दिवाळी खोलवर रुजलेली असते. फराळ, फटाके, पहाटेच्या समयी पणत्यांचा मंद प्रकाश याबरोबरच मला आठवते ती दिवाळी अंकांची आतुरतेने केलेली प्रतीक्षा. दिवाळी अंक आमच्या नेहमीच्या वर्तमानपत्र विक्रेत्याला सांगून ठेवलेले असायचे किंवा दिवाळीच्या दिवशी फराळावर ताव मारून झाला की आम्ही वडिलांबरोबर अंक विकत आणायला जायचो. माहेर, आवाज, कथाश्री, अनुराधा असे काही अंक आठवतात. नंतर वाचनालयात जे मिळतील त्यावरही आम्ही तुटून पडायचो. त्यातल्याच दिवाळी अंकात कथा प्रसिद्ध होणं आणि त्यावेळच्या आमच्या आवडत्या लेखक - लेखिकांच्या पंक्तीत आपलंही काही असणं हा अनुभव अवर्णनीय आहे.

गेली काही वर्ष याचा अनुभव घेतेय. आणि यावर्षी तब्बल १२ दिवाळी अंकात माझ्या कथा आहेत. असं लिहिताना मनात येऊन गेलं, ’म्हणजे महिन्यात फक्त एकच कथा लिहून झाली?’ पण शब्दांचं, विषयांचं असंच आहे. एकदा आजूबाजूला घोटाळायला लागले की कागदावर स्थिरावेपर्यंत त्यांना धीर नसतो पण जवळपास यायचं नाही ठरवलं की फटकूनच वागतात, अस्वस्थ करत राहतात. चालायचंच. तर त्यापैकी काही छायाचित्र. आणि सर्व गोष्टींची अगदी थोडक्यात कल्पना. अंक मिळवून नक्की वाचा आणि अभिप्राय कळवा.

यावर्षी इतक्या अंकासाठी प्रथमच लिहून झालं आणि मेहता प्रकाशनाने माझा ’रिक्त’ कथासंग्रह प्रसिद्ध केला. त्यामुळे माझ्यासाठी हे वर्ष खूपच आनंदाचं ठरलं. तसंच तुमच्यासाठी उर्वरित हे आणि पुढील वर्ष आनंदाचं, इच्छापूर्तीचं जावो.

माझ्या कथा/लेख असलेले दिवाळी अंक
१. आवाज
२. श्री. व सौ.
३. सामना
४. प्रसाद
५. मेहता ग्रंथ जगत
६. कथाश्री
७. अनुराधा
८. कुबेर
९. अभिरुची
१०.माझा मराठीचा बोल
११. फ्रान्स महाराष्ट्र मंडळ
१२. बिगुल (लेख)

आवाज: आर्थर पार्क हा आमच्या गावातील भारतीय लोकांनी भरलेला भाग. तिथे काही वर्ष चोरांचा सुळसुळाट वाढलाय. अशीच एक नुकतीच झालेली चोरी आणि तिचा शोध घेणारा तरुण देखणा अमेरिकन पोलिस. तो पोलिस आणि भारतीय नागरिकांमुळे त्याच्या तपासकामात वाढलेला गोंधळ याची कथा - आर्थर पार्क

प्रसाद : न्यूयॉर्कमधील धडाडीचा तरुण वकील. वडिलांच्या पेशामुळे त्याच्याच वयाच्या मुलांकडून होणारी हेटाळणी आणि त्यामुळे वडिलांचीच आयुष्यभर लाज बाळगत आलेल्या आणि अचानक एका प्रसंगाने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेल्या परमजितची कथा - धुकं.

मेहता ग्रंथ जगत: दत्ता आणि मुक्ताच्या आयुष्यात सावत्र आई येते. मुक्ताच्या हृदयात ती सहज स्थान पटकावते. पण ’सावत्र’ या शब्दाच्या विळख्यात अडकलेला दत्ता तिला नाकारत राहतो. आणि अचानक कितीतरी वर्षांनी दत्ताच्या कृतीने तिघांचं अवकाश बदलतं. त्या घराची कथा - झाकोळ.

कथाश्री: सुलभा आणि अविनाशची एकुलतीएक मुलगी कांचन. एकेकाळी ज्या संकटातून अविनाशला जावं लागलं त्याच समस्येला कांचनलाही तोंड द्यावं लागतं. तोच प्रसंग तिच्यावर ओढवतो. हा प्रसंग तिला वडिलांबद्दल असलेल्या शंका, राग याबद्दल नकळत वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला भाग पडतो. कोणता हा प्रसंग आणि काय होतं पुढे? कथा - सुरुवात.

अनुराधा: दुकान, गिरण असं एक स्वप्न मनात बाळगत शिपायाचं काम करणारा त्रिंबककर, राजेश आणि धर्मेंद्र ही दोन टोकाचे स्वभाव असलेली त्याची मुलं. अचानक त्रिंबककरचं स्वप्न खरं होण्याची शक्यता निर्माण होते. पण... तो जो ’पण’ असतो त्यामुळे मुलगा, बायको एका बाजूला तर त्रिंबककर आणि त्याचा एक मुलगा दुसर्‍या बाजूला असं चित्र निर्माण होतं. होतं त्रिंबककरचं स्वप्न पुरं? की तो ’पण’ सर्वांनाच वेगळ्या दिशेला नेऊन सोडतो? कथा - दुकान, गिरण आणि...

बिगुल: कायद्याने अमेरिकेत समलिंगी विवाहाला मान्यता मिळालेली असली तरी यौवनावस्थेतील मुलांचं समलिंगत्व पालक स्वीकारत नाहीत. काय करतात ते यावर? त्यावर प्रकाश टाकणारा लेख. दुसरी बाजू.

श्री. व सौ. : वय नावाचं गौडबंगाल या अंकाच्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित कथा. वय वाढणं कुणाला चुकलंय? पण या वाढत्या वयाबरोबर होणारी मानसिक, शारीरिक स्थित्यंतरही कधीकधी ढवळून काढणारी ठरतात. कुणी यातून मार्ग काढतं, कुणी नकारात्मकताच घट्ट धरून राहतात. त्यावर आधारित कथा - पर्याय.

कुबेर: वरुण आणि त्याच्या मैत्रिणीच्या एका कृत्यामुळे आत्मघाती कृत्याकडे वळलेला त्याचा मित्र. वरूणला त्याच्या वागणुकीबद्दल न मिळालेली शिक्षा यामुळे उसळलेला जनप्रक्षोभ. या सार्‍या घडामोडींचा, तरुणांच्या मानसिकतेचा अभ्यास करणारे आलोक रॉय. असं काय केलं वरुणने आणि त्याच्या मैत्रिणीने? कथा - प्रारंभ.

सामना: एकमेकांपासून दूर गेलेल्या, कधीही भेट न झालेल्या बहिणी. अचानक एकीला दुसरीची भेट घ्यायची इच्छा होते. पण बहीण कुठे असते हे देखील ठाऊक नाही. होते दोघींची भेट? दुसरीला असते बहिणीला भेटायची इच्छा? त्या दोघींची आणि त्या दोघींच्या कुटुंबाची ही कथा - प्रवेश











Thursday, October 4, 2018

अक्कलखाती गेलेले पैसे परत कसे मिळवायचे?

आता अक्कलखात्यात गेले हे समजलं हेच खूप झालं. परत कसले मिळवताय असं म्हणाल तुम्ही. पण मिळवायचेच आहेत. प्रश्न पैसे गेल्याचा नाही फसवणूक झाल्याचा आहे. तर झालं असं,

गेली दोन वर्ष लमार नावाचा इसम आमचं गवत कापायला येतो. महिन्याचे पैसे मी त्याला एकदम देते. हल्ली हल्ली गवत वाढलेलं नसतानाही तो कापत होता. गवत नसेलच तर कापणार कसं हा प्रश्न मला पडतो लमारला नाही. त्यादिवशी अचानक यंत्राचा आवाज आला आणि भूकंप झाल्यासारखी मी दार उघडून बाहेर धावले. माझा वेगच इतका होता की लमारच्या हातातलं यंत्र धाडकन थांबलंच. तरी मी त्याला पुन्हा थांबवलं,
"थांब, थांब. गवत वाढलेलं नाही." लमारने मला वेड लागल्यासारखं माझ्याकडे पाहिलं आणि एक कोबीच्या गड्ड्यासारखा वाढलेला गड्डा दाखवला."
"हे गवत नाही. रान आहे. " मीपण त्याला वेड लागलंय असा चेहरा करत सांगितलं. दोघं वेडे एकमेकांकडे पाहत राहिले काहीवेळ. तो काही बोलत नाही हे पाहून मीच म्हटलं,
"एका झुपक्यासाठी तू अख्खी माती कापणार? गवत नाहीच वाढलेलं तर मातीच कापू असं ठरवून येतोस की काय? काय बुवा ही माणसं! पैशासाठी कापा आम्हाला." मी मनात बोललेलं त्याला समजलं. तो म्हणाला,
"ठीक आहे. मी पुढच्या आठवड्यात येतो." तो गेला आणि लमारला कसं झापलं, थांबवलं हा माझा पराक्रम मी घरात जाहिर करुन टाकला, आता तुमच्यापर्यंत पण पोचवतेय. उकळायला बघतात नुसते. थांबवलं नाही तर फसलातच तुम्ही वगैरे स्वगतं घरात आठवडाभर चालली आणि नंतर सुरु झाली प्रतिक्षा. गवत वाढवाढ वाढलं पण लमारचा मुखचंद्रमा नाहीसा झाला तो झालाच. पुन्हा अवतरलाच नाही आमच्या अंगणात.

आता...?
त्याला भरपूर निरोप पाठवले. लेखी. म्हणजे SMS हो. मग फोन केले. लमार महाशय फोन उचलत नाहीत म्हटल्यावर नवर्‍याला गळ घातली. त्याने
"तू असे आधीच कसे पैसे दिलेस?" एवढा एक प्रश्न विचारुन दुर्लक्ष केलं. त्यावर मी चार वाक्य ऐकवायला गेले.
"प्रत्येकवेळेला ४० डॉलर्सचा चेक नाहीतर रोख देत बसायचं?. तसं केलं असतं तर एकदम का देत नाहीस म्हटलं असतंस." पुढची दोन पूर्ण व्हायच्या आत,
"लमारमुळे आणखी एक वादाला निमित्तच सापडलं तुम्हाला" असा शेरा मारुन मुलगी आपल्या खोलीत निघून गेली. मग लमारशी बोलण्याऐवजी नवर्‍याने त्याला SMS धाडून दिला. तो कसला उत्तर देतोय. असे १५ दिवस गेले मग अनोळखी फोन वापरुन फोन केला आणि नवर्‍याच्या हातात दिला. लमारने हा फोन ताबडतोब उचलला. कोण बोलतंय कळल्यावर तो कसा अपघातात जायबंदी झालाय. येतोच पुढच्या आठवड्यात असं सांगत त्याने माझ्या नवर्‍याची समजूत घातली. इतकी की काही मदत हवी आहे का असं माझा नवराच त्याला विचारायला लागला. मी आपली इकडे १२० डॉलर्सच्या खाणाखुणा करत. फोन ठेवल्यावर नवरा म्हणाला,
"अपघातात जायबंदी आहे. जाऊ दे. उपचाराला होतील त्याला पैसे ते. सोडून दे."
"लमारला सोड तू. आम्हाला देतोस का तू सहज सोडून.." वगैरे मला अर्थात काढणं भागच होतं. ते झाल्यावर मी समजूतीने म्हटलं,
"पण तो खरंच जायबंदी आहे का ते शोधून काढ आधी. त्याने मला फसवलंय. अनोळखी फोन कसा उचलला? सरळसरळ थापा मारतोय." तो थापा मारतोय की नाही यावर आम्ही घनघोर चर्चा केली. मग श्रमपरिहार म्हणून मस्त बाहेर जेऊन आलो.

पुन्हा लमारची प्रतिक्षा सुरु. काही दिवस वाट पाहून काल त्याला निरोप पाठवला.
"BBB कडे तक्रार करते तुझी. सोशल मिडीयावर वाभाडे काढते तुझे." आता हे वाभाडे नक्की कसे काढायचे? लमारला ओळखणारं आहे कोण इथे :-).

जाऊ दे झालं. इतकं लिहिल्यावर उगाचंच १२० डॉलर्स मिळाले असं वाटायला लागलंय. म्हणजे काय तुमच्यापैकी कुणीतरी काय केलं की अक्कलखात्यात गेलेले पैसे परत मिळवण्याची युक्ती सांगेलच. नाही का?

Monday, September 10, 2018

नवरा म्हणजे!

नवरा म्हणजे नवरा असतो
अं, हं, बरं एवढंच बोलतो
त्याचंही ’काम’ आम्ही करतो
तेव्हा ’किती बोलतेस’ म्हणतो!

नवरा म्हणजे नवरा असतो
यादीतलं सगळं बाजारातच राहतं
कुरकूर केली की वैतागतो
कशाची किंमत नाही म्हणून गुरगुरतो!

नवरा म्हणजे नवरा असतो
कामावरुन आला की टी.व्ही. चा भक्त होतो
बायकोने पावलावर पाऊल टाकलं की
पोटातल्या कावळ्यांसारखंच कावकाव करतो!

नवरा म्हणजे नवरा असतो
कामांच्या नावाने पंचवार्षिक योजना असतो
नोकरासारखं वागवता म्हणत राहतो
आणि राजाच्या थाटात आराम करतो!

नवरा म्हणजे नवरा असतो...

Thursday, August 30, 2018

आई म्हणजे...

उद्या शाळा सुरु होणार
सुट्टी आता संपणार!
सुटीत कळलं आई म्हणजे काय असते
मला चिकटलेली पाल भासते!
आई म्हणजे आई असते
कटकट तिची संपणारी नसते!
उशीरा उठलं की किती झोपतेस
जागलं की किती जागतेस!
फोनचा वापर कमी कर सांगते
सांगायला फक्त फोनमधून डोकं वर काढते!
सारखी काय चिडतेस, बसतेस का जरा शांत
हेही ती आवाज चढवून, वैतागूनच विचारते!
मदत केली तरी धड नाही करत म्हणून सगळं स्वत:च करते
आणि कार्टी मदत करत नाही म्हणून कुरकूरत राहते!
शाळेची मी अधिरतेने वाट पाहते
पण आता मला आई हवी असते!
ती माझी आई असते, तिच्याशिवाय पान कुठे हलते!
तिची कटकट हेच माझ्यावरचं प्रेम असते, ते फक्त मलाच कळते! 

- मोहना जोगळेकर

Wednesday, July 4, 2018

रिक्त

कर्मभूमीचा जन्मदिन आज साजरा होत असतानाच माझ्या जन्मभूमीत आज माझा कथासंग्रह ’रिक्त’ मेहता
प्रकाशनने प्रसिद्ध केला!

ऋत्विक आणि पर्णिका नऊ महिन्यात कबूल केल्याप्रमाणे या भूतलावर अवतरले. दिवसांच्या बाबतीत केलं दोघांनीही थोडं  मागे पुढे.  पहिल्यांदाच असं करत होते म्हणून केलं माफ!  पण पुस्तकाचा जन्म म्हणजे कायमचंच गर्भारपण की काय असं वाटायला लागलं होतं. गर्भारपण निभावणार्‍या प्रकाशकांना इतकी पुस्तकं जन्माला घालायची असतात की त्यामुळे वर्ष सहा महिने मागेपुढे होत असावेत.  पुस्तकाने ’मी येत आहे’ असं म्हटलं की मी देखील, आलं, आलं करत पुस्तकाचा एकेक अवयव, म्हणजे मुखपृष्ठ मग मलपृष्ठ असं जे माझ्यापर्यंत पोचत होतं  ते सर्वांना दाखवत होते. मुलांना नाच करता यायला लागला, ती गाणं म्हणायला शिकली की  कसं पाहुण्यांसमोर आपण करुन दाखवायला लावतो. तसं मी माझ्या मुख आणि मलपृष्ठाला सर्वांसमोर नाचवलं. करता करता चक्क  पाना आणि अक्षरांसकट माझं नविन बाळ भूतलावर अवतरलं आहे. तुमच्या सहकार्यानेच ते वाढेल. तेव्हा नक्की वाचा आणि मला कळवा पुस्तकाबद्दल तुमचं मत. 

Monday, April 30, 2018

जाहिरात

आगामी डंख नाटकाची जाहिरात. एका जाहिरातीत दिसेल आमच्या नेपथ्यकारांची कम्माल तर दुसर्‍या जाहिरातीत कलाकारांचा सराव. नक्की पाहा दोन्ही जाहिराती आणि शार्लट, नॉर्थकॅरोलायनाच्या (Charlotte, NC) आसपास राहत असाल तर नाटक पाहायला या ही आग्रहपूर्वक विनंती. --








अभिव्यक्ती संकेतस्थळ - https://marathiekankika.wordpress.com/  (आधीच्या निर्मितीची झलक पाहता येईल.)